कार्यकर्त्याचा चौथा गुण‌ ‘नवनिर्मितीक्षम (क्रिएटिव्ह) असणे‌’

“हाती घेतलेल्या कामात फारशा अडचणी न येता यशस्वी होत गेलेले, अपयशानी खचून गेलेले आणि यशापयशाच्या पायऱ्या  अनुभवत कामात तग धरू पाहणारे, असे विविध लोक समाजात दिसतात. मात्र ज्यांना सतत नवे काही डोळ्यांपुढे दिसत राहते, तेच यातल्या कोणत्याही परिस्थितीत आणखी मोठे स्वप्न पाहू शकतात. अधिक पुढचे पाहत राहणे, नवनवीन कल्पनांचे प्रयोग करून पाहणे, नवे काही रुजवायचा ध्यास लागणे, म्हणजे कार्यकर्ता होणे...  ” 

नव-विचारांचे प्रात्यक्षिक करणारी संघटना

समाजातील व्यवहार चालू राहण्यासाठी किंवा संघटनेचे काम चालू राहण्यासाठी एकाच प्रकारचे काम सातत्याने करावे लागते. ते काम रोज जेवण्यासारखे आहे. जीवनासाठी आवश्यक, पण त्यात वेगळा आनंद मानण्यासारखे नाही. जे कोणी केले नाही ते करून पाहण्यामध्ये, जो प्रश्न कोणाला सुचलाही नाही तो सोडवण्यामध्ये, रुळलेली वाट सोडून केवळ जिज्ञासा म्हणून वेगळ्या वाटेने जाण्यामध्ये आनंद आहे. व्यक्तीचे, संघटनेचे किंवा समाजाचेही अस्तित्व, नवीन काही करता आले तर सार्थ होते. केवळ जगणे, टिकून राहणे, कंटाळवाणे आहे. रोजचे अध्यापन, संशोधन, वृत्तलेखन, वाङ्मय लेखन यात तर नावीन्य हवेच. उपक्रमांचे पण नावीन्य हवे. स्वच्छतेच्या साधनांमध्ये, संगणकाच्या उपयोगांमध्ये नावीन्य हवे. क्रीडा प्रात्यक्षिके, मिरवणुका, शिबिरे यातही कल्पकता हवी असा प्रबोधिनीत आग्रह असतो. युवतींनी एका प्रात्यक्षिकात कथ्थक, भरतनाट्यम्‌‍ आणि कराटे (मार्शल आर्ट्‌‍स्‌‍) यांचा मनोरम मेळ घातलेला होता, तो दृष्टी खिळवील असा होता! प्रबोधिनीचा कार्यकर्ता पहिल्या तीन लक्षणांत म्हटल्याप्रमाणे प्रतिसादी, उत्तरदायी आणि सहकार्यशील जसा असला पाहिजे, तसा तो नवनिर्माताही असला पाहिजे.
‌‘त्रिमितीतील प्रतिकृती‌’ कागदापासून करण्याच्या मार्गदर्शन पुस्तिकेपासून बचत-गट संचालनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेपर्यंत, शेतकऱ्यांना एकात्मिक शेतीच्या प्रशिक्षणापासून गावात घरटी एक विरजक (फिल्टर) पोचवण्यापर्यंत, डोंबिवली केंद्राच्या रात्र-शिबिरापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्यांच्या समाज-दर्शन शिबिरापर्यंत, काश्मिरी युवकांना महाराष्ट्र-दर्शन घडविण्यापासून महाराष्ट्रातील दोनशे युवकांना ईशान्य भारत दर्शन घडविण्यापर्यंत, अभिक्षमता मापनाच्या संगणकीय चाचण्यांपासून संगीत शिक्षण व अभिव्यक्तीसाठी प्रेरणा-जागरणाच्या संशोधनापर्यंत, जवळच्या वस्त्यांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकांपासून सीमावत राज्यांतील शाळांमध्ये ऑनलाईन तासिका घेण्यापर्यंत, भविष्यवेधशास्त्रातील प्रकल्पांपासून मातृभूमी पूजनाच्या कार्यक्रमांपर्यंत, विहीर लोकार्पणाच्या पोथीपासून वाड्या-वस्त्यांवर सौर दिवे पोहोचवण्यापर्यंत आणि उपासना-केंद्रापासून विज्ञान प्रयोगशाळेतील प्रकल्पांपर्यंतची दलांची विविध रूपे, यातून नवीन कल्पना, नवीन योजना आणि नवीन प्रात्यक्षिके यांचे आविष्कार प्रबोधिनीत सतत होत असतात.

