“आपले तेच खरे असे मानून काम करण्याची सवय झाली, तर मी केले म्हणजे ते आवश्यकच होते आणि पूर्णपणे योग्यच आहे, असा विचार करणारे तयार होण्याची शक्यता असते. मात्र स्वतःला कळले, स्वतः केले ते आणि तेवढेच बरोबर असे न मानता कामाविषयी अधिकाधिक जणांशी संवाद साधता येणे, सकारात्मक भावनेने योग्य-अयोग्य समजून घेता येणे आणि हे सर्व फक्त माझे नाही असे समजणे म्हणजे कार्यकर्ता होणे…
कामासंबंधी भविष्यचिंतन
बऱ्याच वर्षांपूव प्रबोधिनीच्या वार्षिक सभेमध्ये प्रबोधिनीने काय काम करावे यासंबंधी मुक्तचिंतनाचे सत्र येोजले होते. सदस्य, कार्यकर्ते व हितचिंतक धरून सुमारे 120 जण सभेला उपस्थित होते. त्यापैकी 25 जणांनी मुक्तचिंतनात आपले विचार मांडले. वेळोवेळी होणारे हे सर्व मुक्तचिंतन सार्थ करायचे असेल तर ‘काय करावे’चा तात्पुरता शेवट व ‘केोणी करायचे’चा प्रारंभ याची साखळी जोडत राहिले पाहिजे. जे करायचे म्हटले, ते ‘का करायचे’ व ‘केोणी करायचे’ याचा सातत्याने विचार झाला पाहिजे. ‘केोणी करायचे’ ठरविताना ‘केोणी काय करायचे’ हे एकत्र चर्चेनेच ठरवता येईल; परंतु ‘ज्याने करायचे तो कसा पाहिजे’ याचे चिंतन प्रत्येकाला एकेकट्यानेही करता येईल. ते सतत होत राहायला हवे.
रिस्पॉन्सिबल अर्थात् उत्तरदायी
काम करणारा कसा पाहिजे याचा विचार करताना शून्यातून सुरुवात करण्याची गरज नाही. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षणांची पंचसूत्रीच आत्मपरीक्षणासाठी आणि स्वयंविकासासाठी वापरता येईल. या पंचसूत्रीतील दुसरे सूत्र आहे – रिस्पॉन्सिबल. कार्यकर्ता जबाबदार असावा किंवा उत्तरदायी असावा असे रिस्पॉन्सिबलचे सोपे भाषांतर करता येते.
उत्तरदायी असणे म्हणजे दायित्व स्वीकारणे. हाती घेतलेली गोष्ट जबाबदारीने पार पाडणे. प्रथम केवळ सदस्य म्हणून वा विद्याथ, युवक-युवती म्हणून संघटनेत आलेल्या व्यक्ती त्यांच्या अभिक्रमामुळे (इनिशिएटिव्ह्) किंवा त्यांच्या ज्ञानामुळे, गुणवत्तेमुळे विशेष दायित्वाला पात्र ठरतात. ते त्यांच्याकडे स्वाभाविकपणे येते. प्रतिसादात काही वेळा भावनिक आवेग असतो. परंतु उत्तरदायित्व समंजस, डोळस असते. सहल घेऊन गेलेला युवक कार्यकर्ता, अभ्यासदौऱ्याला गेलेला युवती संच, शिबिराचा संयोजक-प्रमुख, प्रशिक्षण वर्गाचा संयोजक या सर्वांना आपापल्या उत्तरदायित्वाची जाणीव असते. आपल्यावर एक विशिष्ट उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, त्यात सहभागी व्यक्तींची काळजी आपण घेतली पाहिजे, उपक्रम परिणामकारक झाला पाहिजे, त्यातील संभाव्य धोक्यांपासून जपले पाहिजे, झालेल्या चुकांबाबत आपण दोषी ठरू शकतो, मुले बरोबर असतील तर पालकांना आपण उत्तरदायी आहोत, असे अल्पकालीन उत्तरदायित्वाचे अनेक प्रकार आहेत. असे दायित्व स्वीकारलेल्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायलाही तयार असावे लागते. विभागप्रमुखांना, केंद्रप्रमुखांना, संचालकांना किंवा गटातील/विभागातील सदस्यांनाही उत्तरदायी राहाता येते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमांबाबत काही वेळा पालकांना उत्तरदायी राहावे लागते. सहविचाराने काम करताना सहकाऱ्यांना उत्तरदायी राहावे लागते. तसेच समाजाला उत्तरदायी राहणे म्हणजे समाजातील कोणीही आपल्या कामाबाबत प्रश्न विचारले तर उत्तरे द्यायला तयार असणे. त्या-त्या वेळी ते उपक्रम दायित्वपूर्वक करत असताना स्थिर उत्तरदायित्वासाठी आपली तयारी होत असते.
