‘मी एक आहे, अनेक व्हावे’ अशी प्रेरणा परब्रह्मशक्तीला झाली आणि त्यातून विश्वाचा सारा पसारा निर्माण झाला. हा पसारा निर्माण करणे ही परब्रह्मशक्तीची लीला आहे आणि त्या लीलेतच तिला आनंद वाटतो असे भारतीय अध्यात्मशास्त्र सांगते. आधी प्रेरणा मग पसारा. त्या पसाऱ्यातले आपण एक अतिसूक्ष्म अंश. आपल्या मूळ प्रेरणेचा शोध घ्यायचा असेल तर आधी पसाऱ्याशी तद्रूप झाले पाहिजे. या तद्रूपतेतूनच परब्रह्मशक्तीच्या लीलेचा आनंद आपण किंचित्सा अनुभवू शकतो. तोच चित्तउल्हास. परब्रह्मशक्तीच्या इच्छाशक्तीचा अतिसूक्ष्म अंश म्हणजे मानवी इच्छाशक्ती. चित्तविस्तारामुळे विश्वाच्या पसाऱ्याच्या अधिकाधिक भागाशी तद्रूप होण्यामुळे मानवी म्हणजे आपली इच्छाशक्ती परब्रह्मशक्तीच्या इच्छाशक्तीशी जोडली जाते. त्यातून चित्ताला उल्हास मिळतो परब्रह्मप्रेरणेने झालेल्या पसाऱ्याच्या लीलेचा, आनंदाचा काही अंश मिळतो. लीलेच्या आनंदाकडून लीलेच्या प्रेरणेकडे जाणे हा उपासनेचा पुढचा चौथा टप्पा आहे. चित्तउल्हासानंतर चित्तप्रेरणा येते.
सर्वांत आधी हवी कार्यप्रेरणा
प्रबोधिनीतील उपासनेसंबंधी लिहिताना कै. आप्पांनी म्हटले आहे –“भक्तियुक्त श्रद्धापूर्ण मनाने परमेश्वराशी केलेला संवाद म्हणजे उपासना. हा संवाद आपल्या भाषेत, आपल्या शब्दात करावयाचा. परमेश्वराला काय सांगायचे ? त्याच्या साक्षीने कोणते संकल्प करायचे ? सर्व समाजाला आणि स्वतःला निर्मल, सेवारत, देशप्रीतीने भरलेले आणि कर्तृत्वसंपन्न जीवन प्राप्त होवो, असे मागणे मागायचे, असे संकल्प करायचे”. वरील वाक्यातील जाड ठशातील सेवारत आणि कर्तृत्वसंपन्न जीवन हे शब्द पाहिले की कै. आप्पांना चित्तप्रेरणा म्हणजे सर्वप्रथम कार्यप्रेरणाच अभिप्रेत होती हे कळते.
‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान’ या लेखात कै. आप्पा म्हणतात, “भक्तीचे रहस्य शरणतेत आहे. …………. सामान्य गोष्टीतून शरणता शिकता शिकता श्रेष्ठ प्रकारची कार्यशरणता आणि अंती परब्रह्मशरणता येईल आणि मनामध्ये चित् आणि आनंद यांचा संचय होईल”. इथेही कार्यशरणता या शब्दातून कै. आप्पांना कार्यापुढे इतर सर्व गोष्टी मागे सारण्यायोग्य आहेत अशी कार्यप्रेरणाच अभिप्रेत आहे हे समजते.
