दूरदृष्टीचे नियोजन
रविवार दि. 25 फेब्रुवारी 2007 रोजी युवकांची क्रीडा-प्रात्यक्षिके पुण्यामध्ये झाली. प्रात्यक्षिके विद्युत्-प्रकाशात झाली. वीज-पुरवठा खंडित झाला तर अडचण होऊ नये म्हणून सर्व वेळ जनित्राचा वापर केला होता. योगायोगाने प्रात्यक्षिके चालू असतानाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील वीज गेली होती. प्रात्यक्षिके पाहणाऱ्यांना मात्र बाहेर सर्वत्र अंधार आहे याची काहीच कल्पना नव्हती. एका जनित्राने केवढी सोय केली!
प्रात्यक्षिके संपल्यानंतर बाहेरची वीज गायब झाल्याचा प्रकार कळला. अशाच एका प्रात्यक्षिकांच्या वेळची ऐकलेली आख्यायिका मला आठवली. त्यावेळी जनित्रे सहज उपलब्ध नसायची व भाडेही जास्त वाटायचे. वीज गेलीच तर…. म्हणून संयोजकांनी प्रात्यक्षिके सादर व्हायच्या क्रीडांगणाच्या चार कोपऱ्यांवर मोटारी उभ्या करून ठेवल्या होत्या. प्रात्यक्षिकाच्या वेळी वीज गेलीच. लगेच मोटारींचे पुढचे दिवे चालू केले. प्रात्यक्षिके चालू राहिली. पाहणाऱ्यांना वेगळी प्रकाश-योजना आहे असे वाटले. वीज गेल्याचे कळलेच नाही.
साधनांची नव्हे आपली गुणवत्ता
मोटारींचे दिवे ऐनवेळी लावायच्या ऐवजी पूर्ण वेळ जनित्र वापरणे एवढा तांत्रिक व आर्थिक बदल इतक्या वर्षांमध्ये झाला. या सुधारलेल्या साधनांना गुणवत्ता म्हणायचे? की पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याच्या दूरदृष्टीला गुणवत्ता म्हणायचे? प्रबोधिनीचा सदस्य गुणवत्तेत तडजोड करणारा नसावा असे आपण म्हणतो. आधुनिक तंत्रे व साधने वापरण्याला, त्याच्यात तडजोड न करण्याला गुणवत्ता म्हणायचे? की उपलब्ध तंत्रे व साधने वापरून आपले नियोजित काम झालेच पाहिजे या आग्रहाने विविध पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याला गुणवत्ता म्हणायचे?
तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या उत्तमातील उत्तम साधने वापरण्याचा आग्रह धरणे म्हणजे ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ ही वृत्ती आहेच. परंतु पर्यायी साधने, पर्यायी सहकारी, पर्यायी जागा, पर्यायी वेळ यांचा विचार करून ठेवणे व ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे असा आग्रह धरणे म्हणजे अधिक टिकाऊ गुणवत्तेचा आग्रह धरणे. त्यामुळे ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ ही वृत्ती साधनांच्या गुणवत्तेकडून साध्याच्या व काम करणाऱ्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधते.
गुणवत्तेमुळे श्रमांना मोल येते
‘मोले घातले रडाया, नाही प्रीती नाही माया’ असा अनुभव अनेकजणांनी घेतला असेल. अलीकडे ‘मोले घातले सत्कार करण्या’, ‘मोले घातले प्रसिद्धी करण्या’, ‘मोलेे घातले प्रचार करण्या’, ‘मोले घातले उत्सव करण्या’, अशी कामे व्यावसायिक पद्धतीने करणारे publicity managers व event managers बघायला मिळतात. ते त्यांच्या श्रमांचा मोबदला वाजवून घेऊनच काम करतात. त्यासाठी साधनांची, तंत्रांची, कार्यक्रमासाठी आवश्यक दूरदृष्टीची गुणवत्ता त्यांना राखावीच लागते. त्यांना ‘विनाश्रमाचे पैसे’ कोणी देणार नाही. मागच्या महिन्यात ‘विनाश्रमाचेे घेणार नाही’ या वृत्तीचे वर्णन ‘स्वीकारलेले काम वेळेवर, चोख, मन:पूर्वक, देखरेखीशिवाय, आठवणीशिवाय आणि त्या कामाचा अपेक्षित परिणाम समजून घेऊन काम करण्याची वृत्ती’ असे केले होते. ‘मोले’ काम करायला लागले म्हणजे ही सगळी गुणवत्ता त्यात आल्यावरच कामाचे मोल वाढते हे लक्षात येते.
कामाच्या मोबदल्याकडून कामाकडे
प्रबोधिनीमध्ये कोणत्याही मार्गाने, कोणत्याही कामासाठी, कोणत्याही कारणासाठी आलेल्या सदस्याने आपल्या श्रमांना असे गुणवत्तेने येणारे मूल्य प्राप्त करून दिले पाहिजे. आणि त्यापुढे जाऊन ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ असे म्हटले पाहिजे. म्हणजे आपल्या कामात प्रीती, माया, जिव्हाळा, आपुलकी ओतली पाहिजे.
साधारणपणे आपण आपल्या कामावर जेवढे प्रेम करतो तेवढेच स्वत:वर करत असतो. मला धक्का न बसता जेवढे काम मला करता येईल तेवढे मी करतो. काम करताना धक्के जास्त बसायला लागले तर ते धक्के सहन करण्याबद्दल आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जास्तीचा मोबदला मिळावा अशी आपली अपेक्षा असते. म्हणजे श्रम वाढले, श्रमांची गुणवत्ता वाढली पण आपली गुणवत्ता वाढली नाही. आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी स्वत:वरचे प्रेम थोडे थोडे कामाकडे वळवावे लागते. आपण काम का करतो आहोत त्या ध्येयाकडे लक्ष गेले की कामावरचे प्रेम वाढवता येते. मी माझ्यासाठी काम करत नसून ध्येयासाठी काम करतो आहे असे वाटायला लागले की स्वत:वरचे प्रेम कामाकडे वळायला लागते.
ध्येयावर प्रेम म्हणून कामावर प्रेम
आपले काम जसे पुढे जाते तसे आपले ध्येयही स्पष्ट होत जाते. ध्येय स्पष्ट झाल्यामुळे कामात काही बदल किंवा सुधारणा सुचतात. कामात बदल झाला की कामाच्या पद्धतीत व कामाच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. अनुभवाने यशस्वी व पक्क्या झालेल्या आपल्या पद्धती व सवयी बदलायच्या झाल्या की काही गैरसोय होते. ही गैरसोय आनंदाने सहन करणं व स्वत: नवीन पद्धती अंगवळणी पाडून घेणं म्हणजे कामावर प्रेम करणं.
कामासाठी चोवीस तास वाहून घेतलेले थोडे जण असतात. बाकीच्यांच्या दिनक्रमात दोन-चार-सहा-आठ तास कामासाठी व बाकीचे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी अशी विभागणी असते. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी जसं खाडीत शिरतं, तसं काही वेळा कामाला उधाण येतं व कामाचा वेळ स्वत:च्या वेळेत शिरतो. हे उधाण खाजगी वेळावर आक्रमण वाटणं म्हणजे स्वत:वर प्रेम करणं. हे उधाण नवीन शिकण्याची संधी आहे असं वाटणं म्हणजे कामावर प्रेम करणं. ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ म्हणजे ‘कामावर प्रेम करण्यात काटकसर करायची नाही’. ‘विनाश्रमाचे घेणार नाही’ म्हणण्यात आत्मसन्मान आहे. तर ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ या सूत्राने समाजमान्यता मिळते.
सौर चैत्र 1, शके 1929
22.3.2007