परिशिष्ट

धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन  माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे दिसते. अशा रोगनाशक गोष्टींची लोकांना ओळख राहावी यासाठी त्या धर्माशी जोडल्या असाव्यात असे वाटते. गणपतीच्या आवडीची म्हणून जी पत्री सांगतात ती सारीच्या सारी औषधी वनस्पतींची आहे हे सिद्ध झालेच आहे. खाली दिलेल्या गोष्टींमध्येही आपणास हे सूत्रच दिसून येईल. जे जे माणसाला सुखदायक – दुःखनिवारक ते ते देवाला देऊ करण्यात येते यात काही संदेह नाही.

) अक्षता  –

       भोक, भोके पडलेले म्हणजेच किडलेले ! कीड  नसलेले ते अक्षत ! अक्षता म्हणजे न मोडलेले अखंड तांदूळ. कुंकू किंवा केशर लावलेले तांदूळ धर्मविधीत वापरले जातात. पूजेमधे एखादे द्रव्य नसेल तर त्याऐवजी उदा.- आसन, अलंकार यासाठी अक्षता वापरल्या जातात. विवाहविधीत वधूवरांवर आशीर्वाद म्हणून अक्षता टाकल्या जातात. औक्षण करताना अक्षता टाकण्यामागेही हाच भाव असतो. पूर्वीपासून धान्य हे संपन्नतेचे प्रतीक समजले जाते. वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा उद्देश अक्षता टाकण्यात असावा. अक्षता या बल, समृद्धी व दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत असे समजले जाते.

) अक्षतारोपण

       वधूवरांनी परस्परांविषयीच्या गृहस्थाश्रमातील अपेक्षा व्यक्त करणे आणि त्या पूर्ण करण्याचे अभिवचन  देणे असा हा विवाहविधीतील एक भाग आहे. यामधे वधूवर यश, संतती, संपत्ती, इ. इच्छा पूर्ण होवोत अशी भावना व्यक्त करतात व ‌‘तथास्तु! ही इच्छा मी पूर्ण करीन‌’ असे अभिवचन, एकमेकांवर अक्षता टाकताना, ते देतात. याला अक्षतारोपण म्हणतात. आजच्या काळात वधूवरांनी आपापल्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा शब्दबद्ध करून त्यांचाही उल्लेख अक्षतारोपण प्रसंगी अवश्य करावा.

) अग्नी /होम – 

       अग्नी ही ऋग्वेदकाळापासून महत्त्वाची देवता मानली गेली आहे. अग्नी आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोचवतो अशी पूर्वी समजूत होती. कोणत्याही धर्मकृत्यात अग्नी प्रज्ज्वलित करणे महत्त्वाचे मानले जाते. उपनयन, विवाह यांसारख्या प्रसंगी जी प्रतिज्ञा केली जाते तीदेखील अग्निसाक्षीने करावी अशी कल्पना असते. अग्नीच्या वर उसळणाऱ्या तेजस्वी  ज्वाळा पाहून मनातही उदात्त विचार आल्यावाचून राहात नाहीत.

     विविध देवतांना उद्देशून अग्नीत मंत्रपूर्वक तूप, समिधा यांसारखे द्रव्य समर्पित करणे  याला होम म्हणतात. याने पर्यावरणशुद्धी होते.

) अभिषेक, प्रोक्षण

       अभिषेक म्हणजे सर्व बाजूंनी सिंचन करणे. देवाला पंचामृताने अथवा शुद्ध जलाने मंत्रपूर्वक स्नान घातले जाते तो अभिषेक होय. विवाहविधीत आशीर्वादपर मंत्र म्हणत वधूवरांवर ज्येष्ठ मंडळी पाण्याने सिंचन करतात त्यालाही अभिषेक म्हणतात. पाणी शिंपडणे म्हणजेच प्रोक्षण करणे होय. अभिषेक /प्रोक्षण प्रसंगी मनानेच आपण शुद्ध होत आहोत असा अनुभव घ्यायचा असतो.  

) अवक्षारण

       ५) अवक्षारण – व्रत संक्रमित करणे. विवाह विधीमधे वधूच्या ओंजळीतील जल खाली वराच्या ओंजळीत सोडले जाते.  १. मुलीचे  दायित्व वडिलांकडून तिच्या पतीकडे दिले जाणे याचे सूचक असे हे अवक्षारण असते. २. अव म्हणजे खाली व क्षारण म्हणजे गाळणे. ३.  गुरूंचे व्रत शिष्याला देतानाही असेच सूचक अवक्षारण केले जाते.

) अश्मारोहण

       ‌‘अश्मन्‌‍‌’ म्हणजे दगड आणि ‌‘आरोहण‌’ म्हणजे चढणे, भरभक्कम अशा दगडी पाट्यावर किंवा सहाणेवर वधूला उभे राहाण्यास सांगून वराने  पुढील मंत्र म्हणणे म्हणजेच अश्मारोहण होय .

              इमम्‌‍ अश्मानम्‌‍ आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव |

            सहस्व पृतनायतः अभितिष्ठ पृतन्यतः ॥   (आश्वलायन गृह्यसूत्र 1.7.7)

       ‌‘या घडीव दगडावर आरूढ हो. तू पाषाणखंडाप्रमाणे स्थिर हो. तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्याच्या छातीवर पाय देऊन उभी राहा व त्याचा पराभव कर.‌’ अशा अर्थाचा मंत्र वर वधूला उद्देशून म्हणतो. स्त्री ही अबला नाही. संसार करताना ज्या काही भल्या बुऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल त्यांना खंबीरपणे तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्यामधे असावे अशी अपेक्षा होती. आजही आपण अशी अपेक्षा ठेवत असू तर हा मंत्र नीट समजावून घेणे आवश्यक वाटते.