प्रतिभासंपन्नता

प्रबोधिनीला केवळ चाकोरीतले काम करत राहण्याचे वावडे आहे. सातत्याबरोबर नाविन्याचाही आग्रह प्रबोधिनीत असतो. प्रबोधिनीच्या शिक्षणपद्धतीत प्रतिभाविकसनाला विशेष महत्त्व आहे. ‌‘जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका‌’ असे आपण लहान मुलांना देखील सांगत असतो. प्रश्न विचारणाऱ्यांचे आणि जुन्या प्रश्नांना नवीन उत्तरे शोधणाऱ्यांचे येथे नेहमी स्वागत असते. एखादी कृती किंवा संकल्पना रूपांतरित करणं (adaptation) – एका गावाच्या विकासाऐवजी खोऱ्याच्या विकासाची संकल्पना मांडणे म्हणजे संकल्पना रूपांतरित करणे. प्रश्नांची एकाहून अधिक समर्पक उत्तरं शोधणं (innovation) – रात्र-शिबिर, समाजदर्शन शिबिर, ग्रामीण परिचय शिबिर, सहजीवन शिबिर, साहस शिबिर, हे विविध प्रकार म्हणजे शिबिर हा एकच ढाचा हेतू प्रमाणे समर्पक रीतीने वापरणे. नवीन गोष्टी शोधून काढणं (divergent thinking) – त्रिमितीतील प्रतिकृती बनवण्याची मार्गदर्शक पुस्तिका किंवा सामाजिक जाणीव प्रशिक्षण पुस्तिका ही नवीनच गोष्ट शोधून काढण्याची उदाहरणे. संकल्पना रूपांतरित करणं, प्रश्नांची एकाहून अधिक समर्पक उत्तरं शोधणं आणि नवीन गोष्टी शोधून काढणे हा बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद झाला. कालोचित बदल, रूपांतर हे बऱ्याच वेळा तात्कालिक उत्तर असतं. अभिनवता (इनोव्हेशन) अधिक स्थायी उत्तरं शोधू शकते – छात्र प्रबोधन दिवाळी अंकाच्या 50,000 प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी ही दहा वर्षे स्थिर झालेली अभिनव कल्पना. कल चाचण्यांचे संगणकीकरण ही देखील आता रूढ झालेली अभिनव कल्पना.
प्रतिभेबरोबर उद्योजकता देखील सर्जनशीलतेसाठी आवश्यक असते. नवा कारखाना, नवे दुकान, नवे उत्पादन, नवा व्यापार, नवी शाळा, नवी संशोधिका, नवे रुग्णालय, नवे बांधकाम, नवी कार्यालय व्यवस्था, नवी संदेशवहन व्यवस्था, नवी व्यायामशाळा, नवी प्रयोगशाळा, नवा मार्गदर्शन वर्ग, नवी वाहतूक व्यवस्था, नवी चळवळ, नवे अभियान, नवे आंदोलन, नवी सुरक्षा व्यवस्था अशा कितीतरी गोष्टी नव्याने सुरू करण्यासाठी उद्योजकता लागते. नवीन कल्पनांचा वापर फक्त स्वतःच्या समाधानापुरता मर्यादित न ठेवता त्या इतरांच्याही उपयोगी पडायला हव्यात, यासाठी प्रतिभेला उद्योजकतेची जोड देण्याची कल्पना प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासूनच आहे.

