निरूपण –
आजचे पद्य मी संचलन करत असताना सर्व प्रथम म्हटले होते. संचलनाच्या तालावर म्हणता येणाऱ्या पद्यांमध्ये एक विशेष जोर असतो. गटात सर्वांबरोबर एकसारखे चालण्याची कृती करत असताना पद्य म्हणायचे असल्याने त्यात वर्णनपर, स्तुतीपर शब्दच जास्त असतात. समजून घ्यायला फार विचार करावा लागेल अशा कल्पना संचलन गीतामध्ये फारशा नसतात. सिंहगडावर झालेल्या एका अभ्यास शिबिरानंतर सिंहगड पायथा ते आय. ए. टी. संस्थेचे प्रवेशद्वार, असे काही किलोमीटर अंतर संचलन करत जाताना, हे जोषपूर्ण पद्य म्हणत गेल्याने संचलनाचा शीण गेल्याचेही आठवते.
जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है
इसके वास्ते यह तन है, मन है और प्राण है ॥धृ.॥
‘जननी आणि जन्मभूमी या दोन्ही तर स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांच्या पुढे सोन्याची लंका मला आकर्षित करू शकत नाही’. या अर्थाचा संस्कृत श्लोक रामायणामध्ये रामाच्या तोंडी आहे. जननी म्हणजे आई. जन्मभूमी ही तर मोठी आई. या पद्यात त्या श्लोकाच्या धर्तीवर आई आणि मोठी आई असे न म्हणता माझी आणि माझ्या आईचीही आई अशी आमची जन्मभूमी स्वर्गाहून मोठी आहे असे म्हटले आहे. मातृऋण हे सर्वात आधी फेडायचे असते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जन्मदात्या आईला सांगितले की आपल्या जन्मभूमीचे ऋण मी फेडले तर तुझेही ऋण फेडल्यासारखे होईल. स्वातंत्र्यानंतरही आपले शरीर, मन, आणि प्राण प्रथम आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी वापरायचे आहेत असे या धृपदामध्ये सांगितले आहे.
इसके कण कण पर लिखा रामकृष्ण नाम है
हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है
धर्म का यह धाम है, सदा इसे प्रणाम है
स्वतंत्र है यह धरा, स्वतंत्र आसमान है ॥१॥
आमची मातृभूमी आम्हाला स्वर्गाहूनही श्रेष्ठ वाटते. कारण इथे धर्माचे धाम म्हणजे कायमचे निवासस्थान आहे. महाभारतात एक मुंगुसाची गोष्ट आहे. अतिथीला आपले जेवण देऊन स्वतः उपासमारीने मृत्यू पावलेल्या गृहस्थाच्या घरच्या जमिनीवर सांडलेल्या अन्नाच्या कणांमध्ये लोळल्यामुळे त्या मुंगूसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले होते. अतिथीसाठी देहत्याग हे धर्माचे श्रेष्ठ आचरण. तसे आचरण आणखी कुठे होते का हे शोधत ते मुंगूस युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ झाला तिथे आले होते. तिथल्या जमिनीवर लोळून उरलेले अर्धे अंग सोनेरी होते का हे त्याने पाहिले. तिथेही त्याची निराशा झाली. कारण त्या यज्ञात फक्त संपत्तीचे दान झाले होते. कोणी आपणहून दुसऱ्यासाठी प्राणत्याग केला नव्हता. पण आमची मातृभूमी मात्र शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने, म्हणजे स्वातंत्र्यासाठी प्राण देण्याने, धर्मभूमी झाली आहे. त्यांच्या रक्ताच्या सिंचनानेच ही भूमी सुपीक होऊन ‘सस्या’ने म्हणजे धान्याच्या भरघोस पिकाने डवरून, ‘श्याम’ म्हणजे गडद रंगाची झाली आहे. जन्म देणारी भारतमाता अन्न देणारी पण आहे. मुंगुसाच्या सोनेरी रंगापेक्षा जीवन देणाऱ्या अन्नाचा गडद रंग जास्त मौल्यवान आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांच्याही आधी या भूमीवर राम, कृष्ण असे पुरुषोत्तम होऊन गेले आहेत. रामाने आपल्या वनवासातील प्रवासाने भारत उत्तर-दक्षिण जोडला आहे. तर कृष्णाने दुष्ट निर्दालनासाठी केलेल्या प्रवासात भारत पूर्व-पश्चिम जोडला आहे. ते जणू कापडाचे उभे-आडवे धागे आहेत. या उभ्या-आडव्या धाग्यांनी बनलेल्या वस्त्ररूपी देशाचा प्रत्येक बिंदू जणू या दोघांच्या पराक्रमांच्या कथांनीच बनला आहे. हा देश त्यांच्या श्रेष्ठ कर्माने धर्मभूमी बनला आहे. आज आता ही मातृभूमी आणि तिच्यावरील आकाश स्वतंत्र आहे. तिला आम्ही रोज, नव्हे, कायमच नमस्कार करतो.
इसकी आन पर अगर जो बात कोई आ पडे
इसके सामने जो जुल्म के पहाड हो खडे
शत्रु सब जहान हो, विरुद्ध विधि विधान हो
मुकाबला करेंगे जब तक जान में यह जान है ॥२॥
आमच्या स्वतंत्र देशाच्या ‘आन’वर म्हणजे गौरवावर कुठला अपमानस्पद किंवा निंदास्पद डाग पडलेला आम्हाला चालणार नाही. आमच्या देशावर ‘जुल्म के पहाड’ म्हणजे कोणी अत्याचार केलेला आम्हाला चालणार नाही. ‘जहान’ म्हणजे सारे जग शत्रू म्हणून उभे राहिले, किंवा ‘विधि विधान’ म्हणजे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेले भविष्य, किंवा नियती आमच्या देशाच्या प्रतिकूल असली तरी आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही सर्व प्रतिकूलतेचा सामना करू. चाणक्य, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस या साऱ्यांनीच नियतीचा धाक न बाळगता परिस्थिती पालटली. आम्हीही तसेच होऊ. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार होऊ. ‘विरुद्ध विधि विधान हो’ ऐवजी ‘विरुद्ध आसमान हो’ असा एक पाठभेद या पद्यात आहे. पण नियतीची सबब सांगण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यावर उपाय म्हणून विधि विधानाच्या सुद्धा विरुद्ध जाऊ हा पाठच योग्य वाटतो.
इसकी गोद में हजारों गंगा-यमुना झूमती
इसके पर्वतों की चोटियाँ गगन को चूमती
भूमि ये महान है, निराली इसकी शान है
इसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है ॥३॥
इथल्या हजारो नद्या आणि उंच पर्वत शिखरे यामुळे आमच्या मातृभूमीची निसर्गशोभा आकर्षक झाली आहे. पण केवळ तेवढ्याच कारणामुळे आमचा देश महान झालेला नाही. त्याच्या ‘शान’ म्हणजे वैभवाचे कारण निराळेच आहे. आमची मातृभूमी धर्मभूमी आहे हे जगातल्या साऱ्या देशांपेक्षा तिचे वेगळेपण आहे. आमच्या मातृभूमीचा ध्वज फडकताना दिसला की आमची मातृभूमी विश्वविजयी झाल्याची ती खूण समजावी. धर्मभूमी भारत विश्वविजयी झाल्याची जय पताका आम्हाला बघायला मिळावी हीच आमची इच्छा आहे.
पद्य –
जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है
इसके वास्ते यह तन है, मन है और प्राण है ॥धृ.॥
इसके कण कण पर लिखा रामकृष्ण नाम है
हुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम है
धर्म का यह धाम है, सदा इसे प्रणाम है
स्वतंत्र है यह धरा, स्वतंत्र आसमान है ॥१॥
इसकी आन पर अगर जो बात कोई आ पडे
इसके सामने जो जुल्म के पहाड हो खडे
शत्रु सब जहान हो, विरुद्ध विधि विधान हो
मुकाबला करेंगे जब तक जान में यह जान है ॥२॥
इसकी गोद में हजारों गंगा-यमुना झूमती
इसके पर्वतों की चोटियाँ गगन को चूमती
भूमि ये महान है, निराली इसकी शान है
इसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है ॥३॥
प्रेरणा देणारे अत्यंत स्फूर्तिदायी गीत. फार सोप्या शब्दात निरूपण केलं आहे.
सत्कार्याची प्रेरणा देणारे, जीवनाला साध्य देणारे,
जय हिंद!
खूप छान निरूपण. पद्य ही उत्तम गायिले आहे! धन्यवाद! 🙏🏼
खूप आवडलं निरूपण
अतिशय सोप्या शब्दात व यथोचित उदाहरणे देत केलेलं निरूपण नक्कीच प्रेरणादायी आहे. 🙏