‘पिक्सेल’ची संख्या वाढवा
आपल्या घरातील दूरदर्शन संचाच्या काचेच्या पडद्याला, आतल्या बाजूने रसायनांच्या मिश्रणाचा एक मुलामा दिलेला असतो. संचाच्या आतून संपूर्ण पडद्यावरील या रसायनांच्या मुलाम्यावर, विद्युत्-कणांचा मारा होतो. ते विद्युत्-कण या मुलाम्यावर आदळल्यावर त्यांच्या उर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. त्यामुळे संपूर्ण पडदा आतून प्रकाशित होतो व बाहेरून पडदाभर चित्र बघायला मिळते. या पडद्यावरचे चित्र किती स्पष्ट आणि किती उजळ दिसायचे, ते आतल्या रसायनांच्या मिश्रणात, विद्युत्-कणांनी उत्तेजित होऊन प्रकाशमान होणारे, किती कण आहेत, यावर अवलंबून असते. एका चौरस सेंटिमीटरमध्ये काही हजार, काही लक्ष किंवा आता ‘डिजिटल’ उपकरणांच्या युगात असे काही दशलक्ष कण असतात. या कणांना ‘पिक्सेल’ असे म्हणतात. पडद्यावरचे चित्र जास्त चांगले दिसायचे असेल, तर पडद्यामागील रसायनांच्या मुलाम्यातील, विद्युत्-कणांनी उत्तेजित होणाऱ्या कणांची संख्या वाढवायला लागते. तसेच पडद्यावर जेवढी ‘पिक्सेल’ची संख्या असते, त्या प्रमाणात दूरदर्शन संचाच्या प्रकाश नळीतून, विद्युत्-कण बाहेर पडले पाहिजेत. त्यांची संख्या मुळात दूरदर्शन-प्रक्षेपणासाठी चित्रे टिपणाऱ्या, कॅमेऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे कॅमेऱ्यातील भिंगाची व त्यातील चित्रफितीची क्षमता देखील, ‘पिक्सेल’च्या भाषेत चांगली पाहिजे. आताच्या चांगल्या कॅमेरात किंवा दूरदर्शन संचात, ती क्षमता दशलक्ष ‘पिक्सेल’ किंवा ‘मेगापिक्सेल’ मध्ये मोजतात.
मानवी कार्यक्षमतेचे ‘पिक्सेल’
दूरदर्शन संचातील पडद्याची कार्यक्षमता चांगली चित्रे दिसण्यावर ठरते. आपली कार्यक्षमता आपल्या शरीर, मन, बुद्धीवर अवलंबून असते. शरीर, मन, बुद्धीची कार्यक्षमता आपल्या शरीरातील विविध पेशींच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. या सर्व पेशींना दोन प्रकारची ऊर्जा मिळते. त्या उर्जेचे रूपांतर कार्यशक्तीत होते. पहिल्या प्रकारची ऊर्जा म्हणजे अन्न-पाणी-प्राणवायू-सूर्यप्रकाश यांच्यावरील रासायनिक-जैविक प्रक्रियांतून मिळणारी प्राणशक्ती. दुसऱ्या प्रकारची ऊर्जा म्हणजे आपले संकल्प पूर्ण करण्याच्या ध्यासातून, आणि उद्दिष्ट गाठण्याच्या, किंवा ध्येय साकार करण्याच्या ध्यासातून सक्रिय होणारी इच्छाशक्ती. प्राणशक्ती शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते. त्यातून सर्व जीवनावश्यक क्रिया होतात. आपल्यातील इच्छा-शक्ती, दूरदर्शनच्या पडद्यावर आदळणाऱ्या विद्युत्-कणांसारखे काम करत असते. पडद्यामागील जेवढे ‘पिक्सेल’ हे विद्युत्-कण ग्रहण करतील, तेवढेच प्रकाशमान होतात. त्याप्रमाणे आपल्या शरीरातील जितक्या पेशी आपल्या इच्छा-शक्तीने प्रभावित होतात, तेवढ्या पेशी जीवनावश्यक क्रियांपलीकडे संकल्पपूतसाठी, उद्दिष्ट गाठण्यासाठी, ध्येय साकार करण्यासाठी, जास्तीच्या क्षमतेने काम करतात. अशा पेशींनाच येथे कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ म्हटले आहे.
पडद्यावरची ‘पिक्सेल’ची संख्या त्या त्या दूरदर्शन संचापुरती ठरलेली असते. जास्त ‘पिक्सेल’ हवे असतील तर संचच बदलावा लागतो. मानवी शरीरात अब्जावधी पेशी असतात. त्या पैकी इच्छाशक्तीने प्रभावित होणाऱ्या पेशी, सुरुवातीला तरी मुख्यत: आपल्या मेंदूतच असतात. दूरदर्शन संच बदलण्याप्रमाणे आपल्याला मेंदू किंवा त्यातील पेशी बदलता येणार नाहीत. परंतु मेंदूतील पेशींप्रमाणे, शरीरातील सर्वच पेशी इच्छाशक्तीला प्रतिसाद देणाऱ्या करता आल्या, तर कार्यक्षमतेच्या ‘पिक्सेल’ची संख्या मात्र कैक पटीने वाढवता येईल.
कार्यक्षमतेचे ‘पिक्सेल’ वाढविण्याचे साधन
दूरदर्शन पडद्यावरील ‘पिक्सेल’च्या संख्येच्या प्रमाणात, दूरदर्शन कॅमेरातील ‘पिक्सेल’ असल्या, तरच पडद्यावरील चित्राचा दर्जा सुधारतो. त्याचप्रमाणे कार्यक्षमता वाढण्यासाठी आपल्यातली इच्छाशक्ती तीव्र व्हायला हवी, व तिला प्रतिसाद देणाऱ्या पेशींची संख्याही वाढायला हवी. हे दोन्ही घडविण्याचे साधन म्हणजे कोणत्या तरी प्रकारची दैनंदिन उपासना.
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यातील उद्दिष्ट वेगवेगळे असू शकेल. कोणतेही उद्दिष्ट असले तरी ते उद्दिष्ट गाठण्याची इच्छाशक्ती तीव्र करण्यासाठी आपल्या मनातील मोह, दु:ख, असूया, स्पर्धा, गर्विष्ठपणा, लोभीपणा इत्यादी नकारात्मक भावना कमी व्हाव्या लागतात. त्यासाठी प्रबोधिनीच्या उपासनेतील शुद्धिमंत्र किंवा विरजामंत्र आहेत. तसेच या सर्व उद्दिष्टांचे रूपांतर अधिकाधिक मोठ्या मानवसमाजाच्या हिताच्या उद्दिष्टांमध्ये कसे होईल, याचाही विचार सतत चालू ठेवावा लागतो. त्यासाठी प्रबोधिनीच्या उपासनेतील शक्ति-मंत्र आहेत.
नित्य उपासनेमुळे प्रतिभा-स्फुरण होऊ लागले, बुद्धीच्या सर्व पैलूंना उजाळा मिळू लागला, की मेंदूतील ‘पिक्सेल’ वाढू लागले हे कळते. दु:ख, अपयश, निराशा यांचा निचरा करण्याची शक्ती वाढू लागली म्हणजे भावनांचे नियंत्रण करणाऱ्या ग्रंथींमधील पेशी ‘पिक्सेल’ बनू लागल्या हे कळते. उत्साह वाढू लागला, सकारात्मकता वाढू लागली की रक्तातील व रक्ताबाहेरील रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी ‘पिक्सेल’ बनू लागल्या. कौशल्यांमध्ये प्राविण्य व प्रभुत्वाच्या पलीकडे, अनायास सहजता आली, की ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांतील ‘पिक्सेल’ची संख्या वाढू लागली. हळू हळू शरीरातील सर्वच अवयवांमधील अधिकाधिक पेशी, ‘पिक्सेल’ म्हणून काम करू लागतात. मग चित्ताची प्रसन्नता वाढते, उद्दिष्टावरील एकाग्रता वाढते व इच्छाशक्ती शरीराच्या सर्व पेशींद्वारे काम करू लागते.
‘विनाश्रमाचे घेणार नाही’, ‘गुणवत्तेत तडजोड नाही’, आणि ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार’ हे आग्रह धरून सगळी कामे सातत्याने करण्यासाठी मोठी इच्छाशक्ती व तिला प्रतिसाद देणारे शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी लागतात. आत्मसन्मान, समाजमान्यता आणि समाजाच्या शुभेच्छा मिळवून देणाऱ्या, सर्वसाधारण प्रबोधिनीपणाच्या या तीन प्रगत पैलूंना, परमेश्वरी शक्तीचे अधिष्ठान देणारा चौथा पैलू हवा. इच्छाशक्तीला सन्मुख होण्याची स्वत:च्या शरीरातील पेशी-पेशीची क्षमता वाढवण्यासाठी, ‘रोज उपासना झालीच पाहिजे’ हा आग्रह. हाच तो आपले प्रबोधिनीपण दृढ करणारा चौथा प्रगत पैलू आहे.
सौर ज्येष्ठ 1 शके 1929
22.5.2007