त्याच लेखात पुढे कै. आप्पांनी असे लिहिले आहे की, “ज्ञानमार्गी लोकांना परब्रह्मशक्तीची अनुभूती आलेली असते का ? ……. साक्षात्कार झाले, कुंडलिनी जागृत झाली, पण आपल्या दैनंदिन व्यवहारात, आचरणात जर फरक पडला नाही, तर परब्रह्मशक्तीची आपल्याला अनुभूती आली अथवा तिचे स्वतःमध्ये अवतरण झाले असे कशासाठी समजायचे? अप्रतिहत प्रेरणेचा झरा जर आपल्यात सापडला तर म्हणता येईल की, इथे काही विशेष घडलेले आहे. आपल्या भोवतालच्या माणसांशी होणारे आपले वागणे बदलले आहे, दैनंदिन कार्यात आपण सर्वथैव यशस्वी होत आहोत, ……. ही सगळी परब्रह्मशक्तीच्या अवतरणाची शुभचिह्ने आहेत असे समजले पाहिजे.” इथेही इतरांशी वागणे, दैनंदिन कार्य यासाठी अप्रतिहत म्हणजे अखंड प्रेरणा म्हणजे अव्याहत कार्यप्रेरणाच अभिप्रेत असल्याचे कळते.
भक्तीमार्गातून आणि ज्ञानमार्गातूनही कै. आप्पांना कार्यप्रेरणा हवी, अर्थातच कर्ममार्गातूनही त्यांना कार्यप्रेरणाच वाढायला हवी आहे. ते म्हणतात, “मला मानव समाजात राहूनच भक्ती केली पाहिजे, ज्ञान संपादन केले पाहिजे आणि मानवसमाजासाठीच काम केले पाहिजे. …… बुद्धिशक्तीच्या विकासाचा उपयोगही समाजहितार्थ झाला पाहिजे. परस्परांच्या साहाय्याने पराक्रम करतील, परस्परांशी सौहार्दाने वागतील अशी उत्तुंग जाणीव असलेली ध्येय–प्रवण माणसे असलेला समाज हा देवमानवांचा समाज होय.” समाजहितासाठी पराक्रम करण्याचा विचार म्हणजे कार्यप्रेरणेचाच विचार इथे पुन्हा एकदा व्यक्त झाला आहे.
या लेखाचा समारोप करताना कै. आप्पा म्हणतात, “ज्ञान प्रबोधिनीला जे काही यश मिळाले आहे, त्याला येथे चालणारी दैनंदिन उपासना, परब्रह्मशक्तीला केले जाणारे आवाहन, त्यातून मिळणारी कार्यप्रेरणा या गोष्टी कारणीभूत आहेत .. .. …. मनःशक्ती, जाणीव यांचा दैनंदिन उपासनेद्वारा, साधनापूर्वक विकास करणे आणि त्यांचा उपयोग “आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च” करणे हे आजच्या युगाचे अद्वैत तत्त्वज्ञान आहे.” इथेही उपासनेतून आधी कार्यप्रेरणा मिळवायची आहे हे स्पष्ट होते.
‘शिक्षणात उपासनेचे स्थान’ या आणखी एका लेखात कै. आप्पांनी लिहिले आहे, “माणूस बदलणे, विकसणे, नवनवीन सामर्थ्यांनी समृद्ध होणे, त्या सामर्थ्याचा समाजघडणीसाठी विनियोग करण्याची प्रेरणा त्याच्या मनात निर्माण होणे, हा शिक्षणाचा हेतू आहे आणि उपासनेचाही तो अपेक्षित परिणाम आहे.” कार्यप्रेरणा निर्माण होणे हा उपासनेचा परिणाम व्हावा असे या ठिकाणीही म्हटले आहे.
चित्तशुद्धी, चित्तउल्हास आणि चित्तप्रेरणा हे शब्द एका पाठोपाठ एक क्रमाने लिहावे किंवा उच्चारावे लागतात. ती लेखणी आणि वाणीची मर्यादा आहे. प्रत्यक्षात मात्र जेवढ्या प्रमाणात चित्तशुद्धी झाली त्या प्रमाणात चित्तउल्हास आणि चित्तप्रेरणाही अनुभवाला येते. त्यांच्यामध्ये कार्यकारणभाव आहे. पहिला टप्पा झाल्याशिवाय दुसरा नाही, दुसरा टप्पा झाल्याशिवाय तिसरा नाही असे आहे. परंतु हे तिन्ही टप्पे एकानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा अशा क्रमाने परंतु सुमारे एकाच वेळी अनुभवाला येतात. फरक असेल तर एवढाच की किमान चित्तशुद्धी झाल्याशिवाय चित्तउल्हास जाणवत नाही आणि किमान चित्तउल्हास झाल्याशिवाय चित्तप्रेरणा जाणिवेच्या कक्षेत येत नाही.
गायत्री मंत्र आणि कार्यप्रेरणेचे अनुभव
शक्ति-मंत्र व शुद्धि-मंत्र (विरजा-मंत्र) म्हणून झाल्यावर प्रबोधिनीप्रणीत उपासनेमध्ये स्वगत-चिंतन किंवा स्वतःशी मौन-संवाद किंवा मौनयुक्त ध्यानासाठी वेळ असतो. स्वगत-चिंतनाच्या पूर्वी हिंदुत्वापासून प्रारंभ करून स्वतःच्या वंशसूत्रांपर्यंत असे व्यापकापासून सूक्ष्मापर्यंत सर्व स्तरांवर शक्तीच्या प्रस्फुरणासाठी प्रार्थना किंवा आवाहन असते. स्वगत-चतनाच्या काळात व्यक्तिगत कवा संघटनात्मक कवा राष्ट्रीय प्रश्नांवर चित्ताची एकाग्रता साधली जाते. त्यानंतर गायत्री मंत्र म्हणण्यासाठी एकाग्र झालेल्या चित्ताची कक्षा व्यापक करत न्यायची असते. पृथ्वीपासून अनंत आकाशगंगांना सामावून घेणाऱ्या परब्रह्मशक्तीपर्यंत चित्त क्रमशः तदाकार करायचे असते. हे जेवढे जमेल तेवढ्या प्रमाणात गायत्री मंत्रातले आवाहन प्रत्यक्षात येते. चित्तामध्ये परब्रह्मप्रेरणेचा अंश प्रथम कार्यप्रेरणा म्हणून उदयाला येतो. ही कार्यप्रेरणा कशी लक्षात येते हे काही उदाहरणांवरून पाहू.
1979-80 या वर्षातले तीन अनुभव आहेत. ऑक्टोबर 1979 मध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या दोनशे शालेय विद्यार्थ्यांचे एक शिबिर शिवापूरला झाले होते. त्या शिबिरासाठी तंबूंची उभारणी करण्याचे काम माझ्याकडे होते. तीन-चार जणांच्या मदतीने ते मी दिवसभरात केले. ते काम मी शिबिराच्या संयोजक गटातील एक म्हणून केले. शिबिर चालू असतानाही तंबूंच्या रचनेबाबतचे बारीक-सारीक प्रश्न मी सोडवत होतो. त्याच वेळी शिबिरार्थींच्या एका पथकाचा मी प्रमुखही होतो. पथकशः स्पर्धेत पथकाचा क्रमांक यावा म्हणून एका बाजूला आखणी आणि त्यानुसार अंमलबजावणी चालू होती. त्याच वेळी इतर पथकांच्या तंबूंचे प्रश्नही मी सोडवत होतो. त्याच शिबिरात मी ‘व्यक्तिविकास आणि कार्यविकास’ परस्परपूरक व एकाच वेळी कसा चालतो यावर व्याख्यानही दिले होते. पथकप्रमुख म्हणून माझा व्यक्तिविकास होत होता आणि शिबिरस्थल व्यवस्थापक म्हणून कार्यविकासातही मी सहभागी होतो. यापूर्वी दोन्ही गोष्टी मला एकत्र कधी जमल्या नव्हत्या. शिबिराआधीचा महिनाभर माझी उपासना बऱ्यापैकी नियमित चालू होती. इतर वेळी शिबिराची आणि भाषणाची तयारी चालू होती. शिबिरसंयोजक, पथकप्रमुख आणि शिबिरातील वक्ता या तीन भूमिका एका वेळी करण्याची शक्ती आणि युक्ती म्हणजेच कार्यप्रेरणा उपासनेमुळे मिळाल्याचा माझा तो पहिला अनुभव होता. या पूर्वी हे जमवण्याचा प्रयत्न केला होता. पण सुरुवातही करता आली नव्हती. अर्थात त्यावेळी उपासनाही नियमित होत नव्हती.
अशी कार्यप्रेरणा मिळणे हा एक योगायोग वाटू शकेल. पण नंतरचे सहा महिने आमचे छोटेसेच पंचवीस जणांचे दल इतके उत्तम रीतीने घेता आले की त्या पुढल्या नवीन वर्षाची दलांची रचना करताना दलावरील पंचवीस जणांपैकी अठरा-वीस जणांना इतर दलांवर गटप्रमुख, मार्गदर्शक, साहाय्यक प्रमुख, प्रमुख म्हणून पाठवण्यात आले. त्या सहा महिन्यांत दर आठवड्याला काही तरी नवीन सुचत होते आणि सुचलेले लगेच दलावरती कार्यवाहीत आणता येत होते. अशी कार्यप्रेरणा माझ्यामध्ये असू शकेल यावर माझा स्वतःचा आणि इतर सहकाऱ्यांचाही विश्वास बसत नव्हता. ही कार्यप्रेरणा उपासनेमुळेच होती. कारण ‘मी विशेष काही करतो आहे’ अशी भावना त्या काळात अजिबात नव्हती. काही सिद्ध करून दाखवायचे आहे असेही नव्हते.
कोणीतरी आवाहन केले, आदेश दिला, आव्हान दिले म्हणून सुरू केलेल्या कामाची प्रेरणा बाहेरून असते. उपासनेमुळे मिळालेली कार्यप्रेरणा आतून असते. पण सुचण्याचे कर्तृत्व स्वतःकडे घेऊन “मला सुचले” असे म्हणता येत नाही. आपले शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी यांच्या कामांचे सुसूत्रीकरण करणारे आतील एक वेगळेच केंद्रच आपल्या शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी यांना प्रेरणा देत असल्याचे आपल्याला जाणवते.
माझे दलाचे प्रयोग चालू असतानाच्या काळातच मी पी. एच्. डी. करायला परदेशात जावे असे आप्पांनी सुचवले. अगदी तटस्थतेने मी परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी आवश्यक परीक्षा दिल्या. त्यात चांगले गुण मिळाले. मला स्वतःला फारशी इच्छा नसल्याने आप्पांनी सांगितलेल्या एकाच विद्यापीठाकडे आवेदन केले होते. त्यांनी प्रवेश दिल्याचा निर्णय कळला तेव्हा माझ्याकडे पासपोर्टही नव्हता. आप्पांनी व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीला जाऊन खटपट करायला सांगितली कारण त्यासाठी आवेदन करायची मुदत उलटून गेली होती. जवळ जवळ सहा आठवडे मी दिल्लीत होतो. स्वतःला परदेशात जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. आप्पांनीही दिल्लीला जाण्याची सूचना करण्यापलिकडे काही म्हटले नाही. परंतु विद्यापीठाशी तारेने संदेश देवाण-घेवाण, दिल्लीत मंत्री-खासदारांच्या भेटी, वैद्यकीय तपासण्या, पासपोर्ट तयार करून घेऊन तो दिल्लीला मागवणे, व्हिसाची मुलाखत हे सर्व काही सतत खटपट केल्यामुळेच पण बिनबोभाट झाले. त्या सहा आठवड्यांतील माझ्या हालचालींमागची प्रेरणा उपासनेशिवाय आणखी काही नव्हती. माझी महत्त्वाकांक्षा नव्हती, आप्पांचाही स्पष्ट आदेश नव्हता. माझ्यासकट सर्व संबंधितांकडून सर्वांच्या आतील समान नियंत्रण केंद्रच काम करून घेत होते.
गोंधळाची परिस्थिती असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, अपयश येत असेल तेव्हा स्थिरपणे काम करत राहण्यासाठी कार्यप्रेरणा लागते. काही प्रेरणा उपजत असते. पण सर्वांचीच प्रेरणा उपासनेने वाढू शकते. कामे सवयीची झाली की प्रेरणा जाणवत नाही. फक्त उत्साहातील चढ-उतार इतरांना जाणवेनासे होतात. कसोटीच्या प्रसंगी कवा नवनिर्मितीच्या वेळी कार्यप्रेरणा जागृत असल्याचे जाणवते. नित्याची कामे सवयीची झाली की ती अमुक एका विशिष्ट ध्येयासाठी करत आहोत याचे भान राहात नाही. ज्यांची ध्येयप्रेरणा जागी असते त्यांना बारीक-सारीक कामे करतानाही ती कोणत्या ध्येयासाठी करत आहोत याची जाणीव असते. माझी ध्येयप्रेरणा अजून तरी विचारातून आलेली आहे. ध्येयाशी विसंगत वागणे होत नाही. पण प्रत्येक कृती ध्येयाशी सुसंगत असल्याची जाणीव मात्र सतत जागी नसते. म्हणून मी म्हणतो की माझी उपासनेतून मिळालेली चित्तप्रेरणा अजून कार्यप्रेरणाच आहे. उपासनेतून ध्येयप्रेरणा मिळते असे ठामपणे सांगणारे मला फक्त कै. आप्पाच भेटले आहेत.
उपासनेद्वारा व्यक्ती म्हणून आलेले कार्यप्रेरणेचे आणखी काही अनुभव सांगतो.
लेखन आणि वक्तृत्व ही काही माझी बलस्थाने नाहीत. पण दोन तरी लेख आणि तीन तरी भाषणे माझ्या स्वतःच्या विचारातून नक्की आलेली नाहीत. लेख लिहिले गेले आणि भाषणे दिली गेली. मी गटकार्याचा काही अभ्यासक्रम तयार करायचा प्रयत्न अभ्यासपूर्वक व विचारपूर्वक केला होता. पण एका प्रशिक्षण वर्गात गटातील परस्परसंबंधांचे गतिशास्त्र (ग्रुप डायनॅमिक्स्) या विषयावर कार्यशाळा घेण्याचा प्रसंग माझ्यावर आला. एका पाठोपाठ एक सत्रांचे विषय व त्या साठीचे सराव-पाठ सुचत गेले. तेव्हा जी कार्यप्रेरणा काम करत होती ती उपासनेतूनच आली होती. आणखी एकदा, आठ ते पंधरा वर्षे संघटनाचेच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘संघटना’ या विषयावर एकट्यालाच चार दिवस हदीतून प्रशिक्षण वर्ग घ्यायचा होता. तेव्हा आतून नियंत्रण करणारी शक्ती आपल्याला बोलायला प्रेरित करते आहे याचा अनुभव घेतला. एखाद्या गटासाठी कवा एखाद्या व्यक्तीसाठी आता पुढचे काम काय सांगायचे हे आधी सुचते, व मग त्या निर्णयामागचा तर्क मी नंतर तयार करतो असे अनेक वेळा होते. असे सुचलेले काम माझा तर्क लंगडा असला, तरी चुकत नाही. हे सुचणे आणि सर्व परिस्थितीत काम करत राहणे ही उपासनेतून मिळणारी कार्यप्रेरणा.
कार्यशरणता, ध्येयशरणता, तत्त्वशरणता आणि परब्रह्मशरणता कवा त्यातून निर्माण होणारी कार्यप्रेरणा, ध्येयप्रेरणा, तत्त्वप्रेरणा आणि परब्रह्मप्रेरणा अशी मालिका कै. आप्पांना अभिप्रेत असावी असे त्यांच्या इतर अनेक लेखांतून व भाषणांतून दिसते. चित्तप्रेरणा म्हणजे कार्यप्रेरणा ते परब्रह्मप्रेरणा ही पूर्ण साखळीच. परंतु वर कार्यप्रेरणा या पहिल्या पायरीचेच संदर्भ दिले आहेत कारण मला अजून तेवढाच अनुभव आला आहे.