“सध्याचे जग ’उपयुक्ततावादी’ झाले आहे. व्यक्तीव्यक्तींमधील स्नेहसंबंध यांनाही उपयुक्ततेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीची, समूहाची अथवा एकंदरीत परिस्थितीची गरज आपणहून लक्षात घेतली जात नाही. त्या दृष्टीने कृतीही होत नाही. स्वतःचे महत्त्व वाढविण्याचा सतत प्रयत्न न करता, इतरांसाठी स्वतःची कार्यशक्ती खर्च करण्याची वृत्ती अंगी बाणवणे, म्हणजे कार्यकर्ता होणे... ”
कार्यकर्त्याचा पहिला गुण
‘प्रतिसादी (रिस्पॉन्सिव्ह) असणे’
प्रतिसाद देतो तो ‘माणूस’
काही देशांमध्ये अनोळखी माणसे सुद्धा सहज ‘सुप्रभात’ किंवा तत्सम प्रकारे साद-प्रतिसाद देतात. समोरच्या व्यक्तीला नुसते ‘माणूस’ म्हणून ओळखणे किंवा तिची दखल घेणे तिकडे मोलाचे मानले जाते. सभोवतालच्या व्यक्ती, त्यांच्या भावभावना, विचार, कृती यांना उचित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याने माणसे जोडली जातात. गुणग्रहणाने जोडली जातात. अडचणीत तत्पर साहाय्य केल्याने जोडली जातात. अशा सहज केल्या जाणाऱ्या गोष्टींनी संघटन करण्यास अनुकूल वातावरण तयार होत असते. आई आणि मूल एकमेकांना साद-प्रतिसाद देत असतात. प्रारंभी तो उत्स्फूर्त असतो. त्यात मागणी, हिशेब इत्यादी नसतं. लहान मुलाला फक्त हसण्याची आणि रडण्याचीच भाषा वापरता येते. दुसऱ्या टप्प्याला भाषेच्या विकासामुळे या साद-प्रतिसादात बदल होतो. मुलाची स्वत्व कल्पना विकसित होते आणि स्थिर होते. इतर व्यक्ती आणि समूह यांच्या संबंधातून ते मूल नवीन संकल्पना शिकतं. आज्ञा, सूचना, देहबोलीतून केलेल्या सूचना, परिस्थितीचं गांभीर्य, त्वरित प्रतिसादाची आवश्यकता हे विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्यक्तीला कळू शकतं. त्यानुसार प्रतिसाद लवचिक होतो. प्रतिसाद व्यक्तींना दिला जातो आणि परिस्थितीलाही दिला जातो.
परिस्थितीचा अभ्यास आणि चिंतन करताना त्यातील प्रश्नांवर काही अभिनव उत्तरे सुचतात. महाराष्ट्रात विधवांच्या केशवपनाच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या ज्योतिबा-सावित्रीबाईंनी ते केशवपन करणाऱ्या नाभिकांनाच असहकार करण्याचे आवाहन केले! ते परिणामकारक ठरले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुक्त श्वास सर्वांनी घेतला. तुरुंगवास भोगलेले खाजगी जीवनाकडे वळले. पण काहींना स्वातंत्र्यानंतरची आव्हाने-प्रश्न जाणवू लागले. महात्माजींना पत्रकार शार्लटन ब्रॉशबर्न यांनी यासंबंधात प्रश्न विचारला तेव्हा, त्यांना वाटलेले आव्हान त्यांनी सांगितले- ‘चारित्र्य घडवणारे शिक्षण!’ पुण्यात वा. आप्पा पेंडसे यांनाही तेच आव्हान जाणवले होते. त्यांचा प्रतिसाद म्हणजे ‘ज्ञान प्रबोधिनी!’
