निरूपण –
प्रबोधिनीतल्या विद्यार्थ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भावनिक व प्रेरणात्मक विकासासाठी त्यांच्यामध्ये responsive, responsible, co-operative, creative आणि regenerative हे गुण विकसित झाले पाहिजेत असे कै. आप्पांनी म्हटले होते. ‘कार्यकर्ते बनूया’ या पुस्तिकेत या गुणांचे मराठी भाषांतर अनुक्रमे प्रतिसादी, उत्तरदायी, सहयोगी, नवनिर्मितीक्षम आणि प्रेरणासंक्रामक असे केले आहे. प्रेरणासंक्रामक म्हणजे इतरांमध्ये स्वतःच्या प्रेरणेचे संक्रमण करणारा. प्रेरणेचे संक्रमण म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे प्रेरणेचे हृदयांतर करणे. स्वतःच्या हृदयातील प्रेरणा दुसऱ्याच्या हृदयात सुद्धा जागी करणे. आजचे पद्य प्रेरणासंक्रामकाने काय काय केले पाहिजे हे सांगणारे आहे.
अविरत श्रमणे हेच जिणे,
स्वप्नीही ध्येयपुनीत मने ॥धृ.॥
जे सतत ध्येयाचे चिंतन करतात, त्यांच्या मनातील इतर सर्व विचार बाजूला सारले जातात. जणू त्यांची मने ध्येयचिंतनाने पुनीत म्हणजे धुऊन निघालेली असतात. त्यांना झोपेतही ध्येयसाधनेचीच स्वप्ने पडतात. मग जागेपणीचे त्यांचे जगणे तर ध्येयसिद्धीसाठी विश्रांती न घेता सतत काम, काम, काम असेच असते.
ईश्वरे अर्पिली अमोल काया,
विमुक्त व्हाया मन जिंकाया
गतवैभव अपुले मिळवाया,
जागणे जना जागविणे ॥१॥
आपल्याला ईश्वराने आपले शरीर दिले आहे. ते अतिशय मौल्यवान आहे. त्याचा उपयोग शरीर सतत कामात जुंपून आपल्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी, देशाला पुन्हा वैभवसंपन्न करण्यासाठी आणि आपण शरीर नसून आत्मा आहोत हे ओळखण्यासाठी, म्हणजे मुक्त होण्यासाठी करायचा आहे. हे जाणून घेऊन स्वतः आपल्या कर्तव्याच्या बाबतीत जागे व्हा आणि इतरांनाही जागे करा.
दुर्बलतेचा घाव जिव्हारी,
शल्य तयाचे खुपे अंतरी
कृतिने कोरुनिया हेतु उरी
वागणे स्वये वागविणे ॥२॥
आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपले शरीर पुरेसे बलवान नाही, आपल्या मनावर आपले पुरेसे नियंत्रण नाही हे लक्षात आले, की शरीर-मनाच्या दुबळेपणाची ती जाणीव सलत राहते. इच्छा असून कामात कमी पडतो आहोत, या जाणिवेने जणू मर्मावरच आघात केला आहे असे वाटते. अशा वेळी असेल त्या शक्तीनिशी काम करत, आपले कर्तव्य पूर्ण करायचेच आहे, हे मनावर बिंबवायचे आहे. काम करत करतच शरीरात त्यासाठी आणखी बळ येणार आहे, हे लक्षात ठेवून स्वतः तसे वागायचे आहे आणि इतरांना तसे वागायला प्रोत्साहन द्यायचे आहे.
सदोदित मुखी अमृतवाणी,
घे स्वजनांचे मन जिंकोनी
मृत ईर्ष्या फुलवी वचनांनी,
बोलणे स्वये बोलविणे ॥३॥
इतरांना आपल्यासारखे कर्तव्याच्या बाबतीत जागे करायचे असेल, त्यांना आपल्यासारखे अविरत श्रम करायला प्रोत्साहन द्यायचे असेल, याबाबतीत त्यांनी आपले ऐकायचे असेल, तर त्यांची मने जिंकली पाहिजेत. त्या साठी ते स्वजन, म्हणजे आपुलकीच्या नात्याने आपल्याशी जोडलेले आहेत, असे आपल्याला व त्यांनाही वाटले पाहिजे. या साठी विझलेल्या कर्तव्यभावनेला संजीवनी मिळून ती जिवंत होईल, सतत प्रेरणा मिळेल, अशा प्रकारचे हृद्य बोलणे सर्वांशी केले पाहिजे. आपण असे बोलायचे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांनाही तसे बोलायला शिकवले पाहिजे.
