प्रबोधिनीची उपासना कशी तयार झाली ?
प्रबोधिनीतील उपासनेची एक विशिष्ट पद्धत आहे. आपण विशिष्टमंत्र विशिष्ट क्रमाने म्हणतो. तेच मंत्र आपण का म्हणतो ? मंत्रांचा तोच क्रम का आहे ? याबद्दल आधी थोडसं समजून घेऊ. त्यानंतर आपल्यामध्ये उपासनेने कोणते बदल झाले पाहिजेत व ते झालेले आपल्याला कसे जाणवू शकतात याबद्दल काही सांगता येईल.
प्रबोधिनीची सगळी उपासना ही कै. आप्पांनी हळूहळू रचत नेलेली आहे. प्रबोधिनीच्या एका जुन्या माहितीपत्रकात प्रबोधिनीत आपण उपासना घेतो ती सात मिनिटे चालते असे म्हटले आहे. पण सध्याची उपासना सतरा मिनिटे चालते. म्हणजे उपासनेत भर पडत गेलेली आहे. सुरुवातीला सात मिनिटे, नंतर आठ मिनिटे आणि नंतर वाढत वाढत आताची सतरा-अठरा मिनिटे अशी भर पडत असतानाची उपासना मी अनुभवलेली आहे. या बाबतीत कै. आप्पांचे स्वतःचे प्रयोग चालायचे. त्या प्रयोगातून त्यांना जे सुचत गेले त्याप्रमाणे प्रबोधिनीची उपासना हळूहळू तयार होत गेली. सामूहिक उपासना केली पाहिजे व त्या उपासनेत ध्यानासाठी, स्वगत चिंतनासाठी थोडा वेळ असला पाहिजे, मौन असले पाहिजे ही कल्पना म. गांधीजींच्या आश्रमामध्ये जी सामूहिक प्रार्थना व्हायची त्यावरून घेतलेली आहे. तिथे सकाळची प्रार्थना मर्यादित संख्येची म्हणजे आश्रमवासियांसाठी तर सायं-प्रार्थना सगळ्यांसाठी असायची. त्यावरून प्रबोधिनीच्या उपासना पद्धतीत सामूहिक उपासना ही असली पाहिजे व त्यात काही मौनाचा भाग असला पाहिजे असे कै. आप्पांनी ठरविले.
आपण जे विरजा मंत्र म्हणतो ते थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये होणाऱ्या उपासनेतून घेतले आहेत. या संस्थेचे नाव कदाचित आपण ऐकले नसेल. त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध नाव म्हणजे जे. कृष्णमूर्ती. थिऑसॉफिकल सोसायटीच्या सुरुवातीच्या धुरीणांपैकी ते एक थोर विचारवंत होते. त्यांनी जवळ-जवळ ५० वर्षे जगभर व्याख्याने देत प्रवास केला. अनेक लोक व्याख्याने ऐकायला येत व त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार आपल्याला जगता येईल का याचा विचार करत. या जे. कृष्णमूर्तींनी 1925 च्या सुमारास चेन्नईमध्ये ‘भारत समाज’ या संस्थेच्या सभासदांसाठी एक सामुदायिक पूजा किंवा उपासनापद्धती बसवली होती. थिऑसॉफिकल सोसायटीच्या चेन्नईप्रमाणे बनारसमध्येही अनेक शाखा आहेत. कै. आप्पांनी ही उपासना प्रथम बनारसला ऐकली व त्यातील विरजा-मंत्र पबोधिनीच्या उपासनेमध्ये आणले. ही भर पुरेशी वाटली नाही म्हणून कै. आप्पांनी स्वतः विचार करून शक्ति-मंत्र रचले व त्यांचा समावेश उपासनेत केला.
हे सगळं करत असताना, अशी भर घालत जायला पाहिजे असं का वाटलं असेल आप्पांना ? आप्पा स्वतःवर अनेक प्रयोग करायचे. त्यांचा होमिओपॅथीचा अभ्यास तर होताच. तसेच ते मानसशास्त्रज्ञही होते. ‘परमेश्वर दिसतो की नाही?’, ‘त्याचा साक्षात्कार होतो की नाही?’, ‘सगळी दुःखे जातात की नाही?’, ‘वरदान मिळतं की नाही?’ अशा सर्वसामान्य सामूहिक प्रश्नांच्या उत्तरांपेक्षा स्वतःला तपासता येतील, जाणवतील व इतरांना दाखवता येतील असे बदल होतात की नाही या बाबतचे प्रयोग त्यांचे सतत चालू असायचे. या प्रयोगांबरोबर चांगल्या सशक्त, निरोगी व्यक्तीशी प्रबोधिनीच्या कामात आणि सामाजिक व राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याच्या कामात त्यांनी सहभागी झाले पाहिजे यासाठी कै. आप्पांचे बोलणे सुरू असायचे. त्यांनी उपासनाही केली पाहिजे असे कै. आप्पा सांगायचे. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, त्यांना होमिओपॅथी औषधांबरोबरच उपासनेचे वेगवेगळे प्रयोग करायला सांगायचे. त्यातून “उपासनेद्वारा व्याधिमुक्ती” हे पुस्तकही आप्पांनी पुढे तयार केले. त्यामध्ये आप्पांचा उपासनेबाबत काय विचार झाला ते सापडते.
उपासनेच्या पायऱ्या – चित्तशुद्धी किंवा चित्तविस्तार
या पुस्तकात त्यांनी उपासनेच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. त्याचं उदाहरण त्यांनी असं दिलंय की आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील, आदरणीय, पूजनीय असे कोणी येणार असतील तर आपण काय करतो ? आपलं घर आधी स्वच्छ करतो. झाडून घेतो. जाळी जळमटं काढून टाकतो. धुऊन पुसून घेतो. त्यानंतर काय करतो ? स्वच्छ केलेल्या घरामध्ये दाराशी रांगोळी घालून, काहीतरी सुशोभन करतो. स्वागताचा फळा लिहून, घरातील वस्तूंची आकर्षक मांडणी करून मग त्या व्यक्तीचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या देहरूपी पंढरीतील विठ्ठलाला – परमेश्वराला – जर आवाहन करायचे असेल तर घराची करतो तशी आपल्या चित्ताची साफसफाई व सजावट केली पाहिजे. चित्ताची साफसफाई करण्यासाठी ज्यांना काही उपचारांची आवश्यकता आहे, अशांसाठी “चित्तशुद्धी” हा शब्द वापरला आहे. फक्त आजाराचाच नाही तर दुःखाचा वा भीतीचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून मनातली भीती काढून टाकण्यासाठी, दुःखे काढून टाकण्यासाठी काय करायचे त्याचे उपाय कै. आप्पांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहेत. पण ज्यांना उपचाराची आवश्यकता नाही, स्वतःच्या घडणीसाठी आणि राष्ट्रघडणीसाठी ज्यांनी उपासनेचा उपयोग करावा अशांसाठी “चित्तविस्तार” हा शब्दप्रयोग आपल्याला करता येईल. चित्तविस्तारासाठी प्रबोधिनीच्या उपासनेत शक्ति-मंत्रांचा समावेश केला आहे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’आणि ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ हे ते दोन शक्ति-मंत्र आहेत.
‘चित्तविस्तार’ हा शब्द कुठून आला ? प्रबोधिनीमधील बहुतेकांनी मातृभूमीपूजनाची पोथी वाचली आहे, ऐकली आहे किंवा अनुभवलेली आहे. त्यात स्वामी विवेकानंदांची वचने आपण घेतली आहेत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘ही चित्तशुद्धी कशी होईल ? प्रथम आवश्यक आहे विराटाची (म्हणजे दृश्य जगाची)पूजा. आपल्या भोवती असणाऱ्या सर्व जीवांची पूजा. त्या विराटाची पूजा करा. पूजा हा शब्दच या ठिकाणी योग्य आहे. दुसरा कोणताही शब्द चालणार नाही. माणसे व पशू हे सर्व आपले देव आहेत आणि ज्यांची आपण सर्वप्रथम पूजा करावी असे देव म्हणजे आपले देशबांधव आहेत.’ (स्वामी विवेकानंद, भारतीय व्याख्याने, रामकृष्ण मठ, नागपूर, १९९१. पृष्ठ २२२) भोवताली पसरलेल्या विराटअशा समाजाला म्हणजेच साक्षात् परमेश्वराला आपण पूजले पाहिजे. विराटाची पूजा करायला पवृत्त होणे म्हणजेच चित्तविस्तार होणे. आपली भारतमाता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे. तिच्या पूजेनेच म्हणजेच विराटाच्या पूजेनेच चित्तशुद्धी होईल.
मी म्हणजे माझा देह असाच विचार आपण नेहमी करत असतो. या देहाचे रक्षण आपल्यालाच करावे लागते, आरोग्य आपल्यालाच राखावे लागते, त्याचे पोषण आपल्यालाच करावे लागते. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात म्हणून मी म्हणजे माझा देह असे आपल्याला वाटत असते. चित्तविस्तार ह्याचा अर्थ ‘मी’ म्हणजे केवळ हा देह नसून हा सगळा समाज म्हणजे ‘मी’ आहे असे स्वतःला पुन्हा पुन्हा बजावायचे, सांगायचे.
मी म्हणजे फक्त माझा देह नाही तर मी म्हणजे सगळा समाज असे पुन्हा पुन्हा स्वतःला बजावत गेलो म्हणजेच चित्तविस्तार केला की फक्त स्वतःसाठी नाही तर सर्व समाजासाठी प्रार्थना करायची असते हे लक्षात येते. असे आपण करायला लागलो की आपल्याला आपल्यातले चांगले काय आहे तेही दिसायला लागते व विसर्जन करण्याजोगे काय आहे तेही दिसायला लागते. ते वेगवेगळे दिसल्यामुळे विसर्जन करणे सोपे होते. त्याच्याशी आपण फार बांधलेले राहात नाही. ते बाहेरून आलेले आहे व ते काढून टाकायला हवे हे आपल्याला कळते.
चित्तउल्हास आणि चित्तप्रेरणा
यापुढची पायरी सांगितली आहे ती म्हणजे ‘चित्तउल्हास’. घरामध्ये आपण सुशोभन करतो व सजावट करतो आणि ते पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते, आनंद वाटतो. तसे आपले चित्त स्वच्छ केल्यानंतर ते चित्त अधिक प्रसन्न, आनंदमय व उल्हसित करायला पाहिजे. त्यासाठी काय करायला हवे ? याबाबत कै. आप्पांचे काही प्रयोग चालू होते. त्यांनी ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ व ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ हे मंत्र रचल्यानंतर एके दिवशी बैठकीच्या वेळी ‘आज बैठकीला कोणताही विषय नाही, आज मी तुम्हाला उपासना सांगतो’ असे म्हणून सुरुवात केली. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो माझिया अंतरात’ या मंत्राचा पाच-पाच वेळा उच्चार करायला सांगितले.
‘परब्रह्मशक्ती स्फुरो माझिया अंतरात’ हा मंत्र ‘उपासनेद्वारा व्याधिमुक्ती’ या पुस्तिकेत आप्पांनी घेतला आहे. उपचार म्हणून त्याची आवश्यकता आहेच. पण नित्याच्या उपासनेतही त्याऐवजी त्याच अर्थाच्या संस्कृतमधील विरजा मंत्रांचा समावेश केला आहे. विरजा-मंत्र हे शुद्धि-मंत्र आहेत. पण त्यांचे धृपद चित्तशुद्धीच्या पुढच्या टप्प्याकडे आपल्याला घेऊन जाते. त्या धृपदाचे मराठी भाषांतर ‘ज्योति असे मी विमल निरागस ईश्वरचरणी समर्पिता’ असे केलेले आहे. मी कुणी पापी नाही. असे पुन्हा पुन्हा स्वतःला स्मरण करून द्यायचे. स्वामी विवेकानंद म्हणायचे ‘तुम्ही अमृताचे पुत्र आहात’. ‘विमल निरागस’ म्हणजे ‘अमृताचे पुत्र’. असा संस्कार स्वतःवर पुन्हा पुन्हा करून घेतल्याने चित्तउल्हास होईल. चित्त प्रसन्न होईल. ही उपासनेची दुसरी पायरी आहे.
यानंतरची पायरी म्हणजे चित्तप्रेरणा. “आमच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो” हा गायत्री मंत्र त्यासाठी आहे. प्रचोदना म्हणजे सुचण्याची शक्ती. सुचणे दोन टप्प्यांवरचे असते. निष्क्रियतेऐवजी काहीतरी करावसे वाटणे आणि चाकोरीतले करण्याऐवजी नवीन काहीतरी करावसे वाटणे. म्हणजेच अनुक्रमे प्रेरणा व प्रतिभा. या दोन्ही वाढू दे असा त्याचा अर्थ. ‘उपासनेद्वारा व्याधिमुक्ती’या पुस्तकात कै. आप्पांनी या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. पण त्याच्या आधीचीही एक पायरी आहे. जसे ‘मी’ म्हणजे हा देह नाही हे कळायला हवे तसे माझ्या देहाशिवाय माझे एक चित्त आहे हेही कळायला हवे. चित्त आहे हे प्रकाशात येणे, उजेडात येणे, आपल्याला चित्त आहे असे कळणे यासाठी ‘चित्तप्रकाशन’ हा शब्द मी वापरतो. म्हणजेच चित्तप्रकाशन, चित्तविस्तार, चित्तउल्हास व चित्तप्रेरणा अशा उपासनेच्या चार पायऱ्या आपल्याला अनुभवता येतील.
सार्थ उपासना करताना आपण उपासनेच्या ज्या पुस्तिकेतून अर्थ वाचतो त्यातल्या प्रस्तावनेत पुढील दोन-तीन ओळी आहेत. उपासना केल्याने काय होत नाही हे त्यामध्ये सांगितले आहे. “ह्या उपासनेने परमेश्वर साक्षात् प्रकट झालेत, त्यांनी आशीर्वाद दिलेत, निमिषमात्रात सर्व दुःखाचे हरण केले, सर्व आपत्ती नाहीशा झाल्या असे अनुभव आले नाहीत.” आपल्या उपासनेने असे काही परिणाम झाल्याचे अजून तरी कोणी सांगितले नाही. त्यामुळे असं काही होतं का? असा जर कुणाचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर “अजून माहीत नाही ” असे द्यावे लागेल. त्याच्याशिवाय उपासनेने आणखी काही होतं का ? आणखी काही परिणाम बघायला मिळतात का ? अशा प्रश्नांना उत्तर म्हणून उपासनेचे जे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवांविषयी पुढे सांगितले आहे.