१७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेले शेवटचे प्रवचन

परी पद्य रूपी उरावे … आपण गातो ती लताताईंची पद्ये
- शतशरदांस्तव स्वीकारा ही…
- हे आनंदी गाणे
- हे विश्वात्मक
- हे कर्मयोगिन्
- शिवभूमी आजला नवेच लेणे ल्याली
- आज त्यामुळे कृतार्थ जीवन
- धून – हिंदूराष्ट्र देवते
- ध्येयाचा सुगंध…
लता ताईंच्या काही चित्रफिती
पूर्ण वेळ कार्यकर्ता कसा असावा ? – लता ताई
नवनवरात्र निमित्त ‘प्रबोधन गीतांचा अभ्यास’ या अंतर्गत ५ गीते निवडून त्यावरील गटाला समजलेल्या अर्थाची मांडणी करायची होती. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या दोघेही हवे या गीताचा अर्थ त्यांच्याकडून समजून घेतला होता..
लता ताईंबद्दल दैनिक विवेक मध्ये आलेला लेख.
लताताईंना सत्तरी निमित्त लिहिलेली पत्रे
लता ताईंबद्दल कार्यकर्त्यांची मनोगते
सुभाषराव देशपांडे
पुन्हा नाही भेट…
गेल्या गुरुवारी सकाळी १०:३० ची वेळ. सोलापुरातल्या हरे कृष्ण सोसायटीच्या ६ व्या मजल्यावर एका आरामखुर्चीत अवघडून त्या बसल्या होत्या. चेहरा हसरा ठेवायचा असा आतून कृतनिश्चय असावा. मी आणि आशुतोष खोलीत गेल्यावर नमस्काराने स्वागत. प्रेषिताचा संदेश हे खलिल जिब्रानचे आणि गीतांजली हे रवींद्रनाथांचे अशी त्यांनी भाषांतरित केलेली पुस्तकं मध्यंतरी त्यांनी मला सस्नेह पाठविलेली. देवचाफे हा त्यांचा काव्यसंग्रह मागेच दिला होता. आशुतोष ला क्रांतिताईंनी ही तीनही पुस्तके दिली आणि मग वाग्शारदेचं क्षेमकुशल मी विचारत आणि पाहात राहिलो.
एकत्र केलेल्या डेहराडून वाऱ्यांच्या आठवणी निघाल्या अन् विमलाजी ठकारांच्या शिबिरापर्यंत पोहोचलो. सोलापूरला मी १९८१ मध्ये घेतलेली पहिली बैठक त्यांच्या लक्षात होती. सुमारे २०-२५ मिनिटे विविध विषय झाले. थकवा जाणवू लागला.
मी म्हणालो, तुमच्या सारख्या आध्यात्मिक व्यक्तीला मी काय सांगणार की धीरानं घ्या म्हणून. हसल्या. म्हणाल्या , आजाराचं स्वरूप कळल्यावर मलाही धक्का बसला. काही जाणवलं नाही असं म्हणणं दांभिकपणाचं ठरेल. पण ठीक आहे. लोकांचं उदंड प्रेम लाभलं आहे मला.
पुन्हा सोलापुरात आलात, की जरूर या….
आज पहाटे ती वार्ता कळली. चैतन्याचा अंश चैतन्यात विलीन झाला.
आता पुन्हा नाही भेट….
सुभाषराव देशपांडे
हेमाताई अंतरकर
‘विश्वाचे आर्त…’
शहा सरांनी चष्म्याआड बोट घालून डोळे टिपले. ते पुन्हा एकदा भर वर्गात भावुक झाले होते.
“ कशी ही मुलगी? क्लासला पण येत नाही! दुसरेच उद्योग करत बसते. नियमित आली तर महाराष्ट्रात पहिली येईल. … पण नाही!”
‘त्या’ मुलीशी – म्हणजे लताशी – माझी पहिली गाठ पडली ती अशी : आमच्या लाडक्या शहा सरांच्या साउंड ट्रॅकवर.
शहा सरांच्या आग्रहावरून डे. जि. भावे स्कूलमधली आम्ही नववीदहावीतली मुलं महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या प्रबोध, प्रवीण वगैरे हिंदीच्या परीक्षांना बसायचो. खूप कळकळीनं शिकवायचे सर. त्यांच्या शिकवण्यातली वाक्यंच्या वाक्यं अजून कानात गुंजतात, इतकं सुंदर शिकवायचे. त्यामुळे मी सकाळच्या शाळेत असले तरी पुन्हा संध्याकाळी शाळेत येऊन त्यांच्या क्लासला हजेरी लावायची. अशा व्याख्यानांची पर्वणी सोडून दुसरीकडेच भुरकळणारी, सरांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ही दुपारच्या शाळेतली सुंदरी आहे तरी कोण?… माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
मग हळूहळू तिचे ‘दुसरेच उद्योग’ समजायला लागले. ती तरी काय करणार? नाट्यवाचन स्पर्धेत ‘वऱ्हाडी मानसं’ मधला वऱ्हाडी लहजा पकडण्यासाठी बाईंना तीच हवी असायची. वक्तृत्व स्पर्धेत फड दुसरं कोण गाजवणार? तीच पाहिजे! आणि कॅलेस्थेनिक्समधे मानवी रांगांमधे रंग भरून मैदान गाजवायलाही तिच्याशिवाय पर्याय नाही. कुणाकुणाचे डोळे टिपणार बिचारी?
पुढे लक्षात आलं – दुसऱ्यांच्या डोळ्यांतल्या पाण्याशी या मुलीचा बराच गहिरा संबंध आहे.
मोठेपणी कॅलेस्थेनिक्सची जागा अध्यात्मानं घेतली आणि शहा सरांची जागा ज्ञान प्रबोधिनीच्या अप्पांनी घेतली. ती अध्यात्मात वाहून गेली तर प्रबोधिनीचं समाजकार्य बाजूला पडेल अशी काळजी त्यांना पडायची. पण तिनं जसे प्रबोध परीक्षेत अव्वल मार्क मिळवून शहा सरांचे पांग फेडले, तशीच प्रबोधिनीचं कार्य वाढवून अप्पांच्या अश्रूंचीही फुलं केली. कोणत्याच आघाडीवर ती कमी पडली नाही.
लताची आणि माझी मैत्री किती दीर्घ ? प्रबोधिनीत काम ती वयाच्या सतराव्या वर्षापासून करते आहे. शहा सरांच्या वर्गात (अखेर एकदाची! ) ती उगवली तेव्हा पंधरा वर्षांची असेल. प्रबोधिनीचं काम आम्ही बारा वर्षं सतत बरोबर केलं – अगदी एकाच विभागात मात्र नव्हे. आणि मग माझ्या बाजूनं -अधूनमधून खंड पडत – ते आजतागायत कमीअधिक प्रमाणात चालू आहे. लताची मैत्री मात्र अखंड चालू आहे.
प्रबोधिनीतल्या तिच्या कामाचा पैस फार मोठा आहे. संघटनकार्याचं बाळकडू तिला घरातच मिळालं होतं. तिचे आई-वडील संघाच्या आणि समितीच्या कार्यात रमून गेलेले होते. घरी कार्यकर्त्यांची उठबस चालू असायची. बापूसाहेब ‘तरुण भारत’चे संपादक असल्यामुळे साहित्यगुण लताच्या डीएनएमधेच जडवले गेले असणार. तिला घडवायला मात्र त्यांना वेळ देता आला नाही फारसा.
असं हे स्वयंभू रत्न अप्पांच्या हाती लागलं आणि त्याचं मूल्य ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. युवती विभागातल्या जबाबदाऱ्या ते तिच्यावर सोपवत गेले आणि ती स्वभावगत निष्ठेनं, परिश्रमपूर्वक त्या पार पाडत गेली.
सतरा-अठराच्या वयातच तिला ज्ञानेश्वरीची गोडी लागली होती. अवघड आणि विद्वत्ताप्रचुर असं लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य तिनं जिज्ञासेनं वाचून काढलं होतं. तत्त्वज्ञान हा तिच्या आवडीचा विषय होता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या सगळ्याच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. फ्रेंचच्याही परीक्षांचा अभ्यास तिनं सुरू केला होता. वृत्तबद्ध काव्यरचना ती लीलया करू शकत असे. (आजही दिलेल्या विषयावर, दिलेल्या मुदतीत ती अत्यंत सुंदर आणि आशयघन रचना करून देते – अगदी हुकमीपणे!) युवतींच्या वैचारिक बैठकी घेणं, क्रीडा-दलं चालवणं, प्रबोधवर्गात शिकवणं हे दैनंदिन उपक्रम चालवताचालवताच ती अप्पांना विविध संस्कारांच्या पोथ्यांची रचना करण्यासाठी मदत करू लागली. आणखीही काही विद्वान लोक त्या उपक्रमात सहभागी होते. त्या कामासाठी त्या तरुण वयातही ती सर्वथा पात्र होती. तेवढी प्रगल्भता तिच्यापाशी होती. संस्कारांमागची धार्मिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी तिला जाणून घेता येत असे. त्या विधींमधलं काव्य तिला भावत असे आणि ते मराठीच्या कवेत आणायला तिला प्रयास पडत नसत. आजही आपल्या संस्कारपोथ्या वाचताना त्यांतलं भावसौन्दर्य जाणवल्याखेरीज राहात नाही.
ह्या पोथ्यांचा उपयोग करून वेगवेगळ्या संस्कारांचं पौरोहित्यही ती करू लागली. आधुनिक जीवनसरणीतल्या एका तरुण युवतीनं अशी जबाबदारी घेणं सोपं नव्हतं. लोकांच्या श्रद्धा आणि भावना ह्या विधींशी जोडल्या गेलेल्या असतात. लता सहृदयपणे त्यांच्याशी समरस होत असे. संस्कारांचा अर्थ समजून देतादेता त्या त्या घरच्या परिस्थितीनुसार योग्य ते समुपदेशनही करत असे. त्यामुळे अनेकांना आपल्या कार्यांचं पौरोहित्य तिनंच करावं असं वाटत असे. अमेरिकेत तर अशा विधींमधून तिनं अनेकांची हृदयं प्रबोधिनीशी जोडली.
स्वभावत: एकांतप्रिय असूनही हा अनेकांची अंतरे राखण्याचा आणि जोडण्याचा वसा लतानं सदैव मन:पूर्वक जपला. सुरुवातीपासूनच तिच्या परिचयातल्या अनेकांना तिनं प्रबोधिनीच्या वर्तुळात सहजपणे आकर्षून आणि सामावून घेतलं आहे. काही व्यक्ती तर इतक्या भिन्न प्रवृत्तीच्या असत की, त्यांचं पाऊल प्रबोधिनीत पडलंच कसं असा प्रश्न पडावा.
सहजपणे आठवतं ते उदाहरण सिस्टर निष्ठा ह्यांचं. ह्या फ्रेंच मिशनरी बाई आम्हाला फ्रेंच शिकवत असत. बहुधा आमची ओळख आलियांस फ्रॉन्सेज ह्या संस्थेच्या कार्यक्रमात झाली असावी. इंग्रजी फारसं बोलू न शकणाऱ्या ह्या बाई प्रथम लताच्या घरी राहायला आल्या आणि मग प्रबोधिनी हेच त्यांचं घर बनून गेलं. त्यांच्या दुव्यामधून मग अनेक फ्रेंच मंडळी प्रबोधिनीशी जोडली गेली. वर्षारंभ, वर्षान्त अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू लागली. त्यांची संख्या एवढी वाढत गेली की मग आपल्या पोथ्यांचा फ्रेंचमधे अनुवाद करण्याची वेळ आली. आपली कार्यवृत्तं आमच्या मदतीनं त्या फ्रेंचमधे भाषांतरित करून द्यायच्या. विविध उपक्रमांचे प्रस्ताव फ्रेंचमधून सादर व्हायला सुरुवात झाली आणि फ्रान्समधून प्रबोधिनीसाठी मदतीचा ओघ चालू झाला. सिस्टर निष्ठांना साहाय्यिका आणि दुभाषी म्हणून बरोबर नेऊन अप्पांनी फ्रान्ससह युरोपचा यशस्वी दौरा केला.
सिस्टर निष्ठांबद्दलची बातमी काही वर्षांपूर्वी कानावर आली ती, त्यांनी काश्मीरच्या थोर समन्वायक संत लालदेड ह्यांच्यावरच्या एका नाटकाचा फ्रेंचमधे अनुवाद केल्याची! मिता वसिष्ठ ह्या माझ्या मैत्रिणीनं ते नाटक दिग्दर्शित करून त्यात लालदेडची भूमिका केली होती.
