२६. घडो ज्ञानाचा उद्बोध

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध

‘ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड : 2‌’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर एक गूढ चित्र आहे. निळ्या-जांभळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक तारे दाखवले आहेत. मध्यभागी एक प्रकाशपुंज आणि त्याच्या मधोमध एक घनदाट काळा ढग दाखवला आहे. त्या ढगातून एका दिशेने शुभ्र पांढरा प्रकाशझोत बाहेर पडतो, तर विरुद्ध दिशेने एक काळसर झोत बाहेर पडतो. (या निरूपणाच्या आधी त्या मुखपृष्ठावरील चित्र पाठवले आहे.) त्यावर चित्राची गूढता वाढवणारी गीतेतील एका श्लोकाची पहिली ओळ छापली आहे. तो श्लोक असा आहे –

गीता 13.17 :         ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते|

                            ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्‌‍ ॥

गीताई 13.17 :        जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले

                            ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे

ज्योतिः म्हणजे प्रकाश म्हणजेच ज्ञान. तम म्हणजे अंधार म्हणजेच अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान याच अर्थाने या श्लोकात ज्योतिः आणि तम हे शब्द आले आहे. ज्योतिषाम्‌‍ म्हणजे सर्व ज्ञानांमध्ये. तमसः म्हणजे अज्ञानाहून. आपल्याला सर्व गोष्टी दिवसा सूर्याच्या, रात्री चंद्र-ताऱ्यांच्या आणि या पैकी काही नसेल तर दिव्याच्या प्रकाशात दिसतात. यापैकी काहीही असले, पण आपली दृष्टी काम करत नसली, तर आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सूर्य-चंद्र या ज्योतींची ज्योती म्हणजे आपली दृष्टी. बाहेर प्रकाश आहे आणि दृष्टी शाबूत आहे, असे असेल तरच आपल्याला दिसते. पण काही वेळेला दिसत असूनही आपण ते पाहत नाही. कारण आपले मन दुसरीकडे कुठेतरी असते. त्यामुळे दृष्टी ही ज्योती असली तरी तिचा उपयोग मन ही ज्योती प्रकाशित झाली असेल तरच होतो. दृष्टीची ज्योत आहे मन. दृष्टी जे पाहते त्याकडे मनाचे लक्ष असले तरी अनुकूल, प्रतिकूल असा प्रतिसाद द्यायला हवा का आणि द्यायचा का हे आपली बुद्धी ठरवते. मन पाहण्यावर एकाग्र असले आणि बुद्धीने संप पुकारला तर त्या पाहण्यालाही अर्थ नसतो. म्हणून मनाची ज्योती बुद्धी आहे. बुद्धीने काहीतरी करायचा किंवा न करण्याचा निर्णय घेतला आणि निश्चय केला तरी त्याप्रमाणे कृती करण्याची प्रेरणा बुद्धीच्या पलीकडून यावी लागते. ती प्रेरणा ही बुद्धीची ज्योत म्हणजे आधीच्या सर्व ज्योतींची ज्योत. तिलाच या लोकाच्या दुसऱ्या ओळीत ‌‘ज्ञेय‌’ म्हणजे ‌‘जाणून घेतले पाहिजे ते‌’ असे म्हटले आहे.

कीर्तनकारांनी अश्वत्थाम्याची एक गोष्ट प्रसिद्ध केली आहे. द्रोणाचार्य कौरवांचे गुरू होण्यापूर्वी अतिशय गरीब होते. तेव्हा त्यांच्या मुलाने, अश्वत्थाम्याने, दूध प्यायला हवे असा हट्ट धरला. गरिबीमुळे दूध विकत घेणे शक्य नसल्याने, त्याच्या आईने पाण्यात पीठ कालवून त्याला दिले. त्याने दुधाबद्दल फक्त ऐकले होते. दूध पाहिलेले नव्हते. त्यामुळे पाण्यात कालवलेल्या पिठावर त्याचे समाधान झाले. केवळ ऐकणे म्हणजे अज्ञान. पाहणे म्हणजे माहिती किंवा परिचय. दुधाची चव घेणे म्हणजे खरे दुधाचे ज्ञान. ऐकणे-पाहणे-अनुभव घेणे म्हणजे ‌‘तमसः परम्‌‍‌’, अज्ञानाच्या पलीकडे जाऊन मिळालेले ज्ञान. व्यवहारातील वस्तूंच्या बाबतीत  ऐकणे-पाहणे-अनुभव घेणे हा क्रम आहे. विचाराने कळणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत शब्द ऐकणे – त्यावर मनन करणे – अनुभव घेणे हा क्रम आहे. या क्रमाने जो अनुभव मिळतो त्यालाच श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत ‌‘ज्ञानगम्य‌’ म्हणजे ‌‘ज्ञानाने जे प्राप्त होते ते‌’ असे म्हटले आहे.

दुधाची चव घेतलेली नसणे व ते पाहिलेलेही नसणे हे व्यावहारिक अज्ञान. मी सर्व पाहतो आहे, मी ज्ञान करून घेतो आहे असे वाटणे हे आध्यात्मिक अज्ञान. त्याच्या पलीकडे ‌‘तमसः परं‌’ जाणे म्हणजे मी जे पाहीन किंवा पाहतो आहे असे वाटते, ते सर्व म्हणजे मीच आहे असा अनुभव घेणे. असा अनुभव घेतला की ज्ञेय आणि ज्ञानगम्य काही वेगळे नाही हे कळते. हे कळणे म्हणजेच गीतेतील ‌‘ज्ञान‌’ किंवा गीताईतले ज्ञानाचे ज्ञान. हे ज्ञान म्हणजेच ज्ञेय म्हणजेच ज्ञानगम्य. दीर्घ काळ चिंतन, मनन, ध्यान केल्यावरच हा अनुभव येणार. तोपर्यंत आपल्यासाठी ही केवळ शाब्दिक माहितीच आहे.

आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने विचार केला तर सर्व विश्व जड, म्हणजे विचारक्षमता व संवेदनक्षमता नसलेल्या, ऊर्जेच्या स्फोटातून बनले आहे. हे जाणून व समजून घेणाऱ्या मला मात्र विचारक्षमता व संवेदनक्षमता आहे. आधीच्या निरूपणात म्हटल्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीने जाणून घेतलेले हे सर्वोच्च भौतिक ज्ञान आहे. पण ते आध्यात्मिक पातळीवरचे अज्ञानच  आहे. मीपण विश्वाएवढे व्यापक करता आले की विश्व जिच्यापासून निर्माण झाले ती ऊर्जा पण विचारक्षम व संवेदनक्षम आहे हे कळते. सर्व ज्योतींची ज्योती हे ज्ञेय, आध्यात्मिक अज्ञान जाऊन मी आणि विश्व एकरूप आहोत हे कळणे म्हणजे तमसः परं असलेले ज्ञानगम्य. ज्ञेय आणि ज्ञानगम्य एकच आहेत हे कळणे हे ज्ञान. कुशाग्र बुद्धी शुद्ध झाल्यावर बुद्धीच्या केंद्रस्थानी म्हणजे हृदयात हे ज्ञान-ज्ञेय-ज्ञानगम्य एकरूप होऊन राहिलेले आहे याचा अनुभव येतो. अनुभव येईपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांना यावर श्रद्धाच ठेवायला हवी. किंवा पडताळा घेऊन पाहिला पाहिजे असे एक गृहीत म्हणून हे स्वीकारायला हवे. ज्ञान प्रबोधिनीला कधीतरी सर्वांमधील या ज्ञानाचे ही प्रबोधन करायचे आहे.