२. षोडश संस्कार
सम् उपसर्ग असलेल्या ‘कृ’ या धातूपासून संस्कार हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ चांगले करणे, शुद्ध करणे, सुंदर करणे असा होतो. हा अर्थ आपल्याला एका उदाहरणावरून समजून घेता येईल. खाणीतून जेव्हा सोने काढले जाते तेव्हा ते शुद्ध स्वरूपाचे नसते. त्यामधे हीण मिसळलेले असते. या सोन्यावर अग्निसंस्कार करून त्यातील हीण काढून टाकून त्याला उजाळा दिला जातो. यालाच म्हणतात इष्ट ते परिवर्तन. इष्ट ते परिवर्तन या अर्थी संस्कार शब्द वापरला जातो. असे परिवर्तन कशामुळे घडून येत असते? एखाद्या वस्तूतील दोष काढून टाकून त्या जागी चांगल्या गुणांची पेरणी केल्यामुळे. यालाच दोषापनयन (दोष दूर करणे) आणि गुणाधान (गुण निर्माण करणे) असे म्हटले आहे. वर आपण खाणीतून काढलेल्या सोन्याचे उदाहरण घेतले. त्यामधे अग्निसंस्कारामुळे हीण जळून जाणे हे झाले दोषापनयन आणि सोन्याच्या रंगाला अधिक उजाळा मिळणे हे झाले गुणाधान.
तंत्रवार्तिकामधील व्याख्येत ‘इष्ट ते परिवर्तन’ याला ‘योग्यता’ म्हटले आहे.
योग्यतां च आदधानाः क्रियाः संस्काराः इत्युच्यते | (तंत्रवार्तिक, पृष्ठ १३७८)
योग्यता प्राप्त करून देणाऱ्या क्रियांना संस्कार असे म्हणतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला अशी योग्यता प्राप्त करून देणे, व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकसन घडवून आणणे आणि त्याला एक उंची प्राप्त करून देणे हाच या संस्कारांमागचा उद्देश आहे.
संस्कारांसंबंधी आपली कल्पना केवढी उदात्त आहे हे खालील वचनावरूनही दिसून येईल –
चित्रकर्म यथानेकैः रङ्गैः उन्मील्यते शनैः |
मानव्यमपि तद्वत् स्यात् संस्कारैः विधिपूर्वकैः ॥
(पाराशर गृह्यसूत्रावरील हरिहरभाष्य, पान 260 )
वेगवेगळ्या रंगांच्या योगाने हळूहळू चित्र जसे आकारास येत जाते त्याचप्रमाणे माणूसपण हेही पद्धतशीरपणे केलेल्या संस्कारांनी क्रमाक्रमाने उमलत जाते.
एखादे चित्र हे साधे रेखाचित्र असण्यापेक्षा त्यात रंग वापरले जातात त्यावेळी ते निश्चितच खुलून दिसते. माणसाचे आयुष्यसुद्धा एक चित्रपटच आहे. जीवन हे सरळ, साधे रेखाचित्राप्रमाणेही जगता येते. परंतु त्यात जर संस्काररूपी रंग भरले तर जीवनातील शोभा नक्कीच वाढते. जीवन अधिक उदात्त, उन्नत आणि उत्तम बनू शकते. चित्रात रंग भरताना अनुकूल रंगसंगती साधणे हे महत्त्वाचे असते. तसे हे संस्कारही योग्य वेळी, योग्य रीतीने केले जाणे आवश्यक आहे. अशा संस्कारांनी व्यक्तिमत्त्व विकसता विकसता विकसत जावे, पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे प्रवास व्हावा अशी संकल्पना आहे.
संस्कार हा संस्कृतीचा कृतिरूप उन्मेष होय असे म्हटले जाते. बहुटेक लोक सर्व संस्कृतींमधे कौटुंबिक जीवनात अपत्यजन्म, विवाह, देहावसान यांसारख्या घटना संस्कारांनी बांधलेल्या दिसतात. अतिशय उदात्त आणि मनोरम आशय या संस्कारांतून व्यक्त केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक व आध्यात्मिक संदर्भही या संस्कांरांमधून प्रकट होऊ शकतो. समाज व व्यक्तीच्या विकासाला पोषक अशी मूल्ये संस्कारांमधून प्राप्त होतात. हिंदू जीवनपद्धतीत अशा सोळा संस्कारांची गुंफण पूर्वी केलेली होती.
संस्कारांची संख्या नक्की किती याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथांमधे पुष्कळ मतभेद आहेत. गौतम धर्मसूत्रांमधे म्हटले आहे –
चत्वारिंशत् संस्काराः अष्ट आत्मगुणाः |
चाळीस संस्कार आणि आठ आत्मगुण मिळून अठ्ठेचाळीस संस्कार होतात. हे आठ आत्मगुण कोणते ?
दया सर्वभूतेषु क्षान्तिरनसूया शौचमनायासो माङ्गल्यमकार्पण्यमस्पृहेति |
दया, क्षमा, अनसूया (कोणाचाही मत्सर न करणे), शौच (अंतर्बाह्य पावित्र्य), अनायास (अनावश्यक कामासाठी वृथा कष्ट न घेणे), मांगल्य (आनंदी वृत्ती) अकार्पण्य (उदारता), अस्पृहा (दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा न धरणे) हे आठ आत्मगुण होत.
चाळीस संस्कारांबरोबर या आठ आत्मगुणांना स्थान देऊन असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीवर सर्व संस्कार होऊनही तिच्यात आत्मगुणांचा अभाव असेल तर ते संस्कार व्यर्थ होत. याउलट एखाद्या आत्मगुणसंपन्न व्यक्तीवर एखाददुसराच संस्कार झाला असेल तरी ती व्यक्ती श्रेष्ठ होय.(संस्कार – भारतीय संस्कृति कोश, खंड ९, पान क्र. ५६३, संपादक – पं. महादेवशास्त्री जोशी )
हे अठ्ठेचाळीस संस्कार कमी होत होत ही संख्या सोळावर आली. या संस्कारांचे वर्गीकरण सामान्यतः पुढीलप्रमाणे करता येईल.
१) जन्मपूर्व संस्कार – गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन
२) बाल्यकालीन संस्कार – जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकरण, कर्णवेध
३) शैक्षणिक संस्कार – विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ, केशान्त, समावर्तन
४) विवाह
५) अन्त्येष्टी
(हिंदू संस्कार- श्री.राजबली पांडेय- मोतीलाल बनारसीदास प्रकाशन)
या संस्कारांचे स्वरूप बघितले तर यात मानवी जीवनाचा सखोल विचार केलेला दिसेल. माणसाच्या जन्माच्या आधीपासून ते मरणानंतरही हे संस्कार होत असतात.
बालकाच्या जन्माला कारणीभूत अशा स्त्रीपुरुषांच्या एकत्र येण्याच्या क्रियेपासूनच संस्कारांची सुरुवात होते. गर्भस्थापना झाली की मूल गर्भात असतानाच त्याच्यावर नकळत संस्कार होत असतात. या जन्मपूर्व संस्कारांमधे मुलाच्या आईला आनंद मिळेल अशाही गोष्टी असतात. तिच्या प्रसन्न वृत्तीचा सुपरिणाम मुलाच्या वृत्तीवर होत असतो. मुलाचा जन्म, त्याला त्याच्या नावाने संबोधणे, त्याचे पहिल्यांदा घराबाहेर पडणे, त्याने पहिल्यांदा अन्न ग्रहण करणे, त्याचे जन्मतः असलेले केस काढणे, कान टोचणे, इ. सर्व प्रसंग कुटुंबियांच्या दृष्टीने कौतुकाचे असतात. पण या प्रसंगांना नुसतेच सोहळ्याचे रूप न देता संस्कारांच्या चौकटीत त्यांना बसवले आहे. पुढे मूल मोठे झाल्यावर त्याच्या प्राथमिक शिक्षणाचा घरीच प्रारंभ होतो. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम अशा चार आश्रमांमधे शतवर्षीय जीवनाची विभागणी केलेली होती. ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करून माध्यमिक शिक्षणाला प्रारंभ करण्यापूर्वी त्याला काही व्रते घ्यावी लागतात. शिक्षण चालू असेपर्यंत ती पाळावी लागतात. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर या व्रतांचा समारोप करूनच त्याने विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा असतो. विवाहप्रसंगीदेखील त्याने काही व्रते घेऊन ती पुढे पाळावीत अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संस्कारांची योजना केली आहे असे दिसते. मृत्यूनंतरही हे संस्कार चालू असतात. कारण देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही अशी हिंदू विचारसरणी आहे आणि निर्जीव देह नष्ट करतानादेखील त्याच्याविषयी आदर राखला पाहिजे अशी कल्पना आहे.
सर्वसाधारणपणे विविध मंत्रांचे उच्चार, त्यानुसार काही आचार आणि या दोन्हींबरोबर उत्पन्न होणारे काही चांगले विचार अशा त्रिविध गोष्टींचा समावेश संस्कारविधीत होतो. यावरून लक्षात येईल की संस्कार हे केवळ एक बाह्य कर्मकांड या स्वरूपात आचरणे एवढीच त्यामागील कल्पना नाही तर या संस्कारांचा परिपाक नैतिक गुणांच्या अभिवृद्धीत व्हावा अशीच अपेक्षा आहे. म्हणूनच संस्कारांप्रमाणेच जीवनातील प्रत्येक पायरीसाठी व्यवहाराचे नियमही धर्मशास्त्रांनी निर्धारित केले. त्यात व्यक्तीच्या नैतिक विकासाचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतात. संस्कारांनी उत्पन्न होणाऱ्या नैतिक गुणांतून संस्कार्य व्यक्तीचा आध्यात्मिक विकास घडावा अशीही अपेक्षा असते. अशा प्रकारे हे संस्कार म्हणजे आध्यात्मिक विकासाच्याच पायऱ्या मानल्या गेल्या आहेत. (संस्कार – भारतीय संस्कृति कोश खंड ९, पान क्र. ५६६, संपादक पं. महादेवशास्त्री जोशी)
अशा सोळा संस्कारांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ.
अ) जन्मपूर्व संस्कार
१. गर्भाधान
ज्या संस्कारामुळे स्त्रीच्या ठिकाणी गर्भाची धारणा होते त्याला गर्भाधान असे म्हणतात. पतिपत्नींनी पितृत्व व मातृत्व प्राप्त करून घेण्यासाठी हा विधी करावयाचा असतो. गर्भधारणा या नैसर्गिक क्रियेला पवित्र अशा संस्काराच्या स्तरावर नेऊन ठेवले आहे ही गोष्ट येथे महत्त्वाची आहे.
ज्या स्त्रीच्या ठिकाणी गर्भाची स्थापना करावयाची ती तो धारण करण्यास सक्षम असावी, गर्भपात न व्हावा किंवा गर्भधारणा होत नाही असेही न व्हावे. गर्भाशयातील दोष दूर होऊन पावित्र्य उत्पन्न व्हावे, गर्भवती स्त्री व गर्भ या दोघांचेही रक्षण व्हावे अशा हेतूने या संस्काराची योजना केली जाते.
या संस्कारातील प्रमुख विधी म्हणजे पती आपल्या ऋतुस्नात पत्नीला गर्भाधानासाठी आवाहन करतो. तिच्या ठिकाणी गर्भ प्रस्थापित करून देवदेवतांची मंत्रांनी प्रार्थना करतो.
या संस्काराचे गर्भवती व गर्भ दोघांच्याही दृष्टीने महत्त्व आहे. सुप्रजाजननशास्त्राचाच हा एक विचार आहे असे म्हणता येईल. हा विधी आता क्वचितच केला जातो.
२. पुंसवन
पुत्र जन्माला यावा या इच्छेने जो संस्कार केला जातो त्याला ‘पुंसवन’ असे म्हणत असत. पुत्र असावा ही जुन्या काळातील लोकांची उत्कट इच्छा असे. युद्ध, शेती व अन्य कामांसाठी वीर पुत्रांची गरज भासे. त्यामुळे पुत्रजन्माचे महत्त्व अधिक होते. त्यामुळे पुंसवन हा संस्कार रूढ झाला असावा.
आधुनिक काळामधे केवळ मुलगाच व्हावा म्हणून एखादा संस्कार करणे हे पटण्यासारखे नाही हे खरे. मात्र पौरुषपूर्ण संतती व्हावी ही इच्छा मनात असावी व त्या अर्थाने या विधीकडे पाहावे.
गर्भाची धारणा नीट व्हावी, गर्भपात, गर्भविकृती यांसारखे अरिष्ट न ओढवता गर्भाची योग्य प्रकारे वाढ व्हावी, गर्भवती स्त्रीचेही रक्षण व्हावे हे या संस्काराचे प्रयोजन दिसते.
या संस्कारात पती आपल्या गर्भवती पत्नीच्या नाकपुडीत वटवृक्षाच्या मुळ्यांचा रस पिळतो. एक घडा भरून तिच्या मांडीवर ठेवतो व तिच्या उदराला स्पर्श करून काही मंत्र म्हणतो.
गर्भवती स्त्रीची ओटी भरण्यासारखे काही विधी आज केले जातात. त्याचे मूळ या संस्कारात दिसते. पुंसवन हा संस्कार आता कालबाह्य झाला आहे.
- सीमन्तोन्नयन
‘सीमन्त’ म्हणजे भांग आणि ‘उन्नयन’ म्हणजे वर नेणे. ज्या संस्कारामधे पती आपल्या गर्भवती पत्नीच्या कपाळापासून वर भांग पाडीत जातो त्याला सीमन्तोन्नयन म्हणतात.
गर्भवती स्त्रीला स्वास्थ्य व आनंद लाभावा, तिच्या आनंदी वृत्तीचा चांगला परिणाम गर्भावर व्हावा, गर्भाला दीर्घायुष्य लाभावे हे या संस्काराचे प्रयोजन दिसते.
या संस्कारामधे पतीने आपल्या गर्भवती स्त्रीच्या केशरचनेत सहभाग घ्यावा व तिला औदुंबर वृक्षाची म्हणजे उंबराची फांदी देऊन काही मंत्र म्हणावेत असा विधी सांगितला आहे. उंबर हा क्षीरवृक्ष आहे. त्याची काडी मोडल्यास दुधासारखा चीक येतो. असे वृक्ष पवित्र मानले असून त्याच्या काड्या यज्ञामध्ये आहुती म्हणून अर्पण केल्या जातात. वड, पिंपळ, रूई इ. वृक्ष तोडू नयेत असे त्यामुळेच मानले जाते. उंबराला विपुल फलधारणा होते अत्यंत औषधी असा हा वृक्ष आहे. त्यामुळे प्रतीकात्मक पद्धतीने त्याचा उपयोग येथे सांगितला आहे.
हल्लीच्या काळातील डोहाळजेवणासारख्या विधींचे मूळ यात असावे. यात गर्भवती स्त्रीच्या मनाची प्रसन्नता हा मुख्य उद्देश असून भावात्मक विचार करणे, प्रसन्न, आशावादी राहाणे, मंगल गोष्टींचे चिंतन करणे याचा गर्भावर अनुकूल परिणाम होतो हे सर्वमान्यच आहे. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ (लेखक – डॉ. ह. वि. सरदेसाई) यासारखी पुस्तके गरोदरपणी वाचणे हे खूपच चांगले.
ब) बाल्यकालीन संस्कार
४. जातकर्म
मूल जन्मताच, नाळ कापण्यापूर्वी, त्याच्या वडिलांनी करावयाचा संस्कार म्हणजे ‘जातकर्म’. गर्भात असताना उत्पन्न झालेले नवजात अर्भकाचे दोष नष्ट व्हावेत, त्याची बुद्धी व आयुष्य वाढावे हे या संस्काराचे प्रयोजन दिसते.
या संस्कारामधे पिता-पुत्राचे मुखावलोकन करून त्यानंतर तूप व मध एकत्र करून त्यात सोने उगाळून ते मिश्रण मुलाला चाटवतो. त्यानंतर तो मुलाच्या कानामधे आयुष्यवर्धक मंत्र म्हणतो. अश्मा भव | परशुः भव | ‘तू दगडाप्रमाणे दणकट हो. तुझी बुद्धी परशुप्रमाणे धारदार बनो.’ असे त्या अर्भकास म्हणून मग त्याची नाळ कापण्यात येई. या मंत्राचा आशय आजही कालबाह्य होऊ नये असाच आहे. तो आईवडिलांनी अपत्याशी बोलताना अवश्य वापरावा असा आहे. मग ते अपत्य मुलगी असो वा मुलगा. त्याने वा तिने स्वसंरक्षणक्षम व्हायचे तर त्यांच्यात टणकपणा यावा म्हणून ‘अश्मा भव |’ म्हणायचे व बुद्धी तर धारदार व्हावी म्हणून ‘परशुः भव|’ हेही म्हणायचे असते.
अपत्यजन्म हा कुटुंबातील आनंदाचा प्रसंग खराच! आदिमकाळापासून आधुनिक काळापर्यंत हा प्रसंग विविध प्रकारांनी साजरा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. जातकर्म संस्कार हा त्याच प्रयत्नाचा आविष्कार होय. आधुनिक काळात प्रसूती प्रायः रुग्णालयात होऊ लागली आहे. त्यामुळे हा संस्कार केवळ स्मृतिशेष झाला आहे. तरीही घरी आल्यावर अपत्यावर हा संस्कार का करू नये? तूप हे जीवनाला बलसंपन्न करते. मध म्हणजे हजारो फुलांमधील एकत्र केलेली फलशर्करा असते. सोने हे वर्ण उजळून टाकणारे मौल्यवान खनिज आहे. म्हणूनच आयुर्वेदाने या तीनही द्रव्यांचा उपचारात विपुल उपयोग सांगितलेला आहे.
५. नामकरण
व्यवहाराच्या सोयीसाठी अर्भकाला विशिष्ट नाव देण्याचा जो संस्कार केला जातो त्याला बारसे किंवा नामकरण असे म्हणतात. सर्व जगभर हा संस्कार या ना त्या प्रकारे होत असतोच.
नवजात अर्भकाच्या दोषांचा परिहार होऊन त्याचे आयुष्य वाढावे व त्याला व्यवहारामधे विशिष्ट नावाने संबोधण्याची सुरुवात व्हावी हे या संस्काराचे प्रयोजन आहे.
नामकरणानिमित्त काही समारंभ हल्ली होत असला तरी नामकरणाचा जो धार्मिक विधी सांगितलेला आहे तो आज दिसत नाही. नामकरणाचा विधी असा – पिता धान्यामधे शिशूचे नाव लिहितो व मातेच्या मांडीवरील शिशूच्या कानात ते उच्चारतो. यात काही आशीर्वादपर मंत्रही म्हटले जातात. आता जातकर्मातील मंत्रच येथे म्हणावा.
नाव कसे असावे याचाही तपशीलवार विचार धर्मशास्त्रीय ग्रंथांमधे केला आहे. उच्चारण्यास सोपे, मांगल्यसूचक, अर्थपूर्ण नाव असावे असे यात म्हटले आहे. अपत्य कसे असावे याचा विचार करून तदनुरूप नाव ठेवण्याचा विचार होऊ शकतो. भारतीय संस्कृती विषयी आदर ज्यातून व्यक्त होईल असे नाव असावे.
एके काळी नामकरण जन्मानंतर बाराव्या दिवशी केले जात असल्याने नामकरणास बारसे म्हणण्यात येऊ लागले.
६. निष्क्रमण
मूल जन्मल्यानंतर पहिले काही महिने ते घरातच असते. थोडे मोठे झाल्यावर त्याला पहिल्यांदाच घराबाहेर नेण्याचा जो संस्कार होतो त्याला ‘निष्क्रमण’ असे म्हणतात.
निष्क्रमणाआधी नामकरण संस्कार झालेला असते. लहान मूल स्वतःच्या विशिष्ट नावाने बाहेरच्या जगात प्रवेश करते . या घटनेचे त्याच्या आयुष्यात नक्कीच महत्त्व आहे. त्या मुलाला दीर्घायुष्य, सौख्य, समृद्धी लाभावी अशी इच्छा करून त्याला बाहेरच्या जगाचे दर्शन घडवणे हे या संस्काराचे प्रयोजन आहे.
मुलाला वस्त्रालंकार घालून मंगल वाद्यांच्या गजरात, मंत्रपठण करत घराबाहेर नेणे व त्याला सूर्यदर्शन व देवदर्शन करवून परत आणणे असा हा विधी आहे. ही रीत आजही कुठेकुठे दिसून येते. कुटुंबजीवनात आनंदनिधान बनलेल्या त्या व्यक्तीचे क्षेत्र व्यापक होऊन या संस्कारापासूनच व्यक्तीच्या सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो.
७. अन्नप्राशन
अन्न खाण्या-पचविण्याची क्षमता येईपर्यंत तान्ह्या मुलाचे पोषण पहिले काही महिने आईच्या दुधावरच होते. त्यानंतर बाहेरचे पोषक अन्न द्यायला सुरुवात करताना ‘अन्नप्राशन’ संस्कार करतात.
मुलाला दीर्घायुष्य, तेज, बल प्राप्त हेोणे हे या संस्काराचे प्रयोजन सांगितले आहे.
काही मंत्रपठण करत पिता मुलाला खीर वा तत्सम गोड द्रव पदार्थ भरवतो असा हा विधी आहे. आजच्या काळात उष्टावणासारख्या विधींच्या स्वरूपात हा संस्कार आढळतो.
मुख्य विधीनंतर मुलापुढे शस्त्र, पुस्तक, वस्त्र, इ. विविध वस्तू मांडून, मूल ज्या वस्तूला स्पर्श करेल त्यावर तो उपजीविका करेल असे समजण्याची एक पद्धत पूर्वी प्रचलित होती. मुलाची अभिवृत्ती ओळखण्याची ती जुनी रीत होती असे म्हणावे लागेल. पुढे त्या अपत्याने जीवनात काय बनावे असे पालकांना वाटत असेल तसे घरचे वातावरण राहावे असा प्रयत्न करावा असे वाटते.
८. चूडाकरण
चूडा म्हणजे शिखा किंवा शेंडी. मुलाच्या डोक्यावरील जन्मतः असलेले केस काढून फक्त बारीकशी शेंडी ठेवली जाते. हाच ‘चूडाकरण’ संस्कार होय. जन्मास आलेले प्रत्येक मूल समजू लागेपर्यंत वडिल मंडळींच्या अधीन असते. विशेषतः आईवडिल त्या अर्भकास वळण लावत असतात. त्यापैकी केस हे विशेष प्रकारे वळण देण्यास अधिक अनुकूल असल्याने जावळ करण्याच्या विधीस महत्त्व येते. अर्थात् यामध्ये पूर्वी जशा पाचपाच शेंड्या ठेवत तसे कोणी करणार नाही. केवढे केस आले म्हणजे ते कापावेत याचा निर्णय आईवडिल यांच्या अधीन असतो. त्यात बहिरंगविचार अधिक असल्याने काही मंत्र म्हणून हा संस्कार व्हावा असे काही नाही. अपत्यास निसर्गतः लाभलेले केस हवे तसे, हवे तेवढे, हवे तेव्हा कापणे यात मंत्र-तंत्राची काही आवश्यकता आहे असे पालकांनाही वाटत नसल्याने हा एक संस्कार म्हणून मानण्याचेही कारण दिसत नाही.
९. कर्णवेध
लहान मुलाचे कान टोचण्याचा जो संस्कार केला जातो त्याला ‘कर्णवेध’ म्हणतात. मुलाला दीर्घायुष्य व आरोग्य प्राप्त व्हावे हे या संस्काराचे प्रयोजन आहे.
या संस्कारात पिता मुलाच्या दोन्ही कानांना स्पर्श करून काही मंत्र म्हणतो व नंतर त्याचे कान टोचले जातात. आज यातही केवळ सोनाराचे काम बाकी आहे. केवळ तंत्र शिल्लक आहे. ही पद्धत सार्वत्रिक आहे. अलंकार घालण्यासाठीही कान टोचलेले असावे लागतात. कान टोचलेले असणे हे एके काळी हिंदुत्वाचे लक्षण होते. यावरूनच विन्ध (ज्यांचे कान टोचलेले आहेत ते हिंदू) व अविन्ध (ज्यांचे कान टोचलेले नाहीत ते अहिंदू) असे शब्दप्रयोग रूढ होते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने कर्णवेधाचे महत्त्व समजावून घ्यावे. अपत्याची सोशिकता वाढवणारा हा विधी आहे. आईला तिचे मनही या प्रसंगी घट्ट करावे लागते.
क) शैक्षणिक संस्कार
१०. विद्यारंभ
यापुढील पाच संस्कार हे शैक्षणिक संस्कार आहेत. मुलाच्या प्राथमिक शिक्षणाला प्रारंभ करणे म्हणजे विद्यारंभ संस्कार. हा उपनयनाच्या अगोदर होत असे.
मुलाच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात करणे हेच याचे प्रयोजन होय.
मुलाला मंगल स्नान घालून नंतर त्याच्याकडून
श्री गणेशाय नमः | श्री सरस्वत्यै नमः | ॐ नमः सिद्धम् |
अशी वाक्ये लिहून घेणे व मंत्रपूर्वक त्याला आशीर्वाद देणे असा विधी असे. श्रीगणेशा करणे म्हणजे काही चांगल्या कार्याचा शुभारंभ करणे म्हणजेच
श्रीगणेशाय नम: | ॐ नम: सिद्धं | इ. चा पुढे अपभ्रंश झाला. ‘ओनोमासीधम् ’ लेखनकला अस्तित्वात आल्यानंतरचाच हा धर्मसंस्कार असल्याने काही धर्मशास्त्रकारांनी याला स्वतंत्र संस्कार न मानता उपनयनापासूनच शिक्षणास प्रारंभ मानलेला आहे. लेखन, वाचन इ. प्राथमिक गोष्टींचा परिचय व्हावा म्हणून आजही प्राथमिक शाळेच्या प्रवेशाच्या प्रसंगी याचा उपयोग करून घेता येईल.
११. उपनयन
विद्यारंभ हा संस्कार म्हणजे मुलाच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ तर उपनयन म्हणजे त्याच्या माध्यमिक शिक्षणाचा प्रारंभ होय.
गृह्योक्तकर्मणा येन समीपं नीयते गुरोः |
बालो वेदाय तद्योगाद् बालस्योपनयं विदुः ॥
(उपनयन – भारतीय संस्कृति कोश खंड १, पान क्र. ६५८ संपादक पं. महादेवशास्त्री जोशी)
गृह्यसूत्रांमधे सांगितल्याप्रमाणे मुलाला वेदाध्ययनासाठी गुरुंजवळ नेले जाते. या विधीला ‘उपनयन’ असे म्हणतात. उप म्हणजे (गुरुंच्या) जवळ, नयन म्हणजे नेणे. उपनयनामुळे बटूचा ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश होतो. उपनयनामध्ये ब्रह्मचर्याश्रमातील व्रतांचा उपदेश केला जातो म्हणून या विधीला व्रतबंध असेही म्हणतात. या विधीत व्रतांचे बाह्यचिह्न म्हणून मुंज नावाच्या गवताची मेखला, करदोटा बटूच्या कमरेला बांधण्यात येत असल्याने मौंजीबंधन असेही या विधीचे नाव आहे.
बटूला द्विज (म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला) हे अभिधान लाभून वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी हा संस्कार केला जातो. हा संस्कार म्हणजे जणू त्या बटूचा दुसरा जन्मच होय. मनुस्मृतीमधे म्हटले आहे –
तत्र यद् ब्रह्मजन्मास्य मौञ्जीबन्धनचिह्नितम् |
तत्रास्य माता सावित्री पिता त्वाचार्य उच्यते॥ (मनुस्मृती 2-170)
ब्रह्मचाऱ्याच्या या ब्रह्मजन्माचे चिह्न म्हणजे मुंज तृणाची मेखला होय. या जन्मात सावित्री (गायत्री मंत्र) ही त्याची माता आणि आचार्य हा पिता होय.
मुंज, उपनयन, दीक्षेसारखा विधी सर्व धर्मामधे आढळून येतो. ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा, पार्शी लोकांची कुश्ती, मुसलमानांची सुंता ही त्याचीच रूपे होत. पारश्यांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचाही मुंजीसारखाच विधी करून त्यांना जानवे घातले जाते. पण ते कमरेमधे अडकवलेले असते.
मुंजीने ज्याप्रमाणे माणसाचा दुसरा जन्म होतो आणि त्याला द्विजत्व प्राप्त होते त्याप्रमाणे ख्रिश्चन धर्मातदेखील दीक्षेतून द्विजत्व प्राप्त होते असे दिसते. उदा. बायबलमधे Except a man be born again, he cannot see the kingdom of God (St. John Bartisma, chapter 3-3) असे म्हटलेले आहे. म्हणजेच बाप्तिस्म्यामुळे पुनर्जन्म होतो असे स्पष्ट म्हटलेले आहे.
उपनयन संस्कारामधे प्रथम संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, आदि सुरुवातीचे विधी करण्यात येतात. त्यानंतर अग्नीमध्ये आहुती देऊन बटूला यज्ञोपवीत, दण्ड, मेखला अशी ब्रह्मचर्याची बाह्यचिह्ने दिली जातात. त्यानंतर सूर्यदर्शन, अवक्षारण, हृदयालंभन असे काही विधी केले जातात. होमाचे उत्तरांग व संस्थाजप झाल्यानंतर आचार्य बटूला गायत्रीमंत्राची दीक्षा देतात. “तू ब्रह्मचारी आहेस, ब्रह्मचर्याचे पालन कर. दिवसा झोपू नकोस. नित्यनियमाने वेदाध्ययन कर.” अशा प्रकारचा उपदेश बटूला केला जाई.
अशा प्रकारे उपनयन विधी पूर्ण झाल्यावर ब्रह्मचाऱ्याला तीन दिवसपर्यंत जेवणातले आंबट-तिखट वर्ज्य करणे, रात्री जमिनीवर निजणे अशा प्रकारचे कडक नियम पाळावे लागत असत. त्याला ‘त्रिरात्र व्रत’ म्हणतात. आश्रमात जाऊन गुरूगृही राहणे, कष्ट करणे अशा जीवनासाठी ही व्रते आवश्यकच दिसतात.
याशिवाय धारणाशक्ती हा बुद्धीचा पैलू विकसित व्हावा या उद्देशाने मेधाजनन नावाचा विधीही या संस्काराच्या शेवटी केला जातो.
उपनयन हा अतिशय महत्त्वाचा संस्कार असूनही आज फक्त काही ब्राह्मणांमधेच आणि तोही फक्त मुलांचाच केला जातो.
पुराकल्पे तु नारीणां मौंजीबंधनमीरितम् | (कूर्मपुराण )
पुराकल्पे कुमारीणां मौंजीबंधनमिष्यते |
अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा॥ (यमस्मृती)
यासारख्या उल्लेखावरून तो मुलींसाठीही केला जात असे हे लक्षात येते. आजच्या काळात सर्व जाती-जमातींची मुले-मुली विद्याध्ययन करत असतात. त्यामुळे सर्व जाती-जमातींतील मुलांचे व मुलींचेही उपनयन अवश्य झाले पाहिजे. मात्र आजच्या काळात गुरूंच्या जवळ जाऊन राहाणे शक्य नसल्याने या संस्कारात कालानुरूप बदलही करावे लागतील. स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाने व त्यानंतर महाराष्ट्रात धर्मनिर्णय मंडळाने सर्व जाती-जमातींच्या मुलामुलींना उपनयनाचा अधिकार दिला आहे. स्वामी दयानंदांनी उपनयन व यज्ञोपवीत हे कर्मकांड असूनही ते स्वीकारले व स्त्रीशूद्रांनाही ते देऊ केले. ज्ञान प्रबोधिनीनेही उपनयन संस्कारामागची कल्पना घेऊन विद्याव्रत संस्कार रूढ केला आहे.
१२. वेदारंभ
उपनयनानंतर लगेच शिष्याच्या वेदाध्ययनास प्रारंभ होत नसे. उपनयनानंतर गुरुगृही राहून अन्य गोष्टी शिकल्यानंतर काही काळाने वेद शिकण्यास प्रारंभ करण्यापूर्वी जो संस्कार केला जातो त्याला ‘वेदारंभ’ असे नाव आहे.
वेदाध्ययनाचा अधिकार मिळणे हे याचे प्रयोजन होय. या संस्कारामधे विद्यार्थ्याला ज्या वेदाचे अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यानुसार विविध देवतांच्या नावे आहुती दिल्या जातात व त्यानंतर शिष्याला वेदांची संथा देण्यास सुरुवात होते.
नंतरच्या काळात ज्ञानशाखांचा विस्तार झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना वेदाध्ययनाची इच्छा असे त्यांच्यापुरताच हा संस्कार होऊ लागला. आज प्रत्यक्ष वेद शिकणारे अपवादात्मक कोणी असले तरी सर्व विद्यार्थ्यांना चार वेदांची व त्यांच्या संहिता, ब्राह्मण, आरण्यक व उपनिषद या विविध भागांची ओळख राहावी म्हणून प्रबोधिनीप्रणीत उदकशांतीची अथवा वेदपूजनाची पोथी वाचून घ्यावी किंवा समजावून सांगावी. तसेच संस्कृत साहित्याचा इतिहास या पुस्तकाचा भाग १ – वेद व वेदांगे वाचावा.
१३. केशान्त
मुलगा वयात येण्याच्या काळात त्याचे दाढी, मिशा इ. केस प्रथमच कापणे म्हणजे ‘केशान्त’ संस्कार होय. केस कापण्यामधे स्वच्छतेचाही भाग आहे. हा संस्कार चूडाकरणाप्रमाणेच करतात. केसांवर दर्भ धरून त्यासह केस कापले जातात. त्यावेळी मंत्रपठण केले जाते. ब्रह्मचारी त्यानंतर स्नान करून गाईचे दान करीत असे. म्हणून या संस्काराला ‘गोदान’ म्हणतात.
या संस्कारात ब्रह्मचाऱ्याला ब्रह्मचर्यव्रताचे पुनःस्मरण देऊन त्याच्या तारुण्यसुलभ प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यास प्रवृत्त करण्यात येते. हा संस्कार ब्रह्मचर्यसमाप्तीचा नसून त्यासाठी ‘समावर्तन संस्कार’ स्वतंत्र सांगितला आहे.
१४. समावर्तन
सम्यक् आवर्तन म्हणजे व्यवस्थित विद्याध्ययन पुरे करून गुरुगृहातून परत येणे. ब्रह्मचर्याश्रमाच्या समाप्तीचा निदर्शक अशा संस्काराला समावर्तन असे म्हणतात. ब्रह्मचाऱ्याच्या ब्रह्मचर्यव्रताचा समारोप करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यास परवानगी देणे हे याचे प्रयोजन होय.या संस्कारात मंत्रपठण करत स्नान करणे हा महत्त्वाचा विधी असल्यामुळे याला स्नान असेही नाव आहे. विशेष अलंकार धारण करणे व गुरुदक्षिणा देणे असे विधी स्नानानंतर असतात.
हा संस्कार झालेल्या व्यक्तीला स्नातक म्हटले जाई. समावर्तनानंतर विवाहापर्यंतचा काळ ही स्नातकावस्था होय. स्नातकांना समाजामधे अतिशय मान असे.
हल्लीच्या काळात विवाहापूर्वी सोडमुंज नावाचा विधी केला जातो ते या संस्काराचेच रूप होय.
१५. विवाह
विवाह याचा शब्दशः अर्थ वधूला पित्याच्या गोत्रातून पतीच्या गोत्रामधे वाहून नेणे. विवाहाला परिणय असेही म्हणतात कारण या संस्कारामधे वर वधूस अग्नीभोवती घेऊन जातो म्हणजे प्रदक्षिणा घालतो. परि म्हणजे (अग्नि) भोवती आणि नयन म्हणजे नेणे. पाणि म्हणजे हात आणि ग्रहण म्हणजे (हातात) घेणे. या संस्कारात वरवधूंनी एकमेकांचे हात हातात घेणे असा एक विधी असल्याने याला ‘पाणिग्रहण’ असेही म्हणतात.
वर-वधूंनी पती-पत्नी म्हणून गृहस्थाश्रमात प्रवेश करणे व गृहस्थाश्रमाची कर्तव्ये निष्ठेने पार पाडीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांची प्राप्ती करून घेणे हे या संस्काराचे प्रयोजन आहे. म्हणूनच विवाह हा करार नसून एक ‘संस्कार’ आहे अशी धारणा आहे.
प्रत्यक्ष विवाहविधीपूर्वी वाङ्निश्चय, सीमान्तपूजन, मधुपर्क असे विधी होतात. विवाहविधीमध्ये प्रथम संकल्प, गणपतीपूजन, पुण्याहवाचन यांसारखे सुरुवातीचे विधी झाल्यानंतर ‘कन्यादान’ नामक विधी होतो. वराने वधूचा पत्नी म्हणून स्वीकार केल्यानंतर तो तिला “मी तुझी धर्म, अर्थ व काम यांबाबतीत अतिक्रमा करणार नाही” असे वचन देतो. त्यानंतर वर-वधू एकमेकांना स्वतःच्या इच्छा सांगतात व त्या पूर्ण करण्याचे परस्परांना वचन देतात. याला अक्षतारोपण म्हणतात. त्यानंतर वर वधूचा हात हातात घेऊन काही मंत्र म्हणतो व नंतर विवाह होमात मंत्रपूर्वक काही आहुती देतो. त्यानंतर लाजाहोम, प्रदक्षिणा व अश्मारोहण हे विधी होतात. सप्तपदी हा विवाहातील सर्वात महत्त्वाचा विधी! सप्तपदी झाल्यावरच विवाह पूर्ण झाला असे प्रचलित कायद्यानुसारसुद्धा समजले जाते. त्यानंतर अग्नीची प्रार्थना करून कर्मसमाप्ती करण्यात येते.
नववधू पतिगृही आल्यानंतर तिचे लक्ष्मी म्हणून पूजन करण्याचीही प्रथा आहे. या शिवाय वरात, मंगलसूत्रबंधन, मंगलाष्टका, गौरीहरपूजन, सूनमुख अशा अनेक विधींचा समावेश देशकालपरत्वे विवाहसंस्कारात केला जातो. भारतासारख्या विशाल देशात तर विवाहविधीत प्रांतानुसार अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. विवाहविधीच्या अनुषंगाने वर-वधू परीक्षा, विवाहयोग्य वय, विवाहाचे प्रकार, आदि सर्व विवेचन धर्मशास्त्रकारांनी केले आहे.
तरुण स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाला विवाह संस्काराने नियंत्रित करून धर्मशास्त्रकारांनी मानवी जीवनाला एक उंची प्राप्त करून दिली आहे. विवाहामुळे कुटुंबव्यवस्था अस्तित्वात येते आणि अतिथिपूजन, अपत्यसंगोपन ही कर्तव्ये पार पाडता येतात. एका मर्यादेत राहून मानवी इच्छा, आकांक्षा पूर्ण करता येतात व त्यासाठी उपयुक्त साधने मिळवता येतात. म्हणजेच काम व अर्थ या पुरुषार्थांना विवाहामुळे धर्माचा पाया मिळतो. नीतिमान, चारित्र्यसंपन्न, परोपकारी दांपत्ये हा समाजाचा आधारस्तंभ आहे. म्हणून म्हटले आहे –
शास्त्री आश्रम चार जे कथियले त्यामाजि जो उत्तम |
देतो स्वार्थ परार्थ जोडुनि नरा ऐसा गृहस्थाश्रम ॥
स्वार्थ आणि परार्थ यांची प्राप्ती करून देणारा गृहस्थाश्रम हा चारी आश्रमांमधे श्रेष्ठ असल्यामुळे त्या गृहस्थाश्रमाची प्राप्ती करून देणारा विवाह संस्कार हा सोळा संस्कारांच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणावे लागेल.
१६. अन्त्येष्टी
‘अन्त्येष्टी’ हा मृत्यूनंतरचा संस्कार होय. धर्मशास्त्राप्रमाणे काही ठिकाणी अन्त्येष्टी हा संस्कार म्हणून मानलेला नाही. पण शरीर नष्ट झाले तरी आत्मा अमर आहे अशी हिंदू संस्कृतीची धारणा असल्यामुळे अन्त्येष्टी हा एक संस्कार मानावा लागेल. शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या शवाची योग्य ती व्यवस्था करणे याला अन्त्येष्टी, अन्त्यसंस्कार किंवा और्ध्वदेहिक असे म्हणतात. सर्वसामान्यपणे हिंदू समाजामधे मृत्यूनंतर शवाला अग्नी देण्याची प्रथा आहे. या प्रसंगीदेखील अग्नीला मंत्रपूर्वक आहुती देण्यात येतात व यमदेवाची प्रार्थना करण्यात येते. समंत्रक अग्नी देण्याला हिंदू धर्मात महत्त्व आहे. अग्नी दिल्यानंतर मृत व्यक्तीला उद्देशून तिलांजली /जलांजली (काळे तीळ व ओंजळभर पाणी) देण्याची पद्धत आहे. शवाचे पूर्ण दहन झाल्यानंतर त्याच्या अस्थी व रक्षा गोळा करून एखाद्या तीर्थक्षेत्री विसर्जन करतात.
या सर्व विधींमधून मृत व्यक्तीवषयी आदरभाव व्यक्त होतो. याशिवाय देशकालपरत्वे विविध रूढी प्रचलित आहेत. अन्त्येष्टीचा विधी हा मृत व्यक्तीच्या शवाची योग्य ती व्यवस्था लावण्यासाठी आहे तर त्या व्यक्तीची आठवण तिच्या पुढील पिढ्यांना सतत राहावी म्हणून श्राद्ध सांगितले आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण. पहिल्या दिवशी दहन झाल्यानंतर पुढे तेरा दिवसपर्यंत विविध प्रकारचे विधी करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे. ही वेगवेगळ्या प्रकारची श्राद्धे होत. याशिवाय दरवर्षी मृत्युतिथीस त्या दिवशी सांवत्सरिक श्राद्धदेखील करण्यात येते.
अन्त्येष्टी आणि श्राद्ध हे विधी मृत व्यक्तीला सद्गती मिळावी म्हणून करावयाचे असतात अशी समजूत आहे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार जीवनभर माणूस जशी कर्मे करीत असेल त्याप्रमाणे त्याला गती मिळत असते. त्यामुळे मरणोत्तर करण्यात येणारे सारे विधी आप्तेष्टांच्या मनाच्या समाधानासाठी, त्यांना आपल्या मनातील प्रेम, आदर व्यक्त करण्याची संधी मिळावी याकरिताच असतात. श्राद्धविधी म्हणजे पूर्वजांचे केलेले पूजनच आहे. पूजेमधे जसे गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य, आदि उपचार करण्यात येतात. तसेच उपचार श्राद्धातही पितरांसाठी करतात. जुन्या काळी छायाचित्रे नसत आणि पूजा करताना काहीतरी प्रतिमा डोळ्यासमोर हवी. म्हणून पिंड ठेवण्यात येऊ लागला. मात्र श्राद्धकर्म हे पूजन असले तरी ते नित्यपूजेपेक्षा काहीतरी वेगळे कृत्य आहे. हे वेगळेपण कळण्यासाठी श्राद्धात अक्षतांऐवजी काळे तीळ, रंगीत फुलांऐवजी पांढरी फुले, अन्य पत्रीऐवजी माका त्याचप्रमाणे साय, काजळ आणि लोकरीचे वस्त्र पूर्वजांना उद्देशून वाहाण्यात येते. तीळ, साय हे स्निग्ध पदार्थ आहेत, माका हा गारवा देणारा आहे. शरीर अन्नाचे रूपांतर आहे. म्हणून अन्नाचा पिंड हे देहाचे प्रतीक. लोकरीचे वस्त्र उबदार असते. पूर्वजांबद्दल प्रेम, स्नेह, माया ते देण्यामुळे व्यक्त होते. दहनक्रिया झाल्यावर पहिल्या तीन दिवसात अस्थिसंचयन आणि अकराव्या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण श्राद्धे केली म्हणजे मृत व्यक्तीसाठी आवश्यक तो क्रियाकलाप झाला असा निर्णय धर्मनिर्णय मंडळाने दिलेला आहे. (पाहा – प्रकरण ४)
श्राद्धासंबंधीचे शंका समाधान
दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध थोरल्या मुलाने करावे असे असते. परंतु विभक्त कुटुंबातील आप्तांनी दिवंगताच्या मृत्युतिथीला आपापल्या घरी श्राद्ध करणे आवश्यक आहे. सर्व भाऊ एकत्र आलेले बहुधा पहिल्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने दिसतात. त्यानंतर प्रतिवर्षी ठरलेल्या तिथीला केवळ थोरल्या भावानेच नव्हे तर सर्वच भावांनी आपापल्या घरी श्रद्धापूर्वक दिवंगताचे स्मरण करणे आवश्यक आहे. हा नियम बहिणींच्या बाबतीतदेखील लागू होतो असे समजावे. दिवंगताचे श्राद्ध हे आपण आपल्या कुटुंबियांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी करणे आवश्यक आहे. दिवंगताचे कर्तुत्व आणि अन्य गुण हे पुढच्या पिढीला समजण्यासाठी श्राद्धाच्या दिवशी दिवंगताचे आणि त्यांच्या आधीच्या दोन पिढ्यांचे नुसते नाव उच्चारणे पुरेसे नाही तर त्यांची स्थल, काल, शिक्षण, कर्तुत्व अशी सविस्तर माहिती श्राद्धप्रसंगी सांगण्यासाठी जमा केलेली असावी. अशा माहितीमधे प्रतिवर्षी काही ना काही भर पडत जावी व काही वर्षांनंतर दिवंगताचे छोटे मोठे चरित्रच तयार व्हावे. यामुळे सामाजिक इतिहासाची साधनसामग्रीच सिद्ध होईल.
दिवंगताला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे पुढील गती प्राप्त होते असा हिंदू धर्माचा सिद्धांत आहे. पुढच्या पिढीने केलेल्या किंवा न केलेल्या श्राद्धासारख्या विधीवर त्याची पुढची गती अवलंबून ठेवणे कर्मसिद्धांताशी जुळणारे नाही.
गयेला जाऊन एकदा श्राद्ध केल्यामुळे, दिवंगताने मृत्युपूर्वी स्वतःचेच श्राद्ध केल्यामुळे किंवा थोरला भाऊ श्राद्ध करत असल्यामुळे दिवंगताचे श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असे मानले जाते. तथापि दिवंगतासंबंधीचा आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सद्गुणांचे स्मरण किंवा अनुकरण व्हावे यासाठी आणि नव्या पिढीमधे इष्ट तो कुलाभिमान निर्माण व्हावा या दृष्टीने श्राद्ध करणे आवश्यक आहे.
श्रद्धया कृतं दानं इति श्राद्धम्|
दिवंगताच्यासंबंधी श्रद्धा बाळगून लोककार्यासाठी दिलेले दान म्हणजेच श्राद्ध असे मानणे योग्यच आहे. पण कुटुंबातल्या सर्व घटकांना दिवंगताच्या चरित्राची आणि चारित्र्याची ओळख अशा प्रकारे दान दिल्याने होऊ शकणार नाही. त्यासाठी श्राद्धदिनी साऱ्या कुटुंबियांना एकत्र बसवून कुटुंब प्रमुखाने व इतर ज्येष्ठ व्यक्तींनी दिवंगतासंबंधीच्या आठवणी सांगणे, गुणवर्णन करणे हे आवश्यकच आहे. यासाठी ज्ञान प्रबोधिनी मधे लौकिक श्राद्ध म्हणून श्राद्धसभेची योजना केली आहे. त्यामधील अभंगांचे गायन केल्याने घरामध्ये योग्य असे वातावरण निर्माण होऊन मनावरील औदासीन्य दूर होते.
अशाप्रकारे या सोळा संस्कारांचे स्वरूप पाहिले तर आजच्या काळातही ग्राह्य मानला जाईल असा काही भाग त्यात आहे असे दिसते. मात्र या संस्कारांचा मूळचा आशय आणि त्याबरोबर त्यात अनुस्यूत असणारी मूल्येही काळाच्या ओघात हरवलेली दिसतात. वर दिलेल्या संस्कारांपैकी या ना त्या स्वरूपात काही थोडेच संस्कार शिल्लक राहिलेले असून त्यातही कर्मकांड व शब्दनिष्ठता यालाच महत्त्व आले आहे. आजच्या काळात हे सर्व संस्कार पुन्हा जसेच्या तसे रूढ केले पाहिजेत अशी अपेक्षा नाही.त्यात जो काही तथ्याचा भाग असेल तो तेवढा घ्यावा. मात्र नामकरण, उपनयन, विवाह व अन्त्येष्टी या संस्कारांची कालानुरूप पुनर्मांडणी अवश्य केली पाहिजे. ती करण्याचा प्रयत्न प्रबोधिनीत नेहमीच चालू असतो.
संस्कारांप्रमाणेच विविध शांती, पूजा असेही धार्मिक विधी समाजात प्रचलित आहेत. त्यांचीही पुनर्मांडणी केली पाहिजे. म्हणून आता शांती व पूजा यांसंबंधी अधिक माहिती घेऊ व त्यानंतर धर्मविधींमधे परिवर्तन करण्याची का आवश्यकता आहे व ते कशा प्रकारे करता येईल ते पाहू.