एका परभाषी, ख्रिश्चन मिशनरी स्त्रीला आपलंसं करून तिच्या दुव्यामधून एवढा कार्यविस्तार साधणं, तिला आपल्या देशाच्या सुखदु:खांशी इतकं समरस करून घेणं ही फारच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. लतानं अप्पांच्या साथीनं ती साधली, हे एक विलक्षणच कर्तृत्व.
अप्पांनी आणि अण्णांनी इतरही अनेक क्षेत्रांमधून प्रबोधिनीशी जोडलेल्या अनेक थोर व्यक्तींशी लतानं घनिष्ठ आपुलकीचे संबंध निर्माण केले. श्री. श्रॉफ, श्री. कारिया, श्री. आचार्य ही त्या काळातली आठवणारी आणखी काही नावं. प्रकाश आमटे, वीणा देव, विजय सरदेशमुख, ह्यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींपासून ते दादा कानडे, श्रीनिवास कुलकर्णी, हेमाताई होनवाड वगैरे कामसू व्यक्तींपर्यंत असंख्य लोकांना तिनं प्रबोधिनीच्या परिवारात सामावून घेतलं आहे.
पंजाब दौरा, राजस्थान दौरा, ‘आशा इज होप’ हा कार्यक्रम, प्रज्ञा मानस संशोधिकेचे उपक्रम अशी पुण्यातली कित्येक कामं यशस्वी केल्यानंतर १९८९ मधे लतानं सीमोल्लंघन केलं. तिची नेमणूक अण्णांनी सोलापूरची अवंतिकाबाईंची शाळा चालवण्यासाठी केली. सोपवलेल्या कामाला नकार देणं लताच्या रक्तातच नाही. खऱ्या कार्यकर्तीच्या आज्ञांकितपणे तिनं ही जबाबदारी स्वीकारली. पुण्यातलं बसलेलं बस्तान उठवून एका परक्याच गावात स्वत: नव्यानं रुजायचं आणि नव्या कामाची एकहाती पायाभरणी करायची, हे अवघडच म्हणायचं. आम्ही गमतीनं म्हणत असू की लता आता सासुरवाशीण झाली! (पुढे अण्णांनीही तिला भरपूर सासुरवास केला! त्यांच्या कठोर शिस्तीला अनेकजण वैतागत असत. पण लता त्यांच्या कसोटीला पुरेपूर उतरली. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ ह्या बाण्यानं, आत्यंतिक सोशिक वृत्तीनं ती कामाचे ढीग उपसत राहिली. ) खरोखरच सासरी गेलेल्या मुलीनं खाव्या तशा अनेक खस्ता खाऊन, विविध मंडळींची मर्जी प्रयत्नपूर्वक संपादन करून, चिकाटीनं काम करून तिनं अवंतिकाबाईंच्या शाळेचं खऱ्या अर्थानं प्रबोधिनीकरण केलं. शाळेचे पूर्वीचे समर्थक व्यवस्थापन बदलल्यामुळे साशंक असायचे. त्यांचा विश्वास तिनं संपादन केला एवढंच नव्हे, तर द्विगुणित केला. शाळा अधिक नावारूपाला आणली आणि उत्तम सहकारी मिळवून साखरशाळा, प्रौढ साक्षरता वर्ग असे अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले.
हराळी हे महाराष्ट्राच्या नकाशातलं एक ठिपक्याएवढं गाव. अण्णांनी त्याच्या भौतिक प्रगतीचा पाया घातला. अनेक सोयीसुविधा, हिरवे मळे आणि शाळा उभारून तिथे कार्याचं रोपटं लावलं. लतानं अलौकिक आपुलकीचा ओलावा शिंपून हे रोप बहराला आणलं. इतक्या कोपऱ्यातल्या ह्या दुर्गम गावाकडे अनेकजण आज खेचले जातात ते लताच्या व्यक्तिमत्त्वातल्या सात्त्विक आकर्षणामुळे; इथे उभारल्या गेलेल्या कामाच्या सचोटीमुळे आणि त्यात सहभाग म्हणजे आयुष्याची खरी कृतार्थता हे मनोमन जाणवल्यामुळे.
एवढंच करून आयुष्याचं सोनं झालं, असं मानती तर ती लता कसली? प्रबोधिनीचा एवढा प्रचंड कार्यभार सांभाळत असताना तिची अध्यात्मसाधनाही दमदारपणे चालू होती. एकाच व्यक्तीला दोन भिन्न क्षेत्रांमधे एवढी उंची गाठता यावी, एवढी लोकमान्यता लाभावी ही किती दुर्मिळ गोष्ट आहे!
मला तिच्या अध्यात्मसाधनेचा प्रवास अजून पुरता जाणून घेता आलेला नाही. त्याचे काही कवडसेच हाती लागल्यासारखे वाटतात. तिचं अध्यात्म पोथीबद्ध नाही; ती ते आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते, हे मला जाणवलेलं आहे.
लताची रसाळ आध्यात्मिक प्रवचनं मी जिवाचे कान करून ऐकली आहेत. तिचा भर विद्वत्तापूर्ण विश्लेषणावर नसतो. घटपटाच्या लटपटी करायला तिला आवडत नाही, तर लोकांनी खरोखर साधना करून अलौकिक शक्तीचा प्रत्यय घ्यावा ही तिची तळमळ असते.
आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या मजरुह सुलतानपुरी, शैलेन्द्र, लता, रफीसारख्या प्रतिभासंपन्न कलावंतांना गीतं परिपूर्ण वठवण्याचे निकष आपोआपच गवसले आणि त्या निकषांवर उतरणारं लेखन-गायन स्वयंभूपणे त्यांच्या लेखण्यांमधून किंवा गळ्यांतून अवतरलं. कुणाला त्यांना काही शिकवावं–पढवावं लागलं नाही. लताची प्रवचनकला हाही तितकाच उत्स्फूर्त, स्वयंप्रज्ञ आविष्कार आहे. आतला प्रकाश बाहेर फाकायला निमित्त शोधत होता, इतकंच. पुण्यातल्या सुविद्य आणि जाणकार श्रोत्यांनाही तिचं विवेचन समाधान देऊन जातं आणि बारामतीतल्या अशिक्षित बायांनाही तिच्या अंतरीचे बोल आयुष्याची लढाई लढायला बळ देतात.
आमच्या सहप्रवासातले काही झळाळ सहजपणे आठवणीच्या जाळ्यात गवसतात. तेच इथे सगळ्यांसह वाटून घ्यावे म्हणते.
प्रथम फर्ग्युसन आणि नंतर स. प. महाविद्यालयात आम्ही अनेक उपक्रमांत बरोबर भाग घेतला आहे – साहित्य सहकारमधल्या मैफली; सॉक्रेटिस क्लबमधले वादविवाद; वर्गप्रतिनिधीच्या निवडणुका; ‘डॉक्टर झिवॅगो’, ‘गॉन विथ द विंड’, ‘शहीद’ ह्यासारख्या चित्रपटांचा आस्वाद; ‘ऋतुचक्र’, ‘द लास्ट टेम्टेशन ऑफ ख्राइस्ट’, ‘चित्रलेखा’, ‘सावित्री’, ‘फाउंटन हेड’ सारख्या असंख्य पुस्तकांवरच्या चर्चा; मोहन रानड्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरची सभा; १९७१ मधे ढाका पडल्यानंतर एकमेकींना फोन करून साजरा केलेला आनंद; कॉलेज- युवकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली विजययात्रा; इंदिरा गांधींची रेस कोर्सवरची विराट सभा आणि तिथून घरी येताना बस न मिळाल्यामुळे करावी लागलेली पायपीट; काळ्याकुट्ट रात्री प्रबोधिकांना घेऊन शिवापूरच्या दिशेनं हसतखेळत केलेली वाटचाल; कितीतरी शिबिरं; स्वत:पाशी प्रावीण्य नसतानाही युवतींकडून बिनचूक करून घेतलेली हॉकी, भालाफेक वगैरे क्रीडांची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं; ग्यानबा तुकारामांचा वारीबरोबर केलेला गजर; निवासी शिबिरात निधडेपणानं रांधलेल्या पाककृती…
एकत्र गप्पा मारतामारता आपापल्या आवडत्या कवीच्या एखाद्या कवितेची आवेगानं आठवण यावी आणि प्रत्येकीनं स्वतंत्रपणे (आणि एकसमयावच्छेदे!) त्या वेगवेगळ्या कविता म्हणत (की बरळत?) सैराट येरझारा घालू लागावं, अशी झपाटलेली काव्यसंमेलनं आम्ही मैत्रिणींबरोबर साजरी केली आहेत. कवितेप्रमाणेच कामाचीही नशा एकत्र अनुभवली आहे. चांदण्या रात्री राजगडावर स्वारी करण्यातला थरार अनुभवला आहे. पंजाब दौऱ्यात प्रसंगी आंघोळ न करणं हीसुद्धा कशी देशसेवा ठरू शकते, त्याचा अनुभव घेतला आहे. प्रबोधिनीच्या कामाच्या अतिरेकावरून एकमेकींच्या घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. एकमेकींच्या घरच्या मंगल आणि शोकसिक्त प्रसंगांत सहभागी झालो आहोत. एकमेकींची आजारपणं आणि उदास मनोवृत्त्या निस्तरल्या आहेत. ‘सर देईन, परि सार न देईन’ ह्या ओळींचा इंग्रजी अनुवाद करण्यातला वैताग एकत्र अनुभवला आहे … आणि ‘ I shall give my head, but not my soup!’ अशी गर्जना करून तो संपवलाही आहे! वर्षारंभ उपासनेतली परब्रह्माची कल्पना कुणा फ्रेंच युवतीला तिच्या भाषेत समजावून देताना आम्हाला ब्रह्मांड आठवलेलं आहे. अप्पा-अण्णांच्या आजारपणातले चढउतार हातात हात घेऊन सहन केले आहेत. …
‘कसा करावा आपुल्या
देण्याघेण्याचा हिशेब?
रत्नखचित रातीचे
खाली झुकलेले नभ ..’
-शब्द दुसऱ्या कुणाचे? तिचेच… ऐन वेळी मदतीला धावून आलेले!
फार पूर्वीच जाणवलं होतं की, ह्या मुलीपाशी इतरांना रडवण्याचं दुर्मिळ सामर्थ्य आहे! चुंबकानं लोखंडाचे कण खेचून घ्यावेत, तसे हिला लोकांच्या डोळ्यांतले अश्रू आकर्षून घेता येतात. हिच्या सहृदय मार्दवात दुसऱ्यांच्या शल्यांचा आपोआप निचरा होऊन जातो. ‘ जी में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहें, रोते रहें ’ … ही उत्कट गरज कुणाला नसते? पण अश्रूंनी भिजवायला पदरही तितकाच मायाळू आणि आश्वासक असावा लागतो. कुचेष्टा होणार नाही, कुठे उगाच बभ्रा होणार नाही ह्याची हमी असावी लागते. आपण आपल्या हक्काच्या घरी आलो आहोत असा दिलासा हवा असतो. आणि नंतर प्रसन्नतेच्या इंद्रधनुषी कमानीखालून आपला प्रवास पुन्हा धीरानं चालू राहील ह्याची ग्वाहीसुद्धा.
‘ मैं भी क्या चीज़ हूँ, खाया था कभी तीर कोई
दर्द अब जाग उठा, चोट लगे देर हुई
तुम को हमदर्द जो पाया, तो मुझे याद आया
के मेरे दिल पे पड़ा आ था कोई ग़म का साया …’
ही मजरूह सुलतानपुरीची अनुभूती तिच्यामुळे तिच्या अनेक सुहृदांना आली.
मीनाकुमारीवरचं गाणं आलंच आहे ओठावर, त्यामुळे वाटतं; तिच्याप्रमाणेच लता ‘मैं चुप रहूंगी’ बाण्यानं, आपल्या पोळलेल्या मौनावर आपणच फुंकर घालून समजूतदारपणे जगली. आणि आपल्या सर्वांच्या वाट्याला तिचं पौर्णिम बोलणंच फक्त यायला हवं, ह्याचंही समंजस भान तिला तुलनेनं लहान वयातच आलं. असाध्य सहनसिद्धी तिला खूप सहजसाध्य झाली होती.
दुसऱ्याचं दु:ख किंवा समस्या जाणायला खूप संवेदनशीलता लागते आणि ते दूर करायला खरी कळकळ आणि अंतर्दृष्टी असावी लागते. नुसतं कोरडं विश्लेषण आणि मानसशास्त्रीय चिरफाड पुरी पडत नाही. प्रत्येक जिवाबद्दल खरी आस्था असावी लागते. तिच्या वागण्यातून ती सतत जाणवते. समोरच्या साध्यातल्या साध्या माणसालाही ती आदरानं वागवते, तो महत्त्वाचा आहे ह्याची त्याला जाणीव देते. मुख्य म्हणजे तिची आस्था माणसांपुरतीच मर्यादित नाही किंवा प्रबोधिनीच्या उंबरठ्यापाशीच थबकलेलीही नाही.
देशांतर करून हराळीला आलेलं कासवाचं पिल्लू एखाद्या संध्याकाळी एकटं, उदास व्हायचं. ते ओळखून ती इतर उद्योगांतून वेळ काढून, त्याला उचलून घेऊन, त्याच्या गळ्याखाली खाजवून त्याला दिलासा द्यायची. एखाद्या कार्यक्रमात दृष्टी अधू असलेल्या एका कार्यकर्तीकडे गायनाची जबाबदारी असायची, पण तिला मंचावर आपलं स्थान घेताना अडचण आली तर ती लक्षात येऊन झट्कन तिला हात द्यायचं भान हिलाच असायचं. अप्पा- अण्णांच्या आजारपणात तिचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असायचं. अण्णांच्या बाबतीत तर धोक्याची जाणीव वेळीच होऊन तिनं दक्षता घेतली आणि वेळ निभावली, असं अनेकदा झालं.
माचणूरला ती एकांतसाधनेसाठी गेलेली असताना संसारात पिचलेली एक सामान्य, अशिक्षित बाई तिला सामोरी गेली. तिच्या सर्व भल्याबुऱ्या वैशिष्ट्यांसह हिनं तिचा पत्कर घेतला तो कायमचा – अगदी कायदेशीर बाबींची पूर्तता करून. तिच्या उपजीविकेसाठी हिनं स्वत:च्या पदराला खार लावून घेतला.
हराळीतल्या अनेक बायांची दुखणीखुपणी सहानुभूतीनं जाणून घेऊन ती ओळखीतल्या डॉक्टरांकरवी त्यांच्यावर अल्प खर्चात उपचार करवून देते.
शाळेपासूनच्या अनेक मैत्रिणींचे हात प्रबोधिनीच्या दैनंदिन धबडग्यात खरं तर सुटून जायचे. पण तिनं ते सुटू दिले नाहीत. देश-परदेशात, सत्संग परिवारात, जिथे कुठे कामाला जाईल त्या गावांत नवे, जिव्हाळ्याचे संबंध रुजवून जिवाच्या शर्थीनं तिनं ते सारे रेशमी धागे आजतागायत जपले आहेत. इतक्या सहजपणे हे बंध तिनं गुंफले आहेत की, हा एक चमत्कार आहे ह्याचंही भान कुणाला राहू नये.
कॉलेजच्या वयात बरोबरच्या कवी–कवयित्रींच्या कविता, त्यांचा साहजिक संकोच बाजूला सारत आग्रहानं वाचायला मागायचा आणि त्यांच्यावर सविस्तर, समतोल अभिप्राय द्यायचा तिचा शिरस्ता होता. आजही तरुण कवींच्या बाबत तेवढीच जिवंत उत्सुकता तिला असते.
सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला तिनं केवळ स्पर्श केला आहे असं नाही; तर ते अधिक खुलावं-फुलावं, सार्थकी लागावं ह्यासाठी ती सहजस्फूर्तीनं, एखाद्या कुशल माळ्याप्रमाणे प्रयत्न करत आली आहे. दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या पण अध्यात्माचं देणं देण्यासाठी तळमळणाऱ्या एखाद्या मैत्रिणीकडून तिनं कोणत्यातरी मौलिक पुस्तकाचा अनुवाद करून घ्यावा आणि त्याच्यावर आवश्यक ते संस्कार करून हर प्रयत्नानं तो प्रकाशित करावा. आणखी कुणाचा साहाय्यकाअभावी रखडलेला संशोधन प्रकल्प वेळात वेळ काढून आणि जिवाच्या पलिकडे काम करून मार्गी लावावा. एखादीचे साहित्यिक गुण हेरून तिला लिहायला उत्तेजन द्यावं. कुणाचा एकटेपणा लक्षात घेऊन तिच्या शस्त्रक्रियेसाठी सोबतीला धावून यावं. कुणाच्या जीवनक्रमाचा प्रवाह प्रिय व्यक्तीच्या व्याधी-वार्धक्यामुळे खंडित होत असेल, तर तिची जबाबदारी स्वीकारून तो पुन्हा वाहता-खेळता करून द्यावा. … अनेक परींनी अनेकांच्या जिवाला खरा विसावा द्यावा – आणि हे सारं करून अलिप्त, नामानिराळं राहावं. कसलं श्रेय हाताला चिकटू देऊ नये.
तिच्या अशा गुणांचा गंध तिच्या सहवासात आलेल्या अनेक माणसांमधेही दरवळताना दिसतो, आणि ह्या सहजपणे घडून येणाऱ्या परागीभवनाचा विस्मयभरित आनंद होतो. ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ ह्या संतलक्षणाचा प्रत्यय अशा वेळी येतो.
‘ फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख
रस गळे, करी चोच लालसर डंख
अशी पांखरून छाया, लावोनिया माया
आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया?’
ह्यातल्या आनंदाच्या आसवांशीदेखील तिचं जवळचं नातं आहे. मधे अनेक मैलांचं अंतर असलं तरी तिच्या प्रेमाची पाखर जाणवून जाते. त्याची कंपनं जाणवत राहतात.
२०१५ साली पुण्यात अनेकांना झाली, तशी मलाही चिकुनगुनियाची बाधा झाली. लता तेव्हा पुण्यात होती. तिलाही चिकुनगुनिया होऊन गेलेला असल्यामुळे त्या आजारात माणूस किती असहाय्य, परावलंबी होतो; त्याला किती वेदना होतात; हालचाल किती अवघड होते ह्याची तिला पुरेपूर कल्पना होती. माझ्याकडे राहून माझी शुश्रूषा करण्यासाठी तिचा जीव तळमळत होता. तर तिला पुन्हा बाधा होऊ नये, स्वत:चीच तब्येत नाजुक असताना तिनं माझ्यासाठी ताण घेऊ नये म्हणून मी तिला न येण्यासाठी विनवीत होते. अनेक जबाबदाऱ्या अंगावर असल्यामुळे शेवटी तिला माझं ऐकणं भाग पडलं.
फोनवर आमचं असं संभाषण झाल्यानंतरची गोष्ट. थोड्याच वेळात इमारतीत खालीच राहणारे आमचे सज्जन डॉक्टर, मी त्यांच्याकडे जाण्याची वाट न बघता स्वत:च उठून मला तपासायला आले. मला सूचना आणि औषधं देऊन ते निघून गेले. त्यानंतर बसल्या जागीच माझं ध्यान लागल्यासारखं झालं. मला अतिशय शांत, निवांत, स्थिर आणि विश्रांत वाटलं. विश्रब्ध वाटलं. ह्याचा काय अन्वयार्थ लावायचा, मला अजून नीट समजलेलं नाही. लताची तळमळीची प्रार्थना मला काहीतरी बाह्य साहाय्य आणि आंतरिक सामर्थ्य देऊन गेली, अशी माझी समजूत आहे. माझा चिकुनगुनिया आश्चर्यकारक रीत्या तीनचार दिवसांतच पळाला.
पुद्दुचेरीला योगी अरविंदांच्या आश्रमात सेवारत असणाऱ्या एक साधिका भेटल्या होत्या. अरविंदांच्या एका इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद लतानं केला होता, तो आश्रमात त्यांच्या वाचण्यात आला. तो अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. “वाचतावाचता माझ्या खोलीतलं वातावरण बदललेलं मला जाणवलं. ते अरविंदांच्या कंपनांनी भारलं आहे असं मला जाणवलं. त्यांच्या चिंतनलहरी त्या अनुवादातून साक्षात् झंकारत आहेत असा प्रत्यय मला आला. खोलीत जणू एक वेगळाच प्रकाश फाकला होता. अंगावर रोमांच उभे करणारी ही साक्षात्कारी अनुभूती!” त्या अगदी भारावून बोलत होत्या.
हराळीला वीज खंडित होणं, इंटरनेटची सेवा नीट नसणं अशा अनेक अडचणी असल्या तरी परगावातल्या सुह्रदांपर्यंत तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोचणारच. पुण्यात आल्यावर वेळ आणि शक्ती जास्तीत जास्त ताणून ती अधिकात अधिक जनांना भेटून त्यांची खबरबात घेणारच. पोटाच्या विकारामुळे उभंसुद्धा राहवत नाही अशा शक्तिशून्य अवस्थेतही, केवळ प्रेमाखातर तिनं आपल्या विद्यार्थिनीच्या आईचा श्राद्धविधी स्वत: कसा संपन्न केला ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
एक सुंदर कथा आहे. एका पुण्यशील माणसाला देवदूत स्वर्गात पाचारण करायला येतो. चिकित्सक पुण्यात्मा देवदूताला स्वर्गलोकाची माहिती विचारतो. स्वर्गातली चिरंजीव सृष्टी, अम्लान फुलं ह्यांच्याबद्दल सांगताना देवदूत ओघात सांगून जातो, की स्वर्गात अश्रूंना अजिबात स्थान नाही. हे ऐकल्याबरोबर तो पुण्यात्मा स्वर्गात जायला नकार देतो. जिथे अश्रू नाहीत, तिथे संवेदना नाही; तिथे जिव्हाळा नाही. तिथे प्रेमाला वाव नाही. अश्रूंमधून निर्माण होणारी कळकळीची नाती नाहीत. थोडक्यात, तिथे माणुसकीच नाही! मग कुणाला हवा आहे असला कोरडा, भावविहीन स्वर्ग?
तिला मोक्ष हवा आहे हे आपल्याला माहीत आहे. पण तसला, अश्रूच नसलेला स्वर्ग तिला भावेल का?
…कुणास ठाऊक! एखादवेळेस दुसऱ्याच उद्योगात रमून ती ईश्वराच्या डोळ्यांतूनही पाणी काढेल.
हेमा अंतरकर
गायत्रीताई सेवक
चिरंतन ऊर्जासंवाहक
काल पहाटे ३ वाजता उठल्यापासून एक अनामिक ऊर्जा आसपास भरून राहिली होती…
अगदी मध्यरात्री उशिरापर्यंत तसाच प्रवाह…
आन्हिक उरकताना, गाडी चालवताना बाह्यतः निःशब्द नि श्वासाश्वासात लतानाम चालू होतं…
सोलापूरला उपासना मंदिरात त्या निष्प्राण कुडीचं दर्शन झालं…
समोर बसल्यावर एक विलक्षण अनावर हुंदका…
आप्पांच्या आणि स्वामीजींच्या देहत्यागाच्या वेळी या माउलीच्या कुशीत शिरून अश्रूंना मुक्त द्वार देता आलं होतं…
आता कोणाच्या कुशीत शिरायचं…
आतून उत्तर आलं… तुझ्या आत आहेच ती… आता तर चैतन्यरूपातून अखंडित भेटी…
आणि शांतवन झालं…
भेट न झाल्याबद्दल यत्किंचितही नाराजी नाही…
“गीतांजली” ओसंडून वाहत आहेच…
मग समोर येत, प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष भेटत, डोळ्यांनी, स्पर्शांनी, शब्दांनी बोलत राहिलेल्या अनेकानेक आप्तेष्टांना त्याच माउलीने शांतवलं…
मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यावर अमोलचा फुटलेला बांध… त्याच्या खांद्यावर झालेला हलकासा स्पर्श त्याच माउलीचा तर होता…
हराळीच्या भावुक झालेल्या सर्व मैत्रिणींच्या पाठीवर तिचाच मऊ मुलायम हस्तस्पर्श विराजला होता…
तोच तो अम्लान… नितप्रसन्न… गाढ प्रेमप्रदायक… प्रगाढ शांती नि शक्तिदायी ऊर्जासंवाहक…
एक गहिरा सखोल समावेशक स्थिर चिरंतन आध्यात्मिक प्रवाह…
अंतःकरणातील संपुटातून अखंडित वाहता राहिलेला…
देहातीत होऊनही नवनवीन ऊर्जास्रोत प्रस्फुटित करणारा…
-गायत्री सेवक
अनघाताई लवळेकर
देवाघरचा पारिजात हा फुलला अपुल्या घरी
विशुद्ध सात्विक शुभ्रसुमांनी
दरवळली ओसरी..
स्मरति रूपे किती बिलोरी
पूर्णिम् चंद्रापरी
छाया-माया तुझी निरंतर जपतो हृदयांतरी….
शब्दांना ओलांडून जावे तिथे तुझा गं गाव
चैतन्याने चैतन्यागृही
सहजच केला ठाव!!
अनघा ताई लवळेकर
आर्याताई जोशी
मन स्वीकारायला तयार होत नाही आणि बुद्धीही प्रतिसाद देत नाही… अशी अवस्था कधी होते? अगदी अंतःकरणापासून जवळचं कुणीतरी जातं तेव्हा!
सकाळची सुरुवात या बातमीने झाली.जरा थोडा वेळ घेतला स्वतःसाठी आणि मग लिहायला बसले.
सर्वचजण त्यांच्याबद्दल प्रवाही होणार आहेत कारण त्यांचं जगणं म्हणजे गंगौघाचं पाणीच होतं आणि त्यांनी त्यात सर्वांनाच जगण्याचं सकारात्मक बळ दिलं,विचारांना पावित्र्य दिलं!
संत्रिकेच्या माझ्या सुरुवातीच्या काळात १९९८-९९मधे मा.लताताईंची भेट बैठकीत झाली. त्यानंतर क्वचित भेटी होत राहिल्या.
त्यानंतर दीर्घकाळानंतर विभागांचे परिशीलन करण्यासाठी ज्येष्ठांची समिती त्यावेळी वेगवेगळ्या विभागांमधे येत होती आणि कामे समजून घेत होती,सूचना करीत होती.
२५जून २००५ हा तो दिवस माझ्या लक्षातही आहे कारण २६ जूनला माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि आम्हाला तो साजरा करायला पाचगणीला जायचं होतं! हे समजल्यावर लताताई विसुभाऊंना म्हणाल्या
” का थांबवून ठेवलंत आर्याताईंना! हा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.बैठक नंतरही झाली असती की!”मी त्यांच्याकडे बघतच राहिले.
कार्यकर्ता म्हणून वावरताना प्रापंचिक जबाबदार्या सांभाळून पण प्रसंगी जेव्हा आपल्या कामाला प्राधान्य द्यावं लागेल तेव्हा थोडं घरीही शांतपणे बोलून तो समतोल कसा साधायचा हे लताताईंकडून शिकायला मिळालं.
युवती विभाग व स्री शक्ती प्रबोधन गटांची मिळून शारदोत्सव उपासना पोथी तयार करताना मा.लताताईंना दूरभाष झालेला आठवतो,मोजकी पण महत्वाची चर्चा व त्यांच्या मौलिक सूचना!
दीपावली लक्ष्मीपूजनाची पोथी नव्याने करताना ताईंना पोथी पाठवली व फोन केला.”आर्याताई तुमचा तो अधिकार आहे आणि तुम्ही योग्य तो विचार कराल याची खात्री आहे.” संस्थेच्या कार्यकर्त्यांवर इतका विश्वास दाखविणार्या लताताई ! मला त्यावेळीही काय बोलावं सुचेना!
“ती.आप्पांनी आम्हाला हे सर्व करण्यासाठी शिकवलं आहे कारण प्रबोधिनीच्या कार्यकर्त्याला विविध क्षेत्रात लीलया वावरता आलं पाहिजे.पण अभ्यासाची व उपासनेची जोडही त्याला निश्चितच हवी” असं संत्रिकेतल्या गप्पांमधे ताईंकडून समजत असे.
सहवास म्हणाल तर तसा तो दिवसांच्या,तासांच्या तुलनेत कमी असेल पण तो आशयघन व दरवेळी नवी ऊर्जा देणारा असाच होता!
हराळीला दोन वर्षांपूर्वी ताई भेटल्या तेव्हाही कुटुंबातील जबाबदार्या,कामांच्या प्रबोधिनीतील जबाबदार्या,स्वतःसाठी वेळ देणे असं खूप काही ताईंनी छान समजावून सांगितलं होतं प्रश्नोत्तरांच्या सत्रात!
माझ्यासाठी विलक्षण सुंदर आठवण म्हणजे दीपान्विताच्या वेळी मला जसं मा.उषाताईंनी मार्गदर्शन केलं तसंच लताताईंनीही केलं! “आईचा संकल्प हाच बाळाचाही संकल्प असतो” असं त्यांनी मला सुंदर उलगडून सांगितलं आणि नगरच्या त्यांच्या डाॅक्टर मैत्रिणीचा संपर्कही दिला.त्या ताईंकडून मी रामरक्षा र च्या विशिष्ट उच्चारांसह कशी म्हणायची आणि या नऊ महिन्यात उपासनेत काय संकल्प करायचे हे मला लताताई फोनवर सांगायच्या.दर पंधरा दिवसांनी आमचा फोन होत असे.लेकीच्या जन्मानंतर तिचं नाव मी त्यांना कळविल्यावर “किती सुंदर नाव दिलं आहे तुम्ही तिला,तिला लहान वयापासूनच नावाचा अर्थ समजावून सांगत रहा”असं त्यांनी मला सांगितलं!
नातेसंबंधांचे भावनिक पदर कसे सांभाळावेत याबद्दलही ताईंशी बोलणं फार सुखावह आणि मार्गदर्शक असे आणि उपासनेबद्दलही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत असे!
हे सारं संवादासकट लक्षात राहण्याचं श्रेय माझ्यापेक्षाही लताताईंचंच आहे.
प्रबोधिनीच्या प्रत्येक केंद्रावरच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे अशाच भरपूर आठवणी असणार आहेत.
लताताई प्रत्येकाकडेच कायम स्नेहार्द्र नजरेने,स्निग्ध प्रेमाने पहात राहणार आहेत…
©आर्या
शिवानंद जाधव
काय आणि किती लिहावे लताताईंविषयी?
अजूनही विश्वास बसत नाही की भेट झाली च नाही आणि सोडून गेल्या
पहिल्यांदा त्या जेव्हा सोलापूरला आल्या तेव्हा आम्ही सातवी मध्ये होतो, तळघरात रहायच्या आणि लगोलग आम्हा सगळ्यांसाठी शाळा जणू घरच झाले. पहिली तुकडी म्हणून आम्ही च आठवी ते दहावी दादा लोक झालो.
लताताई आणि अण्णा, चारू दादा, संतोषदादा सुवर्णाताई, कल्पनाताई, गाता या सगळ्यांसोबत शिकत मोठे होत होतो.
सकाळच्या उपासनेनंतर लताताईंचे पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद देणे म्हणजे कसे शब्दात मांडावे?
किती किती म्हणून आठवणी सांगाव्यात त्या इतक्या वर्षांमधल्या?
किती उपक्रम, किती मिरवणुका,
तंबू शिबिरे, हराळी ला दर रविवारी दवाखाना , सगळी दिवाळी स्टॉल वर फटाके विक्री आणि रात्री उशिरा लताताई गरम गरम, आवर्जून प्रेमाने आम्हा सगळ्यांना जेवू घालत.
अनंत… अनंत.. अनंत आठवणी.
मी तर (लहानपणी) भयंकर बंडखोर, शीघ्रकोपी, उनाड त्यामुळे मला तर माणसात आणण्याचे काम लताताईनी अगदी आईच्या मायेने केले.
मी रोज एक पानभर इंगजी लेखन करून ते रोज शाळेच्या आधी त्यांच्याकडून तपासून घेताना, ज्या पद्धतीने त्या माझ्याकडून ते दुरुस्त करून घेत त्यामागचे मानसशास्त्र आज थोडे अगदी थोडेसे कळते आहे.
अजूनही ती वही मी जिवापाड सांभाळून ठेवली आहे.
आता कसा हा उपकार फेडू ?
दोन तीन वर्षांखाली हराळी ला माझ्या तुकडीची आम्ही काही मंडळी सहपरिवार दोन दिवस निवासी शिबिरासाठी गेलो असता लताताईनी निर्गुणी भजनावर निरुपणे केली होती, त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी खूप आनंदात घालवलेल्या त्या वेळेचे मोल आज कोणत्या शब्दात सांगू? इतके की मी तर ढसाढसा रडलो होतो की इथून जाऊ वाटत नाही आणि माझ्या लहान मुलासाठी तर बाबा रडतो आहे हे पाहणे अगदीच नवीन होते.
एक दोन मुलांची आई होताना जिथे दमछाक होते तिथे हजारो मुलांना एवढ्या ममतेने वाढवणाऱ्या मला मातृवत असणाऱ्या लताताई, नुकतेच देवचाफे वाचत असताना एवढ्या वर्षानंतर पुन्हा नव्याने आणखी उमजत होत्या.
चूल आणि दोन बोळकी मांडून तर संसार आपण सगळेच करतो पण
स्वतःचे संपूर्ण आयुष्य देशासाठी, प्रबोधिनीसाठी, आम्हा हजारो विद्यार्थ्यांसाठी खर्ची करून, इतकी साधना, तप करून एवढा मोठा त्याग आणि त्याचा कसलाही अभिनिवेश न बाळगता आनंदाने, समाधानाने आपली समिधा राष्ट्रसेवेसाठी अर्पण करणाऱ्या लताताई आपणा सर्वांना सोडून अनंताच्या प्रवासाला गेल्या
देवचाफा देवाच्या चरणी विलीन झाला 🙏
शिवानंद जाधव
अश्विनीताई मयेकर
लताताई…
जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतोच हे खरं, पण जेव्हा एखादी जवळची व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा तिचं जाणं स्वीकारणं किती अवघड असतं हे लक्षात येतं.
या नश्वर जगातला आपला कार्यभार आटोपून, न दिसणा-या जगाच्या दिशेने लताताई मार्गस्थ झाल्या. ते जगही त्यांच्या अस्तित्वाने सुंदर होईल याची खात्री आहे. आणि हिंदू विचार परंपरेनुसार, त्या पुन्हा नव्या रूपात या जगात परततील हा विश्वासही.
लताताई म्हणजे डॉ. स्वर्णलता भिशीकर. त्यांच्या मातापित्यांनी ठेवलेलं अर्थपूर्ण नाव त्यांना शोभून दिसत असलं तरी त्यांच्या सान्निध्यात येणा-या सगळ्यांसाठी त्या लताताईच आहेत. होय…आता, होत्या असंच म्हणायला हवं.
पंचवीसेक वर्षं झाली असतील आमच्या पहिल्या भेटीला. त्यांचं नुसतं दर्शनही मनाचं शांतवन करणारं असे. त्या कायमच मंदिराच्या गाभा-यातल्या तेवत्या नंदादीपासम भासत…शांत, सौम्य, तेजस्वी आणि स्थिरचित्त. अंतर्बाह्य स्निग्धता हा त्यांचा विशेष गुण. स्निग्धता त्यांच्या आपुलकीने केलेल्या स्पर्शात असे, डोळ्यात दिसे, आवाजातूनही पोहोचे आणि वागणुकीतही झिरपे. प्रबोधिनीचं काम करत असताना क्वचित प्रसंगी वज्रादपि कठोरही झाल्या असल्या तरी तो काही त्यांचा स्थायिभाव नव्हता.
त्यांच्या अंतर्बाह्य स्निग्धतेला कोंदण होतं तेजाचं. अध्यात्मात त्यांनी गाठलेली ऊंची, आणि केलेली साधना याचं तेज सदैव त्यांच्या चेह-यावर विलसत असे.
ज्ञान प्रबोधिनीच्या कामात युवा कार्यकर्ती म्हणून अगदी सुरूवातीच्या काळातच त्या सहभागी झाल्या आणि मग प्रबोधिनीबरोबरचा प्रवास निरंतर चालूच राहिला. हे काम त्यांच्या आयुष्याचं एक अभिन्न अंग झालं. युवा कार्यकर्ती, प्रशालेतील शिक्षिका, प्रज्ञा मानस केंद्रातील प्रमुख आणि साक्षेपी संशोधक, सोलापूर आणि हराळीसारखी ज्ञानार्जनाची, आयुष्याला अर्थपूर्ण आकार देणारी शैक्षणिक केंद्रं उभारणारी शिक्षणतज्ज्ञ आणि हे चालू असतानाच एकीकडे अध्यात्मात ऊंची गाठलेली साधक, अनेकांसाठी या मार्गावरची अतिशय भरवशाची मार्गदर्शक…एकाच व्यक्तीने किती भूमिका वठवाव्यात! त्या ही सगळ्याच मनःपूर्वक आणि प्रत्येक भूमिका समाजघडणीसाठी भरीव योगदान देणारी.
मला लताताई परिचित आहेत त्या हराळी केंद्रातल्या. प्रत्यक्ष भेटण्याआधी त्यांच्या प्रबोधिनीतल्या योगदानाबद्दल बरंच ऐकलं असल्याने पहिल्या भेटीच्या वेळी मनावर दडपण होतं. पण त्यांच्या मृदुकोमल आवाजाने, हळुवार स्पर्शाने आणि प्रसन्न स्मितहास्याने ते दडपण पहिल्याच भेटीत दूर झालं. आणि त्याची जागा अपरंपार जिव्हाळ्याने घेतली, ती कायमची. त्यांच्याशी आतड्याचं नातं जुळलं.
काही व्यक्तींची प्रत्यक्ष भेट भले कितीही वर्षांच्या अंतराने का होईना, त्या आपल्यासाठी ‘असतात’ असा भरवसा असतो. लताताई माझ्याकरिता अशांपैकी एक होत्या. (ही भावना अनेकांची असेल याची खात्री आहे.) याचं संपूर्ण श्रेय अर्थातच त्यांचं.
२००४ साली माझी सा. विवेकमध्ये ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ ही लेखमाला चालू होती. त्या लेखमालेत एप्रिल महिन्यात मी लताताईंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख लिहिला. त्या लेखासाठी म्हणून झालेल्या गप्पांमध्ये जे समजलं ते एका लेखाच्या रूपात उतरवणं ही कसोटीच होती. पण या भेटीने मी भरून पावले. तिथूनच आमच्यातला स्नेह गाढ होत गेला. हा लेख प्रकाशित झाल्यावर लताताईंच्या वडिलांचं म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, संपादक बापूसाहेब भिशीकरांचं मला पोस्टकार्ड आलं. जेमतेम चारच वाक्यं. पण अतिशय प्रांजळ. ‘प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आमच्या मुलीच्या कार्याची उचित दखल घेतलीत. आनंद झाला..’असं साधंसंच पण भिडणारं. इतक्या मोठ्या व्यक्तीने कृतज्ञता व्यक्त करावी याचं मला खूप अप्रूप वाटलं. आजही आहे. बापूसाहेबांचं ते पत्र अजूनही माझ्या संग्रही आहे.
पुढच्या ५/६ वर्षात हराळीला ४/५ वेळा जाणं झालं. एक वर्ष हराळीचं वार्षिक वृत्त करण्याची जबाबदारी ताईंनी माझ्यावर सोपवली तेव्हा ५/६ दिवस सलग मुक्काम झाला. त्या मुक्कामात लताताईंना वेळ मिळेल तेव्हा गप्पा व्हायच्या. पूर्णपणे अनौपचारिक आत्मीय संवाद. ‘सलगी देणे’ कसे असावे त्याचं लताताई मूर्तिमंत उदाहरण होत्या. ज्येष्ठ आणि नव्याने कामात आलेली कार्यकर्ती हे आमच्यातलं अंतर पार मिटून गेलं. मग छात्र प्रबोधन अंकाच्या तपपूर्तीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं. तेव्हाही व्यापातून वेळ काढून त्या आल्या आणि आनंदाने दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
डोंबिवलीतल्या एका विद्याव्रत सोहळ्यात विद्याव्रतींना देण्यासाठी लताताईंनी आशीर्वच लिहून दिले. माझ्या भाचीच्या आणि दोन्ही नातींच्या जन्मानंतर
लताताईंनी ओव्याच्या रूपांत आशीर्वाद दिला आहे. नव्हे, मी तो त्यांच्याकडे हक्काने मागितला आहे.
आणि त्यांनी त्यांचे सगळे व्यापताप सांभाळत माझे हे हट्ट पुरवलेही आहेत. माझ्यासाठी तो साक्षात सरस्वतीचा कृपाप्रसाद आहे.
….”आई, तू असं कसं काय त्यांच्याकडे मागू शकतेस?” असं लेकाने एकदा आश्चर्याने विचारलं, तेव्हा त्या प्रश्नाने मी ही क्षणभर चमकले. मात्र अशी मागणी करण्यात मला कधी संकोच वाटला नाही हेच खरं! आईवडिलांकडे काही मागताना असतो का कुठला संकोच मनात? तसंच काहीसं.
माझी मोठी नात आद्या लहान असताना लताताई प्रबोधिनीच्या कामानिमित्त डोंबिवलीत आल्या होत्या. त्यातून वेळ काढून आद्याला पहायला घरी आल्या. तिला मांडीवर घेतलं, आपल्यातले घास भरवले, कडेवर घेतलं, गप्पा मारल्या. अशा विदुषीच्या हातून प्रेमाचे घास खाण्याचं भाग्य माझ्या नातीला लाभलं. हे कोडकौतुक पाहताना मला नातीचा अक्षरशः हेवा वाटत होता.
तीन वर्षांपूर्वी आजी-आई-बाबांच्या आठवणींच्या लेखांचं पुस्तक मी प्रकाशित करायचं ठरवलं. या पुस्तकाला प्रस्तावना कोणाकडून घ्यावी हा प्रश्न मनात उमटायच्या आतच लताताई डोळ्यासमोर आल्या….’हो देईन की…’ असं त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सांगितलं आणि काही दिवसांत पाठवलीही. जिव्हाळ्याने लिहिलेली ती प्रस्तावना वाचताना मला झालेला आनंद शब्दांपलिकडचा होता.
पार्थच्या – माझ्या मुलाच्या लग्नात नवविवाहित दांपत्यासाठी अतिशय सुंदर पत्र आलं. आशीर्वाद देणारं आणि सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारं…
.
.
.
आज लताताईंच्या माघारी लक्षात येतंय की केवढा मोठा ठेवा त्या मला देऊन गेल्या आहेत. दौलत आहे ती …पिढ्यानपिढ्या पुरून उरणारी…
-अश्विनी मयेकर
विद्याताई हर्डीकर – सप्रे
विनयराव हर्डीकर

यशवंतराव लेले
मा. श्री. आनंद भिशीकर व क्रांतीताई,
आपल्या ज्येष्ठ भगिनी, विद्यावाचस्पती, ज्ञानप्रबोधिनीच्या युवती विभागाच्या पायाभरणी पासून महत्वाच्या कामात त्या जीव ओतत आलेल्या युवती कार्यकत्या कालवश झाल्या हे वृत्त अतीव दुःखद आहे. कवयित्री, वक्तृत्व कलाकुशल, ग्रंथलेखिका आणि कै. अप्पा आणि कै. अण्णा यांना लेखनवाचनात, प्रत्येक कार्यात हवी ती ती मदत करत आलेल्या मा. स्वर्णलताताई हे जग सोडून गेल्या हे हृदयविदारक सत्य आहे. धक्कादायक आहे. बरेच दिवसात त्यांची भेट होऊ शकली नाही. पण पुष्कळ आठवणी जाग्या झाल्या.
वैदिकाश्रमातील आमच्या घरी नलूताई उजळंबकरांबरोबर येणारी त्यांची मैत्रिण म्हणजे लताताई; प्रबोधिनीशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी प्रबोधिनीचे काम विविध आघाड्यांवर प्रभावीपणे केले, ते आयुष्यभर !
प्रज्ञामानस संशोधिकेच्या कार्यकर्त्या म्हणून वर्षानुवर्षे त्या कार्यरत राहिल्या. प्रज्ञा-मानसला आंतरराष्ट्रीय स्थान व मानसन्मान प्राप्त करून देण्यात कै. उषाताईंच्या बरोबरीने त्यांनी काम केले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
प्रबोधिनीच्या विस्ताराच्या दृष्टीने जसे निगडी महत्त्वाचे केंद्र, तसेच सोलापूर ! सोलापूरचे कार्यक्षेत्र लताताईंनी विस्तारत नेले आणि त्याचवेळी सोलापूर जिल्ह्याला साक्षरतेत अग्रणी बनवण्यात महत्वाचा वाटा उचलला. भूकंपाच्या धक्क्यातून हराळी गावाला सावरुन उभे करण्याचे महत्कार्य लताताईंच्या पुढाकाराने झाले.
माझ्या फ्रान्सच्या दौऱ्याआधी मला काही फ्रेंच शब्द शिकवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न अजूनही स्मरतो.
कायम स्वरूपी शुभ्र साडी परिधान करणाऱ्या लताताईचा तेजःपुंजपणा पंजाब दौऱ्यात माझ्यासह अनेकांनी अनुभवला.
अत्यंत शांत, संयमी, मृदुभाषी व उत्तम व्यक्तिमत्व लाभलेल्या स्वर्णलताताई त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सदैव सर्वांच्याच स्मृतीत राहतील.
लताताईंच्या स्मृतीस मनःपूर्वक वंदन व भावपूर्ण श्रद्धांजली!
अरुंधतीताई पत्की
गेल्या ४६२ दिवसांपासून कर्करोगाशी चालू असलेली लढाई काल रात्री १०.२०वा आ.लताताईंनी जिंकली…
सहा केमोथेरपीज, त्यानंतरची खूप अवघड शस्रक्रिया व परत तीन टारगेट थेरपीची इंजेक्शने घेवूनदेखील व्याधी परत मान वर काढायला लागली होती. मग आम्ही प्रशातकुटीरम्,बेंगलोरला गेलो.
तिथल्या आरोग्यधाम मध्ये १०६ दिवस राहिलो व चमत्कार व्हावा तसा प्रकृतीत चांगला बदल घडू लागला. भूक वाढली. ताई सलग २०-२५ मिनिटे चालू शकत होत्या. आनंदी व प्रसन्न तर त्या व्याधीच्या काळातही होत्या. पण प्रशांतीकुटिरम् मध्ये क्वालिटी ऑफ लाईफमध्ये लक्षणीय बदल जाणवू लागला होता.
मग त्यांना आपल्या कर्मभूमीची ओढ लागली व सोलापूरी मुक्कामाला यायचे ठरले. त्याची दोन कारणे, एकतर त्यांची सर्व विद्यार्थालेकरे इकडे होती आणि दुसरे म्हणजे सत्संग परिवार व प.पू. बाबामहाराज पाटील यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन लाभ.
सोलापूरात घर भाड्याने घेतले. अमेय, विवेक,अमोल व सर्वांनी मिळून घर सुंदर लावून दिले. ५ जानेवारीला आ.ताईंचे जंगी स्वागत होऊन स्वत:च्या घरात गृहप्रवेश झाला. इथे येऊन खूप आनंद व समाधान त्यांना मिळालेले चेहऱ्यावर दिसत होते.
पण परत एकदा व्याधीने आपले विस्तारित विराट रुप दाखवायला सुरवात केली. आ.ताईंची साधना जोरात चाललेली होती. प्रकृतीत चढ उतार होत होते म्हणून त्यांच्या व डॉक्टरांच्या सांगण्यावरुन भेटी गाठींवर बंदी आली. आ. ताईं आत्मदर्शी संत होत्या. त्यांचे कशात मन गुंतले नव्हते. व्यक्ती, वस्तू ,वास्तू कशातही नाही. ‘Birth is not a beginning of life and death is not the end of life’ असे नेहमी सांगणार्या आ. ताईंची देहविसर्जन कधीही करावे लागेल याची तयारी झाल्याची जाणवत होती. आपल्या मागे कोणालाच कुठला प्रयास पडू नये म्हणून सर्व गोष्टी लेखी स्वरुपात संबंधितांना देवून ठेवल्या होत्या.
३ मार्च २५ ला संध्याकाळपासून श्वास घ्यायला त्रास वाटू लागला. तो त्रास वाढू लागला. लगेच प.पू. बाबा महाराजांना फोन केला व डाँ अमोल व पल्लवी कानिटकर आले. पुढे त्यांचे हात हातात घेवून आ.ताई श्वासाची झु्ंज देत दिव्याच्या जोती सारख्या हळू हळू शांत शांत होत गेल्या. २-३ वेळा निंबाळची आरती ऐकली. गुरुंच्या फोटोकडे बघत सोsहं.. सोहंम् म्हणत १०.२०ला प्राणज्योती मावळली.
या सगळ्या काळात मला व क्रांतिताईला विशेषकरुन खूप कडवटपणा घ्यावा लागला. लोकांना भेटायला येवू नका सांगताना यातना झाल्या. पण आ.ताईंची साधना व अनुसंधानाकरिता ते आवश्यक होेते. त्या करिता आम्ही काही कमी जास्त बोललो असू तर क्षमस्व!
माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||
हे सद्गुरु स्मरण लक्षात ठेवू या.
———- अरुंधती
शीलाताई पतकी
लताताई आणि मी
आदरणीय केळकर दांपत्याकडून ही संस्था ज्ञानप्रबोधिनीकडे आली त्यावेळी बाल विकास मधील काही भूगोलाचे सामान आमच्या शाळेला द्यावे असे केळकर यांच्या मनात होते त्यामुळे ते घेण्यासाठी मी आणि तडवळकर सर बाल विकास मंदिर येथे गेलो होतो. त्यावेळी पहिल्यांदा एका छोट्या तळघरात आदरणीय अण्णांची ओळख झाली .एक मोठं टेबल त्याच्यामागे खुर्ची बाजूला संख्या कागदपत्रे खूप दाटीवाटीने सामान लावलेल्याभिंती आणि तिथे अण्णा काम करत बसले होते. सरांनी मला त्यांची ओळख करून दिली इतक्यात दोन मुली थोड्याशा प्रौढ कडेवर दळण्याचे डबे घेऊन आल्या चेहऱ्यावर थोडं पीठ वगैरे लागलेलं होतं केस भुरभुरत होते दोघीही गोऱ्या पान दिसायला सुंदर आणि अत्यंत हसरे चेहरे …अण्णांनी ओळख करून दिली या स्वर्णलता भिशीकर आणि या गायत्री सेवक या प्रबोधिनीच्या कार्यकर्त्या आहेत. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले संस्थेत काम करणाऱ्या या मुली किंवा स्त्रिया समोर आपण दळण आणण्यासाठी नव्या परक्या गावात स्वतः एकट्या गेलेल्या होत्या आणि कडेवर दळण्याचे डबे घेऊन येताना त्यांना कुठलाही संकोच वाटत नव्हता तिथे मी संस्था चालवण्याचा पहिला धडा शिकले की…. कोणत्याही कामाला लाजता कामा नये ..!
ही सगळी माणसं नव्याने सोलापुरात आली होती सोलापुरातल्या माणसांची फार ओळख नाही .. ठिकाण माहीत नाहीत जागा ..अतिशय अपुरी आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या योगक्षेमासाठी जरुरी सोयी करून घेतलेल्या होत्या मी बाहेर आल्यावर सरांना म्हटलं सुद्धा सर अहो त्या चक्क दळण आणायला गेल्या की.. सर म्हणाले अशीच माणसं संस्था मोठी करतील याची खात्री आहे तसंच घडलं बघता बघता लताताई आणि अण्णांनी एक एक माणूस पारखून घेतला कुठलाही अहंभाव नाही संस्थेसाठी उपयुक्त असणारा तळागाळातला.. मोठ्या पदावरचा.. कोणताही माणूस असू दे त्याच्याकडे स्वतः जाऊन त्याला आपल्या कामांमध्ये कसे आणता येईल याचा विचार करून किंवा आपल्या संस्थेशी त्याला कसं जोडता येईल आणि लोकसंग्रह कसा वाढवता येईल हे काम त्यानी फार सुंदर केले. लताताई कितीतरी वेळा सेवासदन मध्ये तडवळकर सरांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत हळूहळू शाळा आकार घेऊ लागली कारण एका व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे जाताना मध्ये नेहमी खडखडाट असतोच त्या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आपल्या संस्थेचे नाव मोठं करणे हे अवघड असतं आणि ते अत्यंत संयमाने नम्रतेने माणूस माणूस जोडत जाऊन केले पाहिजे हे मी त्यांच्याकडून शिकले एखाद्या साध्या माणसाला मोठं करण्याची ताकद या माणसांमध्ये होती.. लताताई तरी इतक्या नम्रतेने बोलायच्या इतक्या थोर विदुषी.. अभ्यासू संपूर्ण आयुष्य एका ध्येयाने प्रेरित होऊन झोकून देणाऱ्या बाई पण त्यात खूप लहान होऊन बोलत असत आणि समोरच्या माणसाला मोठा करत असत
त्यानंतर 1995/ 96 चा कालावधी त्यामध्ये मी साक्षरता अभियानाच्या कार्यात रीतसर शासनाकडून जोडले गेले म्हणजे मला डेपो टेशन वर पाठवले गेले माझा पहिला दिवस ज्ञान प्रबोधिनी मध्ये… लताताई साक्षरता अभियानाच्या सचिव होत्या माझी नेमणूक समन्वयक म्हणून करण्यात आली होती मी गेल्यानंतर लता ताईंनी स्वागत केले माझं ऑफिस सज्ज होत टेबलावर टेबल क्लोथ फ्लॉवर पॉट त्यावर माझ्या नावाची छोटी पाटी प्रा शीला पतकी समन्वयक साक्षरताअभियान ..समोर बसणाऱ्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था. खरं तर मी साधी शिक्षिका होते हा सगळा थाट मला नवीनच होता मी खऱ्या अर्थाने भारावून गेले म्हणजे हा भार मोठाच असणार याची मला जाणीव झाली अनेक वर्ष काम केलेली माझी शाळा सोडून मी आले होते प्रबोधिनीतल्या या सगळ्या लोकांशी माझं जमेल की नाही हा प्रश्न होता पण लताताई अतिशय सौम्य आणि शांत आणि मी तितकीच भडक आणि तडक सुद्धा पण आमची छान मैत्री झाली कामात उत्तम समन्व साधला गेला आणि बघता बघता तीस हजार महिला आणि दहा हजार पुरुष यांच्या साक्षरतेचे आमच्या कडून उत्तमपणे मार्गी लागेल माझ्या नवनवीन कल्पनांच लताताई नेहमी कौतुक करायच्या. पैसे कमी असतील तर मी अभियानाच्या ठिकाणी जे वर्ग भरायचे त्यासाठी घरून 100/ 100 ग्लास सरबत करून घेऊन जात असे ही सगळी माझी धडपड प्रामाणिकपणा पैशाचा व्यवहार नेटका करणे हे सारे गुण लताताईंनी हेरले होते आणि या सर्व अभियानात आम्ही दोघींनी खूप छान काम केले त्याचे एक समाधान आहे.
लताताईंबरोबर काम करण्याचा आनंद म्हणजे शिकणं होतं त्या खूप शांतपणे एखादा प्रश्न सोडवायच्या कधीही आताताईपण नाही.. कामाचा खर तर त्यांना खूप भार होता पण हे प्रबोधिनी व्यतिरिक्त अतिरिक्त काम होतं माननीय जिल्हाधिकारी हे त्याचे अध्यक्ष होते म्हणजे आम्हाला त्याचा रिपोर्ट सतत जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे लागायचे पण आम्ही दोघी त्यामध्ये अतिशय अचूक होतो आणि दोघींनाही प्रसिद्धीची अजिबात हौस नव्हती त्यामुळे केवळ उत्तम काम करणं या एकाच प्रेरणेने आम्ही कार्यरत झालो आणि शहर साक्षरता अभियान यामध्ये एक वेगळा ठसा भारतात आम्ही उमटवला. या काळात मी लताताईंकडून कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे याचा अगदी बारीक सारीक तपशील शिकले आणि शिकवणारा माणूस इतका छान की ते मला काही शिकवत आहेत ही भावना नसायची अगदी दीपप्रज्वलनाच्या वाती आधी एकदा पेटवून भिजवून ठेवायच्या म्हणजे त्या कार्यक्रमाच्या वेळी पटकन लागतात हे मी प्रबोधिनीत शिकले फार छोटी गोष्ट आहे पण मी शिकलेल्या अनेक मोठ्या गोष्टी ंच्या बरोबरची अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला पुढे उपयोगी पडली. तडवळकर ट्रस्ट ही माझी संस्थासुरू केली त्यावेळेला शिकलेल्या अनेक गोष्टी मी लता ताईंकडून शिकले होते याचे स्मरण सदैव असे.
त्या काळातला एक प्रसंग असा होता की दाते नावाचे टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक या अभियानाला भेट देण्यासाठी येणार होते जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकली होती आणि दोन दिवसात त्यांना अभियानाचे आता ज्याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो ते हवे होते ती जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली आणि मग लताताई म्हणाल्या ते आता कसं करता तुम्ही. म्हणलं मी फोटोग्राफर पटवाना बरोबर घेते आणि प्रत्येक वर्गावर जाऊन तिथला तपशील आणते फोटोसकट आणि सुमारे पाच ते सहा तास फोटोग्राफर पटवा आणि मी आमच्या असंख्य वर्गावर जाऊन फोटोग्राफी, तिथले आकडे त्या भागा त कार्यकर्त्यांनी काढलेली कात्रण कारण तिथे आमचे वर्ग चालक असायचे त्यांच्याकडे ची माहिती असे हे समग्र गोळा करून मी दुपारी तीन साडेतीनला प्रबोधिनीत हजर माझा दमलेल्या चेहरा पाहून ताईनी मला स्वतः जेवायला वाढले ..शीला ताई खूप दमलात ना ?त्यांच्या एका या वाक्याने माझा सगळा शीण निघून गेला त्यानंतर माझे 14 कार्यकर्ते माझ्याबरोबर होते त्यांच्यासह आम्ही रात्री उशिरापर्यंत प्रबोधिनीत बसून काम केले फाईल तयार झाल्या कलेक्टरांच्या टेबल वरती दुसऱ्या दिवशी फाईल ठेवली ते खूप खुश झाले दुसरी फाईल दाते साहेबांना दिली त्यांना बरोबर घेऊन मी वर्ग भेटींचे कार्यक्रम केले संध्याकाळी ते मेलनी मुंबईला गेले कलेक्टर साहेब तिथे फक्त भेटायला आले होते आणि त्यांनी विचारले की तुम्हाला या व्हिजीटमध्ये योग्य माहिती मिळाली का तर ते इतके भरभरून बोलले ते म्हणाले तुमचे कार्यकर्ते इतके सक्षम आहेत खूप सुंदर काम चालू आहे आणि त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यावर अग्रलेख लिहिला आणि जिल्हाधिकाऱ्यासाठी ही गोष्ट त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरली त्यानी माझ्या या कामाचे भरभरून कौतुक केले खर तर लताताईंपेक्षा मी थोडी मोठी तरी मला लताताईच मोठ्या वाटायच्या आणि त्या सर्वार्थाने मोठ्या होत्या विशेषतः त्या समंजसपणा तर त्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या होत्या त्याच मला लहान बहिणी सारख्या वागवत होत्या जेवणाचे आबाळ करू नका इथे जेवत चला मी म्हणलं तुमचं ते बिनतिखटाचे जेवण आम्हा सोलापूरकरांना चालत नाही …अशा खूप खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही कार्यमग्न असू… संपूर्ण अभियान हाताखालील माणसांना कसे वागवावे हे , त्यांच्याकडून काम कसे करून घ्यावे या सगळ्या गोष्टी त्यांना संभाळावे कसे हे सुद्धा मी शिकले
आमचा एक कार्यकर्ता पठाण म्हणून होता आणि त्याचा अपघात झाला त्याला माझ्या इथल्या सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ऍडमिट करण्यात आले रे मला कोणीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की त्याचा मोठा अपघात झाला आहे आणि तो सिरीयस आहे मी ताबडतोब त्या ठिकाणी गेले त्याच्या पायाला जबरदस्त मार लागला होता अपघात एसटीचा झाला होता आणि त्याचे पाय त्या बाकाखाली अडकले होते जखमा होत्या त्याचे ब्लड प्रेशर लो व्हायला लागलेले होते आणि मी त्याला समजावत होते मोठ्यांना ओरडून की तुला काही होणार नाही आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत ते बघ आण्णा आले लता आल्यात एवढी माणसं तुझ्यासाठी इथे आहेत या वाक्याने माहीत नाही त्याला धीर वाटला असावा लताताई या नावात जादू होती.. खूप आश्वासक नाव आणि पाच मिनिटात त्याचे ब्लड प्रेशर वाढले उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पटापट त्याचे एक्स-रे काढले उपचाराला सुरुवात झाली आणि महिनाभरात पठाण बरा झाला फक्त त्याच्या पायांना मात्र कुबड्यांचा आधार घ्यावा लागला निदान काही महिने तरी ..!मी लताताई त्यांचे नाव घेता क्षणी मात्र त्याचे ब्लड प्रेशर वाढल्याचे मी स्वतः पाहिले केवढ आश्वासक नाव होतं ना ते …त्या दिवशी शिकले की आपल्या बरोबर काम करणार्या माणसाला आपला विश्वास वाटला पाहिजे आपण सदैव त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि त्याच्याबरोबर आहोत हा विश्वास देणे हे गरजेचे असते मी त्या दिवशी शिकले.
लताताईं वर संस्थेच्या जबाबदाऱ्या होत्या काही वेळेला त्यांना येण्यासाठी उशीर व्हायचा क्वचित आणि माझे काम आडून राहायचे मी एका दिवशी खूप रागवले म्हटलं तुम्ही येत नाही तुमच्या इथली माणसं एखादा पेपर सुद्धा लताताई त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही झेरॉक्स काढत नाही असं म्हणतात मग आम्ही काय करायचं ?माझा नेहमीचा स्वभाव ऊफाळून आला.. लताताई माझ्यासमोर बसल्या त्यांनी झेरॉक्स काढणाऱ्या मुलाला बोलवलं आणि सांगितलं की शीलाताईंनी जे काम सांगितले असेल ते लगेच त्यांना करून द्यायचं माझ्या परवानगीची गरज नाही आणि मला सांगितलं शीलाताई हे 14 कार्यकर्ते. यानंतर तुमच्या नियोजनाप्रमाणे काम करतील तुम्हाला माझ्यासाठी ताटकळत बसण्याची आवश्यकता नाही आणि हे त्यांनी अतिशय विश्वासाने प्रेमाने सांगितलं त्यावर त्या म्हणाल्या सुद्धा हे की मला प्रबोधिनीच्या कामातून इथे वेळेवर येणं शक्य होत नाहीये खर आहे वेळेवर येण्यात त्यांचा धरणार नाही पण त्यांची फार ओढाताण होत होती आणि मग ते संपूर्ण काम माझ्या पद्धतीने सुरू झाले अगदी लताताई सुद्धा मी सांगेल ते नियोजन करत होत्या काहीही मनात न ठेवता काम करणे हे मी त्यांच्याकडून शिकले.
लताताईनी एकदा एक माझ्या कामांमध्ये एक त्रुटी दाखवली मी त्या आणि शिक्षणाधिकारी तिघेच होतो संध्याकाळची वेळ होती मी माझ्या पद्धतीने त्यांना त्याचे एक्सप्लेनेशन दिले त्यावरून थोडीशी कुरबुर झाली माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिथून तटकन उठले खोलीच्या बाहेर आले त्या क्षणाला मला हे काम सोडून आपण शाळेत जॉईन व्हायचे आपल्याला हे काम करणे शक्य नाही असे लिहून घ्यायचे असे विचार मनात आले आणि पुन्हा मी विचार केला की शाळेने मला विश्वासाने या कामासाठी पाठवले आहे त्यांना कमीपणा येईल असे मी वागता कामा नये मी माझे डोके शांत होईपर्यंत प्रबोधिनीला दोन-तीन चकरा मारल्या मग शांत डोक्याने ऑफिसमध्ये गेले काहीही न झाल्यासारखे आम्ही पुन्हा चर्चा करू लागलो आमची मीटिंग संपल्यानंतर लताताईंनी मला जवळ घेतले आणि म्हणाल्या शीलाताई राग शांत झाला का?.. हा सर्व कामाचा भाग असतो ते सोडून द्यायचं आणि मग तो सगळा राग आमचा सरबताच्या पेल्यात साखरेसारखा विरघळून गेला मी प्रबोधिनीत काम करावे विशेषतः हरळीत येऊन राहावे यासाठी मी निवृत्त झाल्यावर त्या माझ्या घरी आल्या होत्या पण आईच्या तब्येतीमुळे मला ते स्वीकारता आलं नाही तरीही जमेल तेव्हा आणि ते बोलतील त्या त्या वेळेला मी प्रबोधिनी जात असे कारण त्या पवित्र वास्तुत अत्यंत निस्वार्थीपणे काम करणारी ही दोन माणसं होती अण्णा आणि लताताई प्रबोधिनीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला ही दैवत प्रेरणादायी ठरली आहेत आणि याच्यापुढे ठरतील यात शंकाच नाही माझ्या संस्थेच्या उभारणीत त्यांच्याकडून घेतलेले हे सगळे गुण मला खूप उपयोगी ठरले अजूनही असंख्य आठवणी आहेत पण लेखन मर्यादा सांभाळावी लागते काल लताताई गेल्याची बातमी कळली संपूर्ण दिवस मन बेचैन होते असंख्य आठवणी मनामध्ये गर्दी करत होत्या डोळ्यातल पाणीवाहत होते एका तपस्वी अभ्यासू प्रामाणिक निस्वार्थी जीवनाचा शेवट झाला… कुटुंबात रमलेला माणूस आपल्या कुटुंबासाठी काही काळा आठवणी ठेवून जातो पण लता ताईंच्या आठवणी कार्यपद्धती त्यांनी केलेले कार्य हे समाजातल्या अनेक पिढ्यांना अनेक वर्ष मार्गदर्शक राहील यात शंकाच नाही… लताताई तुमच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रातील.. सामाजिक क्षेत्रातील सगळी माणसं हळहळली तुमचे विद्यार्थी तुमचे कार्यकर्ते ढसाढसा रडले सोलापुरातल्या शिक्षण क्षेत्रात कित्येक नवे पायंडे तुम्ही सुरू केलेत सोलापुरात आपण खूप मोठे योगदान दिले आहे त्यासाठी सोलापूर तुमचे सदैव ऋणी राहील तुमच्या अनेक स्मृतीना अभिवादन तुमच्यासारखे शेवटपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करू हीच श्रद्धांजली असेल प्रत्येकाच्या हृदयात आदराचे चे स्थान असलेल्या या संत कोटीला पोहोचलेल्या माऊलीला आणि तिच्या स्मृतीला साष्टांग दंडवत🙏🙏 शीला पतकी सेवासदन
मंजूषाताई गाडगीळ
आदरणीय लता ताई,
माझ्या गुरु, प्रेरणा स्थान आणि काय म्हणू?
सोलापूर मधे आल्यानंतर संगमेश्वर कॉलेज मध्ये मानसशास्त्र पदव्युत्तर वर्गाला abnormal psychology हा विषय शिकवायला त्या आमच्या वर्गावर आल्या, आणि अक्षरश: त्या आल्या, त्यांनी पाहिले आणि त्या जिंकल्या या उक्तीप्रमाणे त्यांच्या अत्यंत साध्या पण तेज:पुंज व्यक्तिमत्वाने आम्ही भारून गेलो. आरडाओरडा न करता शांत, हळू पण ठाशीव आवाजात बोलणे, आपल्या विषयात सुसंगत असणारे आध्यात्मिक दाखले देणे हे आम्हाला नवीनच होते. त्या वेळेपासून त्यांचा माझा परिचय झाला. पाहता क्षणी नतमस्तक व्हावे असेच व्यक्तिमत्व होते त्यांचे!
त्या नंतर त्यांचे आमच्या घरी वारंवार येणे होत असे. माझे सासरे अचानक गेल्यानंतर त्यांनी सासूबाईंना , उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रबोधिनी मध्ये संस्कृत विषयाचे वर्ग घेण्यासाठी बोलावले.
त्या नंतर मला त्यांची स्वीय सहाय्यक म्हणून बोलावले. तिथून आमचा घनिष्ठ संबंध आला. त्यांच्या आणि आण्णांच्या परीक्षेत पास होणे ही फार अवघड गोष्ट होती. त्या काळात साक्षरता अभियान सुरू करण्यासाठी प्रबोधिनीचे नाव घेतले जात होते, आणि ते मिळालेही. त्यासाठी लता ताई बरोबर मी तत्कालीन शिक्षणाधिकारी सुमन ताई शिंदे, आयुक्त डॉ.सुधीरकुमार गोयल, समन्वयक डॉ गौरीशंकर गंगा यांच्या भेटीला जात असे. तिथे लता ताईंचा दरारा, अभ्यास आणि कुठलीही आर्थिक तडजोड न करता काम करून घेण्याची हातोटी जवळून बघता आली.
लता ताईंनी माझ्यावर आणि माझी एक सहकारी माधवी जोशी, हिच्यावर विश्वास ठेवून दिल्ली इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एक शोध निबंध सादर करायला सांगितला होता. त्यासाठी आमच्या अनेक पुणे वाऱ्या झाल्या, तिथल्या प्रमुख डॉ उषाताई खिरे यांच्या बरोबर प्रदीर्घ चर्चा झाल्या, आणि याचे फल स्वरूप म्हणजे त्या निबंधाचा समावेश towards excellence नावाच्या पुस्तकात झाला. लताताई फक्त मराठी उत्तम बोलू शकत असे नाही तर त्यांचे इंग्रजी भाषेवर ही प्रभुत्व होते.
साधी बिनरंगाची बिन इस्त्रीची साडी, त्यावर लाल, पांढरा असा कुठलाही ब्लाउज आणि पाहता क्षणी डोळ्यात भरणारे गोऱ्यापान कपाळावरचे लाल ठसठशीत कुंकू! त्यांना ते इतके शोभून दिसायचे!
किती आणि काय काय आठवणी सांगायच्या…
त्यांच्या बरोबर 2 दिवस शिबिरात राहिले ते दिवस तर अद्भुत होते!
माझे गुरुस्थान हरपले!🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्योतीताई कर्वे
गुणसुमने मी वेचियली….
वृत्ती घडण ,प्रेरणा जागरण यासाठी सहवास, मुलाखत, अनुभवकथन, चरित्र कथनाच्या माध्यमातून अनेक प्रेरणादायी दर्शने घडत असतात. ज्यांना ज्यांना आ.लताताईंचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं ते सर्व भाग्यवान.. मी ही त्या भाग्यवंतांमधील एक.
प्रबोधिनी परिवारात नवीनच सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्राच्या कार्यकर्त्यांची हराळी केंद्र परिचय सहल होती. तेथील वास्तू , आदरणीय आण्णा व लताताई या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तींचा सहवास आम्हा सगळ्यांना प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा देणारा तर होताच. पण प्रबोधिनीत येणारी व्यक्ती नवीन असली तरी ती आपल्याच परिवारातील आहे, तिला सामावून घेणं हा महत्वाचा गुण ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमच्या मध्ये रुजवला आहे. याचे उदा. आवर्जून द्यावेसे वाटते. आमच्या दुपारच्या परतीच्या प्रवासात त्रास होऊ नये म्हणून मी जेवण केले नव्हते. त्यादिवशी ताई सोलापुरात होत्या. केंद्रातील २०- २५ सदस्यांमध्ये अनेक जणांचा आण्णा व ताईंना प्रथमच परिचय होत होता. एवढ्या सगळ्यांमध्ये मी जेवायला नाही हे आ.आण्णांच्या लक्षात आले, त्यांनी उपस्थित एका ताईंना माझे नाव विचारून घेतले व आ.ताईंना फोन करून सांगितले ज्योतीताई जेवल्या नाहीयेत तर सोलापुरात पोहोचल्यावर आधी त्यांना जेवायला वाढा आणि गेल्या बरोबर ताईंनी ज्योतीताई कुठे आहेत विचारून आधी आग्रहाने, प्रेमाने जेवायला बसवले, त्यावेळी खूप भरून आलं होतं. आपली नुकतीच ओळख होत असताना इतकं प्रेमाने चौकशी करणं, माहेरचा अनुभव देणं सगळं किती आपलेपणाने , सहज होतं. हे नकळत माझ्यामध्ये संक्रमित झालं होतं. मी हा अनुभव विसरूच शकत नाही.
संवादिनीच्या नवं नवरात्र उपक्रमा निमित्त ‘प्रबोधन गीतांचा अभ्यास’ हा आमच्या गटाचा विषय होता. या अंतर्गत ५ गीते निवडून त्यावर गटाने आपल्याला समजलेल्या अर्थाची मांडणी करायची होती. त्यावेळी ताईंनी लिहिलेले गीत दोघेही हवे याचा अर्थ त्यांच्याकडूनच समजून घेऊ या असं ठरवलं, त्याप्रमाणे ताईंना म्हटलं “या गीताचा अर्थ, या गीतामागची भूमिका तुमच्या कडून समजून घ्यायची आहे.” यासाठी त्यांनी दूरस्थ पद्धतीने भेटण्याची तयारी दर्शविली. त्यांना बरं नव्हतं त्यामुळे लगेच त्यांना शक्य झालं नाही. काही दिवसांनी त्यांचा मेसेज आला. बरं नसल्यामुळे शक्य होईल तेव्हा त्याचे रेकॉर्डिंग मात्र पाठवते आणि गौरीताईच्या मदतीने त्यांनी ते रेकॉर्डिंग करून आमच्यासाठी पाठवलं. गीताचा अर्थ त्यांच्याकडून समजून घेताना अर्थ खूप छान प्रकारे आम्हाला समजला. काही झालं तरी कोणालाही नाराज करायचं नाही, हा ताईंचा स्वभाव.. आमचाही असा हट्ट त्यांनी त्यावेळी पुरवला होता.
ताई आजारी आहेत हे त्यांच्या जाण्यापूर्वी दोन दिवस आधी श्रुतीताईंकडून कळले होते. मी समजत होते ताई मौनातच आहेत. दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले आहे, कळल्यावर मात्र मोठा धक्काच बसला. त्यावेळी मला रामकृष्ण परमहंसांची आठवण झाली. आध्यात्मिक उंची गाठलेल्या या संत मंडळींना दुर्धर आजार व्हावेत?? कदाचित त्यांच्यातील स्वीकारशीलता, सहनशीलता याचा उच्चांक.. आयुष्यभर इतरांची दुःख, चिंता, प्रश्न ऐकत असताना, सोडवत असताना अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम यांच्या शरीरावर होऊन त्यातून कधीतरी आजाराचे प्रकटीकरण होत असणार.
त्यांचे प्रेम, त्यांचा सहवास मला मिळाला, भाग्यवान समजते मी स्वतःला. आपल्या घरी त्या येऊ शकल्या नाहीत ही खंत मात्र कायम जाणवत राहील.
आ.ताई म्हणजे गुणांचा समुच्चय.. मला त्यांच्यातील काही गुण जरी घेता आले तरी कृतार्थ होईन.. त्यांनी म्हटल्या प्रमाणे ‘पहावे आपणासी आपण ‘.. ताईंनी प्रत्यक्ष जीवनातून हे आपल्याकडे संक्रमित केलेलं आहे. मनन, चिंतनासाठी त्यांच्या आठवणी आहेतच. त्यांचे हे गुण काही प्रमाणात तरी रुजविण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी त्यांना आदरांजली असेल.🙏🙏🙏
ज्योतीताई कर्वे
रंजनाताई अभंग
माझा लताताईशी 1967-1988 या काळात संबंध आला: मुख्यत: युवती बिभागाच्या माध्यमातून. युवती विभागाला सन 1964 मध्ये प्रारंभ झाला: आमच्या बॅच पासून. प्रारंभी साप्ताहिक बैठकी. उपासना, वाचन असे कार्यक्रम चालत. पण प्रत्येक वेळी सदस्य बदलते असत. 3-4 वर्षांनी लताताई आल्या. त्यांचे सह आम्हा 6 जणींचा (मी, लताताई, नलूताई, नीलाताई. हेमाताई विद्याताई) एक गट 4-5 वर्षानी तयार झाला. मग कामाला खरी गती आली. विविध सहली, अभ्यास दौरे, दले, शिबीरे असे उपक्रम धडाक्याने सुरु झाले. कामाशिवाय ही परस्परात वैयक्तिक स्नेहबंध निर्माण व्हावेत असे मा,अप्पांचे प्रयत्न असत. उदा त्यांच्या आमंत्रणावरून परांडे वाड्यात आम्ही सर्व काही काल एकत्र राहिलो होतो. नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते तें मा. अप्पा वेळोवेळी सर्वाना एकत्र दाखवत असत. यातूनच पुढे युवती प्रशाले सारखे स्थायी स्वरूपाचे काम निर्माण झाले. या काळात लताताईंची प्रेरक सुंदर, पद्ये सर्व प्रबोधिनी्यांच्या ओठी असत. “हिंदू ऐक्याची ध्वजा”, “अग्रेसर हिंदू राष्ट्र हिंदू संस्कृती” अशा त्यांच्या पंक्तीतून हिंदुत्व प्रेम हा त्यांच्या व्यक्तित्वाचा पैलू ठळकपणे जाणवत असे.
लता ताईंच्या व्यक्तीमत्वबाबत मला वाटते कीं आई वडिलांकडून संघ समितीच्या पार्शवभूमीमुळे सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना जन्मत: च मिळाले होते पण त्यात त्यानी स्वप्रेरणेने भर घातली. मा. अप्पा-आण्णा यांच्या शिवाय लहानपणापासूनच थिओसोफिकल सोसायटीचे पू. नानाजी मराठे, साधिका विमलाताई ठकार, रामकृष्ण मिशन चे स्वामी रंगनाथानंद, गोविंदगिरी महाराज अशा अनेक संत महात्म्याचे प्रत्यक्ष (व रामकृष्ण विवेकानंद निवेदिता यांचे अप्रत्यक्ष्) सानिध्य, चरित्र व विचार लेखन यातून त्यांच्या पुण्याईचे अमृतकण त्यांनी जमविले. त्यातून त्यांचे व्यक्तित्व आणखी परिष्कृत झाले. त्यामुळे नंतर सोलापूर हरळीलाही त्या मोठे काम उभारू शकल्या. अर्थात मा. अण्णांचा अत्यंत भक्क्म पाठिंबा, मार्गदर्शन, सहभाग हे सर्व होतेच.
युवती विभागाच्या त्या भारलेल्या
वातावरणात ” या वास्तूच्या कणा कणाशी जडले माझे नाते, काशी माझी हीच आणखी रामेश्वर ही येथे! असा ध्येयधुंद संकल्प अनेकांनी केला असेल पण तो (प्रथम पुण्याच्या व नंतर सोलापूरच्या वास्तूबाबत) लताताई पूर्ण करू शकल्या हे त्यांचे मोठेपण !
त्यांच्यासारखी समर्पित व्यक्तीत्वे निर्माण होणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल
– रंजना अभंग
अपर्णाताई लळिंगकर
लताताईंचा परिसस्पर्श
महाविद्यालयात आल्यापासून लताताईंना मी त्यांच्या वर्तमानपत्रांतील लेखांमधुन ओळखत होते. जसे बापुसाहेब भिशीकरांचे लेख वर्तमानपत्रात येत असत तसे लताताईंचेही येत असत. महाविद्यालयात असल्यापासूनच संध्याकाळी कुठे ना कुठे तरी व्याख्याने ऐकावयास जाणे होत असे. एम एस्सी झाल्यावर १९९६ साली रामकृष्ण मठाची लायब्ररी लावली होती. त्या अनुषंगाने रामकृष्ण परमहंस, शारदामाता आणि स्वामीजी यांची चरित्रे, स्वामीजींची पत्रे, रामकृष्ण संकिर्तन, कोलंबो ते अल्मोरा, गीतारहस्य अशी पुस्तकेही वाचून झालेली होती. दरम्यान रोज संध्याकाळी सिंहगड रोड वरील शारदामठात सायं आरतीसाठी जात असे. रविवारी सकाळी मोक्षप्राणा माताजींच्या प्रवचनालाही जात असे. त्यातच खूप आतून वेद-उपनिषदे यांचा अभ्यास शारदा मठात राहून (त्या वातावरणात राहून) करण्याची इच्छा होती. तसं त्यावेळी माताजींना बोलुनही दाखवलं की मला शारदा मठ जॉईन करायचा आहे. घरी बोलुन दाखवलं तर सहाजिकच विरोध झाला होता. ते देखील माताजींना सांगीतलं. मग त्या म्हणाल्या की काही काळ तू अरुणाचल प्रदेशच्या आमच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम कर मग बघ तुला काय वाटतंय ते. त्यांनी मला दीक्षा घेण्यास सांगीतलं. सगळी तयारीही केली होती पण नियतीच्या मनात वेगळंच असल्याने ऐनवेळी काही ना काही अडचणी उपस्थित झाल्या आणि मी दीक्षा घेण्यास जाऊ शकले नाही.
मनात अस्वस्थता होतीच. तशातच डिसेंबरमध्ये रामकृष्णमठात लताताईंची सलग तीन दिवस संध्याकाळची व्याख्यानमाला होती. मी तीनही दिवस व्याख्यान ऐकायला गेले होते. शेवटच्या दिवशी सगळं झाल्यावर मी लताताईंशी बोलले. मला वेद आणि उपनिषदांचा अभ्यास शारदा मठात राहून करायचा आहे. पण मला घरचे नाही म्हणताहेत. मी काय करु? तशी माझी आणि त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती पण मी एकदम त्यांच्याशी हे बोलल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या अगं मलाही वेद आणि उपनिषदं अभ्यासायची आहेत. तू सोलापूर प्रबोधिनीत ये आपण दोघी मिळुन अभ्यासही करु आणि प्रबोधिनीचं कामही करु. त्या म्हणाल्या की वेद आणि उपनिषदे वाचून आणि ध्यानधारणा करुन त्या साधनेला एकप्रकारे रूक्षपणा येईल. त्याला प्रत्यक्ष कृतीची, सामाजिक कार्याची जोड दिली तर सगळ्याचं सार्थक होईल. त्यांनी जानेवारीत (१९९७) होणार्या आध्यात्मिक शिबीरासाठी मला सोलापूरला बोलावले. मी गेलेही. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीत आध्यात्मिक शिबीराला जाण्यास आई-बाबांचा काहीच विरोध नव्हता. ते शिबीर स्वामी माधवानंद म्हणजेच डॉ. माधवराव नगरकर हे घेणार होते. लताताईंनी त्यांना आधीच माझ्याविषयी सांगीतले होते आणि त्यांना माझ्याशी बोलण्यास सांगीतले. तसे ते माझ्याशी बोलले सुद्धा. सगळे त्यांना डॅडी म्हणत. डॅडींनी मला दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगीतल्या आणि त्या मला पटल्या. त्यातील एक म्हणजे आत्ता दोन पावलं मागे ये म्हणजे भविष्यात चार पावलं पुढे जाता येईल. दुसरी म्हणजे कायम बुद्धिमान लोकांमध्ये रहा कारण त्यांनाच तुझी किंमत कळेल.
पाच दिवसात तिथे अनेकांच्या ओळखी मैत्री झाल्या त्यात अण्णा ताम्हनकर, गायत्रीताई सेवक, प्रज्ञा जेरे आणि आमोल गांगजी हे चौघं होते. अजुनही काही जण होते पण मला आता नावे आठवत नाहीत. त्यांचा रो संध्याकाळी स्वाध्याय चालत असे. ते मला खूप आवडलं. सोलापूरहून परत आल्यावर मी अण्णांना आणि लताताईंना पत्रं लिहीले. अण्णांचे आणि लताताईंचे मला पत्रोत्तर आले. लताताईंची दोन आणि अण्णांचे एक अशी तीन पत्रे माझ्याकडे अजुनही आहेत. त्यातील अक्षर म्हणजे अतिशय सुंदर छापील वाटावे असे. जवळ जवळ पुढचे दीड दोन वर्षे आमचा संपर्क होता. बी एड केल्यावर (हे दोन पावले मागे येणं होतं कारण मला ते करायचं नव्हतं) मी विवेकानंद केंद्राच्या शाळेत अरुणाचल प्रदेश मध्ये जायचा निर्णय घेतला (हे चार पावलं पुढे जाणं होतं). या दोन पावलं मागे येऊन चार पावलं पुढे जाण्यात लताताई, अण्णा, गायत्रीताई, डॅडी, पोंक्षे सर, आमचे बाबा, विलासजी कुलकर्णी, रेखादिदि अशा अनेकांचा वाटा होता. ते माझं आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर रहाणं होतं. त्यामुळेच माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली. दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे समर्पीत जीवनव्रती, त्यानंतर चार वर्षे पुणे ज्ञान प्रबोधिनीतील विद्वान अभ्यासू व्यक्तीमत्वे यांचा माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव पडला. आत्ताच्या माझ्या एकूण प्रवासात या सगळ्यांचा तसेच आयुष्यातील धडसाने घेतलेले विविध निर्णय व त्याण्च्या अनुभवांचा खूप मोठा वाटा आहे. २०२१ मध्ये पुण्यात परत आल्यावर माझं प्रोफेशनल आयुष्य सोडून विविध विषयांचा अभ्यास आणि सामाजिक काम हे करण्यासाठीची मानसिक तयारीही या सगळ्यांमुळेच मिळाली. याची सुरुवात लताताईंच्या त्या पहिल्या संपर्कामुळे झाली.
तसा मला त्यांचा सहवास खूप मिळाला असे नाही पण पुणे प्रबोधिनीत असताना आणि नंतरही त्या जेव्हा जेव्हा भेटल्या तेव्हा तेव्हा एकदम आत्मियतेने भेटायच्या. त्यांचा तो सदा प्रसन्न, तेजस्वी चेहरा एकदम सात्विकतेचा आणि शांततेचा अनुभव देत असे. खरंतर १९९७ मध्ये अण्णा आणि लताताई यांना माझ्याकडून मी सोलापूर प्रबोधिनीत काम करण्यास जाईन अशी खूप आशा होती. त्यांच्या प्रत्येक पत्रात, फोन मध्ये, प्रत्यक्ष भेटीत ते नमूद करत असत. पण नियतीने माझ्या नशीबात वेगळंच लिहून ठवलेलं होतं त्यामुळे ते घडू शकलं नाही. लताताइइंच्या परिसस्पर्षाने या सगळ्याला सुरुवात झाली आणि जे घडलं ते ठीकच आहे. पण त्यांचा कोमल आणि मातृहृदयी सहवास नाही मिळू शकला याची मात्रं खंत आहे. आता स्वतंत्रपणे वेद-उपनिषदे यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास आणि जोडीला सामाजिक कार्य करणे हा त्यांचा संदेश आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सोबत काही पत्रे आणि नैनिताल शिबीराचे परिपत्रक जोडते आहे……. नियोजनाचा वरचा स्तर पाहण्यासाठी.
——————— डॉ. अपर्णा लळिंगकर (६ मार्च २०२५)