६ चार पायाभूत लक्षणे

‌‘सर्वसाधारण प्रबोधिनीपण‌’ या पुस्तिकेतील पहिला लेख लिहिला तेव्हा, प्रत्येक गुणासाठी कोणत्या प्रकारचा आग्रह आहे, हे लक्षात यावे म्हणून, काही विधाने नकारात्मक भाषेत ‌‘नाही‌’चा वापर करून लिहिली होती, तर काही विधाने सकारात्मक भाषेत ‌‘च‌’चा वापर करून लिहिली होती. या गुणांचीच पुढे बारा वर्षांनी पायाभूत व प्रगत गुण अशी विभागणी केलेली आहे.

पायाभूत गुण (शालेय विद्यार्थ्यांसाठी) :
1) आजचे काम उद्यावर नाही, 2) आपले काम दुसऱ्यावर नाही,
3) कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे, 4) रोज नवीन सुचलेच पाहिजे.

प्रगत गुण (प्रौढ सदस्यांसाठी) :
1) विनाश्रमाचे घेणार नाही, 2) गुणवत्तेत तडजोड नाही,
3) रोज उपासना झालीच पाहिजे, 4) प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे.

प्रबोधिनीचे काम शालेय विद्यार्थ्यांमध्ये चालते व प्रौढ सदस्यांमध्येही चालते. ‌‘आजचे काम उद्यावर नाही‌’ व ‌‘आपले काम दुसऱ्यावर नाही‌’ या सवयी आपली कार्यक्षमता व स्वावलंबन वाढवतात. शालेय विद्यार्थ्यांना या सवयी लहान वयात पटकन लागू शकतात.लहान मुलांना सतत काहीतरी सुचत असते व प्रश्न पडत असतात. त्यांची कल्पनाशक्ती व प्रतिभाशक्ती वाढत्या वयाबरोबर हळूहळू कमी होत जाते. वय वाढायच्या आधीच, नवीन सुचणे हा चांगला गुण व सवय आहे हे बिंबले, तर ‌‘रोज नवीन सुचलेच पाहिजे‌’ ही सवय मुलांच्या मूळच्या प्रवृत्तीला बळकट करते. विद्यार्थ्यांची सहज प्रवृत्ती एकमेकांशी चढाओढ करण्याची, स्वतःला आणखी नवीन किंवा जास्तीचे काय करता येईल हे पाहण्याची असते. या मुळे ‌‘कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे‌’ हे विद्यार्थ्यांना सहज कळते व जमते.
‌‘विनाश्रमाचे घेणार नाही‌’ व ‌‘गुणवत्तेत तडजोड नाही‌’ या दोन्ही सवयी प्रौढ सदस्यांकरिता त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी व राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पण बहुतेक विद्यार्थ्यांना याचे महत्त्व लक्षात येत नाही. सध्याच्या चंगळवादी वातावरणात रोज उपासनेची सवय लागली तरी ‌‘रोज उपासना झाली‌‘च‌’ पाहिजे‌’ या आग्रहाचे कारण विद्यार्थ्यांना कळत नाही. त्याच प्रमाणे सर्वत्र केवळ उपयुक्ततेचा विचार, स्वार्थ, आत्मकेंद्रित वृत्ती दिसत असताना ‌‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केला‌‘च‌’ पाहिजे‌’ असे का? हे ही विद्यार्थ्यांना कळत नाही. प्रौढांना मात्र या दोन्ही सवयी विचारपूर्वक लावून घ्याव्या लागतात.

आजचे काम उद्यावर नाही

दूरच्या ग्रहांकडे अंतरिक्ष-यान पाठवायचे असते तेव्हा दोन-चार-बारा-पंधरा वर्षांनी ते त्या ग्रहावर पोहोचणार असते. पृथ्वी आणि ते ते ग्रह सतत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची गती वेगवेगळी असते आणि प्रदक्षिणेचा कालावधी वेगळा असतो. अंतरिक्ष-यानाला कमीत कमी प्रवास करावा लागेल अशा हिशेबाने अंतरिक्ष-यानाच्या प्रक्षेपणाचा मुहूर्त खरोखरच ग्रहांच्या स्थानांंचे गणित करून काढावा लागतो. कधी तर आज समोर दिसणाऱ्या ग्रहावर चार वर्षांनी पोहोचण्यासाठी अंतरिक्ष-यान आज विरुद्ध दिशेला सोडावे लागते. या प्रक्षेपणाची वेळ सांभाळावी लागते. थोडी चुकली तरी अंतरिक्ष-यान ग्रहावर जायच्या ऐवजी हजारो किलोमीटर दूर जाईल.
आपल्या सर्वच कामांच्या बाबतीत असे असते. कामाचा काही परिणाम लगेच जाणवणारा असतो. तर काही बऱ्याच नंतर जाणवणारा असतो. या सर्व परिणामांचा विचार करून, काम कधी करायचे ते ठरवावे लागते. महत्त्वाच्या कामाची वेळ चुकवायची नसेल, तर लहान-सहान कामेही वेळेवर करण्याची तडफ शिकावी लागते. काम वेळच्या वेळी करण्याच्या सवयीच्या पायावर पुढील सर्व कर्तृत्व उभे असते.

आपले काम दुसऱ्यावर नाही

सध्याचे युग सामूहिक पराक्रमाचे आहे. स्वतःची कामे तर स्वतः करावी लागतातच. परंतु गटामध्ये आपल्या वाट्याला आलेले कामही आपणच करावे लागते. आपण नाही केेले तर कोणीतरी करील, या भरवशावर गहाळ राहिले तर आपली तर अडचण होतेच, इतरांचे वेळापत्रकही बिघडून जाते. अलमट्टी धरणाचे दरवाजे कधी उघडायचे याचा निर्णय कोणी घ्यायचा या वादात सांगली शहरात दोन वर्षे पूर आला. जगभरातली कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक ‌‘जेव्हाचे तेव्हा‌’ (Just-in-time) तत्त्वावर होताना, अनेकांना कामाच्या साखळीमधील आपले काम, सावधतेने स्वतःच करावे लागते. त्यामुळे स्वावलंबनाची आणि स्व-कर्तव्यपालनाची सवय ही अंगी मुरायलाच पाहिजे.

रोज नवीन काही सुचलेच पाहिजे

वार्षिक दहा टक्के आर्थिक वाढीच्या रेट्यामुळे, थांबला तो संपला, याची प्रखर जाणीव सर्वांना होत असते. वेगाने पळा, आणि अधिक वेगाने पळा, हे काही याच्यावरच उत्तर नाही. कारण वेगाला मर्यादा असते. नवीन सुचण्याला मात्र मर्यादा नसते. वेगाने पळा, पण वेगळ्या पद्धतीने पळा, हे सतत प्रगतीसाठीचे उत्तर आहे. रोज नवीन सुचले, तर आपण शर्यतीचे नियमही बदलू शकतो. नवीन सुचण्याची सवय लागली, की कोणत्याही शर्यतीत उतरण्याचा आत्मविश्वास येतो.
या लेखातील तीन पायाभूत गुण व पुढील लेखातील ‌‘कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे‌’ हा चौथा गुण. हे चारही गुण अंगी बाणले तर कोणीही सदस्य प्रगत गुणही अंगी बाणवू शकेल. सौर आषाढ 1, शके 1917
22.6.2007