खेड शिवापूरवरून आत वळायचं आणि कुसगव ,साखर,अशी छोटी गावे पार करत खडकाळ आणि वळणावळणाच्या रस्त्याने दोन तास प्रवास केला की राजगडच्या पायथ्याशी असलेल्या भोर तालुक्यातील खेळदेववाडीला आपण पोचतो.शब्दशः डोंगराच्या कुशीत असलेले 150 वस्तीचे गाव.आज शिवरात्रीमुळे थोडे गजबजले होते .एरवी आता तिथे ज्येष्ठ मंडळीच असतात.तरुण सगळे कामासाठी बाहेर पडून पुण्यात वगैरे गेले आहेत.तिथे पोचल्यावर वाटाड्याच्या मागे विहिरीकडे जायला सुरवात केली खडकाळ ,चिंचोळा दरीत उतरून जावे असा रस्ता 15 मिनिटे चालल्यावर विहीर दिसली आणि चालण्याचे सार्थक झाले.इतिहासातील येसाजी कंक यांचे वंशज राजेंद्र कक यांनी विहिरीची जमीन गावाला अर्पण केली,गावकऱ्यांचे श्रमदान,ज्ञान प्रबोधिनीचे योगदान,व परसिस्टंट कंपनीचे अर्थदान यातून पुढील 15 वर्ष पाणी साठवू शकेल अशी मोठी विहीर बांधण्यात आली.तिचा आज लोकार्पण सोहळा झाला.घराघरात आता विहिरीचे पाणी नळाने पुरवले आहे व स्त्रियांच्या डोक्यावरचे 3-3 हंडे खाली आले.तोपर्यंत इथल्या बायका रोज सकाळी 3 हंडे घेऊन 5-6 खेपा व संध्याकाळी 2 पाण्यासाठी खेपा घालत होत्या. एक खेपेला किमान पाऊण तास !! आज सगळयांच्या चेहेऱ्यावर घरात पाणी आल्याचा आनंद होता.
मीनाताईंनी विहीर लोकार्पण पूजा सांगितली, मी सभेची अध्यक्ष होते व परसिस्टंट चे केदार परांजपे प्रमुख पाहुणे होते.सुनीता ताई,विवेकदादा,देशपांडे काका,प्रदीप,तन्वीर,ऋतुजा अशा सगळ्यांचा यात सहभागी होता.
अशा कार्यक्रमांना गेले की प्रबोधिनीच्या कामाची खोली अधिक समजून येते.