कर्णपथावर येतिल वार्ता,
सुगम याहुनी सहस्र वाटा
निर्धारे पुढती नच ढळता,
चालणे दुजा चालविणे ॥४॥
आपल्याला आपली शक्ती कशात आहे हे माहीत असते आणि आपल्यातील उणिवा ही लक्षात येत असतात. उणिवांवरच कुढत राहिलो तर आपल्या मार्गातील अवघडपणाच मनात ठसत राहतो. अशा वेळी इतर मार्ग जास्त सोपे आहेत असे वाटायला लागते. अनेक जण कामाच्या पर्यायी पद्धती सांगतात. त्या ऐकल्यावर आपली पद्धत सोडून इतर मार्गांनी जावे असा मोह होतो. ते ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे’ जाण्यासारखे आहे. अशा वेळी आपला मार्ग न सोडता, निश्चयाने पुढे चालत राहिले पाहिजे. इतरांनाही धीर देत आणि त्यांच्यामध्ये उत्साह भरत त्यांना आपल्याबरोबर नेले पाहिजे.
कार्यमग्नता फळ चिंतेचे,
असंतोष हे बीज फळाचे
पुरवुनिया जल सहवासाचे,
फुलविणे मळे बहरविणे ॥५॥
ध्येयासाठी अविरत श्रमणे हीच कार्यमग्नता, म्हणजे कामात बुडून जाणे आहे. ध्येयसिद्धीसाठी आणखी काय केले पाहिजे हा विचार म्हणजेच कामाची चिंता करणे. काम होईल की नाही? कसे होईल? असा चिंतेचा नकारात्मक अर्थ इथे अपेक्षित नाही. तर कसे करूया? काय करूया? अशी येथील चिंता होकारात्मक आहे. चालले आहे ते काम पुरेसे नाही, काम पुरेशा वेगाने चालू नाही, याबद्दलच्या असंतोषाने किंवा असमाधानाने, ही चिंता किंवा चिंतन सुरू होते. असंतोष हे बीज, त्यातून चिंता किंवा चिंतन हा अंकुर फुटतो आणि त्यातून कार्यमग्नता हे फळ येते. म्हणून असंतोष हे कार्यमग्नता या फळाचे बीज आहे. असंतोषातून नकारात्मक चिंता उत्पन्न होऊ नये, सकारात्मक चिंतनच निघावे, या साठी ज्यांच्या मनात असंतोष आहे, त्यांना सकारात्मक व विजयेच्छेने विचार करणाऱ्यांची साथसंगत लागते. असा विजयेच्छेने विचार आपण केला, आपल्या सहवासाची संधी इतरांना दिली, तर त्यांच्या असंतोषातून कार्यमग्नता फुलेल. अनेकांनी असा विजयेच्छेने विचार केला तर कार्याचे मळेच्या मळे पिकतील. म्हणजे भरपूर कार्य होईल.
राष्ट्रकारणी सर्व समर्पून ,
वीरव्रताचे करी आवाहन,
स्वार्थाचे सागर उल्लंघुन,
ध्येयदेव नयनी बघणे ॥६॥
कार्यमग्नतेतून अखेर समृद्धी निर्माण व्हायला पाहिजे. या साठी आपले ध्येयच जणू काही आपल्याला वीरव्रत घेण्याचे आवाहन करत आहे. वीरव्रत म्हणजे यश मिळेपर्यंत कितीही वेळा अपयश आले तरी त्या अपयशांवर मात करत राहण्याचे व्रत. हे व्रत केवळ स्वतःच्या समृद्धीसाठी स्वीकारायचे नाही. तसे करणे स्वार्थीपणाचे होईल. ‘राष्ट्रार्थ पराक्रमाची भव्य कृती’ करणे, त्यासाठी अविरत श्रम करून शरीर झिजविणे, अशा वीरव्रताचे आवाहन ध्येयदेव म्हणजे ध्येयाच्या रूपातील देव करत आहे. ‘रूप पालटू देशाचे’ हे ध्येयच सतत आमच्या डोळ्यांसमोर असावे. त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्व पणाला लावायची बुद्धी आम्हाला व्हावी.
ज्याला इतरांना पेटवायचे आहे, त्याने या पद्यामध्ये म्हटल्याप्रमाणे स्वतः कर्तव्याच्या बाबतीत जागे राहिले पाहिजे, कृतीने प्रेरणा जागी राहील असे वागले पाहिजे, इतरांची विझू पाहणारी प्रेरणा पुनरुज्जीवित होईल असे बोलले पाहिजे, ठामपणे ठरवलेल्या मार्गाने चालत राहिले पाहिजे, इतरांना कार्यमग्न करण्यासाठी त्यांच्याबरोबर राहून त्यांच्यापर्यंत सकारात्मक व विजयेच्छू विचार सहवासातून पोचवले पाहिजेत आणि राष्ट्रकार्यासाठी वीरव्रत पालनाचे आवाहन केले पाहिजे. जागणे, वागणे, बोलणे, चालणे, सहवासात राहणे आणि वीरव्रताचे पालन करण्याचे आवाहन करणे, हे सर्व स्वतः करणे व इतरांकडून करवणे म्हणजे प्रेरणासंक्रमण. प्रेरणा संक्रामक बनण्यासाठी हे सर्व करायचा निश्चय केला पाहिजे.
पद्य –
अविरत श्रमणे हेच जिणे,
स्वप्नीही ध्येयपुनीत मने ॥धृ.॥
ईश्वरे अर्पिली अमोल काया,
विमुक्त व्हाया मन जिंकाया
गतवैभव अपुले मिळवाया,
जागणे जना जागविणे ॥१॥
दुर्बलतेचा घाव जिव्हारी,
शल्य तयाचे खुपे अंतरी
कृतिने कोरुनिया हेतु उरी
वागणे स्वये वागविणे ॥२॥
सदोदित मुखी अमृतवाणी,
घे स्वजनांचे मन जिंकोनी
मृत ईर्ष्या फुलवी वचनांनी,
बोलणे स्वये बोलविणे ॥३॥
कर्णपथावर येतिल वार्ता,
सुगम याहुनी सहस्र वाटा
निर्धारे पुढती नच ढळता,
चालणे दुजा चालविणे ॥४॥
कार्यमग्नता फळ चिंतेचे,
असंतोष हे बीज फळाचे
पुरवुनिया जल सहवासाचे,
फुलविणे मळे बहरविणे ॥५॥
राष्ट्रकारणी सर्व समर्पून,
वीरव्रताचे करी आवाहन,
स्वार्थाचे सागर उल्लंघुन,
ध्येयदेव नयनी बघणे ॥६॥
फारच छान ! हे पद्य खुद्द आप्पांनी आमच्या वर्गावर परिस्थिती ज्ञानाच्या तासाला येऊन शिकवले होते आणि गाऊन घेतले होते, त्याची आठवण झाली.
वीरव्रत समजून घेण्यास अधिक उपयुक्त. फारच छान
प्रत्येक शब्द मोलाचा आहे. कार्यकर्ता कसा असावा याचे स्वानुभूती चे विवरण
पद्य पूर्वी ऐकले- वाचले नव्हते. फक्त “अविरत श्रमणे हेच जिणे” ही ओळ माहीत होती. आज आधी ते वाचले, तेंव्हा रुक्ष वाटले. मग ऐकले. अत्यंत सुंदर व गोड गळ्याने गायले आहे! गायिकेचे अभिनंदन व धन्यवाद! त्यानंतर जेंव्हा मा गिरीशरावांचे निरूपण ऐकले, तेंव्हा सर्व उलगडले, भावले! धन्यवाद गिरीशराव! 🙏🏼😊
खुप छान
Par excellence…as usual…the essence of JPP!
मा. गिरीशरावांचे अतिशय सुबोध आणि मर्मग्राही विवेचन मनाचा खोल ठाव घेते. गायन अर्थवाही..
शेवटचे कडवे विलक्षणच आहे. राष्ट्रकारण आणि अध्यात्म वेगळे नाही; हा मुख्यत: स्वामी विवेकानंद यांनी रुजवलेला स्वर पद्यात सतत निनादतो आहे…
आज या पद्याची नव्याने झालेली भेट फार प्रसन्न करणारी आहे… मनापासून धन्यवाद!
खूपच छान. माझ्यासाठी दुसरं कडव आहे अस वाटलं
अतिशय प्रेरक, मार्गदर्शक अशा विविध पद्यांच्या वाचन, चिंतन आणि सुरेल गायनाने मागील काही आठवडे, रविवार सकाळ सुरू होते…
आजचे पद्य तसेच कार्य प्रेरणा जागवणारे… स्वतः बरोबरच आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी लहान कृतीचे गूज मंत्र सांगणारे. खूप छान.
मनःपूर्वक धन्यवाद
खूपच उत्साहवर्धक व प्रेरणा जागृती नव्याने उजळून टाकणारे पद्य निरूपण ऐकले व छान वाटले