अन्त्येष्टी (दाहकर्म)

अन्त्येष्टी (दाहकर्म)

पाचव्या आवृत्तीची प्रस्तावना

१) दाहकर्म, जलांजलिदान, अस्थिसंचयन हे मृत्यूनंतरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये करण्याचे विधी, २) एकोद्दिष्ट श्राद्ध, सपिंडीकरण, पिंडोपस्थान, पिंडविसर्जन इ. दहाव्या दिवसानंतर करण्याचे विधी, ३) या पारंपरिक विधींना ज्ञानप्रबोधिनीने दिलेली भजनयुक्त श्राद्धसभेची जोड हे तीन मुख्य भाग अन्त्येष्टी पोथीच्या चौथ्या आवृत्तीत एकत्रच होते. त्यामुळे ती पोथी मोठी (४० पृष्ठांची) झाली होती. गेल्या काही वर्षांमधील अनुभवाने हे तीन भाग एकत्र न छापता वेगवेगळे छापावेत असे वाटले. या पाचव्या आवृत्तीत हा बदल केला आहे. त्यानुसार ही पोथी वरील तीनपैकी फक्त पहिल्या भागाची म्हणजे दाहकर्म संस्काराची आहे. चौथ्या आवृत्तीत प्रारंभी ६ पृष्ठांची ज्ञानप्रबोधिनीची प्रस्तावना आणि शेवटी ७ पृष्ठांची धर्मनिर्णय मंडळाच्या पोथीतील प्रस्तावना अशी १३ पृष्ठे प्रस्तावनेसाठी होती. या पोथीत त्या दोन्ही प्रस्तावनांमधील निवडक परिच्छेद घेतले आहेत आणि अशा उद्धृत परिच्छेदांच्या शेवटी (ज्ञा. प्र.) किंवा (ध. नि. मं.) असा ऋणनिर्देश केला आहे. दोन्ही प्रस्तावनांमधील काही भाग गाळला आहे. मूळ आशयाला धक्का न लावता प्रस्तावनेत क्वचितत् काही अल्प बदल केले आहेत.

चौथ्या आवृत्तीत उपविधींना क्रमांक नव्हते. ते या आवृत्तीत घालून त्या त्या उपविधींच्या वेळी करावयाच्या सूचनांमध्ये योग्य ते बदल केले आहेत.

धार्मिक संस्कार विधींमध्ये कालोचित बदल करण्यामागील वैचारिक भूमिका धर्मनिर्णय मंडळाच्या दोन्ही पुष्पांमधील प्रस्तावनेत चांगल्या प्रकारे आलेली आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य वाचावी.

असेही अनुभवास येते की एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिचे कुटुंबीय/स्नेही यांना दाहकर्माचा समंत्रक विधी करावयाचा असतोच असे नाही. तथापि दहनापूर्वी केवळ काही मंत्रपठण/श्लोकपठण करावे असे त्यांना वाटत असते. अशा इच्छुक सदस्यांसाठी या पोथीच्या परिशिष्टात काही मांडणी केली आहे. तिचा उपयोग होईल अशी आशा वाटते.

साहित्य

चिमूटभर काळे तीळ, ६ कापराच्या वडया, ४ चमचे तूप, काडेपेटी, चमचा, पळी-पंचपात्री (उपलब्ध असल्यास), ताम्हन, ५-६ दर्भ, १ शेणाची गोवरी.

 

ज्ञान प्रबोधिनी धर्मनिर्णय मंडळाच्या प्रस्तावनेतील निवडक भाग

. निधनानंतर लगेच

मृत्यू सुखद नसतो. पण तो चुकत नाही. एखादी व्यक्ती घरी मृत झाली तर तिच्या आसपास उदबत्या लावून ठेवाव्यात. त्या खोलीतील वातावरण फार शोकविव्हल असणार नाही यासाठी प्रयत्न करावा. नात्यातल्या वडीलधाऱ्या मंडळींना पाचारण करावे; आणि अशा वडीलधाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या निकटच्या व्यक्तींना समजावून सांगावे. सांत्वन करावे, पाठीवरून हात फिरवावा. शक्यतो गीतेचे वाचन वा पठण सुरू करावे. (ज्ञा. प्र.)

. अन्त्येष्टीचे मूलतत्त्व

मनुष्याचे शरीर त्यातून जीव निघून जाताच निरुपयोगी होते. अशा शरीराची योग्य ती विल्हेवाट लावणे अत्यावश्यक होय. या आवश्यकतेकडे लक्ष देऊन मृत शरीराच्या विल्हेवाटीचे आचार पूर्वाचार्यांनी सांगितले आहेत. निरनिराळ्या सूत्रात ते आचार वेगवेगळे दिसून येत असले तरी त्यातील मूलभूत तत्त्व एकच आहे. सूत्रकारांनी या क्रियेस अन्त्येष्टी असे म्हटले असले तरी व्यवहारात यासच अन्त्यसंस्कार, अन्त्यकर्म, और्ध्वदेहिक, मूठमाती इत्यादी शब्दही लावतात. (ध. नि. मं)

. निकटवर्ती जनांचे कर्तव्य

मनुष्य मृत झाल्यास त्याच्या शरीरास योग्य ते संस्कार करून त्याची पुढील सर्व व्यवस्था लावणे हे मृतासन्निध असणारांचे आवश्यक कर्तव्य होय. मृताच्या अगदी जवळचे आप्तेष्ट अत्यंत शोकाकुल होऊन जात असल्याने ते और्ध्वदेहिकाची व्यवस्था करण्यास सामान्यतः असमर्थ असतात. यासाठी ही व्यवस्था नीटपणे पार पडावी म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्यांनी व अगदी जवळचा संबंध नसलेल्या नातलगांनीही दक्षता ठेवली पाहिजे. सध्या हिंदुसमाजात याविषयी बऱ्याच वेळी अनास्था दिसून येते, हे बरे नव्हे ! (ध. नि. मं)

. शोक करणे धर्म्य नव्हे

मृत्यूनंतर मन शोकाकुल होऊन रडू कोसळणे हे स्वाभाविकच आहे. मात्र या बाबतीत धर्मशास्त्रकारांची ‌रडू नये, तर मृतास सद्गती प्राप्त व्हावी म्हणून यथाशक्ती क्रिया कराव्यात.

‌       अतो रोदितव्यं हि क्रियाः कार्याः स्वशक्तितः|‌’ (याज्ञवल्क्यस्मृती. ३.११)

अशी आज्ञा आहे हे लक्षात ठेवून क्रियेकडे विशेष लक्ष द्यावे. क्रियाकर्माकडे लक्ष वेधले म्हणजे शोक कमी होऊन मन आवरणे सुलभ होते. (ध. नि. मं)

. मंगळसूत्र बरोबर नेणे आवश्यक आहे का?

पती मरण पावलेला असताना पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन त्याचेही पतीच्या प्रेताबरोबर दहन करावे अशी रूढी आहे. मंगळसूत्रातील सोन्याचा अशाप्रकारे निष्कारण अपव्यय होतो. खरे म्हणजे असे मंगळसूत्र काढून घेण्याचे काही कारण नाही. आधीच पतिनिधनाने ती स्त्री दुःखी झालेली असते. अशात तिच्याकडे मंगळसूत्र मागणे म्हणजे तिच्या दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे. पतिनिधनानंतर मंगळसूत्राचा व कुंकू इ. अन्य सौभाग्यचिह्नांचा त्याग करावा अथवा नाही याचा निर्णय त्या स्त्रीवरच सोपवावा. (ज्ञा. प्र.)

. प्रेताची पाठवणी

मृतदेह घरातून जात असताना जणू ती व्यक्ती कोठल्यातरी दूरवरच्या प्रवासाला, पुन्हा याच देहात परत कधी न येण्यासाठी चाललेली आहे अशी धारणा ठेवावी आणि तिला व्यवस्थित वेशभूषा नेसवून व तिच्या कपाळाला गंध अथवा सुगंधित बुक्का लावून, फुले आणि हार समर्पण करून पाठवणी करावी.

हल्लीच्या दिवसात काडेपेटी उपलब्ध झाल्याने घरून अग्नी नेण्याचे कारण नाही. ज्याने श्रौत किंवा स्मार्त अग्नी घरी ठेवलेला असतो त्याच्या कुटुंबियांनी घरून अग्नी नेणे हे योग्य आहे. (ज्ञा. प्र.)

. स्मशानयात्रा

मृतदेह घरातून नेताना, ‌’श्रीराम जयराम जयजय राम‌’, ‌’जय जय राम कृष्ण हरी‌’, ‌’रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम‌’ अथवा आपणांस योग्य वाटेल तो मंत्र अथवा धून उच्चारीत मृतदेह घरातून हलवावा. देह अंगणात अथवा मोकळ्या जागेवर आणल्यानंतर त्याला स्नान घालण्याची पद्धत पूर्वी होती. आता कढत पाणी करून ते केवळ पायावर घालण्यात येते. तथापि तसे करण्याचीही आवश्यकता दिसत नाही. प्रेतवाहक गाडीतून अथवा अन्य उपलब्ध पद्धतीने मृतदेह स्मशानात न्यावा. (ज्ञा. प्र.)

. समंत्रक अग्नी म्हणजे काय?

स्मशानात गेल्यावर समंत्रक अग्नी देण्यासाठी पुरोहित अडवून पैसे मागतात अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. पुरोहितांनी मंत्र म्हटले तर समंत्रक अग्नी झाला, पुरोहित मिळू शकले नाहीत तर समंत्रक अग्नी देता येणार नाही अशी समजूत असण्याचे कारण नाही. या प्रस्तुत पोथीवरून पुरोहिताचे काम कोणतीही शुचिर्भूत व्यक्ती करू शकेल. प्रसंगी ही पोथीही हातात नसेल तर भगवद्गीतेतील दुसरा अध्याय म्हणून किंवा ‌’श्रीराम जयराम जयजयराम‌’, ‌’जयजय विठोबा रखुमाई‌’ इत्यादी धुनी म्हणूनसुद्धा दहन करण्यास प्रत्यवाय असू नये. मुख्य म्हणजे दहन करणाऱ्याची व्यक्तीबद्दलची श्रद्धा आणि सदिच्छा खऱ्या स्वरूपात व्यक्त होणे आवश्यक आहे.

मृत्यूनंतर अमुक विधी केले तरच मृत व्यक्तीला सद्गती मिळेल, एरवी नाही असे मानणे चुकीचे आहे . भक्ती आणि श्रद्धा या दोन गोष्टीच मुख्य आहेत. बाकीच्या गोष्टी केवळ भक्ती प्रकट करण्याची साधने आहेत. (ज्ञा.प्र.)

. वस्त्रहरण

दहन करताना प्रेताच्या अंगावरील वस्त्रे काढून घ्यावीत अशी रूढी आहे. तथापि तसे करणे आवश्यक व योग्य नाही. मात्र शाल  इ. बहुमोल वस्त्रे न जाळता ती स्मशानात कोणास तरी द्यावीत अथवा स्मशानात ठेवून द्यावीत. एखाद्या गरजूला त्याचा उपयोग होईल. (ज्ञा.प्र.)

१०. त्याज्य रूढी

मृत्यू झाल्यावर मृताच्या ब्रह्मचारी, सकेशा विधवा, रजस्वला, इत्यादी अवस्थेप्रमाणे त्याच्या प्रेतावर कित्येक संस्कार करण्याची रूढी आहे. परंतु हे सर्व प्रकार वर्ज्य करावेत. (ध. नि. मं)

११. अधिकारी

अन्त्येष्टीचा अधिकार मृताच्या पुत्रास व तदभावी बंधू इत्यादी जवळच्या नातलगास असतो हे उघडच आहे. पण पुत्र फार लहान असला तरीही त्याच्या हस्ते अग्नी देता यावा म्हणून त्यास स्मशानात नेण्यात येते. मात्र असे करण्याचे कारण नाही. अशा वेळी मुलास घरी ठेवून दुसऱ्या कोणीही अग्नी देणे योग्य होय. जो अग्नी देईल त्यानेच पुढील दहा दिवसांची कृत्ये केली पाहिजेत असाही नियम नाही. करिता तारतम्य बाळगून अग्नी कोणी द्यावा हे ठरवावे. (ध. नि. मं)

१२. पौरोहित्य

अन्त्यसंस्काराचे पौरोहित्य हा एक नेहमीचाच त्रासदायक प्रश्न होऊन बसलेला आहे. अन्त्यसंस्कार चालविणाऱ्या पुरोहितास समाज अशुभ मानतो. उलट पुरोहिताच्या अभावी नुसता अग्नी देणे (भडाग्नी) कर्त्याच्या जिवावर येते. वास्तविक उपनयन, विवाह इ. अन्य संस्कारांप्रमाणे दाहकर्म हाही एक संस्कारच असल्यामुळे शास्त्रात त्यात दोष मुळीच नाही. अन्त्येष्टी चालविणारा ब्राह्मण पतित (कारटा) असे शास्त्र नाही. (ध. नि. मं)

१३. स्नान

प्रेतदहनानंतर नदीवर स्नान करावे. मग घरी जावे अशी पद्धत आहे. घरचे स्नान अधिक स्वच्छ होत असल्यास घरी येऊन स्नान करणे चुकीचे होणार नाही. (ज्ञा. प्र.)

१४. केशवपन

हजामत करणे, नखे काढणे, स्नान करणे हे स्वच्छतेचे प्रकार आहेत. मृत व्यक्तीच्या आसपासच्या माणसांना मृत देहातील रोगजंतूंची बाधा होणे शक्य आहे. हे जंतू नखांत राहू शकतात. केसात राहू शकतात. म्हणून पूर्ण स्वच्छता करावी. तथापि केस न  कापता आधुनिक पद्धतीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य असल्यास केस कापलेच पाहिजेत असे नाही. या रूढीचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे. (ज्ञा. प्र.)

१५. अस्थिविसर्जन

अस्थिविसर्जनासाठी कोठल्यातरी तीर्थक्षेत्री जावे अशीही पद्धत आहे. तथापि तीर्थक्षेत्री केलेल्या अस्थिविसर्जनाचा संबंध पुढील सद्गतीशी जोडण्याचे कारण नाही. दिवंगतास मिळणारी सद्गती ही त्याच्या जिवंतपणीच्या कर्मावर अवलंबून असते, धार्मिक विधींवर अवलंबून नसते. धार्मिक अथवा अन्य प्रकारचे विधी हे मुख्यतः मृत व्यक्तीविषयीच्या इतरांच्या सद्भावना व्यक्त करण्याचे साधन आहे.  (ज्ञा. प्र.)

१६. धर्मनिर्णय मंडळाचा आदेश

धर्मनिर्णय मंडळाचा या पुस्तिकेतील पुढील प्रयोग इतका सोपा आहे की तो कोणत्याही शिक्षित हिंदूस सहज करता येईल. म्हणून समंजस हिंदूंनी पुरोहिताच्या साहाय्याने अथवा पुरोहित नसतानाही पुढील संस्कार करण्याचा परिपाठ पाडावा. (ध. नि. मं)

१७. धर्मनिर्णय मंडळाचा निर्णय वा

दहनक्रिया झाल्यावर पहिल्या तीन दिवसात अस्थिसंचयन आणि अकराव्या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण ही श्राद्धे करावीत.

या निर्णयास अनुसरून अस्थिसंचयन, एकोद्दिष्ट व सपिंडीकरण एवढे केले म्हणजे मृतात्म्यासाठी आवश्यक तेवढा क्रियाकलाप झाला असे समजण्यास प्रत्यवाय नाही. (ध. नि. मं)

१८. धर्मनिर्णय मंडळाचा निर्णय ७ वा

मृताशौचाचा (सुतक) अवधी पुढीलप्रमाणे असावा.

अ) पिता आणि जन्मदात्री माता यांचे पुत्रास व पुत्राचे या दोघांस, पति-पत्नीचे परस्परांस व अन्त्यक्रिया करणारास दहा दिवस व बाकीच्या मृतासन्निध असणाऱ्या एकत्र कुटुंबियांस तीन दिवस.

आ) वरील परिच्छेदात न उल्लेखिलेल्या नातेवाईकांस स्नान मात्र. (ध. नि. मं)

आधुनिक काळात विशेष कार्यमग्न असणाऱ्या व्यक्तींनी दहा दिवसांऐवजी तीन किंवा एक दिवस सुतक पाळून चालेल असे ज्ञान प्रबोधिनीचे मत आहे.

१९. नि. मंडळाचे इतर संक्षिप्त शास्त्रार्थ

१. (१.१) मृतावस्थेत जन्मलेली मुले आणि जन्माला आल्यापासून नामकरण होईपर्यंत मृत झालेली मुले यांना पुरावे आणि स्नान करून घरी जावे. याशिवाय कोणताही विधी नाही. (१.२) नामकरण झाल्यापासून आठवे वर्ष पूर्ण होईपर्यंत मृत झालेल्या अर्भकाचा दाह,जलांजलिदान, अस्थिसंचयन या तीन कर्मांचे मात्र अनुष्ठान करावयाचे.

२.    आठ वर्ष पूर्ण झालेल्या उपनीत-अनुपनीत (म्हणजे मुंज झालेले/न झालेले), विवाहित-अविवाहित अशा सर्वांचा दाहापासून सपिंडीकरणान्त सर्व अन्त्येष्टि-प्रयोग करावा.

३.    रजस्वला, बाळंतीण आणि कुष्टी यांच्या प्रेताला स्मशानात स्नान घातल्यानंतर तुलसीपत्रमिश्रित उदकाने तीन वेळा प्रोक्षण करून प्रेत चितेवर ठेवावे. प्राचीन खटाटोपाचा शुद्धिसंस्कार यापुढील काळात अग्राह्य ठरविला आहे.

४.     मृत ब्रह्मचाऱ्याचा अर्कवृक्षाशी किंवा पिठाच्या बाहुलीशी विवाह करून नंतर और्ध्वदेहिक करावे असे प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. प्राचीन परंपरेतील काही विद्वानांनी ही चाल अग्राह्य ठरविली आहे. ध.नि. मंडळही ते कृत्य अग्राह्य मानते.

५.    हिंस्र श्वापदे, विषारी प्राणी यांनी मारलेले, नैसर्गिक आपत्ती वा अपघातात मृत झालेले, त्रिपाद-पंचक इ. नक्षत्रांवर मृत झालेले इ. चे और्ध्वदेहिक  करण्यात अशाच लहान मोठ्या अडचणी सांगितल्या आहेत. ती सर्व कारणे ध. नि. मंडळ अग्राह्य ठरवीत आहे.

६.    आत्महत्येने मृत झालेल्यास स्मशानात स्नान घातल्यानंतर क्रियाकर्त्याने ‌’मम पितुः (नात्याप्रमाणे नाव घ्यावे) आत्मघातजन्यदोषपरिहारार्थं दशगायत्रीरूपं  प्रायश्चित्तं सूतकान्ते अहमाचरिष्यामि,‌’ असे उदक सोडून अकराव्या दिवशी नित्यकर्म केल्यानंतर एकोद्दिष्ट श्राद्ध करण्यापूर्वी प्रायश्चित्त करावे. आत्महत्या ही गोष्ट धर्मविरुद्ध असून बेकायदेशीर आहे.

सुज्ञ व्यक्तींचे कर्तव्य… वरील अपवाद व शास्त्रार्थ ध्यानात घेऊन, तसेच वर दाखविलेले या संस्काराचे वैशिष्ट्य लक्षात आणून प्रत्येक हिंदूने याचा प्रसंगानुसार उपयोग करणे आवश्यक आहे.

 

दाहकर्मविधी

सर्वसाधारण सूचना

१. पोथीमध्ये कंसात इटॅलिक्समध्ये जो मजकूर आहे तो केवळ माहितीसाठी आहे. तो पुरोहितांनी अथवा यजमानांनी प्रकटपणे म्हणण्यासाठी नाही.

२. कंसात असलेल्या पण इटॅलिक्समध्ये नसलेल्या सूचना मात्र पुरोहितांनी प्रकटपणे देणे अपेक्षित आहे.

३. या पुढील मजकुरात स्पष्ट निर्देश केला नसला तरी संस्कृत मजकूर पुरोहित व क्रिया करणारी व्यक्ती या दोघांनी म्हणणे आणि मराठी अर्थ व अन्य सूचना    मात्र फक्त पुरोहिताने सांगणे अभिप्रेत आहे. अन्य उपस्थितांनीही जो मजकूर म्हणणे अपेक्षित आहे तेथे ‌’पुरोहित आणि उपस्थित‌’ असा निर्देश केला आहे.

४. संस्कृत मंत्र म्हणताना संधिनियमानुसार काही बदल होतात. ते बदल त्या त्या ठिकाणी कंसात दाखविले आहेत. जोडून म्हणताना कंसाप्रमाणे व तोडून म्हणताना कंसाआधी दाखवल्याप्रमाणे म्हणावे.

(मृताचे दाहकर्म उपस्थितांपैकी सर्वात निकटचा आप्त असेल त्याने करावे. स्मशानात गेल्यावर ज्या ठिकाणी धार्मिक विधी करावयाचा ती जागा स्वच्छ करावी. विधी करणाऱ्या व्यक्तीने हातपाय धुवून पूर्वेस तोंड करून बसावे. आवश्यक ते साहित्य जवळ असावे.)

 

. आचमन

पुरोहित क्रिया करणारी व्यक्ती

(पहिल्या तीन मंत्रांच्या वेळी आचमन करावे. चौथ्या वेळी उजव्या तळहातावरून ताम्हनात पाणी सोडावे. पुरोहितांच्या पाठोपाठ म्हणावे.)

केशवाय नमः| केशवाला नमस्कार असो.

नारायणाय नमः| नारायणाला नमस्कार असो.

माधवाय नमः| माधवाला नमस्कार असो.

(उदक सोडावे.)

गोविन्दाय नमः | गोविंदाला नमस्कार असो.

(यानंतर काही क्षण डोळे मिटून शांत बसावे.)

 

. संकल्प

यानंतर पुरोहितांपाठोपाठ संकल्प म्हणावा.

(दिवंगत व्यक्ती पुरुष असल्यास ‌’प्रेतस्य‌’ म्हणावे; स्त्री असल्यास ‌’प्रेतायाः‌’ म्हणावे. क्रिया करणाऱ्याशी दिवंगताचे जे नाते असेल (उदा.वडिलांचे,भावाचे, आईचे) त्याप्रमाणे पुढील संकल्पात पितुः, बन्धोः, मातुः . योग्य तो उल्लेख करावा. या पोथीच्या शेवटच्या पृष्ठावरील (*) या खुणेखालील योग्य तो नातेवाचक शब्द या पुढील मजकुरात (*) या खुणेच्या ठिकाणी योजावा.)

विष्णुः विष्णुः विष्णुःइह पृथिव्यां, जम्बुद्वीपे, भरतवर्षे, बौद्धावतारे, –नगरे/ग्रामे, –नाम संवत्सरे, –मासे, –पक्षे, –तिथौ, –वासरे, –नक्षत्रे प्रेतस्य/प्रेतायाः मम  (*) (पितुः, मातुः, बन्धोः . पैकी) और्ध्वदेहिकं कर्म करिष्ये |      

पुरोहित

विष्णुः विष्णुः विष्णुः असे विष्णुस्मरण करून, या पृथ्वीवर, जम्बुद्वीपामध्ये, भरतवर्र्षात, बौद्धावतारात, — गावी, आज — नावाच्या संवत्सरात,— महिन्यात, — पक्षात, — तिथीवर, — वारी, — नक्षत्रावर, माझ्या (*) (वडिलांच्या, आईच्या, भावाच्या अथवा जे नाते असेल त्याचा उल्लेख करून) प्रेताचे दहनकार्य करतो/करते.

 

. अग्निप्रज्वलन आहुती

(आता संकल्प झाल्यावर आपल्या समोरील जागेवर दर्भाने पाणी शिंपडा व त्यावर चिमूटभर काळे तीळ विरळ पसरवून टाका. आता समोरील दोन-चार विती रूंदीची जागा पाण्याने सारवल्यासारखी करावी व त्यावर प्रत्येक दिशेला एक-एक दर्भ ठेवावा. त्या दर्भांनी जो चौकोन तयार होईल तो सुमारे दोन विती रूंदीचा असावा. नंतर त्या दर्भाच्या चौकोनात गोवरी वा लाकडाच्या ढलप्या ठेवून त्यावर तूप/तेल/रॉकेल घालून काडीने अग्नी पेटवावा व त्यात खालील मंत्र म्हणून ‌’स्वाहा‌’ असे म्हटल्यावर तूपाच्या किंवा तेलाच्या आहुती द्याव्यात.)

भूः स्वाहा | अग्नये  इदं मम |   (भूस्स्वाहा), (अग्नय)

हे पृथ्वीला अर्पण असो. हे आता अग्नीचे आहे. माझे नाही .

  भुवः स्वाहा | वायवे  इदं मम | (भुवस्स्वाहा), (वायव)

हे अंतरिक्षाला अर्पण असो. हे आता वायूचे झाले, माझे नाही.

स्वः स्वाहा | सूर्याय इदं मम |  (स्वस्स्वाहा)

हे स्वर्लेाकाला अर्पण असो . हे आता सूर्याचे झाले. माझे नाही.

भूर्भुवः स्वःस्वाहा| प्रजापतये इदं मम |  (भूर्भुवस्स्वस्स्वाहा), (प्रजापतय)

हे पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्लोक यांना अर्पण असो. हे आता प्रजापतीचे झाले, माझे नाही.

 

. यमादिप्रार्थना

(आता आपण ऋग्वेदातील, दहाव्या मंडलातील, यमसूक्तातील मंत्रांनी यमाची प्रार्थना करूया. यमाला सांगूया की, या मृताच्या आत्म्याला तू चांगल्या मार्गाने, चांगल्या ठिकाणी घेऊन जा. यजमान व उपस्थितांनी हात जोडून पुरोहितांच्या मागून पुढील प्रार्थना म्हणाव्यात.)

परेयिवांसं प्रवतो महीरनु|

            बहुभ्यः पन्थाम्‌‍ अनुपस्पशानम्‌‍ | (बहुभ्यःप्‌‍पन्थाम्‌‍)

वैवस्वतं संगमनं जनानाम्‌‍ | यमं राजानं हविषा दुवस्य (ऋग्वेद १०.१४.१)

सत्कर्म करणाऱ्यांना मिळणाऱ्या उत्तम लोकांकडे सुखरूप घेऊन जाणारा, अनेक पुण्यवंतांना मार्ग दाखविणारा आणि सर्व जगाचे एकत्र होण्याचे ठिकाण असणारा, विवस्वताचा पुत्र जो यमराजा त्याला हवी अर्पण करून उपासना करूया.

मा एनम्‌‍ अग्ने वि दहः, मा अभि शोचः |

            मा अस्य त्वचं चिक्षिपः, मा शरीरम्‌‍ | (अस्यत्त्वचं)

यदा शृतं कृणवो जातवेदः |

            अथ ईम्‌‍ एनं, प्रहिणुतात् पितृऽभ्यः (ऋग्वेद- १०.१६.१)

हे सर्वज्ञ अग्निदेवा, मृत झालेल्या व्यक्तीला तू कसातरी होरपळून टाकू नको. शोक होईल असेही करू नको. याची कातडी (फाडून) इकडे तिकडे फेकून देऊ नको. देह भलतीकडेच टाकू नको तर या देहाला तू व्यवस्थित रीतीने दग्ध करून (त्याच्या आत्म्याला) पितरांमधे नेऊन ठेव.

तपसा ये अनाधृष्याः, तपसा ये स्वर्ययुः |

            तपो ये चक्रिरे महः, तान्‌‍ चित् एव अपि गच्छतात्  | (ऋग्वेद १०.१५४.२)

जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, जे तपाच्या योगाने स्वर्लेाकाला गेले किंवा जे लोक उग्र तप आचरते झाले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे.

ये युध्यन्ते प्रधनेषु शूरासः, ये तनूत्यजः |

            ये वा सहस्रदक्षिणाः, तान्‌‍ चित् एव अपि गच्छतात् ॥ (ऋग्वेद १०.१५४.३)

जे शूर लोक युद्धात झुंजत असतात, जे शूरवीर युद्धात आपले देह अर्पण करतात किंवा जे (यज्ञात) सहस्रावधी दाने देतात, अशांना जो लोक प्राप्त होतो तेथेच यांनी गमन करावे.

परं मृत्यो अनु परेहि पन्थां, यस्ते स्व इतरो देवयानात् |

चक्षुष्मते शृण्वते ते ब्रवीमि, मा नः प्रजां रीरिषो, मा उत वीरान्‌‍ ॥(नःप्‌प्रजां)

(ऋग्वेद १०.१८.१)

हे मृत्युराजा! देवयान मार्गाहून निराळा असा जो तुझ्या स्वतःच्या अधिकार-क्षेत्रातील मार्ग आहे त्या मार्गाने तू दूर निघून जा. तुला डोळे आणि कान असल्यामुळे चांगले-वाईट, शुभ-अशुभ हे सर्व तुला दिसतेच आहे. म्हणून माझी तुला अशी प्रार्थना आहे की आमच्या संततीचा आणि वीरांचा तू (अकाली) नाश करू नकोस.

मृत्योः पदं योपयन्तो यदैत, (मृत्योःप्‌पदं)

द्राघीय आयुः प्रतरं दधानाः| (आयुःप्‌प्रतरं)

आप्यायमानाः प्रजया धनेन, (आप्यायमानाःप्‌प्रजया)

शुद्धाः पूता भवत यज्ञियासः॥ (शुद्धाःप्‌पूता) (ऋग्वेद १०.१८.२)

(हे मित्रांनो) मृत्यूच्या पावलांना दूर ठेवून तुम्ही आपले दीर्घ आयुष्य उत्तम प्रकारे उपभोगीत राहा. संतती आणि संपत्ती यांनी समृद्ध होऊन कालक्रमणा करत राहा. हे यज्ञकर्त्या मित्रांनो (नेहमी शुद्ध आणि पवित्र राहा.)

यथा अहानि अनुपूर्वं भवन्ति, यथा ऋतवो ऋतुभिर्यन्ति साधु|

यथा पूर्वम्‌‍ अपरो जहाति, एव धातः आयूंषि कल्पय एषाम्‌‍ (धात)

(ऋग्वेद १०.१८.५)

ज्याप्रमाणे दिवसांमागून दिवस आणि ऋतूमागून ऋतू निरपवादपणे जातात, पाठीमागून येणारा माणूस पुढच्या माणसाला (अचानक) सोडून देत नाही अशा (साखळीप्रमाणे), हे जगन्नियंत्या विधात्या, आमच्या आयुष्याची व्यवस्था लाव.

 

. गीताई श्लोक पठण

अग्नी देण्यापूर्वी गीताईतील काही लोक म्हणूया. तत्पूर्वी गीतेमध्ये मृत्यूबद्दल काय म्हटले आहे हे थोडक्यात पाहूया. गीतेचा सिद्धांत असा आहे की, शरीर नाशवंत आहे, आत्मा अमर आहे, शरीराला मृत्यू अटळ आहे. पण पुनर्जन्मही निश्चित आहे. म्हणून ज्ञानी माणसाने मृत्यूचा शोक करू नये.

गीताईच्या दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे-

ह्या देहीं बाल्य तारुण्य, जरा वा लाभते जशी |

            तसा लाभे नवा देह, डगे धीर तो तिथे॥

(देहिनोऽस्मिन्‌‍ यथा देहे, कौमारं यौवनं जरा | तथा देहान्तरप्राप्तिः, धीरस्तत्र न मुह्यति॥)

(देहान्तरप्‌प्राप्तिः) (गीता २.१३)

ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण या अवस्था देहाला येतात त्याचप्रमाणे देहाचा अंत होतो आणि दुसरा देह प्राप्त होतो. हे समजून धैर्यवान लोक शोकाकुल होत नाहीत.

खरे पाहिले तर देह ही उपाधी आहे आणि ती धारण करणारा जो आत्मा तो आपण आहोत. देह धारण करणारे जे आपण त्या आपणाला जन्मही नाही आणि मरणही नाही. याचेच वर्णन पुढील लोकात केलेले आहे.

जन्म पावे कदापि मृत्यु, होऊनि मागे पुढे होय|

            आला गेला स्थिर हा पुराण, मारोत देहास परी मरे ना॥

(न जायते म्रियते वा कदाचित् ‍, नायं भूत्वा भविता वा न भूयः|

अजो नित्यः शाश्वतोऽयं  पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे॥) (नित्यश्शाश्वतोऽयं) (गीता २.२०)

हा आत्मा जन्मत नाही, किंवा मरतही नाही. हा जन्मला होता आणि पुनः नाहीसा झाला असेही कधी होत नाही. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत, पुराणपुरुष असा आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. आत्म्याचा आणि शरीराचा संबंध कसा आहे हे पुढील श्लोकात सांगितले आहे.

सांडूनियां जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन

            तशीं चि टाकूनि जुनी शरीरे, आत्मा हि घेतो दुसरी निराळी

(वासांसि जीर्णानि यथा विहाय  नवानि गृह्णाति नरोऽपराणि|

तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही ॥) (गीता २.२२)

ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे देही म्हणजे शरीराचा स्वामी-आत्मा; जुना देह सोडून नव्या देहात प्रवेश करतो.

अशा रीतीने आत्मा हा देह बदलत असतो. आत्म्याने नवा देह प्राप्त  करण्यास आपण जन्म म्हणतो. आत्म्याने देह टाकून दिल्यास त्याला मृत्यू म्हणतो. वास्तविक रीत्या आत्मा आहे तसाच आहे. मग शोक कशासाठी?

 

जन्मतां निश्चये मृत्यु, मरता जन्म निश्चये

            म्हणूनि टळे त्याचा, व्यर्थ शोक करू नको॥

(जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ध्रुवं जन्म मृतस्य च | (हिध्ध्रुवो)

तस्मात् ‍ अपरिहार्येऽर्थे, न त्वं शोचितुमर्हसि ॥) (गीता २.२७)

जो जन्माला आला त्याला मृत्यू आणि ज्याला मृत्यू आला त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या अटळ गोष्टीविषयी शोक करणे उचित नाही.

दिवंगताचा मृत्यू हा सुखावह नाही. तथापि दिवंगताचे जे आप्तेष्ट आहेत त्यांनी हा विचार स्वीकारावा आणि जो मनुष्य-जन्म मिळाला आहे त्यामधे आयुष्याचे सार्थक होईल, कृतकृत्यता वाटेल असे वागण्याचा प्रयत्न करावा. हीच दिवंगताला खरी श्रद्धांजली ठरेल.

(यानंतर दिवंगतासंबंधी आप्तेष्टांना काही बोलून श्रद्धांजली अर्पण करावयाची असेल तर त्याप्रमाणे त्यांनी भाषणे करावीत. योग्य जागी उभे राहून बोलावे. भाषणे थोडक्यात असावीत. दिवंगत व्यक्तीचा योग्य गौरव त्यात असावा. उखाळ्यापाखाळ्या काढण्याचा तो प्रसंग असू नये.)

यानंतर विद्युत् दाहिनीपर्यंत मृतदेह उचलून इष्ट तेथे नेऊन ठेवावा.

दहनयात्रेस आलेल्या लोकांनी सर्व दहनकर्म पुरे होईपर्यंत थांबणे शक्य नसल्यास दहनकर्म करणाऱ्या व्यक्तीस सांगून, शक्य झाल्यास तिचे सांत्वन करून जावे. सर्वात शेवटी वडीलधाऱ्या मंडळींनी दहनकर्म करणाऱ्यास, “आता सर्व झाले, चलूया” असे म्हणून घरी जाण्यास प्रवृत्त करावे. जाताना सर्वांनी नळ/विहीर/ओढा/नदी यातील पाण्यात हातपाय धुवून घरी जावे. जे प्रेतवाहक असतील किंवा ज्यांनी प्रेताला स्पर्श केला आहे त्यांनी स्नान करावे.

 

जलांजलिदान

(काही ठिकाणी घरी जाण्यापूर्वी दहनविधीस आलेल्या सर्व नातेवाईकांनी मृतात्म्याला जलांजली देण्याची पद्धती आहे. ती आवश्यक आहे असे नाही. देणे असल्यास ती खालील पद्धतीने द्यावी.)

(हातात काळे तीळ आणि ओंजळभर पाणी घेऊन एकेकाने म्हणावे.)

(पुरुषासाठी) — नाम्ने प्रेताय/(स्रीसाठी) — नाम्न्यै प्रेतायै अयं जलाञ्जलिः उपतिष्ठताम्‌‍| (रिकाम्या जागी दिवंगत व्यक्तिचे नाव घालावे.)

—-नावाच्या प्रेतास ही जलांजली प्राप्त होवो.

असे म्हणून काळे तीळ घातलेले पाणी उजव्या अंगठ्यावरून सोडावे.

अस्थिसंचयन

अग्नी दिलेला दिवस धरून तिसऱ्या दिवशी सकाळी / आपल्या सोयीनुसार स्मशानात जाऊन अस्थी गोळा कराव्यात. कित्येक ठिकाणी दुसऱ्या दिवशीसुद्धा अस्थी गोळा करतात कारण महानगरांमध्ये स्मशानाची जागा थोडी असते व दहन-विधीकरिता येणाऱ्या प्रेतांची संख्या मोठी असते. त्यामुळे तीन-तीन दिवस थांबणे शक्यच नसते. विद्युतदाहिनीत तर दहन झाल्याबरोबर अस्थी काढून देतात कारण क्षणभरसुद्धा थांबायला सवड नसते. कोणत्या दिवशी अस्थिसंचय करावा ही सोयीची गोष्ट आहे.

चिता रचून दहनकर्म केले असल्यास चिता पूर्ण विझवून, अस्थी बाहेर काढून बाकीची राख स्मशानातच कोठेतरी पुरावी, अथवा त्या त्या ठिकाणच्या सुविधा व कायदे यानुसार प्रदूषणमुक्त पद्धतीने तिचे उपयोजन करावे.

 

परिशिष्ट

विधिपूर्वक मंत्राग्नी न देता केवळ दहन करायचे असल्यास दहनापूर्वी पुढील श्लोक, भजन म्हणणे उपयुक्त ठरू शकेल.

* श्रीमद्भगवद्गीतेतील अक्षरब्रह्मयोग या आठव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे-

           पावले मोक्षसिद्धीस, महात्मे मज भेटुनी

            दुःखाचे घर तो जन्म, घेती चि अशाश्वत

(मामुपेत्य पुनर्जन्म, दुःखालयमशाश्वतम्‌‍|

नाप्नुवन्ति महात्मानः, संसिद्धिं परमां गताः॥) (गीता ८.१५)

म्हणजेच परमपदाला पोहोचलेले महात्मे माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्यावर; दुःखाचे स्थान असलेल्या, अशाश्वत अशा पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत.

मृत्युसमयी दिवंगत व्यक्तीच्या मनात शुभसंस्कार, विचार असतील तर त्याला जन्म मृत्यूचे चक्र राहात नाही. ती व्यक्ती चैतन्यस्वरूपाला प्राप्त होते, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात –

           जो जो आठवुनी भाव, शेवटी देह सोडितो

            मिळे त्या त्या चि भावास, सदा त्यांत चि रंगला॥     

(यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌‍ |(त्यजत्त्यन्ते)

तं तमेवैति कौन्तेय, सदा तद्भावभावितः॥)   (गीता – ८.६)

म्हणून देहत्यागानंतर ईश्वर-प्राप्ती व्हावी यासाठी इहलोकी जीवन व्यतीत करताना ईश्वराचे निरंतर स्मरण करणे हाच उपाय होय.

(यानंतर दाहकर्म विधीतील ‌’गीताई श्लोक पठण‌’ या भागाचे वाचन करणे उपयुक्त ठरेल.)

* समर्थ रामदासांनी श्रीदासबोधात सांगितले आहे – व्यक्तीचे संचित कर्म संपताक्षणी, क्षणाचाही विलंब न लागता मृत्यू येतो.

        संसार म्हणजे सवेंच स्वार | नाही मरणासी उधार

        मापीं लागले शरीर| घडीनें घडी॥१॥

       नित्य काळाची संगती | नकळे होणाराची गती|

       कर्मासारिखे प्राणी पडती| नाना देशीं विदेंशी

      सरता संचिताचे शेष| नाही क्षणाचा अवकाश|

      भरतां भरतां निमिष| जाणे लागे॥

      चारी खाणी चारी वाणी | चौऱ्यांसी लक्ष जीवयोनी |

      जन्मा आले तितुके प्राणी | मृत्य पावती॥३७॥

      मृत्याभेणें पळों जातां| तरी मृत्य सोडिना सर्वथा |

      मृत्यास ये चुकवितां | काही केल्या॥३८

      ऐसे जाणोनिया जीवे | याचे सार्थकचि करावे|

      जनी मरोन उरवावे| कीर्तिरूपे॥४४॥

      असो ऐसे सकळही गेले | परंतु येकचि राहिले |

       स्वरूपाकार जाले| आत्मज्ञानी॥५९॥ (दासबोध दशक ३, समास ९)

*  मृत्यूलोकी जाणे हे अटळ आहे. प्रत्येकालाच मृत्यू येतो हे सर्वांनी जाणून घ्यावे.

देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो|

चरण न सोडी सर्वथा | आण तुझी पंढरीनाथा ॥

वदनी तुझे मंगल नाम| हृदयी अखंडित प्रेम|

नामा म्हणे केशवराजा| केला पण चालवी माझा॥

 

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम |

सुंदर माधव मेघश्याम पतित पावन सीताराम॥

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम |

जानकी जीवन राजाराम पतित पावन सीताराम॥

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम |

सीताराम सीताराम भज भज तुम्ही सीताराम|

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम |

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम…

 

*  तुकोबारायांच्या अभंगाने सांगता करूया.

झाला प्रेतरूप शरीराचा भाव| लक्षियेला ठाव स्मशानीचा॥१॥

रडती रात्रंदिवस काम क्रोध माया | म्हणती हाय हाय यमधर्म॥२॥

वैराग्याच्या शेणी लावल्या शरीरा| ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेंसी ॥३॥

फिरविला घट फोडिला चरणीं| महाकाव्य ध्वनी बोंब झाली ॥४॥

दिली तिळांजुळी कुळनामरूपासी| शरीर ज्यांचे त्यांसी समर्पिले ॥५॥

तुका म्हणे रक्षा झाली आपींआप | उजळीला दीप गुरुकृपा॥६॥

(तुकाराम गाथा १७११)

संदर्भ- पृष्ठ ८ वरील संकल्प

क्र.    शब्द                              (*) संबंध

१)    आई                               मातु:

२)    वडील                             पितुः

३)    सासू                             श्वश्र्‌वाः

४)    सासरे                             श्वशुरस्य

५)    आजोबा (वडिलांचे वडील)     पितामहस्य

६)    आजी (वडिलांची आई)         पितामह्याः

७)    आजोबा (आईचे वडील)        मातामहस्य

८)    आजी (आईची आई)            मातामह्याः

९)    भाऊ                                बन्धोः

१०)   वहिनी                            भ्रातृजायायाः

११)   बहीण                            भगिन्याः

१२)   नवरा                             पत्युः

१३)   बायको                          भार्यायाः

१४)   मुलगा                            पुत्रस्य

१५)   सून                               स्नुषायाः

१६)   मुलगी                            कन्यायाः

१७)   जावई                            जामातु:

१८)   काका                            पितृव्यस्य

१९)   काकू                             पितृव्यायाः

२०)   आत्या                            पितृष्वसुः

२१)   मामा                             मातुलस्य

२२)   मामी                             मातुलान्याः

२३)   मावशी                            मातृष्वसुः

२४)   नातू (मुलाचा मुलगा)             पौत्रस्य

२५)   नातू (मुलीचा मुलगा)             दौहित्रस्य

२६)   नात (मुलाची मुलगी)             पौत्र्याः

२७)  नात (मुलीची मुलगी)             दौहित्र्याः

२८)   भाचा                             भागिनेयस्य

२९)   भाची                             भागिनेय्याः

३०)   दीर                               देवरस्य

३१)   जाऊ                            यातुः

३२)   मेव्हणा                            शालकस्य

३३)   पुतण्या                            भ्रात्रीयस्य

३४)   पुतणी                            भ्रात्रीयायाः

३५)   नातेवाईक/मित्र                    आप्तस्य