लक्ष्मीपूजन

 

प्रथम आवृत्तीची प्रस्थावना

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व

आश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी लमीदेवतेचं पूजन करयाची आपल्याकडे प्रथा आहे. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून, देवापुढे दिवा लावून, आपण शुभंकरोति म्हणतो,  यात “घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो” अशी प्रार्थना आपण करतोच. परंतु लमीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं विशेष महत्त्व आहे. बलिप्रतीपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवतानुसार नवीन वर्ष सुरु होतं. अनेक व्यापार-व्यावसायिकांचं आर्थिक वर्षही दिवाळीच्या पाडव्यापासून  सुरू होतं. त्यामुळे हिशेबाच्या नवीन वह्यांची आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा करतात. त्यावेळी जुन्या वह्याही काही लोक पूजेत ठेवतात. तिजोरी-तराजू-लेखण्यांची देखील पूजा करण्याची काही ठिकाणी पद्धत असते. यामागील भाव आणि विचार समजून घ्यावा.

हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंती | या घराघरातून वसो क्षेम-सुख-शांती |

सचोटीने, नीतीने, कष्ट करून पुष्कळ संपत्ती मिळवावी, घरात समृद्धी, समाधान, शांती असावी, “इशावास्याम्  इदं सर्वम्” असं म्हणत आपल्याला मिळालेलं धन देवाला अर्पण करून त्याचा प्रसाद म्हणून ते स्वीकारावं असं आपल्या पूर्वजांचं सांगण आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आणि भगवान विष्णूंची पत्नी. भगवान विष्णू हे जगाचे पिता, म्हणून लक्ष्मीला त्रिभुवनाची माता समजतात. विष्णू म्हणजे विशाल, सर्व काही व्यापणारा असा विचार करणाऱ्या व्यक्तीला धन-समृद्धी मिळते असे मानले जाते. चांगल्या मार्गाने धन मिळविण ही आईची पूजा आहे असं मानतात आणि दुसऱ्याला फसवून, कपटाने, भ्रष्टाचाराने मिळविलेलं धन हणजे आईचा अनादर होय असे आपण मानतो. वहीपूजन करण्यामागचा भाव असा असतो की पराक्रम-पुरुषार्थाने आम्ही वर्षभरात उदंड संपत्ती मिळवावी. देवापुढे नि:शंक मनाने ठेवता येतील एवढे आमचे आर्थिक व्यवहार निर्मळ, प्रामाणिक असावेत.‌‍

प्रत्येकच उद्योग, व्यापार, व्यवसाय ही ईश्वराची पूजा होवू शकते. त्यामुळे व्यवसायाची साधनं ही एक प्रकारे पूजेचीच साधनं असतात, मग ती लेखणी असो, तराजू असो, नांगर असो की यंत्र असो. या सर्वांची पूजा आपण दसऱ्या-पाडव्याला करतो. घरातील पवित्र ग्रंथ, विद्यार्थ्यांची पुस्तकेही पूजेत ठेवतो. या साधनांच्या आधारे जीवनात आपण यश मिळवितो या साधनांबाबत अशा रीतीने कृतज्ञतेचा भाव आपण व्यक्त करीत असतो.

लमीपूजनाच्या निमित्ताने ‌’आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती‌’ आणि ‌’अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता‌’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात; हणून या पूजेची विशेषता आहे.

 

पूजेची तयारी

लक्ष्मीपूजनाच्या आधी स्वच्छतागृहासहित घर लख्ख करावं. दारात सुंदर रांगोळी काढावी, पणत्या लावाव्यात, दारावर मंगलतोरण बांधावीत.

चौरंगावर शाल किंवा स्वच्छ वस्त्र घालून त्यावर एका चांदीच्या किंवा निष्कलंक लोहाच्या (स्टीलच्या) वाटीत लक्ष्मीची मूर्ती किंवा टाक अथवा नाणी ठेवावीत. दुसऱ्या वाटीत कुबेरपूजेसाठी चलनी रुपये, नाणी ठेवावीत. आपल्या कामाची साधन (वह्या, लेखणी, तराजू कवा अन्य काही) मांडावीत. एका कलशात पाणी भरून त्यात किंचित हळद-कुंकू, कापूर, अक्षता, एक फूल, एक सुपारी, एखादे नाणे घालून ठेवावे. वर विड्याची किंवा आंब्याची पाच पानं लावून त्यावर नारळ ठेवावा. कलशावर कुंकवाचं स्वस्तिक काढावं. चौरंग किंवा पाटावर अक्षता ठेवून त्यावर कलश ठेवावा. शंख, घंटा, समई ठेवावी. दिलेल्या यादीनुसार साहित्याची तयारी असावी. खारका, बदाम या पूजेतील अत्यावश्यक गोष्टी नव्हेत. ज्यांना त्या ठेवाव्याशा वाटतील त्यांनी त्या ठेवाव्यात. नंतर प्रसाद म्हणून त्यांचं वाटप करावं. पूजेच्या वेळी घरातील सर्वांनी मंगल तिलक लावून, स्वच्छ कपडे घालून पूजेला ओळीत, शिस्तीने बसावं. घरातील कर्त्या पुरुषाने अथवा स्त्रीने वा दोघांनी यजमान म्हणून पूजेस बसावं.

 

सर्वसाधारण सूचना

१) पोथीमये आलेला ठळक अक्षरातील भाग पुरोहितांपाठोपाठ सर्व उपस्थितांनी म्हणावा.

२) गद्यातील भाग फक्त पुरोहितांनी अथवा ते सूचना करतील त्यानुसार यजमान अथवा इतर उपासकांनी म्हणावा.

३) सामन्यात: कृतीच्या सूचना कंसात दिल्या आहेत आणि अन्य विवेचन मंत्रांच्या आधी/नंतर दिले आहे.

४) संस्कृत मंत्र म्हणताना संधिनियमानुसार काही बदल होतात. ते बदल त्या त्या ठिकाणी कंसात दाखविले आहेत. जोडून म्हणताना कंसाप्रमाणे व तोडून म्हणताना कंसाआधी दाखवल्याप्रमाणे म्हणावे.

 

पूजेचे साहित्य

हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले, आंब्याची किंवा विड्याची 5/7 पाने, उदबत्ती, उदबत्तीचे घर, नीरांजन, फुलवाती, तूप, कापूर, काडेपेटी, 3/4 सुपाऱ्या, नारळ, पंचामृत, लाह्या-बत्तासे, कापसाची वस्त्रे, शंख, घंटा, समई,  कलश, सुटी नाणी, लमीची मूर्ती/टाक, अन्य अलंकार, चांदीची नाणी (उपलब्ध असल्यास), 2 ताम्हन, 1 पळी, 1 भांडे, 1 कलश, 3-4 वाट्या, 1 ताट, चौरंग किंवा पाट, शाल किंवा एखादे स्वच्छ वस्त्र, देव पुसण्यासाठी वस्त्र, हात पुसण्यासाठी रुमाल, पाणी. आपल्या कामाची साधने वह्या, लेखणी, तराजू, किंवा अन्य काही मांडावीत.

 

3) लक्ष्मीपूजन प्रारंभिक विधी

आज आश्विन वद्य अमावास्येचा शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी श्रीलक्ष्मीदेवी व धनाची देवता कुबेर यांचं पूजन करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. येत्या वर्षात उत्तम प्रयत्न करून नीतीने संपत्ती मिळवू आणि कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी तिचा उपयोग करू असा मनोमन संकल्प करूया. सर्वांचे प्रतिनिधी या नात्याने प्रत्यक्ष लक्ष्मीपूजन यजमान करतील. खरं तर आपण सर्वच जणांनी मनोमन पूजा करावयाची आहे. म्हणून सर्व मंत्रांमध्ये आपण बहुवचनाचा प्रयोग करत आहोत.

प्रथम त्रिवार ओंकार म्हणूया.

अ, उ, आणि म्‌‍ यांनी युक्त अशा ओंकाराचा उच्चार मनाच्या एकाग्रतेसाठी उपयोगी असतो. (आपण सर्वांनी आता पाठोपाठ तीन वेळा ओंकाराचा उच्चार करावा.)

हरिः  ॐ। ॐ। ॐ।

 

3.1 आचमन

या पूजेची सुरूवात आचमनाने करूया. आचमन केल्याने कंठाला ओलावा मिळतो आणि मनही शांत होते.

(आचमनासाठी आपल्या उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा करा. त्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याशेजारील बोट मुडपून ते तळव्यापाशी अंगठ्याला चिकटवा. डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या गोकर्ण मुद्रेत घेऊन प्या. पाणी पिऊन झाल्यावर म्हणा)

केशवाय नमः केशवाला नमस्कार असो.

(पुन्हा एकदा गोकर्ण मुद्रेत एक पळी पाणी घेऊन प्या आणि म्हणा)

नारायणाय नमः नारायणाला नमस्कार असो.

(पुन्हा एकदा एक पळी पाणी गोकर्ण मुद्रेत घेऊन प्या आणि म्हणा)

माधवाय नमः माधवाला नमस्कार असो.

(आता चौथ्या वेळी एक पळी पाणी गोकर्ण मुद्रेत घ्या आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटावरून ते पाणी ताम्हनात सोडा आणि म्हणा )

गोविन्दाय नमः। गोविंदाला नमस्कार असो.

आता आपण आजच्या कार्यक्रमासाठी स्वत:ची, येथील भूमीची व आसमंताची शुद्धी करूया.

 

3.2 आत्मशुद्धी

आपण सर्वजण आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून, कपाळाला गंध लावून पूजेसाठी बसलो आहोत. तथापि शरीराच्या पावित्र्याच्या जोडीने मनाची पवित्रताही महत्त्वाची आहे. (त्यासाठी आता डाव्या हातात एक पळी पाण्याने भरून घ्या. उजव्या हातात एक फूल घेऊन ते पळीतील पाण्यात बुडवा. आपल्यावर शांती आणि पावित्र्याचे सिंचन होत असल्याचा अनुभव घेत फुलाने आपल्या मस्तकावर पाणी शिंपडा आणि म्हणा.)

अपवित्रःपवित्रो वा, सर्वावस्थां गतोऽपि वा । (अपवित्रःप्‌पवित्रो)

 यःस्मरेत्‌‍ पुण्डरीकाक्षं, स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥ (यस्स्मरेत्‌‍) (बाह्याभ्यन्तरश्शुचिः)

मनुष्य पवित्र वा अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेत असो, त्याने परमेश्वराचे स्मरण केले तर तो अंतर्बाह्य पवित्र होतो.

स्वत:ची शुद्धी झाल्यानंतर आता या भूमीची, आसमंताची शुद्धी सर्वत्र अक्षता टाकून करूया.

 

3.3 भूमीशुद्धी

(डाव्या हातात थोड्या अक्षता घ्या. उजव्या हाताने त्या अक्षता सर्व दिशा-उपदिशांना तसेच वरच्या दिशेने आणि खाली जमिनीवर टाकताना म्हणा)-

अपसर्पन्तु ते भूता, ये भूता भूमिसंस्थिताः।

ये भूता विघ्नकर्तारः, ते गच्छन्तु शिवाज्ञया॥

अपक्रामन्तु भूतानि, पिशाचाःसर्वतो दिशम्‌‍। (अपक्‌क्रामन्तु) (पिशाचास्सर्वतो)

सर्वेषाम्‌‍ अविरोधेन, पूजाकर्म समारभे॥

या भूमीमध्ये ज्या दुष्ट प्रवृत्ती असतील त्या येथून दूर जावोत. कार्यात अडथळे आणणाऱ्या ज्या प्रवृत्ती असतील त्या श्री शिवांच्या आज्ञेने दूर निघून जावोत. अशुभ प्रवृत्तींच्या रूपात असलेली भूते व पिशाच्चे सर्व दिशांना दूर निघून जावोत.

 

3.4 संकल्प

आता आपण आजच्या लक्ष्मीपूजनाचा संकल्प करूया. संकल्प म्हणजे दृढनिश्चय. सामूहिकरीत्या संकल्प केल्याने तो पूर्ण करण्यास सर्वांचे सहकार्य मिळते. संघटनेची भावना वाढीस लागते. आजच्या या पूजेचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे करायचा आहे. हा संकल्प म्हणताना तुमच्या देशाचे, गावाचे नाव, संवत्सराचे नाव तुम्ही रिकाम्या जागी घालून उच्चारायचे आहे. वार आणि नक्षत्राच्या जागीही योग्य ती माहिती तुम्ही भरायची आहे. उर्वरित संकल्प जसाच्या तसा पाठोपाठ म्हणायचा आहे.

इह पृथिव्यां,——– द्वीपे, ——- वर्षे ——- ग्रामे/ नगरे, ——— नाम संवत्सरे, आश्विनमासे, कृष्णपक्षे, अमावास्यातिथौ, ——– वासरे, ——— नक्षत्रे, अस्माकं, सकुटुंबानां, सपरिवाराणां, क्षेमस्थैर्यआयुःआरोग्यऐश्वर्यअभिवृद्ध्यर्थं, अभ्युदयनिःश्रेयसप्राप्त्यर्थं , श्रीलक्ष्मीदेवताप्रीत्यर्थं, यथा मिलितउपचारद्रव्यैः, श्रीलक्ष्मीपूजनं कुबेरपूजनं करिष्यामहे। तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्रीगणपतिपूजनं, कलशादिअर्चनं करिष्यामहे।

या पृथ्वीवरील, ——– द्वीपामधील ——– देशामधील ——— नावाच्या गावात / नगरात, ——- नावाच्या संवत्सरात, आश्विन महिन्यात, कृष्ण पक्षात, अमावास्या तिथीला, ——– वारी, ——– नक्षत्रावर, आमच्या कुटुंबाला स्वास्थ्य, स्थैर्य, दीर्घायुष्य, आरोग्य लाभावे म्हणून, तसेच अभ्युदय म्हणजे ऐहिक वैभव आणि नि:श्रेयस म्हणजे आध्यात्मिक परिपूर्ती हे दोन्ही प्राप्त व्हावं यासाठी श्रीलक्ष्मीदेवता आणि श्रीकुबेरदेवता यांची, उपलब्ध असलेल्या पूजाद्रव्यांनी आम्ही पूजा करीत आहोत. तसेच पूजा निर्विघ्न व्हावी म्हणून श्रीगणेशाची आणि पूजेचा भाग म्हणून कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करीत आहोत.

 

3.5 श्रीगणेशपूजन

आता श्री गणेशाची प्रार्थना करूया.

सर्वदा सर्वकार्येषु, नास्ति तेषाम्‌‍ अमङ्गलम्‌‍

येषां हृदिस्थो भगवान्‌‍, विघ्नेशो गणनायकः॥

संकटांचा नाश करणाऱ्या गजाननाचा ज्यांच्या हृदयात निवास आहे ते सर्व कार्यात नेहमी यशस्वी होतात.

(गणपतीला गंध, अक्षता, फुले वहावीत.)

गं गणपतये नमः। निर्विघ्नं कुरु। पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामः॥

श्री गजाननाला नमस्कार असो. तो आमची पूजा निर्विघ्न करो. पूजेसाठी गंध, अक्षता, फुले वाहतो.

 

4) उपकरण पूजा

4.1 कलश पूजन

आता कलशदेवतेची म्हणजे वरुणाची पूजा करूया. प्राणिमात्रांच्या जीवनात पाण्याचे महत्त्व खूप आहे. जीवनाला ओलावा, शीतलता पाण्यामुळे येते. सृजनाची, नवनिर्मितीची शक्ती येते. (कलशाला आणि पूजेच्या तांब्याला दोन्ही हात लावा व म्हणा.)

कलशस्य मुखे विष्णुः, कण्ठे रुद्रः समाश्रितः। (रुद्रस्समाश्रित:।)

मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणाः स्मृताः ॥1॥ (मातृगणास्स्मृता:)

कुक्षौ तु सागराः सर्वे, सप्तद्वीपा वसुन्धरा (सागरास्सर्वे)

ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः, सामवेदो ह्यथर्वणः

अङ्गैश्च सहिताः सर्वे, कलशं तु समाश्रिताः॥2॥ (सहितास्सर्वे,)

अत्र गायत्री सावित्री, शान्तिपुष्टिकरी तथा

आयान्तु देवपूजार्थं, दुरितक्षयकारकाः ॥3॥

गंगे यमुने चैव, गोदावरि सरस्वति

नर्मदे सिंधु कावेरि, जलेऽस्मिन्‌‍ सन्निधिं कुरु ॥4॥

कलशाच्या मुखाच्या ठिकाणी विष्णू, कंठस्थानी शिव, मूलस्थानी ब्रह्मदेव आणि मध्यभागी मातृगण राहतात. त्याच्या कुशीत सात समुद्र, सात द्वीपांसह पृथ्वी, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चारही वेद आपापल्या अंगांसह राहिलेले असतात. येथे गायत्री आणि सावित्री या देवता पापांचा नाश करण्यासाठी आणि आपल्याला शांती व समृद्धी देण्यासाठी येवोत. हे गंगे, हे यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू आणि कावेरी, तुम्ही या कलशात येऊन राहावं, अशी आम्ही प्रार्थना करतो.

(कलशाला गंध, अक्षता, फुले वाहावीत.)

वरुणाय नम: | पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयाम: ||

आम्ही वरुणदेवतेला नमकार करतो आणि पूजेसाठी गंध, अक्षता आणि फुले वाहतो.

(शंख उपलब्ध असल्यास याची पूजा आता करायची आहे.)

 

4.2 शंखपूजन

हा सामान्य शंख नव्हे तर भगवान विष्णूंचा पांचजन्य आहे या भावनेने पूजा करूया.

त्वं पुरा सागरोत्पन्नो, विष्णुना विधृत: करे | (विधृतक्करे)

नमित: सर्वदेवैस्तु, पांञ्चजन्य नमोऽस्तु ते || (नमितस्सर्वदेवैस्तु,)

हे शंखा, तू पूर्वी सागरातून उत्पन्न झालास. तुला भगवान विष्णूंनी हातात धरलं आहे. सर्व देव ज्याला नमस्कार करतात अशा शंखदेवतेला आम्ही नमस्कार करतो.

(शंखाला गंध व फुले वहावीत.)

ॐ शंखदेवतायै नम: | पूजार्थे गंध पुष्पं समर्पयाम: ||

आम्ही शंखदेवतेला नमस्कार करतो आणि पूजेसाठी गंध आणि फुले वाहतो

4.3 घंटापूजन

(उजव्या हाताने घंटा वाजवावी.)

आगमार्थं तु देवानां, गमनार्थ तु रक्षसाम् |

कुर्वे घंटारवं तत्र, देवताह्वानलक्षणम् ||

देवांनी हणजे शुभशक्तींनी येथे यावे आणि राक्षस म्हणजे दुष्ट शक्ती येथून निघून जाव्यात म्हणून आम्ही हा घंटानाद करतो.

(घंटेला गंध, अक्षता, फुले वहावीत.)

ॐ घण्टादेव्यै नम: | पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयाम: ||

घंटादेवतेला नमकार असो. पूजेसाठी गंध, अक्षता आणि फुले वाहतो.

4.4 दीपपूजन

अमावास्येच्या रात्री दीपाचे/प्रकाशाचे फार महत्त्व असते. दीप हा ज्ञानाचे/ तेजाचे प्रतीक आहे. त्याची आता पूजा करूया.

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां पतिरव्ययः (दीपब्‌ब्रह्मरूपस्त्वं,)

 आरोग्यं देहि पुत्रांश्च, सर्वार्थांश्च प्रयच्छ मे (सर्वार्थांश्चप्‌प्रयच्छ )

हे दीपा, तू साक्षात्‌‍ परब्रह्माचं रूप आहेस, सर्व ज्योतींचा तू स्वामी आहेस. तू आम्हाला आरोग्य, उत्तम संतती आणि इष्ट ते सर्वच दे.

(दिव्याला गंध, अक्षता, फुले वाहवीत.)

दीपदेवतायै नमः पूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामः     

दीपदेवतेला नमस्कार असो. पूजेसाठी गंध, अक्षता, फुले वाहतो.

5. कुबेर पूजन

(कुबेर ही धनाची देवता आहे. वाटीतील नाण्यांची कुबेररूपाने आता पूजा करावी. त्यांना गंध, अक्षता, फुले वाहावीत.)

श्रीकुबेराय वैश्रवणाय नमः पूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामः॥

विश्रवसाचा पुत्र असा जो कुबेर त्याला नमस्कार असो. पूजेसाठी गंध, अक्षता व फुले वाहतो.

 

5.1 कामाच्या साधनांची पूजा

आपलं सगळं कर्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जे जे करतो ते आणि व्यवसाय, उद्योग, नोकरी म्हणून करतो ते, आवड म्हणून करतो ते सर्व ईश्वराची पूजाच होय. या पूजेची जी साधने म्हणजे वही, लेखणी, यंत्रे, अन्य काही यांची पूजा करूया. त्यासाठी पुढील ओव्या म्हणूया-

माझी कामाची साधने, पवित्र हे धाम माझे

येथे लक्षुमीसहित, माझा श्रीरंग विराजे

प्रेमभावे, कौशल्याने, जे मी येथ करीतसे

त्याच कर्माने प्रभूचे, पूजन हे होत असे

(वही, लेखणी, यंत्रे यांना गंध, अक्षता, फूल वाहावे.)

6. लक्ष्मीपूजन

(आता यजमानांनी लक्ष्मीची मूर्ती कवा टाक अथवा प्रतीकरूप नाणी पूजेसाठी खाली ताम्हनात घ्यावीत.)

षोडशोपचार पूजा

(देवतेला मनोमन आवाहन करावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। आवाहनं कुर्मः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. पूजेसाठी आवाहन करतो.

(देवतेला अक्षता वहाव्यात.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। आसनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. आसनासाठी अक्षता वाहतो.

(दोन-तीन पळ्या पाणी घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। पादयोः पाद्यं समर्पयाम:

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. पाय धुण्यासाठी हे पाणी घालतो.

(दोन-तीन पळ्या पाणी घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयाम:

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. हात धुण्यासाठी हे पाणी घालतो.

(दोन-तीन पळ्या पाणी घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। आचमनीयं समर्पयामः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. आचमन करण्यासाठी हे पाणी घालतो.

(चार-पाच पळ्या पाणी घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। स्नानीयं समर्पयामः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. स्नानासाठी हे पाणी घालतो.

(दोन-तीन पळ्या पंचामृत घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। पञ्चामृतस्नानं समर्पयामः। (पञ्चामृतस्स्नानं )

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. पंचामृताने स्नान घालतो.

(चार-पाच पळ्या गरम पाणी घालावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। उष्णोदकस्नानं समर्पयामः। (उष्णोदकस्स्नानं)

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. गरम पाण्याने स्नान घालतो.

(देवतेला पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्रीसूक्त म्हणावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः अभिषेकस्नानं समर्पयामः (अभिषेकस्स्नानं)

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. अभिषेक करून स्नान घालतो.

श्रीसूक्त

हे देवी लक्ष्मीला आवाहन करणारे स्तोत्र – सूक्त आहे. ऋग्वेदाच्या परिशिष्टात खिलसूक्तात ते आले आहे. त्यात 15 ऋचा आहेत आणि 16 वी ऋचा फलश्रुतीची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सूक्ताने देवीला अभिषेक करण्याची पद्धत आहे.

हरिः हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्रजाम्‌‍

चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह ॥1॥ (सुवर्णरजतस्स्रजाम्‌‍)

हे अग्ने, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांतीच्या, हरिणीप्रमाणे चपलगतीच्या, सोन्यारुप्याच्या माला परिधान केलेल्या, चंद्राप्रमाणे आल्हाददायक अशा सुवर्णमयी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ॥1॥

तां आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीम्‌‍

यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरुषानहम्‌‍ ॥2॥

हे अग्ने, जिच्यामुळे मला सुवर्ण, गोधन, अश्वधन, सेवकधन हे सारं प्राप्त होऊ शकेल अशा अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ॥2॥

अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीम्‌‍ (हस्तिनादप्प्रबोधिनीम्‌‍ )

श्रियं देवीमुपह्वये, श्रीर्मा देवी जुषताम्‌‍ ॥3॥

जिच्यासमोर अश्व आहेत, जी रथावर आरूढ आहे, हत्तींच्या गर्जनेने जी जाग आणते त्या लक्ष्मीला मी आवाहन करतो, ती देवी लक्ष्मी माझ्यावर कृपा करो. ॥3॥

कां सोस्मितां हिरण्यप्राकाराम्‌‍, आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्‌‍

पद्मे स्थितां पद्मवर्णां, तामिहोपह्वये श्रियम्‌‍ 4

मुखावर स्मित आणि हृदयात ओलावा असलेली, तेजस्विनी, आत्मतृप्ता आणि भक्तांचं आर्त पुरविणारी, सुवर्णाने नटलेली, कमलवासिनी आणि कमलाच्या कांतीची जी लक्ष्मी, तिला मी आवाहन करतो. ॥4॥

चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्‌‍

तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥5॥

चंद्राच्या प्रभेसारखी उज्जवल, यशाने तळपणारी, देवसुद्धा जिची पूजा करतात अशा लक्ष्मीला मी शरण आलो आहे. ती माझं दारिद्रय दूर करो अशी मी तिला प्रार्थना करतो. ॥5॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः।

तस्य फलानि तपसा नुदन्तु, मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥6॥

सूर्याप्रमाणे तेजस्वी कांती असलेल्या हे लक्ष्मीदेवते, तुझ्या तपातून वनस्पतिविश्व आणि त्यातही बिल्ववृक्ष उत्पन्न झाला आहे. तुझ्या तपातून उत्पन्न झालेल्या वृक्षांच्या फळांमुळे माझं अज्ञान, दुःख आणि दारिद्रय दूर होवो.॥6॥

उपैतु मां देवसखः, कीर्तिश्च मणिना सह

प्रादुर्भूतोस्मि राष्ट्रेऽस्मिन्‌‍, कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥7॥

देवमित्र कुबेर, कीर्तिदेवता आणि चिंतामणी यांसह देवी लक्ष्मी माझ्याकडे येवो. या राष्ट्रात- या भरतभूमीत माझा जन्म झाला याबद्दल मला कृतार्थता वाटते. लक्ष्मीदेवी मला यश आणि समृद्धी देवो.॥7॥

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम्‌‍, अलक्ष्मीं नाशयाम्यहम्‌‍

 अभूतिम्‌‍ असमृिद्धं च, सर्वां निर्णुद मे गृहात्‌‍ ॥8॥

भूक आणि तहानेने म्लान झालेल्या दरिद्रतेला इथे थारा न उरो. हे लक्ष्मी, तू माझ्या घरातून दुर्भाग्य-दारिद्रय घालवून दे.॥8॥

गंधद्वारां दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम्‌‍ (गंधद्द्वारां)

 ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियम्‌‍ ॥9॥

रोमरोम सुगंधित असणारी, जिच्याशी सामना करणं दुरिताला कठीण आहे अशी, जिच्याभोवती समृद्धी-तृप्ती नांदते अशी, गजान्त वैभवाची स्वामिनी, सर्व भूतमात्रांतली ईश्वरी शक्ती जी लक्ष्मी तिला मी आवाहन करतो.॥9॥

मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि (मनसक्काममाकूतिं, वाचस्सत्यमशीमहि)

पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यश ॥10॥ (श्रीश्श्रयतां )

हे लक्ष्मी, माझ्या मनातील कामना आणि संकल्प पूर्ण कर. माझी वाणी सत्य असावी. पशुधन, अन्न, श्रेष्ठ यश आणि उत्तम रूप यांची मला प्राप्ती व्हावी. ॥10॥

कर्दमेन प्रजाभूता, मयि संभव कर्दम (कर्दमेनप्प्रजाभूता,)

श्रियं वासय मे कुले, मातरं पद्ममालिनीम्‌‍ ॥11॥

हे लक्ष्मीपुत्र कर्दमा, माझ्या ठिकाणी निर्माण हो. कर्दमामुळे पुत्रवती झालेल्या, कमळाचे हार घालणाऱ्या तुझ्या आईचा म्हणजे लक्ष्मीचा माझ्या वंशात वास असावा. (कर्दम = निर्मितीची भूमी. बी रुजायला ओली जमीन (कर्दम) लागते.॥11॥

आपः सृजन्तु स्निग्धानि, चिक्लीत वस मे गृहे (आपस्सृजन्तु)

नि देवीं मातरम्‌‍, श्रियं वासय मे कुले ॥12॥

हे लक्ष्मीपुत्र चिक्लीत, माझ्या घरात राहा. आमच्या घरात तुझा ओलावा असू दे. तुझ्या आईचा – लक्ष्मीचा आमच्या वंशात वास असो. ॥12॥

आर्द्रां यःकरिणीं यष्टिं, सुवर्णां हेममालिनीम्‌‍ । (यक्करिणीं)

सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह ॥13॥

हे अग्ने, मृदू मनाची, सोन्याच्या रंगाची, कमळाच्या माळा घालणारी, सुवर्णाने अलंकृत अशी जी लक्ष्मी तिला माझ्यासाठी आवाहन कर. ॥13॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं, पिंगलां पद्ममालिनीम्‌‍  

चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो आवह ॥14॥

सोन्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमाला धारण करणारी, सूर्यासारखी तेजस्वी अशी जी लक्ष्मी, तिला, हे अग्ने, तुझ्याकरवी मी आवाहन करतो. ॥14॥

तां आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीम्‌‍

यस्यां हिरण्यं प्रभूतं, गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्‌‍ ॥15॥

हे अग्ने, जिच्या योगाने मला उदंड सुवर्ण, गोधन, अश्वधन, सेवकधन लाभणार आहे, त्या लक्ष्मीदेवतेला आवाहन कर. ॥15॥

यः शुचिः प्रयतो भूत्वा, जुहुयादाज्यमन्वहम्‌‍ (यश्शुचिप्प्रयतो भूत्वा,)

सूक्तं पंचदशर्चं च, श्रीकामः सततं जपेत्‌‍ ॥16॥ (श्रीकामस्सततं)

शान्तिः शान्तिः। शान्तिः

जो शुचिर्भूत होऊन प्रयत्नपूर्वक हे पंधरा ऋचांचं सूक्त नेहमी जपतो, तुपाच्या आहुती देऊन हवन करतो, ज्याला लक्ष्मी प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याच्या इच्छा लक्ष्मी पूर्ण करो. ॥16॥ ॐ शांती असो, शांती असो, शांती असो.

(अभिषेकानंतर लक्ष्मीची मूर्ती कवा टाक अथवा प्रतीकरूप नाणी पुसून पुन्हा वर वाटीत ठेवावीत.)

(देवतेला कापसाचे वस्र वहावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। वस्त्रं समर्पयामः।

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. वस्त्र वाहतो.

(देवतेला चंदन लावावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामः।

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. अंगाला लावण्यासाठी हे चंदन लावतो.

(देवतेला हळदी-कुंकू वहावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। हरिद्राकुंकुमादि सौभाग्यद्रव्याणि समर्पयामः।

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. हळद-कुंकू इ. सौभाग्यद्रव्ये वाहतो.

(देवतेला फुले वाहावी.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. ऋतूनुसार उपलब्ध असलेली फुले वाहतो.

(देवतेला उदबत्ती ओवाळावी.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। सुवासार्थे धूपं आघ्रापयामः

(श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. सुवासासाठी उदबत्ती ओवाळतो.)

(देवतेला निरांजनाने ओवाळावे.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। प्रकाशार्थे दीपं दर्शयामः।

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. प्रकाशासाठी नीरांजनाने ओवाळतो.

(देवतेला नैवेद्य दाखवावा.)

श्रीलक्ष्मीदेव्यै नमः। नैवेद्यं समर्पयामः

      प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा।  समानाय स्वाहा । ब्रह्मणे स्वाहा।

श्रीलक्ष्मीदेवतेच्या पंचप्राणांना हा नैवेद्य दाखवतो.

(एक फूल व थोड्या अक्षता देवतेला वहाव्यात.)

श्रीलक्ष्मीदेवतायै नमः मंत्रपुष्पं समर्पयामः

श्रीलक्ष्मीदेवतेला नमस्कार असो. मंत्रपुष्प वाहतो.

 

प्रार्थना

श्रीलक्ष्मी आणि श्रीपार्वती दोघी एकच आहेत, श्रीनारायण आणि श्रीशिव हे एकच आहेत, अशा बोधाने लक्ष्मी-पार्वतीची स्तुती करणारा हा श्लोक म्हणूया.

सर्वमंगलमांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके।

      शरण्ये त्र्यंबके गौरि, नारायणि नमोऽस्तुते॥

सर्वांचे मंगल करणाऱ्या, सर्व हेतूंची पूर्तता घडवून आणणाऱ्या, सर्वजण ज्यांना शरण जातात अशा हे पार्वतीदेवी, हे लक्ष्मीदेवी, तुम्हाला नमस्कार असो.

(आता आरती करूया. तबकात नीरांजन आणि कापूर लावून घ्यावा.)

 

 

 

आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी

वारी वारी जन्ममरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी

जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी॥1

जयदेवी ….

त्रिभुवनीभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी श्रमले परंतु बोलवे काही

साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्तालागी, पावसि लवलाही 2

जयदेवी ….

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासुनि सोडी, तोडी भवपाशा

अंबे, तुजवाचून कोण पुरविल आशा, नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा 3

जयदेवी ….

कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम्‌‍

सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि

देवी लक्ष्मीची शांत चित्ताने प्रार्थना करूया. डोळे मिटून काही क्षण देवीचे ध्यान करूया. आपल्या कुटुंबाचे आणि विश्वातल्या भूतमात्रांचे तिने कल्याण करावे अशी प्रार्थना करूया.

 

ध्यान पूजा समाप्ती

      ॐ।

      आवाहनं जानामि, जानामि तवार्चनम्‌‍

      पूजां चैव जानामि, क्षम्यतां परमेश्वरि॥

हे देवी, तुला कोणत्या प्रकारे बोलवावे, तुझी पूजा कशी करावी ते मला नीटसे कळत नाही. या पूजेत काही अधिक-उणे राहिले असेल तर क्षमा कर. ही पूजा पूर्ण मानून घे.

(उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावे व म्हणावे.-)

अनेन कृतपूजनेन श्रीलक्ष्मीदेवता प्रीयताम्‌‍ तत्‌‍ सत्‌‍ ब्रह्मार्पणमस्तु

(पाणी ताम्हनात सोडावे.)

या पूजेने श्रीलक्ष्मीदेवी सुप्रसन्न होवो. हे सर्वच परब्रह्माला अर्पण असो.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देवी उपासनेसाठी

दुर्गासप्तशतीतील काही श्लोक देत आहोत.

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात मातृरूपात राहते।  नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात तृष्णारूपात राहते।  नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात क्षुधारूपात राहते।  नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात निद्रारूपात राहते।  नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात शक्तीरूपात राहते।  नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु बुद्धीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै  नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात बुद्धिरूपात राहते। नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात श्रद्धारूपात राहते। नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात दयारूपात राहते। नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात शांतीरूपात राहते। नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

जी देवी भूतमात्रात लक्ष्मीरूपात राहते। नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।

चितिरूपेण या कृत्स्नम्‌‍ एतद्‌‍ व्याप्य स्थिता जगत्‌‍

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

विश्वाला व्यापुनी पूर्ण जी राहे दिव्य चेतना । नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः।