आपल्याला माशासारखे पोहता यावे, पक्ष्यासारखे उडता यावे, गरुडासारखी झेप घेता यावी, चित्त्यासारखी झडप घालता यावी, वाघासारखी झुंज घेता यावी असे इतिहास पूर्वकाळापासून माणसाला वाटत आले आहे. या वाटण्यामुळेच अनेक जण तसे करण्याचा प्रयत्न करत राहिले. पाणबुडी, विमान, रॉकेट यांसारख्या यंत्रांचे शोध आणि ॲथलेटिक्स, मल्लयुद्ध यांसारखे क्रीडा प्रकार यांचा शोध त्यातूनच लागला. अनेक पशु-पक्ष्यांच्या हालचाली पाहून त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली योगासने तयार झाली. सृष्टीत आजूबाजूला जे घडते आहे, ते आपणही करावे, आपल्यालाही जमावे, असे वाटणे यातच मानवाचे इतर सर्व पशु-पक्ष्यांपेक्षा वेगळेपण आहे.
त्याला जमते तर मला जमले पाहिजे, आणि त्याला जमत नाही तर मी करून दाखवीन, असे म्हणावेसे वाटते, कारण त्यातच माणसाचे माणूसपण आहे. एव्हरेस्टवर दहा गिर्यारोहकांना चढता आले नाही तरी आम्ही चढणारच असे तेनसिंग आणि हिलरींना वाटत होते म्हणून ते एव्हरेस्टवर पोचले. आजपर्यंत अंतराळवीर सहा महिने अवकाशात राहिले होते तर मी आठ महिने राहीन असे सुनीता विल्यम्सला वाटले आणि अनेकांच्या मदतीने तिने ते केले. जगातले मोटार उत्पादक दोन लाख रुपयांची मोटार करतात तर मी एक लाख रुपयांची मोटार करीन असे टाटांना वाटले आणि नॅनो जन्माला आली.
सुरुवातीला निसर्गातल्या घटना पाहून आणि पशु-पक्ष्यांच्या हालचाली पाहून मानवाला नवीन नवीन गोष्टी करून पाहण्याची प्रेरणा झाली. नंतर समाजातील इतर व्यक्तींची कृती पाहून त्याप्रमाणे काम करण्याची प्रेरणा झाली. नवीन कृतीचे अनुकरण आणि इतरांनी केले त्याहून अधिक करण्याची प्रेरणा यांतून माणसाच्या अनेक नवीन क्षमता विकसित होत गेल्या आहेत. स्वतः काही केल्यावर आपण काल जे केले त्याहून आज अधिक करावे असेही वाटू लागते. बोल्ट हा धावपटू सध्या शंभर, दोनशे, चारशे मीटर धावण्याच्या वेगाचे स्वतःचेच विक्रम सारखे मोडत आहे. पोहणारे, उंच उडी व लांब उडी मारणारे, भालाफेक व गोळाफेक करणारे असे सर्व प्रकारचे क्रीडापटू ताकदीचे, अंतराचे, उंचीचे, वेगाचे विक्रम सारखे मोडत असतात. कोणाच्यातरी किंवा स्वतःच्या नमुना कृतीचा आदर्श (रोल मॉडेल), सातत्याने सराव किंवा प्रयत्न, प्रयत्नातील शोधक शास्त्रीय दृष्टी आणि यशाची प्रेरणा, या सर्वांच्या एकत्रित परिणामातून नवे विक्रम, पराक्रम, उच्चांक होत असतात. कोणत्या तरी नमुन्याच्या आदर्श कृतीपेक्षा आपली कृती सरस ठरावी असे वाटण्याला मी स्पर्धा-भावना मानतो. ही स्पर्धा-भावना माणूसपणाची ओळख आहे. दुसऱ्याच्या यशापेक्षा वरचढ यश मिळवणे आणि स्वतःचे आधीचे यश फिके वाटेल असे सरस यश मिळवणे ही स्पर्धा-भावनेचीच दोन रूपे आहेत. स्पर्धात्मक कृतीचे दोन प्रकार आढळतात. ज्याचे मोजमाप करता येते अशा कृतीमध्ये प्रमाणाची म्हणजे संख्येची स्पर्धा असते. उदाहरणार्थ जगातली सगळ्यात उंच इमारत, सगळ्यात लांब पूल, सगळ्यात छोटे पोस्टाचे तिकीट, सगळ्यात वेगवान आगगाडी, सगळ्यात जास्त वेळ चालणे, बोलणे, इत्यादी. ज्याचे मोजमाप करता येत नाही अशा कृतीमध्ये प्रकाराची म्हणजे वेगळेपणाची स्पर्धा असते. उदाहरणार्थ वेगळा रंग, वेगळी नक्षी, वेगळी चाल, वेगळा ताल, वेगळा वाद्यमेळ, वेगळा आकार, वेगळी रंगसंगती, वेगळ्या हालचाली, वेगळे तंत्रज्ञान इत्यादी.
दोन वाहनांच्या वेगाची, इंधन वापराची तुलना करता येते. ती प्रमाणाची किंवा संख्येची स्पर्धा. पण त्याच वाहनांच्या दिसण्याची, आरामशीरपणाची तुलना संख्येत करता येत नाही. ती त्यांच्या गुणात्मक पैलूंची तुलना होते. एखादे वाहन वातानुकूलित आहे व दुसरे नाही ही त्यांच्या गुणात्मक पैलूंची तुलना किवा स्पर्धा आहे. दोन संगणकांच्या स्मरणशक्तीची तुलना ही संख्येची तुलना आहे, पण त्यांच्यातील सुविधांची (फीचर्सची) तुलना ही पैलूंची तुलना आहे. खेळाडूंचे, गायकांचे, वादकांचे, वक्त्यांचे, अभिनेत्यांचे, दिग्दर्शकांचे, नर्तकांचे आणि उद्योजकांचे वेगळेपण त्यांच्या शैलीमध्ये म्हणजे पैलूंच्या विविधतेमध्ये असते.
संख्यात्मक स्पर्धा करता येते. वैविध्याची स्पर्धा करता येत नाही. वैविध्याने आपली वेगळी ओळख निर्माण होते. इतरांपेक्षा अशी वेगळी ओळख निर्माण करण्यालाच वेगळ्या प्रकारची स्पर्धा म्हणता येईल. इतरांचे अनुकरण करण्यात, स्पर्धा करण्यात जसे माणसाचे वेगळेपण आहे, तसेच इतर माणसांपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या इच्छेमध्येही माणसाचे वेगळेपण आहे. पशुपक्षी आपल्या जातीचे केवळ एक उदाहरण किंवा नमुना असतात. प्रत्येक माणूस मात्र त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे माणूसपणाचा नमुना बनतो. ज्याच्यात काही वेगळेपण नाही त्याला आपण बिनचेहऱ्याचा माणूस म्हणतो.
इतरांशी संख्यात्मक स्पर्धा, स्वतःशी संख्यात्मक स्पर्धा आणि स्वतःचे इतरांपेक्षा वेगळेपण वाढवण्याची स्पर्धा असे मला स्पर्धेचे पुढचे पुढचे टप्पे दिसतात. या तीनही टप्प्यांमध्ये स्पर्धेचे नियम, व्याप्ती, मर्यादा आपण स्वतःच ठरवायच्या असतात. स्पर्धा करायची किंवा नाही, कोणाशी, कोणत्या बाबतीत, किती वेळ करायची हे स्वतःच ठरवायचे असते. ज्यांच्याकडे मूळचाच आत्मविश्वास आहे ते अशी स्पर्धा करू शकतात. अशी स्पर्धा ही नैसर्गिक स्पर्धा असते.
आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही वेळा मुद्दाम स्पर्धा भरवावी किंवा योजावी लागते. काही जण आजूबाजूला बघतच नाहीत. त्यांना अनुकरणीय, नमुनेदार, आदर्श कृती (रोल मॉडेल) लक्षात आणून देण्यासाठी स्पर्धा योजावी लागते. अनुकरण कृतीचे करायचे आहे. नमुन्याच्या कृतीपेक्षा वरचढ कृती करायची आहे याचे भान अशा कृत्रिम स्पर्धेमध्ये ठेवावे लागते. नाही तर कृतीऐवजी प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा सुरू होते. इतर स्पर्धक हे सहस्पर्धकांऐवजी प्रतिस्पर्धक वाटायला लागले की काही काळाने शत्रूही वाटायला लागतात. मग स्पर्धेच्या भावनेचे रूपांतर ईर्षा, असूया, मत्सर अशा नकारात्मक भावनेमध्ये होऊ लागते. कृत्रिम स्पर्धांमधला हा धोका टाळायचा असेल तर सर्व स्पर्धक एकाच उत्तमतेच्या मार्गावरचे सहप्रवासी आहेत याचे भान ठेवावे लागते. अशी मुद्दाम योजलेली स्पर्धा धार लावायच्या दगडासारखी असते. तीमध्ये भाग घेऊन आपल्या गुण-कौशल्यांना धार लावायची असते. धार लावून इतर कामांत ती गुण-कौशल्ये वापरायची असतात.
कृतीशी किंवा कामगिरीशी स्पर्धा करण्यापेक्षा अनेकांना सहस्पर्धकांशी स्पर्धा करणे सोपे वाटते, पण सहस्पर्धकांशी केलेली स्पर्धा ही कामगिरी पूर्ण झाल्यावर आठवणीच्याच रूपाने राहते. म्हणून कामगिरीचे प्रतीक म्हणून बक्षीस, चषक, ढाल, प्रशस्तिपत्रक अशा समूर्त गोष्टी लागतात. ज्या व्यक्ती अशा कामगिऱ्यांच्या प्रतीकांचा संग्रह वाढवण्यातच रमून जातात ते स्पर्धामार्गावरच्या पहिल्या स्टेशनावरच्या प्रतीक्षालयातच थांबून राहिले. ते आपल्या गुण-कौशल्यांना धार लावायच्या दगडावर धार लावत राहिले. पुढे जाण्याचे नावच नाही.
कृत्रिम स्पर्धेतील यशाच्या प्रतीकांकडून यशस्वी कामगिरीकडे जाणे म्हणजे आपली वेगळी ओळख फुलायला लागणे. कृत्रिम स्पर्धेकडून म्हणजे इतरांशी योजलेल्या स्पर्धेत भाग घेण्याकडून आपण स्वतःच्या नियमानुसार स्पर्धा करायला लागलो म्हणजे आपली माणूस म्हणून आणखी प्रगती झाली. स्पर्धा हे एक आवाहन असते – आपल्यातील सुप्त गुणांच्या प्रकटीकरणासाठी आवाहन. समर्थांनी संभाजी महाराजांना पत्र लिहून शिवरायांच्या अनेक गुणांची आठवण करायला सांगितली होती. मग आवाहन केले होते, ‘याहून करावे विशेष | तरीच म्हणवावे पुरुष ॥’. हे आपण इतरांच्या समान व्हावे असे आवाहन झाले. पण संभाजी हाराज अशा स्पर्धेतही अडकले नाहीत. त्यांनी आपल्या बलिदानाने वेगळाच आदर्श – स्वतःची वेगळी ओळख – निर्माण केली. ‘आपण त्यांच्या समान व्हावे’ इथून स्पर्धाजीवनाची म्हणजे मनुष्यजीवनाची सुरुवात होते. ‘परी या सम हा’, त्याच्यासारखा तोच, अशी जेव्हा ओळख करून द्यावी लागते, तेव्हा मनुष्यजीवनातील स्पर्धेचा अध्याय संपतो.
(शब्दोत्सव दिवाळी अंक 2009)