मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही आपण पाहिले. या प्रकरणात आपण प्रत्यक्ष धर्मविधी करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात ते पाहू. हे सर्व विवेचन म्हणजे धर्मविधींमधील परिवर्तन कसे झाले पाहिजे ते दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे.
१. पुरोहित
‘पुरोहित’ हा शब्द पुरस् + हित (‘धा’ (ठेवणे) या धातूपासून बनलेले भूतकाळवाचक विशेषण) असा बनलेला आहे. पुरस् म्हणजे पुढे आणि हित म्हणजे ठेवलेला. पूर्वीच्या काळी युद्धात, राज्यकारभारात, धर्मकृत्यात अग्रभागी राहून राजास मदत करणाऱ्या व्यक्तीला पुरोहित म्हटले जाई. हा शब्द ऋग्वेदकाळापासून प्रचलित आहे. उदा. अग्नीला पुरोहित हे विशेषण लावले आहे. बृहस्पती हा देवांचा पुरोहित होय असे उल्लेख आढळतात. पुरोहित युद्धामध्ये सैन्याच्या पुढे राहात असे व आपल्या सैन्याला विजय मिळावा म्हणून प्रार्थना करीत असे. राज्यकारभारातही पुरोहिताचा सल्ला महत्त्वाचा मानला जाई. यज्ञयागादि धर्मकृत्यांमधे मंत्रपठण करणे व तदनुषंगिक कृतींचे मार्गदर्शन करणे हे पुरोहिताचे काम असे. यावरून पुरोहित ही समाजाचे नेतृत्व करणारी महत्त्वाची व्यक्ती मानली जात होती हे लक्षात येते.
‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः| (शुक्ल यजु. ९-२३)
‘आम्ही पुरोहित राष्ट्रामधे जागृत राहू’ ही पुरोहितांची महत्त्वाची उद्घोषणा होती.
आम्ही पुरोहित होऊन राष्ट्रकल्याणार्थ सदैव सावध राहू. आम्ही पुरोहित म्हणजे कोणी पोटार्थी भिक्षुक नाही तर समाजाच्या अग्रभागी राहून सत्याचे नेतृत्व करणारे आहोत.
संशितं क्षत्रं जिष्णु यस्याहमस्मि पुरोहितः ॥ (शुक्ल यजु. ११-८१)
‘शास्त्रशुद्ध आचरणाने मी माझे ब्रह्मतेज अत्यंत तीक्ष्ण व कडकडीत राखले आहे. मी माझे शरीरसामर्थ्य व इंद्रियांच्या शक्ती कार्यक्षम ठेवल्या आहेत. ज्या राजाचा मी पुरोहित आहे त्याचे क्षात्रतेजही मी वृद्धिंगत केले आहे.’ असा आत्मविश्वास वैदिक काळी पुरोहितांच्या ठायी होता. वैदिक काळात पुरोहितांच्या शक्तीने राजशक्तीवरही प्रभाव गाजवल्याचे दिसते. पुढे बौद्ध धर्माचा उदय झाल्यावर पुरोहितांचे महत्त्व कमी झाले. पुढे भारतावर मुस्लिमांचे व नंतर ब्रिटीशांचे राज्य आल्यावर पुरोहित वर्गाचे पूर्ण पतन होऊन केवळ विवाहादि संस्कार, पूजाअर्चा हेच त्यांचे काम शिल्लक राहिले.
आजच्या काळातही पुरोहितवर्गाचे हेच चित्र दिसत आहे. प्रत्यक्षात पुरोहितांची मुले आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करताना दिसतात. त्यांना बहुतेक पौराहित्यात प्रतिष्ठा वाटत नाही. आपण तंत्रज्ञ आहोत किंवा अधिकारी आहोत हे सांगताना जसे बरे वाटते तसे पुरोहित असल्याचे सांगताना वाटत नाही असे दिसते.