) अस्थिसंचय

मरणानंतर शवाची व्यवस्था लावण्यासाठी हिंदू समाजात अग्नी देण्याची पद्धत आहे. अग्निसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी उरलेल्या अस्थी गोळा करणे याला अस्थिसंचय म्हणतात. त्या अस्थी नंतर संगमावर तीर्थक्षेत्री नदीमधे विसर्जित करण्याची पद्धत आहे. यामधे मृत व्यक्तिविषयी आदर, प्रेम व्यक्त होते. तसेच त्या व्यक्तीला मरणोत्तर सद्गती मिळावी ही सदिच्छा व्यक्त होते. 

) आचमन

       धर्मविधीच्या प्रारंभी परमेश्वराचे नामस्मरण करून तीनदा पळीभर पाणी प्राशन  करून चौथ्या वेळी हातावरून पाणी सोडले जाते. या क्रियेला आचमन म्हणतात. ही एक शुद्धिक्रिया आहे. स्वरेंद्रिय, जीभ यांना पळीभर पाण्याने ओलावा यावा, अंतरंग शुद्धीचा अनुभव यावा यासाठी आचमन करतात. परमेश्वराच्या नामोच्चाराने मन पवित्र होते, शुद्ध होते.

देवर्षिपितृमनुष्याणां जलाञ्जलीदानेन तृप्तिसम्पादनम्‌‍ |

       देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजेच तर्पण होय. दैनंदिन संध्येत तर्पण केले जाते.

       आचमन केल्यानंतर उजव्या हाताच्या बोटांवरून समोर पाणी सोडले जाते, तो भाग म्हणजे देवतीर्थ, अंगठा व तर्जनी यांच्यामधील भाग म्हणजे पितृतीर्थ, करंगळीच्या बाजूची हाताची कड म्हणजे ऋषितीर्थ, तर मनगटाच्या बाजूने जल प्राशन केले जाते तो भाग म्हणजे आत्मतीर्थ. असे हाताचे भाग सोयीसाठी केले आहेत.

) आरती –   

       ताम्हनामधे नीरांजने ठेवून त्यांनी देवाला ओवाळणे याला आरती म्हणतात. आरती ओवाळताना देवाची स्तुतिपर पद्ये म्हणण्यात येतात. रामदासादि संतांनी रचलेल्या आरती. अतिशय भावमधुर व भक्तिपूर्ण आहेत. सगुणोपासक भक्तांनी आपल्या मनातील भाव प्रकट करण्याकरता  या रचना केल्या आहेत. आरती, म्हणजे ‌‘नीराजन‌’ असा मूळ, संस्कृत शब्द आपण मराठीत आणताना  ‌‘नीरांजन‌’असा केला आहे.

१०) आसन

        कोणतेही धर्मकार्य करत असताना शक्यतो पद्मासनामध्ये ताठ बसावे. पद्मासनाची सवय होईपर्यंत साधी मांडी घालून बसावे. बसण्यासाठी जो पाट आपण वापरतो तो धर्मशास्त्रात सांगितलेला नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे हरिणाजिन (हरणाचे कातडे), चटई  / सुती वस्त्राची घडी बसण्यासाठी घ्यावी. स्वतंत्र तंत्र ग्रंथामधे पांढरे-काळे कांबळे हे चांगले आसन मानले असून लाल कांबळे हे सर्वोत्तम आसन सांगितले आहे.

११) आहुती/समिधा  –

       समिधा अथवा तूप अग्नीमधे अर्पण करणे या कृतीला आहुती देणे असे म्हणतात.

        वड, पिंपळ,औदुंबर, पळस, खैर,रुई, शमी, आघाडा, बेल, चंदन, सरल (पाईन), सालवृक्ष, देवदार, खदीर अशा औषधी वनस्पतींच्या काड्या अग्नीत अर्पण केल्या जातात  त्यांना समिधा म्हणतात. दूर्वा व दर्भांचाही असा  वापर  कधीकधी केला जातो. या समिधांचे काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्या अग्नीत अर्पण केल्याने पर्यावरण प्रसन्न होते.

१२) आश्रम –   

     ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होत. विद्याभ्यास करणे हे ब्रह्मचर्य आश्रमातील प्रमुख कर्तव्य आहे. शरीरबल, बुद्धिबल, नैतिक बल मिळवणे  ब्रह्मचाऱ्यास अगत्याचे असते. विवाह करून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे, धनार्जन, अपत्यसंगोपन, अतिथिसत्कार ही गृहस्थाश्रमातील कर्तव्ये आहेत. पूर्वी गावाबाहेर एखाद्या निवांत जागी राहून दुरूनच लोकांना मार्गदर्शन करणे, जास्तीत जास्त वेळ आत्मचिंतनात व्यतीत करणे अशी वानप्रस्थाश्रमाची कल्पना होती. आता वनात जाऊन राहणे शक्य नसले तरी सांसारिक जबाबदाऱ्या पुढील पिढीवर सोपवून घरातच अलिप्तपणे, परोपकारी  वृत्तीने राहाणे शक्य आहे. संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग होय. अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ आत्मचिंतनात उर्वरित आयुष्य जगणे म्हणजे संन्यास.

१३) एकोद्दिष्ट  –

केवळ दिवंगत व्यक्तीस उद्देशून केलेले श्राद्ध म्हणजे एकोद्दिष्ट. या श्राद्धात मृत व्यक्तीच्या मागच्या दोन पिढ्यांचा समावेश नसतो. अन्य श्राद्धांमधे तो असतो. 