प्रतिसाद देण्यातील अडचणी
आपली क्षमता, अनुभव, ज्ञान अपुरे आहे अशी कमीपणाची भावना मनात असेल, तर आपल्या वरिष्ठांना किंवा ज्येष्ठ सदस्यांना संकोचामुळे प्रतिसाद दिला जात नाही. मी प्रतिसाद दिलेला चालेल का? माझा प्रतिसाद आवश्यक आहे का? माझ्या प्रतिसादाचा उपयोग होणार आहे का? अशा शंका मनातल्या कमीपणाच्या भावनेमुळे मनात येतात, आणि त्यामुळे प्रतिसाद देण्याची टाळाटाळ होते. अशा संकोची लोकांकडून प्रतिसाद हवा असेल तर गटाच्या प्रमुखांनी कामाचे आवाहन करण्याची व प्रतिसाद देऊ इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते. अशांना उत्कट साद घालता आली तर अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते.
बऱ्याच वेळा प्रतिसाद देण्याची इच्छा असते. पण तो किती तत्परतेने हवा आहे व तो कोणत्या स्वरूपात हवा आहे हे न कळल्यामुळे प्रतिसाद दिला जात नाही. गटाच्या प्रमुखाने सदस्यांना कोड्यात न ठेवता कोणत्या स्वरूपाचा प्रतिसाद कधीपर्यंत हवा आहे हे स्पष्ट सांगावे.
प्रत्यक्ष सहभाग किंवा मदतीची गरज आहे, की फक्त सोबतीला बरोबर राहण्याची गरज आहे, की प्रोत्साहनपर पाठिंब्याचे शब्द बोलण्याची गरज आहे, हे अनुभवाने कळू शकते. शक्यतो कृतिरूप प्रतिसादच द्यावा व त्या प्रतिसादाचा कसा व किती उपयोग झाला याचा अंदाज घेत कृतिरूप, उपस्थितीरूप किंवा शाब्दिक प्रतिसाद द्यायचा हे हळूहळू ठरवता येऊ लागते. To be on safer side या म्हणीप्रमाणे प्रतिसादीपणा शिकण्याची सुरुवात कृतिरूप प्रतिसादातून व्हावी. एखाद्याच्या कामाबाबत, लेखाबाबत, भाषणाबाबत, वागण्याबाबत अनुकूल-प्रतिकूल अभिप्राय (feedback) विधायक वृत्तीने देणे हा सुद्धा आवश्यक प्रतिसाद आहे.
दृश्य प्रतिसाद – अदृश्य उत्कटता
तत्पर आणि नेमका प्रतिसाद देता येणे ही इतरांना ओळखू येण्याची खूण आहे. कार्यकर्त्याने स्वत:चे आत्मपरीक्षण करायचे असेल, तर आपली उत्कटता किती हे बघायला पाहिजे. उत्कटता म्हणजेच अत्यंत मन:पूर्वकता. उत्कटता दोन प्रकारे साधली पाहिजे असे वाटते.
प्रतिसाद देताना उतावीळपणा व उत्कटता याची गल्लत होत नाही ना याची काळजी घ्यायला हवी. उत्तम प्रतिसाद देता येण्यासाठी उत्कटता, म्हणजे मनापासून भरभरून प्रतिसाद देण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. शाब्दिक प्रतिसाद अनेक वेळा उत्कट असू शकतो. कृतिरूप प्रतिसाद बऱ्याच वेळा उतावळेपणाचा असू शकतो. पण परिस्थितीचा संदर्भ सोडून, उद्दिष्टाचे भान न ठेवता, मनात येईल तो प्रतिसाद देणे अशा उतावीळपणावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. Reactive असू नये, पण Responsive असावे असे व्यावहारिक भाषेत म्हणता येईल. उत्कट प्रतिसादसुद्धा मनात दहा आकडे मोजून द्यावा, नाही तर तो उतावीळपणा किंवा वरवरचा प्रतिसाद ठरू शकतो.
प्रतिसाद उत्कट असेल तरी अभ्यासपूर्ण तसाच तो भावपूर्ण असायला हवा. केवळ औपचारिक नसावा. तात्कालिक प्रतिसाद आवाहनकर्त्याचा उत्साह वाढवितो. पण अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवाहनकर्त्याचे बळ वाढवितो, उत्साह शुद्ध करतो. आवाहनकर्त्याचे आवाहन तात्कालिक आणि अपुऱ्या विचाराचे असेल तर प्रतिसाद धीम्या गतीने देणे गरजेचे असते. आवाहनकर्ता स्वार्थाने, दुर्बुद्धीने, विघातकवृत्तीने किंवा अपुऱ्या विचाराने आवाहन करीत असेल तर प्रतिसाद न देणे सुद्धा काही वेळा जाणतेपणाचे ठरेल.