जबाबदारीचे निवेदन
आपण ज्यांना उत्तरदायी आहोत असे वाटते त्यांनी आपल्या कामाबद्दल आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना आपल्या कामाची नीट माहिती पाहिजे. कामाचे उद्दिष्ट ठरवणे, कामाचे नियोजन करणे, नियोजनाची कार्यवाही करणे व झालेल्या कामाचा आढावा घेणे या चार गोष्टी आपण स्वतःच्या पुढाकारानेच करायच्या असतात. आपण काय व का ठरवले? काय व कसे करणार आहोत? काम कसे चालू आहे? व ठरवल्याप्रमाणे काम झाले का? हे चार प्रश्न आपल्याला कायमचेच विचारलेले आहेत असे समजून आपण ज्यांना उत्तरदायी आहोत त्यांना स्वतःहून प्रत्येक टप्प्याला त्याची माहिती देणे म्हणजे उत्तरदायी राहून काम करण्याची पहिली पायरी आहे. दुसरी पायरी त्यांच्या सर्व उपप्रश्नांना उत्तरे देण्याची. तिसरी पायरी जास्त अवघड आहे. आपले निवेदन ऐकून/वाचून आपण ज्यांना उत्तरदायी आहोत त्यांनी काही सूचना केल्या तर त्यांचा सकारात्मक भूमिकेतून विचार केला पाहिजे. आपले उद्दिष्ट, नियोजन व कार्यवाहीची पद्धत यात त्यांनी सुचवलेले इष्ट ते बदल करणे म्हणजे उत्तरदायी राहून काम करणे. त्यामुळे नियमित, सर्वंकष आणि अर्थपूर्ण निवेदन हा येथील कार्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधिनीच्या विविध केंद्रांच्या प्रमुखांनी मा. संचालकांना केलेल्या मासिक निवेदनात या ठिकाणचे उपक्रम, संख्याबळ, परिणामकारकता, आर्थिक स्थिती, तेथील कार्यकर्त्यांची प्रेरणा, मनःस्थिती या सर्वांचे चित्र उमटले पाहिजे. महत्त्वाचे निर्णय, त्यामागची कारणे याबद्दल लिहायला हवे.
स्वतःच्या वागण्यातील दक्षता
कार्याचा विस्तार आणि कार्याची प्रतिमा याबद्दल उत्तरदायी सदस्य सदैव जागृत असतो. स्वतःच्या जीवनाची संघटनेच्या ध्येयाला अनुकूल मांडणी करणे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही तशा प्रकारची मांडणी करायला साहाय्य करणे हाही उत्तरदायित्वाचा भाग असतो. शिवाय कुठलीही महत्त्वाची जबाबदारी, विभाग, खाते नसतानाही उत्तरदायित्व व्यक्त करता येते. आपल्या रोजच्या कामाचे दिवसाच्या सुरुवातीलाच नियोजन केल्याने, तसेच ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी बैठक, कार्यक्रम किंवा कामासाठी अनेकजणांना एकत्र जमायचे असते, तेव्हा आपण वेळेवर गेल्याने आपला व इतरांचा वेळ वाया जात नाही. बैठकींमध्ये आणि कार्यक्रमांच्या वेळी आवश्यक तेवढेच बोलणे केले आणि लक्षपूर्वक पाहणे आणि ऐकणे केले, तर आपला व इतरांचा वेळ आणि शक्ती वाया जात नाही. कामासाठी आवश्यक तेवढ्याच वापरायच्या वस्तू आणि साधने बरोबर ठेवली, तर त्यांचा पूर्ण वापर होतो आणि कोणतीही वस्तू वाया जात नाही. आवश्यक नसेल तेव्हा दिवे, पंखे बंद केले तर वीज वाया जात नाही. कोणतेही वाहन फक्त कामासाठीच वापरले तर इंधन वाया जात नाही. चार ठिकाणी चौकशी करून मग आवश्यक त्या व तेवढ्याच वस्तू खरेदी केल्या तर पैसे वाया जात नाहीत. वेळ, वापर वस्तू आणि साधने, वीज, इंधन, पैसे याबाबतीतही असे जागरूक राहून काम करणे, याला उत्तरदायी राहून काम करणे असेच म्हणतात. असे उत्तरदायी वागण्यासाठी सर्व कामांचे, प्रत्येक दिवसाचे, आठवड्याचे आणि महिनावार वर्षाचे सुद्धा नियोजन करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागते.
‘उत्तरदायी’ म्हणजेच दक्ष
उत्तरदायी किंवा जबाबदार असा रिस्पॉन्सिबलचा अर्थ घेतला, तरी त्यापेक्षा अधिक अर्थ दक्ष या शब्दामध्ये आहे असे वाटते. दूरदर्शनच्या पडद्यावर क्रिकेटच्या सामन्याचे प्रक्षेपण चालू असताना कॅमेरा फक्त क्रिकेटच्या चेंडूवरही केंद्रित होऊ शकतो आणि प्रेक्षकांसकट संपूर्ण क्रीडांगणही आपल्या कक्षेत आणू शकतो. छोट्याशा चेंडूपासून संपूर्ण क्रीडांगणावर पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ कॅमेरा रोखता येतो. पडद्यावर त्या वेळेपुरते तेच दृश्य दिसते. दृश्य कोणतेही दिसले तरी सामना चालूच असतो.
एखादे काम करताना त्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे, ते काम करत असताना स्वत:चे निरीक्षण करता येणे, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडे लक्ष देता येणे, आपल्या तसेच शेजारच्या विभागाचा विचार करता येणे, करत असलेल्या कामाचा संपूर्ण प्रबोधिनीवर कसा परिणाम हेोत आहे हे शेोधता येणे, ज्यांच्यासाठी काम करतो त्या समाजावर आणि सगळ्या देशावर काय परिणाम हेोईल याचा अंदाज करता येणे, हे सगळे काम करतानाच जमले पाहिजे. काम चालू असताना आपले लक्ष, हातातल्या कामापासून देशावरील त्याच्या चालू व संभाव्य परिणामापर्यंत पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ ज्याला वळवता येते