१४) ओंकार  –

       अ, उ आणि म्‌‍ या तीन वर्णांनी बनलेला ओंकार हा विश्वातील पहिला शब्द. ओंकारातून जगातील सर्व शब्दांचा जन्म झाला असे मानले जाते. अनेक उदात्त, पवित्र व मंगल भाव निर्माण करणारे ओंकार हे एक प्रतीक आहे. ओंकाराभोवती मानवी रूपाची कल्पना केली की गणपती बनतो. म्हणून  तो ओंकारस्वरूप आहे. मुस्लिम धर्मातील आमीन किंवा आमेन हे ‌‘तथास्तु‌’ अशा अर्थाचे शब्द मुस्लीम वापरतात. (पाहा उर्दू मराठी कोश – श्रीपाद जोशी, पान क्र. २५) हिब्रू भाषेतील ‌‘खात्रीने‌’ या अर्थाचा शब्द आहे आमेन. आशीर्वादासाठीही याचा उच्चार करतात. हे पवित्र शास्त्र शब्दकोशात (बायबल) म्हटले आहे. ख्रिस्ती धर्मात हा शब्द वापरतात. हिंदू धर्मातील जैन, बौद्ध, सिक्ख, शैव व वैष्णव आदि  पंथोपपंथांनी ओंकार  पवित्र मानला आहे. म्हणून ओंकार हे राष्ट्रीय एकात्मतेचे एक साधन आहे. ओंकाराच्या उच्चारणाचे होणारे चांगले परिणाम यावर शास्त्रीय संशोधनही झाले आहे.

१५) औक्षण  – 

       एखाद्या मंगल प्रसंगी एखाद्या व्यक्तीला ताम्हनात नीरांजन ठेवून  किंवा ताम्हनातील पाण्यात कुंकू घालून ओवाळणे आणि त्याच्या मस्तकावर अक्षता टाकून आयुष्मान/आयुष्मती भव अशी शुभेच्छा व्यक्त करणे म्हणजे औक्षण करणे. युद्धाला जाताना किंवा परतल्यावर वीरांना त्यांच्या पत्नी ओवाळत. भाऊबीजेला बहीण भावाला किंवा दिवाळीच्या पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते.  शुभेच्छा व्यक्त  करण्याची ही आपली पद्धत आहे. म्हणून हा एक आयुष्यवर्धक विधी मानला आहे. 

१६) अंतरपाट / मंगलाष्टके

       अंतर म्हणजे मर्यादा व पट म्हणजे वस्त्र. वधूवरांमधील विवाहपूर्व  मर्यादा दूर करणारे वस्त्र म्हणजे अंतरपट किंवा अंतरपाट ! विवाहविधीमधे वधूवरांना पूर्व पश्चिम उभे करून त्यांच्यामधे जे वस्त्र धरले जाते त्यास अंतरपाट म्हणतात. यावेळी ज्या मंगल पद्यपंक्ती म्हटल्या जातात त्यांना मंगलाष्टके म्हणतात. मंगलाष्टके म्हटल्यानंतर अंतरपाट दूर होऊन  वधू-वर एकमेकांना हार घालतात. हा लौकिक विधी आहे. वरवधूंमधे असलेला दुरावा नाहीसा होऊन त्यांची जीवने एक झाली आणि सर्वांसमक्ष त्यांनी परस्परांचा पतिपत्नी म्हणून स्वीकार केला आहे हे दर्शविण्यासाठी हा विधी आहे.

१७) कन्यादान /स्वयंवर  –

       विवाह विधीमध्ये  वधूचा पिता धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी वराला कन्या देतो. विवाह विधीतील हा एक महत्त्वाचा भाग  आहे. या कन्यादानाला पर्याय म्हणून वधू  स्वतः आपल्या पतीची निवड करते असाही  विधी करता येतो. याला स्वयंवर म्हणतात.

१८) कलश – 

       पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा, त्यावर आंब्याची किंवा  विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवून धर्मविधीत कलश म्हणून ठेवला जातो.  वरुणदेवता म्हणून  त्या कलशाचे पूजन करतात. पाण्याचे महत्त्व आपण सर्वजण जाणतोच.कलशातील पाण्यात पवित्र सात नद्यांचे आवाहन केले जाते. कलश हे मांगल्याचे, पूर्णत्वाचे प्रतीक आहे. विधी पूर्ण झाल्यावर कलशातील जलाने यजमान दंपतीला व घरातील सगळ्यांना ज्येष्ठ मंडळी अभिषेक करतात.

१९) कापूर  –

पूजा झाल्यानंतर देवापुढे कापूर लावण्याची पद्धत आहे. कापूर जळून गेल्यावर  खाली काहीही उरत नाही. त्याप्रमाणे पूजकाने ‌‘स्व‌’ चे पूर्ण विसर्जन करून पूजन केले पाहिजे हा भाव त्यातून व्यक्त होतो. कापूर हा सौम्य जंतूनाशक पदार्थ आहे. इसबावरील औषधात कापूर असतो. विषहारक म्हणूनही कापराचा वापर होतो. कापूर लावल्यामुळे हवा शुद्ध होते.         

२०) गणपती –  

       ओंकाराभोवती मानवी रूप घातले की गणपती होतो. म्हणून तो ओंकारस्वरूप आहे. गणपती हा गणांचा अधिपती म्हणजे संघटनेची देवता आहे. कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी विघ्नविनाशक गणपतीचे पूजन व स्मरण करावे म्हणजे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते अशी कल्पना आहे.

२१) गायत्री मंत्र

       उपनयन संस्कारामधे बटूला गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. गायत्री मंत्र मिळाल्यानंतरच बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील श्रेष्ठ मंत्र असून त्यामधे तेजस्वी अशा सवितृ देवाचे ध्यान करून त्याने आमची बुद्धी तेजस्वी करावी अशी प्रार्थना केली आहे. सवितृ देवाचा या अर्थी हा सावित्री मंत्र असून तो गायत्री छंदामधे असल्याने त्याला गायत्री मंत्र म्हटले जाते. विश्वामित्र महर्षींचा हा मंत्र दशसहस्र वर्षांपूर्वीचा आहे.  गायत्री मंत्रापूर्वी भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः व सत्यम्‌‍ म्हणजेच पृथ्वी, अंतरिक्ष, सूर्य, कोटिसूर्य, आकाशगंगा, अनंत आकाशगंगा व परब्रह्म यांचे स्मरण केले जाते, त्यांना  सप्त व्याहृती असे म्हणतात.

२२) घंटा  –    

       पूजेमधे धूप, दीप, नैवेद्य, आरती असे उपचार करताना घंटा वाजवली जाते. घंटानाद हा मांगल्यसूचक मानला जातो. दुष्ट प्रवृत्तींचे निराकारण व शुभ शक्तींचे आगमन सुचवणारा नाद करणाऱ्या घंटेचे पूजन केले जाते. घंटानाद  करण्यामागे आपल्या शुभ, पवित्र, मंगल भावना निगडित झालेल्या आहेत.

२३) चंदन  –

       पूजेच्या सोळा उपचारांपैकी चंदनाचे गंध लावणे हा एक उपचार आहे. त्याला अनुलेपन असे म्हणतात. चंदन हे शीतल असते. चंदनाच्या सुगंधाने प्रसन्नता येते. त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. चंदनाचे खोड ज्याप्रमाणे सहाणेवर झिजते त्याप्रमाणे स्वतः झीज सोसून  पूजकाने जनताजनार्दनाची पूजा केली पाहिजे हा भाव येथे दिसून येतो. कापूर, केशर व चंदन हे डोकेदुखीवरील वैद्यांचे खास औषध असते. तसेच चंदन व कापराची उटी दाह दूर करते. चंदन पोटात घेण्याने मूत्रविकार दूर होण्यास मदत होते.

२४) तीळ – 

       देवपूजेत जशा अक्षता त्याप्रमाणे श्राद्धकार्यात काळे तीळ  आवश्यक  असतात. तीळ हे शक्तिवर्धक आहेत. शौचशुद्धी करतात. मुळव्याधीसारख्या रोगांवर उपयुक्त आहेत. पोटदुखीवर हे उत्तम औषध आहे. लघवीच्या विकारावर हे तीळ वापरतात. काळे व पांढरे तीळ दोन्ही सारखेच गुणकारी आहेत. अभ्यंगासाठी वैद्य तिळाचे तेल सांगतात.

२५) तुळस  –

       तुळस ही बहुगुणी औषधी वनस्पती असून ती प्राणवायूचे उत्सर्जन करते. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व मोठे आहे. अनेक पौराणिक कथांची रचनाही याबाबतीत झाली आहे. तुळसीपत्र ठेवून मगच देवाला नैवेद्य दाखवतात.यामधे संपूर्ण समर्पण व्यक्त होते. मृत्यूसमयी माणसाच्या मुखात तुळशीपत्र ठेवतात. काळी व पांढरी असे तुळशीचे दोन प्रकार असून काळ्या तुळशीस वृंदा म्हणतात. कर्पुर तुळशीपासून कापूर काढतात. चर्मरोगांवर, विंचवाच्या दंशावर तुळशीचा रस उपयोगी ठरतो. कर्करोगावर तुळस उपयोगी आहे. तुळस जंतुनाशक असल्याने घरोघर दारासमोर ती लावण्याची प्रथा पडलेली आहे.

२६) दक्षिणा –  

       धर्मविधीनंतर तो विधी करण्यास मदत करणाऱ्या पुरोहिताला जे धन दिले जाते त्यास दक्षिणा म्हणतात. पूजेच्या विविध उपचारांच्या शेवटी नैवेद्यानंतर देवालाही दक्षिणा देण्याची पद्धत आहे. विशेष प्रसंगी कोण्या अतिथीला जेवायला बोलावले तर त्यालाही दक्षिणा दिली जाते. त्यात कृतज्ञताभाव दिसून येतो.

२७) दर्भ  – 

       धार्मिक कृत्यांमधे दर्भ नावाचे तृण वापरतात. पाणथळ  जागी  वाढणारे लव्हाळ्याच्या सारखे हे  सुकलेले  गवत असते. धर्मविधींमधे होम केला जातो त्यावेळी अग्नीला आसन म्हणून होमाभोवती दर्भ ठेवले जातात. श्राद्धात पिंडाखाली आसन म्हणून दर्भ ठेवले जातात. काही धार्मिक कृत्ये करताना अनामिकेत दर्भाची अंगठी  करून घालतात. त्यालाच पवित्रक म्हणतात. दर्भाचे काही औषधी उपयोग आहेत. दर्भ शीतल (थंडावा देणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे) व तृषाशामक (शोष कमी करणारे) असल्याचे म्हटले आहे. स्नान करताना दर्भाने अंग चोळावे. चटईचे गवत दर्भासारखे असते.

२८) दूर्वा

       दूर्वांचा रस दाह दूर करतो. गणपतीस दूर्वा प्रिय मानल्या आहेत. नाकातून रक्त येत असल्यास खडीसाखरेसह दूर्वांचा रस द्यावा.

२९) दीप

         पूजेच्या विविध उपचारांमधे पूजेसाठी दीप दाखवणे हा एक उपचार आहे. दीप तेलाचा किंवा तुपाचा असतो. विजेच्या दिव्यापेक्षा तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याने पसरणाऱ्या प्रकाशाचे वेगळेपण आणि त्यामुळे होणारी भावनिर्मिती हा अनुभवाचाच भाग आहे. मुख्य पूजाविधीच्या आधी दीपपूजा केली जाते. तिन्हीसांजेला घराघरात दिवा लावण्याची प्रथा आहे.

३०) नागवेली

नागवेली म्हणजे विड्याचे पान. हे कफनाशक आहे. मुखदुर्गंधी दूर करते. भूक वाढवते. सर्व पूजांमधे ही पाने वापरली जातात. 

३१) नैवेद्य /प्रसाद –  

       नि + विद्‌‍  या धातूचा अर्थ समर्पण करणे असा होतो. देवाला समर्पित या अर्थी नैवेद्य हा शब्द आहे. नैवेद्य हा पूजेच्या सोळा उपचारांपैकी एक होय. घरात जे चांगलेचुंगले गोडधोड पदार्थ असतील ते प्रथम देवाला अर्पण करावेत म्हणजेच त्यांचा देवाला नैवेद्य दाखवावा व देवाचा प्रसाद म्हणून नंतर तो आपण घ्यावा अशी पद्धत आहे. यामधे कृतज्ञतेची, समर्पणाची, आदराची भावना व्यक्त होते. 