सर्जनशीलता

नवीन सुचणे म्हणजे प्रतिभासंपन्नता तर सुचलेले प्रत्यक्षात करून पाहणे म्हणजे उद्योजकता होय. जो प्रतिभावान आहे त्याला नवे सुचू शकते. मात्र केवळ नवीन कल्पना सुचणे पुरेसे नाही. त्याच्या पुढे जाणे म्हणजे प्रतिभेला उद्योजकतेची जोड देऊन सर्जनशील होणे. जो सर्जनशील आहे तो सुचलेल्या कल्पनांना मूर्त रूप देऊ शकतो. एखाद्याच्या मनातील कल्पना प्रत्यक्ष आकार घेण्यापूव त्या व्यक्तीला चिंता, अनिश्चितता आणि भावनिक खळबळीतूनही जावं लागतं. परंतु या तपस्येतून पुढच्या क्षितिजापर्यंत आपला प्रवास अडचणी ओलांडून झाला आहे याची आनंददायी जाणीव त्या व्यक्तीला होते. नकारात्मकतेमुळे, निरुपयोगी सामाजिक रचनांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रनांवर सर्जनशीलता समर्पक उत्तरं शोधून काढत असते. शतकानुशतके संस्कृत मंत्रांसह कर्मकाण्ड पद्धतीने केल्या जाणाऱ्या धार्मिक संस्कारांचे ताजे, टवटवीत, अर्थपूर्ण, कालोचित आणि सामूहिक रूप हा प्रबोधिनीतील सर्जनशीलतेचा एक विशेष आविष्कार आहे. एकाच प्रकारच्या कामातले विशेषीकरण झाल्याने जे आणि जेवढे केले तेच बरोबर मानण्याची वृत्ती बदलण्यासाठी सर्जनशीलता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमध्ये संग्रहात्मक, वगकरण, प्रतिकृती, भाषिक नवनिर्मिती, वैज्ञानिक संशोधन, सामाजिक शास्त्रे भविष्यवेध असा सर्जनयुक्त अभ्यासक्रम तयार झाला तो प्रकल्पपद्धतीने अध्ययनात तोचतोचपणा येऊ नये म्हणूनच.