त्यालाच ते काम उत्तम करता येईल. संदर्भाविना कामात लक्ष टिकून राहात नाही. सर्व संदर्भ लक्षात घेऊन केलेले काम उत्तमही होईल आणि अर्थपूर्ण झाल्यामुळे उत्साहही वाढवील. उत्तम काम केल्याने उत्साह वाढणे आणि परिणाम दिसायला वेळ लागला, तरी ससंदर्भ काम केल्यामुळे धीराने थांबता येणे, म्हणजे दक्ष राहून काम करणे असे वाटते. असे काम करणाऱ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. काम पूर्ण होईपर्यंत तो उत्तरदायी राहीलच. सर्व संदर्भांसह काम करणे म्हणजेच स-अवधान काम करणे. स-अवधान काम करणारा जिथे आपले लक्ष केंद्रित करेल, हातातल्या कृतीपासून देशाच्या परिस्थितीपर्यंत जे आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये आणेल त्यावरच त्याचे लक्ष एकाग्र हेोईल. रिस्पॉन्सिबल तेो, जो कामाच्या बाबतीत आपली अवधानशक्ती आणि एकाग्रता वाढवतो. या क्षमतांनाच कार्यकर्त्यांची दक्षता म्हणायची. अशी व्यक्ती आपले निर्णय, कृती आणि तिचे परिणाम यांना आपण जबाबदार आहोत असं मानते. मनुष्य सामाजिक परिवेषात राहतो, त्यामुळे आपल्या निर्णयांचे आणि कृतींचे परिणाम आपल्या समाजावर, आपल्या भोवतालच्या माणसांवर होतील याची जाणीव त्याला असते. कृतींचे निर्णय आणि प्रत्यक्ष कृती यांमुळे स्वकल्पना प्रगल्भ होत जाते. जीवनातले प्राधान्यक्रम स्पष्ट होतात आणि त्यानुसार कृती होते. आपल्या कुटुंबातील आणि सामाजिक परिवारातील व्यक्तींना आपण उत्तरदायी आहोत याची जाणीव त्याला असते. एखादी महत्त्वाची जबाबदारी, उपक्रम, कार्य, प्रकल्प हे करत असताना कुटुंबापासून देशापर्यंत विविध स्तरांवर उत्तरदायित्व वाढत जाते.
दक्षता हा स्थायी भाव बनणे
प्रबोधिनीत चार प्रतिज्ञांच्या माध्यमातून व्यक्ती कार्याच्या गाभ्यात क्रमशः प्रवेश करते. प्रथम प्रतिज्ञेने एखादी व्यक्ती प्रबोधिनीच्या ध्येयविचाराच्या निकट येते. दुसऱ्या प्रतिज्ञेने ती प्रबोधिनीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेत असल्याने उत्तरदायी कार्यकर्ता होते. तिसऱ्या प्रतिज्ञेने काही काळासाठी ती ‘ज्ञान प्रबोधिनीविना अन्य काही नाही’ अशा पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या मनःस्थितीत येते. ही कालबद्धता काहींच्या बाबतीत हळूहळू गळून पडते. ही चतुर्थ प्रतिज्ञेची एक प्रकारे सिद्धताच असते. फळाला हळूहळू पक्वता यावी तसे संपूर्ण जीवन प्रबोधिनीमय होते. मग ‘उत्तदायित्व किंवा दक्षता’ ही सुद्धा स्वतःला आठवण करून देण्याची गोष्ट राहात नाही. ती सहजवृत्ती होते. एखाद्या परिस्थितीच्या अनुकूल-प्रतिकूल बाजूंचे मूल्यमापन करण्याची शक्ती येते.
परिस्थितीतील आव्हानांना सामोरे जाणे म्हणजे प्रतिसादी असणे हा पहिला गुण असेल, तर त्या परिस्थितीतील घटक व्यक्तींना आपल्या कृतीची वेळोवेळी माहिती देणे व त्यांच्या प्रतिसादानुसार स्वतःच्या वर्तनात आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता दाखवणे म्हणजे उत्तरदायी असणे. म्हणून हा दुसरा गुणही अत्यंत महत्त्वाचा आहे. अशी दक्षता ही ज्याची सहजवृत्ती होईल, तो कार्यकर्ता मग इतरांनी वेड्यावाकड्या टाकलेल्या चपला सहजतेने व्यवस्थित ठेवील आणि तितक्याच सहजतेने ज्ञान प्रबोधिनी ही दोन सहस्र वर्षे जयिष्णू राहाणारी संघटना कशी होईल या संबंधीचे चिंतन आणि त्याबाबत लगेच सुचलेली कृती देखील तो करील.