कृतिरूप प्रतिसाद
कुणी हाक मारली की ‘ओ’ देणे, आवाहन केले की प्रतिसाद देणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे असे वाटते. कुटुंबातील किंवा कामाच्या ठिकाणच्या ज्येष्ठांनी सूचना केली तरी ती आज्ञेसारखी मानणे, इच्छा व्यक्त केली तरी तो आदेश आहे असे मानणे, म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे, हे अनेकांनी ऐकले असेल. देशांतर्गत असंतोष, नैसर्गिक आपत्ती, परचक्र, संभाव्य आणीबाणीची परिस्थिती यामध्ये हातातले काम सोडून वेगळे काही करायला पाहिजे हे कळणे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह असणे असेही बऱ्याच जणांनी ऐकले असेल. काही वेळा परिस्थिती आणि प्रश्न यांच्याबाबतची संवेदना आणि कृती महत्त्वाची ठरते. ध्वज वर चढवला जाताना अडकला आणि कुणा युवकाने तत्परतेने खांबावर चढून तो सोडवला हा उत्स्फूर्त-तत्पर प्रतिसाद आहे. कोयनेच्या भूकंपाचे वृत्त कळताच महत्त्वाची सभा रहित करून आपत्ती निवारणाला धावणे हा उत्स्फूर्त, तत्पर, उचित प्रतिसाद होता. आंध्र वादळानंतर कोणी सुचवलेले नसताना प्रबोधिनीच्या युवकांनी तिथे जायचे ठरवणे, हा प्रतिसादी वृत्तीचा संस्कार आहे
नवनिर्मिती आणि पूरक कृती
प्रतिसाद काही वेळा परिस्थिती बदलण्याच्या तळमळीतून येतो. वंचित, दुःखितांच्या करुणेतून येतो. प्रश्न सोडवण्याचे आव्हान पुरुषार्थाला भिडले म्हणून येतो. सीमावत प्रदेशांमध्ये संघटन करण्याचे आव्हान विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांना भिडले. त्यांनी सीमावत मुलांच्या शिक्षणासाठी काही रचना उभी केली. ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी ‘ज्ञानसेतू’च्या माध्यमातून नवी रचना उभी केली. ती अन्य संघटनेची आधीची रचना मजबूत, प्रभावी होण्यासाठी उपयोगी पडत आहे. प्रतिसाद हा स्वतंत्र कृतीच्या स्वरूपात असतो, तसा अस्तित्वात असलेली रचना अधिक परिणामकारक होण्यासाठीही प्रकट होतो.
स्वामी विवेकानंदांनी परिस्थितीचे भेदक वर्णन आपल्या अन्यदेशीय आणि एतद्देशीय चाहत्यांपुढे, शिष्यांपुढे पत्रांमधून केले आहे आणि ‘माझिया सांगाती, वदा कोण येती?’ असे आवाहनही केले आहे. निवेदिता, जोसेफाईन मॅक्लिऑड, भगिनी ख्रिस्ताईन अशी प्रतिसादी व्यक्तींची कितीतरी गौरवशाली उदाहरणे आहेत. बुकर टी. वॉशिंग्टन यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना पत्रातून केलेले आवाहन आठवावे. ‘मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही… अमुक नाही.. तमुक नाही..’ पण टेक्सासमध्ये पिढ्यानपिढ्या शिक्षणाला वंचित असलेल्या अमेरिकेतील कृष्णवणयांना शिक्षण देण्याच्या कार्यात सहभागी होण्याचे ते उत्कट आवाहन होते. त्याला जॉर्ज कार्व्हर यांचा प्रतिसाद होता, ‘मी येत आहे..’. शब्द थोडे आणि कृती समर्पक, परिपूर्ण. ही खऱ्या प्रतिसादी वृत्तीची ओळख आहे.
स्थळ-काळ-प्रसंगानुसार बदलणे हाही प्रतिसाद
कितीही अवघड गोष्ट नियोजनानुसार-नियमानुसार चालू असेल तर त्यातून पुन्हा-पुन्हा नवीन शिकणे होत नाही. नियोजनानुसार काम करायला दक्षता लागते, तर नियोजन करायला व नियोजन बाजूला सारायला उत्कटता लागते. नवीन संधी समोर आली व त्यामुळे नवीन मार्ग दिसला किंवा नवीन अडचण समोर आली व त्यामुळे नवीन मार्ग शोधावा लागला, तर त्याला ध्येयसिद्धीसाठी परिस्थितीला प्रतिसाद देणे म्हणतात. उत्कटता असेल तर प्रतिसाद द्यावासा वाटेल. कार्र्यकर्त्याचा पिंड कोणावर विश्वास टाकायचा असेल तर ज्येेष्ठांच्या इच्छेलाही प्रतिसाद दिला जातो. स्वत:च सर्व ठरवायचा पिंड असेल तर परिस्थितीला प्रतिसाद दिला जातो. ध्येेयाबाबत दृढता आणि ध्येयसिद्धीच्या मार्गाबाबत लवचिकता व तत्परता या दोन्हीतून उत्कटता व्यक्त होते.
संघटनेतील प्रतिसादी वृत्ती
काहींना प्रतिसाद देणे का जमत नाही? वृत्ती आत्मकेंद्रित असली तर भोवतालच्या परिस्थितीची जाण येणे कठिण असते. स्वार्थपरायण व्यक्ती स्वार्थाच्या तटबंदीपलीकडे उडी घेऊ शकत नाही. परंतु खऱ्या शिक्षणाने आत्मकेंद्रितता, स्वार्थपरायणता यांच्यापलीकडे जाता येते. प्राप्त परिस्थितीतील आपली भूमिका, संघटनेतील आपली भूमिका यांचे भान येते. आपल्या सहकाऱ्यांची सुखदुःखे, आकांक्षा, प्रेरणा समजून घेणे, त्यांचे तणाव सहृदयतेने, युक्तीने दूर करणे, यशाचे योग्य कौतुक, अपयशाबाबत आणि चुकांबाबत संयमित, वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया देणे, प्रेरणा वाढेल असे उपक्रम, कार्यक्रम योजणे, हा सर्व संघटनेतील प्रतिसाद आहे. परिस्थितीची एखादी तीव्र निकड ध्यानात येणं आणि ती पूर्ण करणं हे आपलं जीवित ध्येय आहे असं वाटणं हा सर्वाधिक प्रगल्भ प्रतिसाद आहे.
ध्येय निश्चिती हाच प्रतिसाद
प्रत्येकाच्या मनात एक मध्यवत कल्पना, मध्यवत विचार किंवा मध्यवत सूत्र पाहिजे. बाकी सर्व कल्पना किंवा विचार त्याच्याभोवती रचना केलेले पाहिजेत. कार्र्यकर्त्यांच्या दृष्टीने हा मध्यवत विचार म्हणजे कामाचे अंतिम ध्येय. ही ध्येयनिश्चिती झाली म्हणजे त्याला घट्ट पकडून ठेवणे हा एकदाच आणि कायमसाठी दिलेला प्रतिसाद. असा प्रतिसाद देणारे अतिशय उत्कटच आहेत. कितीही मोठ्या अडचणी आल्या किंवा कितीही मोहात पाडणारी आकर्षणे समोर आली, तरी ‘सोडू कधी न पथ हा’ म्हणणे हा उत्कटतेचा एक आविष्कार.
मध्यवत विचाराच्या भोवती इतर सर्व विचारांची रचना करणे, त्यासाठी नवीन विचार शोधणे, हे पण जमले पाहिजे. विचारांची व अनुभवांची विविधता, व्यापकता व समृद्धता असेल तरच अशी रचना करणे जमेल. अशी रचना जमली तर नवीन परिस्थिती स्वीकारणे व त्या परिस्थितीतही गरज असल्यास नवीन प्रकारे काम करणे जमेल.