क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्माता

कार्यकर्त्याला रोज नवीन-नवीन सुचणे आणि सुचलेले घडवून आणणे हे कसे साधेल? कामाचा ध्यास लागला असेल, म्हणजेच झाले ते थेंबाएवढे आणि राहिले ते समुद्राएवढे असा विधायक असंतोष असेल, आणि तरीही एकान्त साधून मनाला स्थिर व शांत करता येत असेल, तर उत्तम कल्पना निश्चितच स्फुरतील. आपण करत असलेल्या छोट्या-मोठ्या कामांची परिणामकारकता कशी वाढेल याचा सातत्याने विचार झाला पाहिजे, प्रयोग झाले पाहिजेत. आपल्यासारखी कामे करणारे आपल्या आजूबाजूचे वेगवेगळे कार्यकर्ते, अन्य संस्था-संघटना, अन्य देशांमधले इतर लोक ती कशा प्रकारे करतात याचा अभ्यास पाहिजे. साचेबंदपणात न अडकता प्रत्येक घटनेचा स्वच्छ मनाने-बुद्धीने ताजेपणाने विचार करता यायला हवा. या कल्पना जपून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणे म्हणजे कार्यकर्त्याने नवनिर्माता बनणे.
1992 साली प्रबोधिनीच्या त्रिदशकपूतनिमित्त काढलेल्या स्मरणिकेत, “नेतृत्व म्हणजे त्या-त्या क्षेत्रात नवे सुचून ते प्रत्यक्षात आणता आले पाहिजे. नवे रुजवणे, नवे शिकविणे म्हणजे नेतृत्व!” असे आपण म्हटले आहे. ‌‘मी कल्पना सुचवतो, तुम्ही करा‌’ असे म्हणणारा प्रतिभावान कार्यकर्ता पुरेसा नाही. ‌‘मी एकदा करून दाखवतो‌’ किंवा ‌‘मी एकदा केले आहे‌’ असे म्हणणारा सर्जनशील कार्यकर्ताही पुरेसा नाही. कार्यकर्ता हा सुचलेली कल्पना स्वत: प्रत्यक्षात आणून इतरांनाही कसे करायचे ते दाखवणारा आणि अनेकांना जमले की पुन्हा पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी बदलाचा आग्रह धरणारा नवनिर्माता हवा. नवीन काही सुचले की झोकून देऊन करून पाहणे कार्यकर्त्याला जमायला हवे. निगडीतले लहान मुलांच्या खेळण्यांचे संग्रहालय व ग्रंथालयातील पुस्तकांप्रमाणे खेळण्यांची देवघेव करणारे जम्मतघर हे झोकून देऊन केलेली नव्या कल्पनेची नवनिर्मिती आहे.
असे झोकून देऊन काम करत असताना, जे जुने आहे, परंपरेतून आणि अनुभवांमधून आपल्या-पर्यंत पोहोचले आहे, त्यावर विचार करून योग्य ते स्वीकारणे आणि जुना आशय व नव्या कल्पना यांची मूळ रचनेला, उद्दिष्टांना धक्का न लावता सांगड घालता येणे महत्त्वाचे आहे. एखाद्या उपक्रमाचे उद्दिष्ट समजून घेतल्यानंतर आपापल्या गटाच्या आवश्यकतेनुसार त्याच्या स्वरूपात बदल सुचणे ही देखील नवनिर्मिती आहे. विद्याव्रतातील विविध संकल्पना समजावताना विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने किंवा तासिका योजणे, कृतिसत्रांद्वारे स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची संधी देणे, चित्रफिती दाखवणे, निवासी शिबिरे घेणे, दासबोधाचे वाचन करणे, व्यक्तिकार्ये सुचवणे इत्यादी वापरली जाणारी विविध माध्यमे ही त्या त्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आवश्यकतांनुसार केलेली नवनिर्मिती आहे.
गटात काम करत असताना सुचणाऱ्या कल्पना गटातील सहकाऱ्यांना सांगितल्याने, त्यांचे मत समजून घेतल्याने त्या कल्पनांवर चहूबाजूंनी विचार व्हायला मदत होते. एखादी कल्पना प्रत्यक्षात आणताना फसली, काही अडथळे आले तरी हार न मानता चिकाटीने नवे-नवे प्रयोग करत राहणे याने आपले कामासंबंधीचे चिंतन वाढत राहते. मात्र हे सर्व करत असताना अंतिमतः कार्यकर्त्याला नवनिर्माता बनण्यासाठी आपली सर्जनशीलता देशाचे रूप पालटण्यासाठी वापरता येणे अधिक आवश्यक आहे. समाजपरिवर्तनाच्या कामात तर एकेका व्यक्तीप्रमाणे सहयोगी व्यक्तींच्या गटालाही सामूहिकरित्या नवनिर्माता बनावे लागेल.

ध्यासातून नवनिर्मिती

नवनिर्मितीसाठी कालबाह्य कल्पनांचा, कालबाह्य पद्धतींचा त्याग करायला लागेल. पूव परिपूर्र्ण वाटणारे, परंतु आज अपुरे वाटणारे विचार सोडून द्यायला लागतील. आपल्याच कामाचे चिकित्सक परीक्षण करावे लागेल. जुन्या वस्तू, कार्यपद्धती आणि विचार गरज नसले तर टाकून देता येणे आणि नव्या वस्तू घडवणे, नव्या कार्यपद्धती बसवणे, नवे विचार रुजवणे हे प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना जमले पाहिजे. अशी नवनिर्मिती करण्यासाठी प्रतिभाविकसनाच्या प्रशिक्षणाचा व सरावाचा उपयोग होईलच; परंतु प्रश्न सोडविण्याचा व कार्य घडविण्याचा ध्यास लागणे हे जास्त महत्त्वाचे. अंबाजोगाई परिसरातील गावांमधील लोकांची पाणी प्रश्नाविषयी जागृती व त्यांचा तो प्रश्न सोडवण्यातील पुढाकार प्रबोधिनीच्या व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या ध्यासातून झालेली नवनिर्मिती आहे.