३२) पतिपत्नींचे स्थान

              यज्ञे होमे व्रते दाने स्नानपूजादिकर्मणि |

            देवयात्रा विवाहेषु पत्नी दक्षिणतः शुभा

            आशीर्वादेऽभिषेके पादप्रक्षालने तथा  |

            शयने भोजने चैव पत्नी तूत्तरतो भवेत्

       यज्ञ, होम, व्रत, दान, स्नान, पूजा, यात्रा अशा वेळी पत्नीचे स्थान पतीच्या उजवीकडे असावे. आशीर्वाद घेताना, अभिषेक करताना, पाय धुताना आणि शयन, भोजन प्रसंगी मात्र पत्नीचे स्थान पतीच्या डावीकडे असावे.

३३) पत्री / फुले  –

       पूजेच्या विविध उपचारांमधे पत्री / फुले वाहाणे या उपचाराचा समावेश होतो.

              पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति |                           

            तदहं  भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः   (गीता 9-श्लोक  क्र. 26) 

       सहजगत्या उपलब्ध असलेल्या वस्तू ईश्वराला भक्तिभावपूर्वक अर्पण केल्यास तो अवश्य स्वीकारतो. हा त्यामागील भाव आहे. सुशोभनासाठीही त्यांचे महत्त्व आहे.

       कोणती फुले पूजेत वापरावीत यासंबंधी ग्रंथामधे जे सांगितले आहे ते स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.

              याचितं निष्फलं पुष्पं क्रयक्रीतं निष्फलम्‌‍ |

            तुलस्यगस्त्यबिल्वानां नास्ति पर्युषितात्मता |

       मागून आणलेलं फूल,फळ देत नाही, विकत घेतलेल्याचाही काही उपयोग नाही. तुळस, अगस्ति, बेल हे कधीही शिळे होत नाहीत. तसेच गंगाजल कधीच शिळे होत नाही.  म्हणून म्हटले आहे

              अवर्जम्‌‍ जाह्नवीतोयं अवर्जम्‌‍ तुलसीदलम्‌‍ |  

३४) पाणिग्रहण

‌‘पाणि‌’ म्हणजे हात, ‌‘ग्रहण‌’ म्हणजे (हातात) घेणे. विवाहविधीमधे वधूवरांनी एकमेकांचे उजवे हात मंत्रपूर्वक हातात घेणे याला पाणिग्रहण म्हणतात. या प्रसंगी – 

गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं ….. |  (ऋग्वेद विवाह सूक्त 10-85)

     मी सौभाग्यप्राप्तीसाठी तुझा हात हातात घेतो. हा मंत्र वराने वधूला उद्देशून म्हणावयाचा असतो. संसाराच्या वाटेवर उभयतांना शेवटपर्यंत हात हातात घालून जायचे आहे याचे त्यातून निदर्शन होते.     

३५) पाणी  –

       धर्मविधींमधे पाण्याची आवश्यकता विविध ठिकाणी भासते. पाणी हे दाहनाशक आणि शांतिकारक मानले जाते. विवाहासारख्या विधींमधे  वरवधूंना पाण्याने अभिषेक केला जातो. आचमनासाठी पाणी लागते.

              अपवित्रः पवित्रो वा, सर्वावस्थां गतोऽपि वा |

            यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं, बाह्याभ्यन्तरः शुचिः

      ‌‘माणूस पवित्र, अपवित्र वा कोणत्याही अवस्थेत असो, जो भगवंताचे स्मरण करतो तो अंतर्बाह्य पवित्र होतो.‌’ या अर्थाचा मंत्र म्हणून अक्षता टाकतात किंवा पाण्याने पूजा साहित्यावर तसेच स्वतःवर प्रोक्षण करतात. 

३६) पिंड  –  

       श्राद्धादि विधी म्हणजे खरेतर पितरांचे पूजन होय. पूजेसाठी समोर काहीतरी प्रतीक असणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळी छायाचित्रे नसत. म्हणून पिंड ठेवण्याची पद्धत सुरू झाली. पिंड म्हणजे भाताचा छोटा गोळा होय. पूजेमधे जशी मूर्ती, छायाचित्र वापरतात  त्याप्रमाणे श्राद्धादि विधींमधे पिंड वापरतात. आपले शरीर हे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतरच नाही का? त्यामुळे दिवंगतास अन्नमय पिंडाच्या रूपात पाहाणे स्वाभाविकच दिसते.

       श्राद्धाच्या दिवशी सहाही रसांनी युक्त (कडू, गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट) स्वयंपाक करण्याची प्रथा आहे. यात ज्या ज्या पदार्थांचा समावेश असतो त्या सर्वांचाच अल्प अंश काळ्या तिळाबरोबर भातामधे मिसळून लिंबाच्या आकाराचे पिंड तयार करावयाचे असतात.

३७) पुण्याहवाचन  – 

       ‌‘पुण्य‌’ म्हणजे शुभ, ‌‘अहन्‌‍‌’ म्हणजे दिवस व ‌‘वाचन‌’ म्हणजे सांगणे. एखाद्या धर्मकृत्यामधे ज्येष्ठ मंडळी योजलेल्या कार्यास आजचा दिवस शुभ आहे, त्यामुळे हे कार्य करण्यास हरकत नाही असे आशीर्वादपूर्वक सांगतात. याला पुण्याहवाचन म्हणतात. ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने, संमतीने कोणतीही गोष्ट करावी म्हणजे आपला उत्साह वाढून ती यशस्वी होते. असा भाव यात दिसतो. प्रस्तुत धर्मविधी करण्यास आजचा दिवस शुभ आहे, या विधीत स्वस्तिक्षेम असेल, हा विधी संपन्न होवो, या विधीत समृद्धी असेल व या विधीत कल्याण असो या वाक्यांनी पुण्याहवाचन करतात.

३८) पुरुषार्थ – 

       धर्म, अर्थ, काम  व मोक्ष हे चार पुरुषार्थ होत. धर्म म्हणजे सदाचरण, शुद्ध नैतिक वर्तन असा अर्थ करता येईल. अर्थ म्हणजे सुखसमृद्धीची साधने प्राप्त करणे. काम म्हणजे इच्छा. धर्माला अविरोधी अशा इच्छा पूर्ण करून घेणे. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. जीवनातील परमोच्च अशा ज्ञानाची प्राप्ती करून घेणे, बंधमुक्त होऊन कृतार्थतेचा अनुभव घेणे म्हणजे मोक्ष.

३९) पंचपल्लव –  

       पंचपल्लवामधे वड, पिंपळ, आंबा, उंबर आणि डाळिंब यांची पाने गृहीत धरली जातात. घर या पानांनी सजवले जावे.

४०) पंचामृत – 

       देवाला स्नान घालताना काही प्रसंगी पंचामृताचे स्नान घालतात. वेदकालापासून पंचामृताचा उल्लेख सापडतो. दूध, मध, साखर, तूप व दही हे पदार्थ समप्रमाणात मिसळून पंचामृत तयार करतात. यातील प्रत्येक द्रव्यासाठी वेगळा मंत्र असतो. अनेक पुराणांमधे पंचामृताचा उल्लेख आहे. जैनांच्या अभिषेक विधीमधे देखील पंचामृताचा वापर करतात. आयुर्वेद ग्रंथांमधे पंचामृताचा उल्लेख येतो. ही पाचही द्रव्ये स्वतंत्रपणेही अमृताप्रमाणे गुणकारी असल्यामुळे ती एकत्र केल्याने त्याची गुणवत्ता कितीतरी अधिक होते आणि त्यामुळे त्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने रसायनाचा महिमा प्राप्त होतो.रसायनाचा अर्थ शरीरातील सातही धातूंची वृद्धी करणारे द्रव्य.

त्वचा कोरडी पडली असताना किंवा त्वचेवर काळे डाग पडले असताना बाहेरून लावण्याकरता त्याचा उपयोग होणे शक्य आहे. त्यामुळेच देवाला अभिषेक करताना जसे पंचामृत वापरतात त्याचप्रमाणे त्याला नैवेद्य दाखवतानाही  पंचामृताचा उपयोग करतात.

गर्भवती स्त्रीने पंचामृत सेवन करणे हे हितकारक ठरते. थकवा आल्यानंतर उत्साहवर्धक म्हणून पंचामृत घेणे लाभदायक ठरते.

४१) प्रसाद  –  पाहा नैवेद्य

४२) प्रोक्षण –  पाहा अभिषेक

४३) फुले –   पाहा पत्री

४४बेल  बेलाचे फळ औषधी आहे तर पाने ही, पूजेत शंकराला आवडती म्हणून वापरतात.

       बेलाचे फळ कफनाशक व कृमिनाशक आहे. बेलाची पानेही औषधी आहेत. बेल शंकरास  विशेष  प्रिय आहे.

४५) मंगलसूत्र  – 

       विवाहविधीत वधूच्या गळ्यात ओवलेले काळे मणी घालण्यात येतात. त्याला मंगलसूत्र म्हणतात. ब्रह्मचर्याश्रमातील व्रतचिह्न जसे यज्ञोपवीत तसे गृहस्थाश्रमातील व्रतचिह्न मंगलसूत्र. वरानेदेखील विवाहात साखळी किंवा अंगठी असे व्रतचिह्न घ्यायला हवे. परस्परांना अंतर न देण्याचे वचन दोघांनी द्यायचे असते. त्याचे स्मरण देणारे हे चिह्न होय.

४६) मंगलाष्टके  पाहा अंतरपाट

४७) मधुपर्क  –

       विवाहविधीमधे वराला व वरपक्षाकडील मंडळींना मधुपर्क देणे असा एक विधी आहे. अतिथी व प्रिय व्यक्तींच्या स्वागतासाठीही मधुपर्क देण्यास सांगितले आहे. मधुपर्कातील द्रव्यांविषयी धर्मशास्त्रकारांमधे मतभेद असले तरी साधारणपणे तो दही व मध यांच्या मिश्रणाचा बनवतात. पंचामृतही त्याऐवजी वापरावे. वधूपक्षीयांनाही वरपक्षीयांना मधुपर्क अवश्य द्यावा, व त्यांचे स्वागत करावे.

४८) माका  –   

       माका ही औषधी वनस्पती असून श्राद्धासारख्या विधींमध्ये पितरांना माका वाहिला जातो. माका गारवा देणारा आहे. विविध उपचारांमधे विविध वनस्पतींची पाने फुले इ. आवश्यक असल्याने तेवढ्या वनस्पतींची तरी ओळख राहाते.

४९) मार्कंडेय  – 

    पुराणामधे मार्कंडेय ऋषीची कथा प्रसिद्ध आहे. ते प्रथम अल्पायुषी होते पण भगवान शिवाच्या कृपाप्रसादाने ते चिरंजीव झाले. आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे दीर्घायुष्य मिळावे या हेतूने साठीशांतीसारख्या धर्मविधीत त्यांची प्रार्थना करतात.

५०) मुहूर्त –   

       वेगवेगळी कामे करत असताना ती यशस्वी व्हावीत म्हणून  शुभ वेळी ती सुरू करणे  हे चांगले असे मानून ज्योतिषांना विविध गोष्टींसाठी शुभ वेळा विचारल्या जातात. या वेळांनाच मुहूर्त असे म्हणतात. वीरतंत्राप्रमाणे चांगल्या कामाला कोणतीही वेळ शुभ मानण्यात येते.

              सर्व एव शुभः कालो नाशुभो विद्यते क्वचित‍  |

            न विशेषो दिवारात्रौ संध्यायामथवा निशि (वीरतंत्र)

       सर्वच वेळा मंगल असतात. अशुभ वेळ कधीच नसते. दिवस, रात्र, संध्याकाळ किंवा मध्यान्हकाळ यांचेही काही विशेष शुभाशुभ नसते.

       अमावास्या आणि ग्रहण असे मनोमालिन्य उत्पन्न करणारे दिवस सोडून अन्य सर्व दिवस चांगले मानण्याची  धर्मनिर्णय मंडळाची भूमिका आपण स्वीकारणे योग्य होईल.

५१) यज्ञोपवीत

       उपनयन संस्कारानंतर घेतलेल्या व्रताचे चिह्न म्हणून यज्ञोपवीत घालतात. त्याचे तीन पदर असतात व एक गाठ असते. देवपूजेच्या वेळी ते डाव्या खांद्यावरून उजवीकडे सोडलेले म्हणजे सव्य (उपवीती) असावे. पितृकार्यात ते उजव्या खांद्यावरून डावीकडे सोडलेले  म्हणजे अपसव्य (प्राचीनावीती) असावे आणि मानुषकर्मांच्या वेळी, ऋषींना अर्घ्य देताना निवीती म्हणजे माळेसारखे असावे असे सांगितले आहे. 

५२) लाजाहोम – 

       लाजा म्हणजे लाह्या. विवाहविधीमधे वधूवर अग्नीमधे साळीच्या लाह्यांची मंत्रपूर्वक आहुती देतात. त्याला लाजाहोम असे म्हणतात. भाताची लावणी करताना वाढ होऊन काही प्रमाणात तयार झालेली भाताची रोपे दुसरीकडे लावली जातात. विवाहविधीमधेही उत्तमगुणमंडित, उत्तम  शिक्षण आणि संस्कारांनी घडलेली अशी वधू सासरी जाते. एका प्रकारे ही भाताच्या लावणीप्रमाणेच कृती आहे. म्हणून या साळीच्या लाह्यांना या विधीत महत्त्व आले असावे.

५३) वर्ण  –  

       ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण होत. भगवद्गीतेनुसार अध्ययन व अध्यापन  करणारा, दान देणारा व घेणारा, यज्ञ करणारा व करवून घेणारा  ब्राह्मण होय. लोकांचे रक्षण करणे, राज्यकारभार पाहाणे, अध्ययन करणे व यज्ञ करणे ही कामे करणारा क्षत्रिय. व्यापार, शेती, गोपालन करणे इ. कामे करणारा वैश्य आणि सेवेची सर्व कामे करणारा शूद्र होय. हे वर्ण जन्मावरून ठरत नसून प्रत्येकाने आपापल्या स्वभावानुसार स्वीकारलेल्या कामावरून ठरत असतात. अशी गुणकर्मानुसार वर्णांची विभागणी केली आहे. प्रत्येक समाजामधे हे चार वर्ण असतात. आज वर्णाऐवजी जात प्रतिष्ठित झाली आहे.

              शूद्रोऽप्यागमसंपन्नो द्विजो भवति संस्कृतः | (महाभारत अनुशासन पर्व 143 )

       शूद्रदेखील ज्ञानसंपन्न असेल तर तो सुसंस्कृत द्विज (ब्राह्मण) होतो.

              जीवितं यस्य धर्मार्थं धर्मो हर्यर्थमेव

            अहोरात्राश्च  पुण्यार्थं तम्‌‍ देवा ब्राह्मणं विदुः | (महाभारत  12.237.23 )

       ज्याचे जीवन धर्मासाठी आहे, धर्म वैराग्यासाठीच आहे, दिवसरात्र जो पुण्यकर्म करतो, त्याला देव ब्राह्मणच समजतात.

       जन्मावरून वर्ण ठरवणे अयोग्य आहे. आज कर्मावरून कोणाचे वर्ण ठरवणे हे दुष्करच आहे. त्यामुळे आपण सर्व हिंदू आहोत एवढेच ध्यानी घ्यावे.

५४) वास्तुपुरुष – 

       चराचरात भरून राहिलेली ईश्वरी शक्ती वास्तुपुरुषाच्या रूपाने घरातही अवश्यमेव राहाते अशी आपल्या मनाची धारणा असते. वास्तुशांतीप्रसंगी या वास्तुपुरुषाचे पूजन केले जाते. त्याची प्रार्थना केली जाते.

५५) शंख  – 

        काही ठिकाणी पूजेमधे घंटानादाप्रमाणे शंखनादही केला जातो. तोही मंगलसूचक मानला जातो. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात युद्धास सुरुवात होण्यापूर्वी जे विविध शंखांचे ध्वनी करण्यात आले त्याचे वर्णन आले आहे. पूजेतील शंख हा भगवान श्रीकृष्णाचा पांचजन्य आहे या भावाने धर्मविधीत गंध व फुले वाहून शंखाचे पूजन केले जाते.

५६) सप्तपदी – 

       वधूवरांनी गृहस्थाश्रमात एकमेकांच्या साथीने वाटचाल करायची असते. याचा शुभारंभ सात पावले एकमेकांबरोबर चालून होतो. याला सप्तपदी म्हणतात. 

       सात पावले एकत्र चालणे हा या विधीचा वरवरचा भाग असला तरी त्यामधील मंत्र व त्यातून प्रकट होणारा भाव याला खूप महत्त्व आहे.

       एक पाऊल बरोबरीने चालले तरी जीवाभावाचे सख्य होते. या विधीमधे सामर्थ्यसंपादनासाठी, सुखसमृद्धीसाठी, संतती-प्राप्तीसाठी, धनवर्धनासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्परांमधे  दृढ मैत्री व्हावी याकरता सात पावले जोडीने चालायची असतात.

       रूढी, धर्मशास्त्र आणि आजच्या कायद्याच्या दृष्टीनेही सप्तपदीचे मोठे महत्त्व आहे. सप्तपदी झाली म्हणजेच  विवाह झाला असे समजतात.

५७) सपिंडीकरण

हा श्रद्धाचा एक प्रकार आहे. सपिंडीकरण श्राद्धामधे दिवंगत वडील, आजोबा, पणजोबा अशा मागच्या पिढ्यांना पिंड देऊन मृत व्यक्तीच्या पिंडाचे त्या पिंडांशी मिश्रण करावयाचे असते. या पैकी कोणी हयात असेल तर त्या आधीची पिढी घ्यावी. मृत मनुष्याचा पितरांमधे समावेश व्हावा यासाठी हे करतात. पितर ही एक पदवी असून सपिंडीकरणामुळे मृत व्यक्तीला ती पदवी प्राप्त होते.

५८) समिधापाहा आहुती

५९संकल्प :

       एखादा धर्मविधी करताना तो विधी कुठे, कधी आणि कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करावा लागतो. त्याला संकल्प म्हणतात. मनाने जे ठरवले असेल त्याचा वाचेने उच्चार संकल्पात केला जातो. संकल्प म्हणजे दृढनिश्चय किंवा एक प्रकारची प्रतिज्ञाच होय. आपल्या इंद्रियांच्या व चित्ताच्या सर्व वृत्ती त्या धर्मविधीमधे एकवटण्यासाठी संकल्पाचा उपयोग होतो. त्या धर्मविधीसाठी तो करणाऱ्याची मानसिक सिद्धता झाली हे दर्शवण्यासाठी हातावरून पाणी सोडले जाते. ‌‘आता हे कर्म परिपूर्ण झाल्यावाचून मी अन्य काही करणार नाही‌’ हा त्याचा गर्भितार्थ आहे.

६०) संस्थाजप – 

       विवाह विधीमधे वधूवरांनी आणि उपनयनात आचार्य व बटूने उभे राहून हात जोडून अग्नीची किंवा देवदेवतांची प्रार्थना करावयाची असते तिला संस्थाजप म्हणतात. संस्थाजप म्हणजे कर्मसमाप्तीच्या वेळी करण्यात येणारी प्रार्थना. ‌‘ माझे सर्व शब्द, हे यज्ञरूप परमेश्वरा, मी तुला अर्पण करतो.‌’ अशा अर्थाची ही प्रार्थना आहे.

६१) स्वयंवर :   पाहा कन्यादान

६२) सुपारी – 

       पूजेच्या सोळा उपचारांमधे नैवेद्य दाखवून झाल्यावर सुपारी आणि दक्षिणा ठेवण्याची रीत आहे. पूजेत गणपतीचे व अन्य देवतांचे प्रतिनिधी म्हणून सुपारी ठेवतात व त्याची पूजा करतात. भारतीय संस्कृतीत सुपारीला महत्त्व आहे कारण सुपारी हे समृद्धी, स्नेह आणि मांगल्य यांचे प्रतीक समजले जाते. भोजनानंतर अतिथीला आपण विडा दक्षिणा देतो. त्याप्रमाणेच देवालाही विडा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे जेवणानंतर तोंडाला आलेला ओशटपणा जातो.

६३) सूर्यदर्शन – 

       विवाह विधीमधे वर वधूला व उपनयन विधीत पिता पुत्राला सूर्याचे दर्शन करवून काही मंत्र म्हणतो. या विधीस सूर्यदर्शन म्हणतात. त्या सूर्याचे तेज आपणासही प्राप्त व्हावे हा भाव यातून व्यक्त होतो.

६४) सोवळे –  

       सोवळे म्हणजे ‌‘सोज्ज्वल वस्त्र‌’ या शब्दाचे रूढ रूप. धर्मविधीच्या वेळी स्वच्छ धुतलेले वस्त्र  अथवा सोवळे नेसून पूजा अथवा स्वयंपाक करण्यामागे स्वच्छतेचा भाग आहे. धर्मविधी करणाऱ्याने स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र नेसून, केस व्यवस्थित आवरून विधी करावा हा आशय आहे.

६५) हळद

       एक प्रभावी जंतुनाशक म्हणून हळद हिंदुस्थानात प्राचीन काळापासून वापरात आहे. तिच्यामुळे जखमा भरून येतात. त्याचप्रमाणे शरीराचा रंग उजळतो. त्यामुळे स्वयंपाकापासून ते सौंदर्यवर्धनापर्यंत आणि जेजुरीच्या खंडोबापासून पंढरीच्या पांडुरंगापर्यंत देवदेवतांच्या पूजा अर्चांमध्ये हळदीचा उदंड वापर होतो. चुन्याचा उपयोग करून हळदीचा रंग लाल होतो आणि त्याचा सौभाग्यद्रव्य  कुंकू म्हणून वापर केला जातो. रोज स्वयंपाकात जर हळदीचा वापर केला तर आतड्यांचा कर्करोग होत नाही.

६६) हृदयालंभन

       उपनयन संस्कारामधे बटूचा पिता बटूच्या हृदयाला हात लावून म्हणतो,

मम व्रते हृदयं ते दधामि  | मम चित्तमनुचित्तं ते अस्तु |

      मम वाचमेकव्रतो जुषस्व |बृहस्पतिष्ट्वा नियुनक्तु मह्यम्‌‍ |

(आश्वलायन गृह्यसूत्र अध्याय १, खंड २१)

       ‌‘आपणा दोघांची हृदये अभिन्न असोत‌’ या अर्थाचा हा मंत्र असून याला हृदयालंभन म्हणतात.

६७) होम  –  पाहा  अग्नी

६८) क्षौर –  

       क्षौर म्हणजे केस कापणे. जावळ, उपनयन व विवाहाच्या वेळी क्षौर केले जाते. धर्माप्रमाणे क्षौर हे ‌‘कृताकृत‌’ आहे. कृताकृत याचा अर्थ केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल.