निरुपण –
या पद्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या कडव्यात अनुक्रमे मनाच्या व प्राणशक्तीच्या विकासाबद्दल सांगितले आहे, असे आपण मागच्या भागात पाहिले. आता चवथ्या कडव्यात तपाने शुद्ध झालेल्या शरीराचे सार्थक कशात आहे, ते सांगितलेले आहे.
झिजविता झिजविता झिजवावे
झिजुनि जीवनि महायश घ्यावे
तनु झिजो जगती जणू चंदन
मनो बनो विजयी अति पावन ||४||
शरीर या शब्दाचा अर्थच मुळी जे झिजते ते, असा आहे. आपण काही न करता सुद्धा जे झिजणारच आहे, ते चांगल्या कारणासाठी झिजवावे. पहिल्या सगळ्या कडव्यांप्रमाणेच, तीन वेळा झिजवावे म्हटलेले आहे, ते आयुष्यभर शरीर झिजवतच राहावे, यासाठी सांगितले आहे. भारतीय संतांचा आवडता दृष्टांत चंदनाच्या लाकडाचा आहे. चंदनाचे खोड सहाणेवर उगाळले की ते झिजत जाते. परंतु त्या झिजलेल्या चंदनाच्या कणांपासून जे गंध तयार होते ते शीतलता आणि सुगंध दोन्ही देते. तसे आपले शरीर परोपकाराच्या कामात सतत वापरावे म्हणजेच शरीर झिजवावे, आणि त्यातून आपल्या कीर्तीचा सुगंध आपोआप पसरत जावा. प्रसिद्धी करावी न लागता आपली कीर्ती सगळीकडे पसरणे म्हणजेच आपल्या आयुष्यात यशस्वी किंवा विजयी होणे. तप करून जसे आपले शरीर शुद्ध होते, तसे कर्तव्यभावनेने आणि आनंदाने इतरांच्या सेवेत शरीर झिजवण्याने, आपले मन ही अति पावन, म्हणजे अतिशय शुद्ध होते. मन शुद्ध होणे म्हणजेच इतरांशी विनाकारण स्पर्धा, इतरांचे दोष काढत बसणे, फक्त लगेचची उपयुक्तता पाहून निर्णय घेणे, इतरांच्या अस्तित्वाची दखल न घेणे, स्वार्थ आणि अहंकार असे मनातील दोष कमी होत जाणे.
मन, प्राणशक्ती, आणि शरीर यांचा खरा विकास कशात आहे हे सांगितल्यानंतर, आता पुढच्या कडव्यात बुद्धीचा विकास कशात आहे, ते सांगितले आहे.
वितरता वितरता वितरावे
जनमनी विपुल ज्ञान करावे
जन प्रचोदित असे घडवावे
जन सुसंघटनार्थ विणावे ||५||
सृष्टीतील रहस्ये शोधून काढणारी बुद्धी ही विकसित झालेली बुद्धी आहे. परंतु प्रबोधिनी मध्ये आपण बुद्धी कर्ती होणे, म्हणजे परिस्थितीत चांगले बदल करणारी होणे, असा बुद्धीचा विकास झाला पाहिजे असे म्हणतो. प्रबोधिनीच्या उपासनेत ‘अमुच्या बुद्धीला प्रचोदना मिळो’ अशी प्रार्थना आपण करतो. प्रचोदना मिळणे म्हणजे बुद्धीची प्रतिभा आणि प्रेरणा दोन्ही वाढणे. तपाने बुद्धीची प्रतिभा वाढते हे आधीच्या कडव्यात आलेच आहे. या कडव्यात बुद्धीला काय करण्याची प्रेरणा मिळावी, हे सांगितले आहे. आपले ज्ञान इतरांना वाटण्याने कमी न होता वाढतेच. आपलेही वाढते आणि इतरांचे ही वाढते. त्यामुळे ज्ञानाचे वितरण किंवा वाटप अखंड करत राहायचे आहे. त्यातून लोकांमध्ये ही विपुल ज्ञान होईल, म्हणजे ज्ञान वाढत राहील. ज्ञान वाढणे हे बुद्धी विकसित झाल्याचे एक लक्षण आहे. परंतु खरी विकसित बुद्धी ही कर्ती बुद्धी झाली पाहिजे हा प्रबोधिनीचा सिद्धांत आहे. स्वतःमधले आणि लोकांमधले ज्ञान वाढले, याचे सार्थक लोकांमधील प्रेरणा वाढल्याने होणार आहे. लोकांची प्रेरणा वाढल्यावर त्या प्रेरणेच्या बळावर लोकांमध्ये सुसंघटना झाली पाहिजे. एकत्र आलेले म्हणजेच जोडले किंवा विणले गेलेले लोक झुंडशाही किंवा विध्वंसही करू शकतात. सुसंघटनेसाठी परस्परांशी जोडले गेलेले लोक आपले राष्ट्र घडवत असतात. ‘ही हिंदुभू परम श्रेष्ठ पदास न्याया, आम्ही कृती नित करू झिजवोनि काया’, असे आपण प्रार्थनेत म्हणतो. ‘झिजवोनि काया’ शब्दांत शरीर, मन आणि बुद्धी झिजवणे हे सर्वच आले. ज्ञानाचे वितरण करून बुद्धी झिजवयाची आहे, ती आपले राष्ट्र परम श्रेष्ठ पदावर नेण्यासाठी आणि त्याचा मार्ग समाज सुसंघटित करण्यातून जातो.
पुढच्या कडव्यामध्ये सर्व प्रकारच्या संघर्षांना सामोरे जाण्याचा आप्पांचा लढाऊ बाणा व्यक्त होतो.
भरडिता भरडिता भरडावे
अरिजना भुइसपाट करावे
हटविता हटविता हटवावे
तुडविता तुडविता तुडवावे ||६||
भरडणे म्हणजे पीठ करणे किंवा चुरा करणे, जे अखंड आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करणे. अरिजन म्हणजे शत्रू. परक्यांबरोबरचा संघर्ष समजायला सोपा असतो आणि बहुतेकांना तो करणे आवश्यक आहे हे जास्त लवकर समजू शकते. १९७१ साली बांगला देश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने बांगला देशातील पाकिस्तानी सैन्याला कुठे एकत्र येऊच दिले नाही. सगळया तुकड्या वेगळ्या वेगळ्या राहिल्या आणि शेवटी ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताचे युद्धकैदी बनले. पाकिस्तानी सैन्य आपले शत्रू होते. त्यांना भरडून आपण भुईसपाट केले. पाकिस्तानी सैन्य आणि त्या बरोबर पाकिस्तानची पूर्व बंगाल मधील राजवट भुईसपाट झाली म्हणजे पूर्णपणे संपली. काही वेळा शत्रूला आपल्या प्रतिकारक्षमतेची चुणूक दाखवावी लागते. चिनी सैन्याने लडाख मध्ये गलवान नदीच्या खोऱ्यात सैन्य घुसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्यांना नियंत्रण रेषेवर मागे जाणे भाग पाडले. असाच प्रकार भूतानच्या सीमेवर डोकलाम येथे ही झाला होता. दोन्ही ठिकाणी आपण शत्रूला मागे हटवले. संघर्षामध्ये काही वेळा शत्रूला मागे हटवणे पुरेसे असते. अलीकडच्या भारतीय इतिहासात कुरापती सहन केल्या जाणार नाहीत हे दाखवण्यासाठी शत्रूला तुडवून टाकण्याची आपली शक्ती दाखवावी लागली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी उरी येथे हल्ला केला. त्याचे उत्तर म्हणून दहा दिवसांच्या आत भारतीय सैन्याच्या तुकडीने पाकव्याप्त काश्मीर मध्ये जाऊन तिथला दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त करून टाकला. तसेच दहशतवाद्यांनी पुलवामा येथे ४० जवानांचा प्राण घेतल्यावर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा दहा दिवसांच्या आत पाकिस्तानात बालाकोट येथील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र त्यातील ३५० दहशतवाद्यांसह हवाई हल्ला करून नष्ट केले. परकीयांच्या बाबतीतले भरडणे, भुईसपाट करणे, हटवणे, तुडवणे समजू शकते. पण काही वेळा अरिजन हे स्वकीयच असतात. पांडवांनी कौरवांची अकरा अक्षौहिणी सेना भरडून भुईसपाट केली. चंबळच्या खोऱ्यातील अनेक डाकू आणि दंडकारण्यातले नक्षलवादी यांना हटवत हटवत पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवून शरण जायला लावणे हाच पहिला पर्याय वापरला गेला व जातो. तो त्यांनी मानला नाही तर मग त्यांनाही तुडवावे लागते. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे अशा स्वकीयांना, ते समजावून सांगून सरळ होत नाहीत, हे पाहिल्यावर तुडवूनच संपवले. परकीय आणि स्वकीय शत्रू जसे असतात तसे आपल्यातील दुर्गुण हे सुद्धा आपले शत्रूच असतात. आपल्यातील दुर्गुण नाहीसे करण्यासाठी आप्पा चार टप्पे सांगायचे. आधी स्वतःचे निरीक्षण. मग स्वतःचे परीक्षण. स्वतःमधले बरे–वाईट ठरवून त्यातले दुर्गुण दूर करणे. त्यांना हटवणे. अधिक चिवट दुर्गुणांसाठी स्वतःवर टीका करणे. म्हणजे दुर्गुणांना भरडणे. अगदीच नाठाळ दुर्गुणांसाठी नाईलाजाने स्वतःची निंदा आणि स्वतःला शिक्षा म्हणजे दुर्गुणांना तुडवणे. कामातील अडचणीही आपल्या शत्रूच. समस्यापरिहाराच्या साध्या तंत्रांनी त्या दूर झाल्या नाहीत तर जालीम उपाय करावे लागतात आणि तसे करायची तयारी आपण आयुष्यभर ठेवावी लागते हेच या कडव्यात सांगितले आहे.
दुष्ट व्यक्ती किंवा कामातील अडचणी यांच्याशी विविध प्रकारे सतत संघर्ष करावा लागतो. संघर्ष करताना मन, प्राणशक्ती, शरीर आणि बुद्धी ही सर्व एकवटावी लागतात. नवनिर्माण करतानाही ही सर्व तशीच एकवटावी लागतात, हे शेवटच्या कडव्यात सांगतिले आहे.
समकृती समकृती समकार्य
हृदय स्पंदन घडो मन एक
विमल हेतु स्फुरो नवनीत
विमल राष्ट्र घडो अभिजात ||७||
समाज संघटित करणे किंवा राष्ट्र निर्माण करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही. अनेकांनी सम म्हणजे एकसारखी कृती आधी करावी लागते. अशी समकृती करता करता, आपण सगळे एक आहोत अशी भावना सर्वांच्या मनात तयार होऊ लागते. मग सर्वांनी आपण कशासाठी संघटित झालो आहोत हा विचार समजून घ्यावा लागतो. तो विचार म्हणजे कार्य. ते ही सर्वांचे समानच असले पाहिजे. समकार्य, म्हणजेच समान उद्दिष्टासाठी, आपल्याला समान कृती करायची आहे याचा विचार सुरू झाला आणि त्या विचाराबरोबर कृती होत राहिली, म्हणजे जणू सगळ्यांच्या हृदयाचे ठोके एकाच तालात पडू लागतात. असे झाल्यावर सगळ्या समूहाचे एक सामूहिक मन सुध्दा असल्याचे सगळ्यांना जाणवायला लागते. समान कृती, समान कार्य आणि सामूहिक मन तयार होताना सगळ्यांच्या मनाची जणू घुसळण होते. दही घुसळल्यावर त्यातील लोणी जसे वर येते, तसे सगळ्यांच्या मनात आपले समान कार्य का करायचे हा हेतू स्फुरायला लागतो. तो हेतू सर्वांना प्रेरणा द्यायला लागतो. तो जणू काही सगळ्यांच्या मनाच्या घुसळणीतून वेगळे झालेले लोणी म्हणजे नवनीतच आहे.
‘जात’ म्हणजे जन्मलेले. ‘अभि’ म्हणजे जे वंदनीय आहे, ज्याची इच्छा करावी, जे सर्व बाजूंनी सर्व काळ विकसित होत असते, ज्याचा अभ्यास केला पाहिजे, जे सुखदायी आहे, असे वेगवेगळे अर्थ संदर्भानुसार घेता येतात. आमचे राष्ट्र अभिजात घडावे असा हेतू मनात ठेवताना ‘अभिजात’ म्हणजे ‘सर्व बाजूंनी सर्व काळ विकसित होत असलेले’ असे राष्ट्र घडावे असा अर्थ आहे. आपले मन शुद्ध असेल, आपले शरीर शुद्ध असेल, तर आपला हेतूही विमल म्हणजे शुद्धच असणार. आणि तो हेतू अभिजात राष्ट्र घडवण्याचा असावा. आपला सारा व्यक्तिमत्त्व विकास आपला समाज संघटित करून अभिजात राष्ट्र घडवण्यासाठी आहे, हेच या पद्याचे सार आहे असे मला वाटते.
पद्य –
विकसता विकसता विकसावे ।। ध्रु. ।।
झिजविता झिजवता झिजवावे
झिजुनी जीवनि महायश घ्यावे
तनु झिजो जगती जणु चंदन
मन बनो विजयी अतिपावन ।। ४ ।।
वितरता वितरता वितरावे
जनमनी विपुल ज्ञान करावे
जनप्रचोदित असे घडवावे
जन सुसंघटनार्थ विणावे ।। ५ ।।
भरडिता भरडिता भरडावे
अरिजना भुइसपाट करावे
हटविता हटविता हटवावे
तुडविता तुडविता तुडवावे ।। ६ ।।
समकृती समकृती समकार्य
हृदयस्पंदन घडो मन एक
विमल हेतु स्फुरो नवनीत
विमल राष्ट्र घडो अभिजात ।। ७ ।।