त्यामुळे आपण धर्माचा अभ्यास करावा, तो लोकांपर्यंत पोचवावा, त्यासाठी स्वतः पुरोहित व्हावे असे ज्यांना वाटते आहे त्यांना पुरोहित शब्दामागील ही सगळी पार्श्वभूमी माहिती पाहिजे. उत्तर काळामधे पुरोहितांचे पतन कोणत्या गोष्टींमुळे झाले ते ओळखून आता ते दोष निर्माण न होण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात समाजाचे नेते, मार्गदर्शक होण्यासाठी आवश्यक ते आचरण पुरोहिताचे असावे. त्यासाठी –
१) पुरोहिताचा निदान उपनयन संस्कार झालेला असणे, त्याने स्वतःची दैनंदिन उपासना करणे, सदाचारी असणे आवश्यक आहे.स्पष्ट व उच्चार त्याच्याकडून अपेक्षित आहेत.
२) धर्म लोकांपर्यंत पोचवण्याचे एक माध्यम म्हणजे संस्कार, शांती, पूजा इ. विधी असल्यामुळे सर्व जाति-जमातींच्या लोकांकडे जाऊन हे काम अवश्य करावे.
३) वाचन, श्रवण, चर्चा, इ.द्वारे धर्मशास्त्र व अन्य विषयांमधीलही व्यासंग वाढता ठेवावा. म्हणजे लोकांच्या प्रश्नांचे योग्य समाधान करता येईल.
४) स्वतःच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी पुरोहिताने प्रयत्नशील असावे. व्यक्तीच्या आंतरिक गुणांचा बाह्य दर्शनावर परिणाम होतो हे लक्षात ठेवून स्वतः चारित्र्यसंपन्न असावे.
५) पुरोहिताने निःस्पृह असणे आवश्यक आहे. समाजाने दिलेली दक्षिणा अवश्य स्वीकारावी मात्र धनलालसा असू नये.
६) कोणत्याही धर्मविधीची ठरलेली वेळ पुरोहिताने काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि यजमानांकडेही तसा आग्रह धरला पाहिजे.
स्त्री पौरोहित्य- पौरोहित्यासंबंधी वरील सर्व विवेचन करीत असताना एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की पुरोहितांचे वर्चस्व स्थापन करण्याचा हा प्रयत्न नाही. धर्मविधींच्या बाबतीत लोकांनी स्वावलंबीच असले पाहिजे. गणेशस्थापना, सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, इ. पूजा व वर्षश्राद्धासारख्या विधींमधे खरे तर घरातीलच कोणी ज्येष्ठ व्यक्तीने पुरोहित म्हणून काम करावे. विवाह, वास्तुशांती इ.बाबत पुरोहितांची आवश्यक ती मदत घ्यावी.
आजच्या काळात सर्व जाति-जमातींच्या व्यक्तींना पौरोहित्याचा अधिकार आहे. केरळमध्ये देवस्थान संस्थांचे नियुक्त मंडळ असते व पुजाऱ्यांसाठी परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या कोणासही, मग तो कोणत्याही जातीचा असो, पुजारी म्हणून, पुरोहित म्हणून नोकरी मिळते.
(पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्य करता येते. ऋग्वेदामधे ‘विश्वावरा’ ही यज्ञाचे पौरोहित्य करणारी स्त्री आढळून येते. नव्या काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना करून स्त्री पौरोहित्याचा नव्याने प्रारंभ केला. माई भगवती व श्रीमती ठकुरानी यांचे उपनयन करून त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दयानंदांनी दिला.
आजच्या काळातही शिर्डीपाशी साकुरी येथे एक आश्रम असून श्री साईबाबांचे शिष्य उपासनी महाराज आणि त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी यांच्यापासून तेथे स्त्रियांची वेदपठणाची परंपरा चालत आली आहे. या स्त्रिया मोठमोठ्या यज्ञांचे पौरोहित्यही करतात.
पुण्यात कै. शंकरराव थत्ते यांनी उद्यान प्रसाद कार्यालयात स्त्रियांसाठी पौरोहित्याचा वर्ग चालवून कित्येक स्त्रियांना पौरोहित्याची दीक्षा दिली. वर नमूद केलेल्या प्रयत्नांव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी असे वर्ग चालू असतील. ते निश्चितच अभिनंदनीय आहेत. ज्या पुण्यामधे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याला मुलींची शाळा चालवल्याबद्दल समाजाच्या जहरी टीकेला तोंड द्यावे लागले त्याच पुण्यात आज स्त्री पुरोहितांचे कौतुक होताना दिसते. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्यत्र स्त्री पौरोहित्याचा हा प्रयोग अभिनव व यशस्वी ठरला आहे. हिंदू धर्माच्या लवचिकतेचे हे द्योतक आहे.
ज्ञान प्रबोधिनीमधे १९९० पासून सर्व जाति-जमातींच्या स्त्रीपुरुषांसाठी पौरोहित्य वर्ग चालू असून पुरुषांप्रमाणे महिलाही अन्त्येष्टीसह विविध संस्कार, शांती व पूजा यांचे पौरोहित्य परिवर्तनाच्या धोरणाला अनुसरून करत असतात.)
स्त्रियांनी आणि तथाकथित ब्राह्मणेतर समाजाच्या लोकांनीही पौरोहित्याचा अधिकार कोणी ठराव करून देण्याची वाट बघत न बसता किंवा कोणाकडे मागत न बसता आत्मविश्वासपूर्वक स्वतःच घेतला पाहिजे असे वाटते.
२. शुचिता विचार
शुचिता म्हणजे शुद्धता, निर्मळता, पावित्र्य. याबाबतीत पुढील वचनाचा विचार करण्यासारखा आहे –
देशकालक्रियाद्रव्यकर्तृणां शुद्धता यदि |
मन्त्राणां च तदा पूर्णं कर्मणां फलमश्नुते |
(बृहन्नारायणीय उपनिषद् उत्तर भा. ३३ – ६३, ६४)
स्थान, समय, कृती, साधने, कर्ता व मंत्र यांच्या ठिकाणी शुद्धता असेल तर कोणत्याही कामात संपूर्ण यश मिळते.
यावर सविस्तर विचार करणे योग्य होईल.
१) देश म्हणजे जेथे, ज्या जागी धर्मविधी केला जातो ती जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. जमीन एकसारखी सपाट असावी व ती कोरडी असावी. सुंदर रांगोळी घातलेली असावी. शुभचिह्ने रेखाटलेली असावीत. त्या जागी दुर्गंधी उत्पन्न होईल अशी परिस्थिती नसावी. मंद धूप जळत असावा. तोरणे, पुष्पमाला, पताका या सर्वांच्या साहाय्याने वातावरणनिर्मिती करावी. प्रसंगोचित अशा संगीताचा वापर करावा. सर्वत्र स्वच्छ उजेड असावा. ज्यामुळे मांगल्याचा, पावित्र्याचा भाव मनात उत्पन्न होईल असे वातावरण त्या जागी राखणे म्हणजे देशशुद्धी.
अन्त्येष्टी, श्राद्धविधी असले तरी तेथेही टापटीप व स्वच्छता आवश्यकच !
धर्मविधींमधे कोणी कोणत्या दिशेला तोंड करून बसावे याबाबत चर्चा केली जाते.
सदा संतुष्टमनसः सर्वाः सुखमयः दिशः| (भागवत ७-१५-१७)
‘संतुष्टचित्त मनुष्याला सर्व दिशा चांगल्याच आहेत’ असा आपला विचार आहे. तथापि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या प्रमुख दिशा, आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य या उपदिशा, ऊर्ध्व (वर) आणि अधर (खाली) या दहा दिशांशी जोडले गेलेले काही संकेत आहेत. त्यामुळे धर्मकृत्यात पूर्व व उत्तर दिशांना काही विशेष महत्त्व आलेले दिसते.
सूर्य पूर्वेस उगवतो. त्यामुळे ज्या दिशेकडून उष्णता, ऊर्जा, प्रकाश मिळतो त्या दिशेला सम्मुख राहाणे याला महत्त्व आले असावे. पूर्वी नदीकाठी, मोकळ्या जागेवर धार्मिक अनुष्ठाने करताना सूर्याला साक्षी ठेवून हे कृत्य करतो आहोत असा भाव निर्माण होत असल्याने पूर्व दिशेला महत्त्व मिळाले असावे.
भारताचा भौगोलिक दृष्ट्या विचार करता विस्तार पावणे हे उत्तर दिशेलाच शक्य आहे. उत्तरपूर्व दिशेला अपराजिता दिशा असेही नाव आहे. ज्या दिशेस नित्य विजय मिळवण्यास जावे ती अपराजिता दिशा ! यावरूनच कदाचित ‘उत्तरोत्तर प्रगती’ हा वाक्प्रचार आला असावा. भारताच्या उत्तरेला हिमालय व तिबेट आहे. हिमालय व तिबेट (अमरकोशानुसार तिबेट = त्रिविष्टप = देवलोक = स्वर्ग) यांची भारतीय मनाला पूर्वीपासून ओढ वाटत आली आहे. म्हणून उत्तर दिशेला विशेष महत्त्व आले असावे.
२) ईशान्य दिशेस ‘अपराजिता’ हे नाव आहे. दसऱ्याचे सीमोल्लंघन करताना त्या दिशेस जाणे अभिप्रेत दिसते, इष्ट देवतांची स्थापना ईशान्य दिशेस अभिप्रेत असते.
सर्व एव शुभः कालः नाशुभो विद्यते क्वचित् |
न विशेषो दिवारात्रौ संध्यायामथवा निशि ॥ (वीरतंत्र )
सर्वच वेळा मंगल असतात. अशुभ वेळ कधीच नसते. दिवस किंवा रात्र, संध्याकाळ किंवा मध्याह्नकाळ यांचेही काही विशेष शुभानिशुभ नसते.
वास्तविक पाहाता सर्व दिवस, सर्व वेळा या चांगल्याच असतात. मात्र दिशांप्रमाणेच दिवस आणि वेळा यांबाबत पूर्वापार चालत आलेल्या काही कल्पना आहेत. त्यातूनच शुभाशुभ मुहूर्तांची कल्पना आली आहे. येथे त्या खोलात शिरण्याचे कारण नाही.
अमुक एक दिवस चांगला असे आपल्या मनाला निःशंकपणे वाटले आणि तो दिवस सोयीचाही असेल तर त्या दिवशी धर्मविधी केला जावा. ज्या वेळेला तो विधी असेल ती वेळ यजमान, आप्तेष्ट, पुरोहित यांनी काटेकोरपणे पाळावी. त्यात ढिलाई करू नये.
ज्या वेळी माणसाला उत्साह वाटत असतो, रात्रीची विश्रांती होऊन चैतन्य अनुभवास येते अशी सकाळची वेळ धर्मविधींसाठी चांगली मानली आहे. एकदा वेळ चांगली असे मनाने घेतले की चांगले विचारही मनात सहजच उत्पन्न होतात.
त्यामुळे असे चांगले विचार येतील असा दिवस व अशी वेळ ही धर्मविधीसाठी निवडणे म्हणजे कालशुद्धी. दिवस मोठा होत जातो तो उत्तरायणात, चंद्र प्रतिदिन वर्धमान होत जातो तो शुक्लपक्षात, सूर्यप्रकाश मिळतो भर दिवसा. म्हणून धर्मविधी, दिवसाच्या वेळी, शुक्ल पक्षात व उत्तरायणात करण्याची आपली प्रवृत्ती दिसते.
३) कोणतीही क्रिया कशी व्हावी याचे काही संकेत ठरलेले असतात. व्यक्तीने ते स्वीकारताना ‘असेच का ?’ असा विचार अवश्य करावा व त्यामागे काही विचार आहे का तेही पाहावे. अशा काही कृती उदाहरणार्थ पुढे देत आहोत. प्रसाद घेताना उजव्या हातात घ्यावा. बहुसंख्य लोकांचा उजवा हात अधिक क्रियाशील असल्याने व डाव्या हाताला काही राखीव कामे आपणच दिली असल्याने उजवा हात प्रसाद घेण्यासारख्या चांगल्या कामाला वापरावा असा संकेत पडला. शंखाला अक्षता वाहू नयेत. शंखाच्या आत अक्षता गेल्या व त्यावर पाणी पडले तर त्या कुजू शकतात, त्या फुगून शंख फुटू शकतो. म्हणून शंखाची पूजा अक्षतांविरहित करावी हे समजण्यासारखे आहे. श्राद्धामधे पिंडाला भात वापरावा. श्राद्ध म्हणजे पूर्वजांचे पूजनच होय. पूजेसाठी काही मूर्त प्रतीक डोळ्यासमोर असणे माणसाला आवश्यक वाटते. पूर्वीच्या काळी छायाचित्रे नसत त्यामुळे भात हा सर्व भारतात सहज उपलब्ध असलेला पदार्थ पिंडासाठी वापरण्यात येऊ लागला. अन्य पिठाचे पिंडही प्रसंगी चालतील.
ऐङ्गुदं बदरैर्मिश्रं पिब्याकं दर्भसंस्तरे |
तस्य राम: सुखदु:खार्तो रूदन् वचनमब्रवीत॥
(वा.रा. अयोध्याकांड 103.29)
रामायणात रामाच्या वनवासकाळात त्याला पितृनिधनाचे वृत्त समजले त्याच वेळी रामाने वडिलांचे श्राद्ध केले. बोरासारखा गर असणारे इंगुदी हे फळ वनात उपलब्ध होते. नित्यभक्षणातील इंगुदी फळांपासूनच पिंड तयार करून रामाने आपल्या दिवंगत पित्याबद्दल श्रद्धायुक्त मनाने पिंडदान म्हणजेच श्राद्ध केले!
धर्मविधींच्या बाबत अशा कित्येक बारीक सारीक कृती आहेत की ज्यांचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकच कृतीमागे काही कारण असेलच असे नाही पण ते शोधण्याचा प्रयत्न केल्यावाचून एखादी गोष्ट निरर्थक ठरवणे टाळावे. ते कारण समजून घेऊन प्रत्येक गोष्ट यथासांग करणे याला म्हणायचे क्रियाशुद्धी.
४) द्रव्य म्हणजे धर्मविधींसाठी लागणारे साहित्य. धर्मविधींमधे लागणाऱ्या विविध साहित्याचे महत्त्व शेवटी परिशिष्टामधे दिले आहे. हे साहित्य अतिशय स्वच्छ असावे. धर्मविधींसाठी तांब्या, भांडे, पळी, ताम्हन, नीरांजन, कलश, इ. उपकरणे लागतात. ती सर्व स्वच्छ, चकचकीत, घासलेली, असावीत. फुले, पत्री ताजी असावी. पाणी शुद्ध हवे. हळद, कुंकू, कापूर, धूप, समिधा, तूप, पंचामृत, अक्षता, चंदनाचे गंध अशा सर्व प्रकारच्या साहित्याचे महत्त्व समजावून घ्यावे व ते योग्य प्रकारे वापरावे म्हणजे द्रव्यशुद्धी साधेल.
पूजेसारख्या धर्मविधीमधे त्या देवतेला कोणता पदार्थ आवडेल असे आपल्याला वाटते त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा व तो प्रसाद सर्वांनी घ्यावा अशी पद्धत आहे. यामधे कृतज्ञतेचा भाव प्रकट होतो. प्रसाद मिळाला म्हणजे तो विधी पूर्ण झाला अशीही भावना असते. पंचामृत, शिरा, साखरखोबरं आणि अशाच चांगल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात आणि प्रसाद घेतात. कोणत्याही धर्मविधीत अन्य पूजासाहित्य व विशिष्ट प्रसाद प्रयत्नपूर्वक उपलब्ध करणं हे उत्तम. पण तसे होऊ शकले नाही तर भीती बाळगण्याचे कारण नाही. भाव महत्त्वाचा आहे.
धर्मविधींमधे वापरण्यात येणाऱ्या वस्त्रांना सोवळे म्हणतात. त्याचा खरं तर रेशमी वस्त्राशी संबंध नाही. स्वच्छ धुतलेले वस्त्र म्हणजे ‘सोज्ज्वल वस्त्र’ याचे रूढ रूप म्हणजे सोवळे होय. या सर्वांमधे स्वच्छतेचा भाग आहे हे लक्षात ठेवावे. त्यामुळे धुतलेले कपडे धूतवस्त्र म्हणजे सोवळे असे समजून त्याचा वापरही अवश्य करावा.
५) धर्मविधींचे मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे पुरोहित कसा असावा याबाबत आपण मागे बघितलेच आहे. पुरोहिताची मदत आवश्यक तेवढीच घ्यावी. एरव्ही ज्याचे मन पवित्र आहे, आचार शुद्ध आहे आणि ज्याला चार चांगल्या गोष्टी सांगण्याचा अधिकार आहे अशा घरातल्याच कोणी ज्येष्ठ व्यक्तीने पौरोहित्य करावे.
पूजा करणाऱ्यांनी व इतरांनीही शौचमुखमार्जनानंतर स्वच्छ स्नान करून, केस व्यवस्थित आवरून, स्वच्छ भारतीय वेशामधे धर्मविधीस यावे. भारतीय वेशाचा विशेष आग्रह असावा कारण धर्मविधींमधे त्याचे विशेष औचित्य आहे.
बाह्य शुद्धीप्रमाणेच आंतरिक शुद्धीचाही विचार केला पाहिजे.
चित्तशुद्धिविहीनस्य सर्वे शौचाः निरर्थकाः |
ज्याचे मन स्वच्छ नाही, काही विकारांनी गढूळ झाले आहे त्यांनी बाकी सारी स्वच्छता, शुद्धी केली असली तरी त्याचा काय उपयोग? हे ध्यानी घ्यावे. यासाठी म्हणून धर्मविधी अगोदर स्वतःची उपासना झालेली असणे, मन प्रसन्न असणे आवश्यक आहे.
धर्मविधी करणाऱ्याच्या मनात अमुक एक गोष्ट केली नाही तर आपले काहीतरी वाईट होईल ही भीती किंवा पूर्वापार चालत आलेली आहे म्हणून अमुक गोष्ट एकदाची उरकून टाकू यासारखे नकारात्मक भाव असू नयेत. अंतरी श्रद्धा नसतानाही बऱ्याच वेळा जननिंदेच्या किंवा अन्य भीतीपोटी धर्मविधी उरकून टाकल्याने काय साधणार?
अशा प्रकारे तयारी करून पुरोहित व यजमानांनी धर्मकृत्य करणे म्हणजे कर्तृशुद्धी होय. कर्तृशुद्धीमधे स्त्रियांनी आपल्या मासिक धर्माच्या वेळी धर्मविधीमधे भाग घ्यावा का? हा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. वैद्यकशास्त्रानुसार विचार केल्यास खरे तर मासिक धर्मामधे अनैसर्गिक असे काहीच नाही. मलमूत्रविसर्जनाइतकीच ती सहज गोष्ट आहे. ज्या स्त्रियांना हे मनोमन पटले आहे त्यांना मासिक धर्माच्या वेळीदेखील इच्छा असेल तर शुचिर्भूत होऊन धर्मविधींमधे भाग घेण्याचे स्वातंत्र्य असावे.
पूर्वीपासून मनावर झालेल्या संस्कारांमुळे किंवा शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे ज्या स्त्रियांना मासिक धर्माच्या वेळी धर्मविधीपासून दूर राहावेसे वाटत असेल त्यांनी तसा विचार केल्यास त्यात गैर नाही.
विधवा स्त्रियांना आजच्या काळातही धर्मविधींच्या प्रसंगी दुराव्याने वागवण्यात येते. मनावरच्या पूर्वापार संस्कारांमुळे त्याही धर्मविधींमधे उत्साहाने भाग घेत नाहीत. ही गोष्ट प्रयत्नपूर्वक बदलली पाहिजे, व अशा महिलांना आदरपूर्वक सहभागी करून घेतले पाहिजे.
६) विविध संस्कार, शांती, पूजा, इ. मधे संस्कृत मंत्रांचा अंतर्भाव असतो.
हे मंत्र वेदांमधील असतात. तेव्हा त्यांना वैदिक मंत्र म्हणतात. वैदिक मंत्र उदात्त, अनुदात्त, स्वरित, इ. विशिष्ट स्वरात म्हणायचे असतात. ते स्वर हाताने व मानेनेही सूचित केले जातात. अखिल भारतात ते स्वरांसह मुखोद्गत करून जतन करण्यात आले आहेत. विशेष शिक्षणाशिवाय ते उच्चार शक्य होत नाहीत. तसे विशेष शिक्षण झालेले नसले तरी स्पष्ट, शुद्ध, लयबद्ध रीतीने ते म्हणण्यास हरकत नाही.
याशिवाय काही मंत्र पुराणे, स्मृती इ. मधून घेतलेले असतात. त्यांना पौराणिक मंत्र म्हणतात. शुद्ध उच्चारांचे नियम पाळून ते स्पष्ट, मोठ्या आवाजात म्हणणे आवश्यक आहे.
याशिवाय काही मंत्र असे असतात की ज्यांचे मूळ माहीत नसते किंवा काही वेळा लोकभाषेतच धर्मविधी संपन्न होतात उदा. सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीत वधूवरांचा मराठीतून संवाद हेच मंत्र असतात. वनवासी समाजातील विवाहविधी त्यांच्यातीलच ढवळारी नामक अनुभवी महिला त्यांच्या बोलीतील मंत्र म्हणत पार पाडते. या मंत्रांना लौकिक मंत्र म्हणतात. लौकिक मंत्र संस्कृतात किंवा लोकभाषेतही असतात.
वैदिक, पौराणिक किंवा लौकिक मंत्र स्पष्ट, शुद्ध, मोठ्या आवाजात म्हणणे म्हणजे मंत्रशुद्धी. पुरोहितांनी मंत्र सांगून मागून ते उपस्थितांनी म्हणावेत व पुरोहितांनी मंत्रार्थ समजावून सांगावा.
मंत्रांच्या बाबत संस्कृत भाषेचा आग्रह धरला पाहिजे. संस्कृत ही भारतीय संस्कृतीची भाषा आहे. म्हणूनच ‘संस्कृतिः संस्कृताश्रिता|’ असे म्हटले जाते. भारतामधे राष्ट्रीय एकात्मतेची जी साधने आहेत त्यात संस्कृतचे स्थान महत्त्वाचे आहे. सर्व देशी भाषांना शब्दसंग्रह देणे, नवीन शब्द घडवण्याचे तंत्र देणे आणि आधुनिक विज्ञानाचीही परिभाषा रूढ करणे हे काम संस्कृत समर्थपणे करू शकते. अशी ही संस्कृत भाषा टिकवण्याचे धर्मविधी हे एक माध्यम आहे. देशभर धर्मकृत्यांचा संकल्प हा संस्कृतातच केला जातो. ते एकात्मतेचे साधन टिकवून त्याबरोबर लोकभाषेतील अर्थ सांगणे हे आपले काम आहे.
३. ज्ञान प्रबोधिनीची संस्कार विषयक सूत्रे
धर्मविधी करताना खालील तत्त्वे अवश्य पाळली जावीत असे वाटते.
अ) सार्थता – आज सर्वत्र चालू असणारे धर्मविधी पाहिले तर त्यातील विविध कृतींचा आणि त्याबरोबर म्हणण्यात येणाऱ्या मंत्रांचाही अर्थ समजावून घेण्याच्या वा देण्याच्या भानगडीत पडताना कोणी दिसत नाही. केवळ कर्मकांड आणि शब्दनिष्ठता यावर सारा भर देऊन आपण अर्थगर्भ असे सारे धर्मविधी जणू अर्थहीन करून टाकले आहेत.
त्यामुळे धर्मविधींमधे अर्थ भरण्याचे काम आपल्याला सर्वप्रथम करावे लागेल. कोणताही धर्मविधी त्यातील विविध कृतींचा व मंत्रांचा अर्थ समजावून घेत केला गेला पाहिजे. पुरोहितांना तो सांगता आला पाहिजे व यजमानांनी त्याचा आग्रह धरला पाहिजे.
आ) सामूहिकता – कोणताही धर्मविधी, संबंधित सर्वांनी एकत्र येऊन सामूहिकपणे करावा. छापील पोथ्यांमधे पाहून सर्वांनी पुराहितांपाठोपाठ मंत्र म्हणावेत. धर्मविधींमधे शुभेच्छायुक्त, सद्भावनापूर्वक सहभागी व्हावे. मंत्रांचा अर्थ वाचणे, आशीर्वाद देणे, अभिषेक करणे, इ. कृतींत सहभागी व्हावे. वैयक्तिकता कमी करून सामूहिकता, संघटितपणा वाढवणे, सहविचार संवर्धित करणे हे हिंदू समाजास अत्यंत आवश्यक आहे.
इ) शिस्त – कोणताही धर्मविधी ठरलेल्या वेळेवर सुरू झाला पाहिजे. वेळेच्या शिस्तीप्रमाणेच पादत्राणे ओळीत काढणे, ओळीत बसणे, गोंगाट न करणे, सर्व तयारी आधीपासून केलेली असणे हे सर्व शिस्तीत येते. अन्त्येष्टी /श्राद्धासारखे विधी असल्यास प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वर्तन करावे. मात्र ही शिस्त कोरडी;
कोणी बाहेरून लादलेली नसावी. आनंदी, उत्साही व प्रसन्न वातावरण राखावे.
ई) समभाव – स्त्री आणि पुरूष तसेच कोणत्याही समाजगटात जन्माला आलेली व्यक्ती यांना सर्व धार्मिक कृत्यांमधे आदरपूर्वक सहभागी करून घेणे.
उ) स्वयंपौरोहित्य – पुरोहिताच्या मार्गदर्शनाने संस्कारविधी करणे या जोडीनेच स्वतःच्या कुटुंबात धर्मविधी करताना आपण त्याचे पौकरोहित्यही करायला शिकणे स्वगतार्ह आहे.
परिवर्तनीयतेच्या परंपरेला धरून स्थलकालानुरूप असे अर्थगर्भ धर्मविधी सर्वत्र प्रचलित होवोत, प्रत्येक धर्मविधीमधून काही चांगले विचार समाजापर्यंत पोहोचोत आणि या धर्मविधींच्या पलिकडचाही जो खरा ‘धर्म’ आहे (माणसामधे मूलतःच असलेले दिव्यत्व आविष्कृत करणे ) त्याकडे आपणां सर्वांची वाटचाल होवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !