दर वर्षी दिनांक १२ जानेवारी हा दिवस देशभर ‘युवक दिवस’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी विवेकानंद जयंती असते. विवेकानंदांनी युवकांना आवाहन केले म्हणून त्यांचा जन्मदिवस युवकदिन म्हणून गेली तीस वर्षे साजरा करण्यात येत आहे. विवेकानंदांनी केवळ युवकांनाच नाही तर देशातील सर्वांनाच आवाहन केले. अमेरिकेतील दौरा आटोपून विवेकानंद भारतात परत आल्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. स्वागताला उत्तर देताना त्यांनी ठिकठिकाणी लोकांना आवाहन केले. रामनद येथील लोकांनी त्यांना मानपत्र दिल्यावर त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटले “बंधूजनहो, चला आपण सर्व पराकाष्ठेने काम करू लागू. झोप घेण्याची ही वेळ नाही. आपल्या कामावर हिंदुस्थानचा भविष्यकाळ अवलंबून आहे. ही मातृभूमी आपली प्रतीक्षा करत आहे.” या आवाहनाला प्रतिसाद म्हणूनच ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली. या आवाहनाला प्रतिसाद म्हणूनच ज्ञान प्रबोधिनीमध्ये अनेकजण व्यक्तिश: प्रथम प्रतिज्ञा घेत असतात.
आपली मातृभूमी आपली प्रतीक्षा करत आहे याचा अर्थ आपल्या समाजातील दुर्बल लोक आपल्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत. जे शारीरिक दृष्ट्या दुर्बल असतात ते सकस आहार, स्वस्त परिणामकारक औषधे, तत्पर वैद्यकीय सेवा आणि दुर्बालांनाही सर्वत्र संचार करता येईल अशा व्यवस्था यांची अपेक्षा करत असतात. जे मानसिक दृष्ट्या दुर्बल असतात ते शिक्षण आणि निर्णय घेण्यामध्ये व निर्णयाची कार्यवाही करताना मदतीची अपेक्षा करत असतात. जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात ते स्थिर रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि समावेशक बँक व विमा सेवेची अपेक्षा करत असतात. जे सामाजिक दृष्ट्या दुर्बल असतात ते संघटनेचा आधार आणि सर्व सार्वजनिकस्थळी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक सुविधांच्या वापरात आत्मसन्मानाला धक्का न पोहोचता मुक्त प्रवेशाची अपेक्षा करत असतात. जे राजकीय दृष्ट्या दुर्बल असतात त्यांना ओळख, नातेसंबंध, वशिला यांच्याशिवाय सत्ताधाऱ्यांपर्यंत आपल्या गरजा व अडचणी पोहचवण्याची संधी हवी असते. जे सांस्कृतिक दृष्ट्या दुर्बल असतात त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यात व सकस मनोरंजन होण्यासाठी मार्गदर्शन हवे असते.
प्रथम प्रतिज्ञा घेणाऱ्या सर्वांनी वरील पैकी कोणत्याही प्रकारे जे आपल्यापेक्षा दुर्बल आहेत त्यांना ती दुर्बलता दूर करण्यासाठी मदत केली पाहिजे. अशी मदत करण्यासाठी काही वेळा अनेकांनी एकत्र येऊन काम करावे लागते. आपापल्या ठिकाणी नियमितपणे अशा कामांसाठी आपण वेळ काढला पाहिजे. आपली कौटुंबिक व नोकरी-व्यवसायाची कामे संपून रोज काही वेळ अशा कामांसाठी दिला पाहिजे. आपल्यापेक्षा दुर्बलांना मदत करणे हा देशसेवेचा एक मार्ग आहे. देशातील संपत्ती, सार्वजनिक सुविधा, प्राचीन आणि आधुनिक ज्ञानाच्या साठ्याचे जतन करणे आणि त्यात भर घालणे, नवीन संशोधन करणे, सार्वजनिक शिस्तीचे वातावरण निर्माण करणे, देशाची संरक्षण-क्षमता वाढवणे, देशातील विविध कलांची प्रतिभापूर्ण आणि अभिरुचीपूर्ण अभिव्यक्ती करणे हे सुद्धा देशसेवेचेच काम आहे. आपापली नोकरी, व्यवसाय निवडताना आणि आपले छंद जोपासताना वरीलपैकी कोणत्याही एक किंवा अधिक प्रकाराने देशाच्या वैभवामध्ये भर घातली जाईल अशीच निवड करावी.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाला समर्थ व समृद्ध करण्यासाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जाणारे अनेक जण नंतरच्या काळात झाले. त्या पैकी महात्मा गांधी हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी ‘दरिद्रनारायणाची सेवा’ हे सूत्र स्वीकारले. दुसरे नाव डॉ. हेडगेवार यांचे आहे. त्यांनी ‘संघटित व्हा’ हे सूत्र स्वीकारले. तिसरे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. त्यांनी ‘शिक्षणातून स्वत:च स्वत:चा उद्धार करणे’ हे सूत्र स्वीकारले. इतरही अनेक जणांनी आधुनिक विज्ञान शिकणे, आपल्या परंपरेचा अभिमान धरणे, जगभर भारतीय अध्यात्माचा प्रचार करणे आणि आपल्या देशाला जे उपयुक्त ते सारे जगाकडून शिकायला तयर असणे अशी वेगवेगळी सूत्रे स्वीकारून काम केले. प्रथम प्रतिज्ञतांनी यापैकी एखादे सूत्र स्वत:चे जीवनध्येय म्हणून स्वीकारावे आणि आयुष्यभर काम करत राहावे असे वाटते. दिनांक १४ एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन म्हणून भारतात सर्वत्र आणि महाराष्ट्रात विशेष करून साजरा होत असतो. ज्यांना ज्यांना ‘शिक्षणातून स्वत: स्वत:चा उद्धार करणे आणि इतरांना अशीच प्रेरणा देणे’ हे सूत्र आपले ‘जीवनध्येय’ म्हणून स्वीकारावेसे वाटते, त्यांनी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपल्या प्रथम प्रतिज्ञेनुसार कामाचा असा संकल्प अवश्य करावा.
(प्रथम प्रतिज्ञित कार्यकर्त्यांना लिहिलेले पत्र, सौर चैत्र १९ शके १९३८, दि. ८ एप्रिल २०१६)
**************************************************************************************************************