१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे
आम्ही गणित, इंग्रजी किंवा इतिहास शिकवत नाही तर भाषा आणि मानव्यविद्या, भौतिक आणि सामाजिक शास्त्रे, यांच्या अभ्यासातून देशप्रश्नांचा अभ्यास करायला शिकवतो, अशी प्रबोधिनीतील नित्यघोषणा आहे. हे प्रत्यक्षात कसे आणायचे याचा विचार केला तर, संत सावता माळी यांनी बागाईतीतून, संत गोरा कुंभार यांनी मडकी बनवता बनवता, संत सेना न्हावी यांनी हजामती करता करता, संत कबीरांनी विणकाम करताना, संत रोहिदासांनी कातडे कमावताना, आपापल्या इष्ट दैवताचा साक्षात्कार करून घेतला, हीच उदाहरणे डोळ्यासमोर येतात. मागच्या लोकात पाहिल्याप्रमाणे यांनी आपले कामच पूजा बनवले होते. तसे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना, त्याच्या आधाराने देशप्रश्न सोडवून मातृभूमीची पूजा करायची आहे, हा ध्यास घेतला पाहिजे. पण संतांची उदाहरणे पाहिली तसे किती इतर माळी, कुंभार, न्हावी, विणकर, चांभार काम करता करता संत झाले? उत्तम क्रमिक अभ्यास करून किती जण कर्ते देशभक्त होतात?
प्रबोधिनीमध्ये गेली पंचवीस वर्षे स्पर्धा परीक्षा केंद्र चालू आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या या निवड परीक्षेचे स्वरूप उलगडत गेले आहे. काही लाख उमेदवार पूर्व परीक्षेला बसतात. त्यातून काही हजार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. त्यातल्या काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाते. शेवटी सात-आठशे जणांना यूपीएससी तर्फे सेवेसाठी पाचारण केले जाते. काहीशे वैमानिकांना कठोर प्रशिक्षण व दीर्घ सरावानंतर निवडीला सामोरे जावे लागते. त्यातला एखादा वैमानिक अंतराळवीर म्हणून निवडला जातो. एव्हरेस्टवर चढाई करायला गिर्यारोहक व शेर्पा मिळून चाळीस-पन्नास जणांचा चमू बेस कॅम्पपाशी जमतो. त्यातले शिखरावर दोघे-तिघेच पोचतात. स्पर्धा परीक्षा उमेदवार, वैमानिक किंवा गिर्यारोहक या पैकी सगळ्यांनाच अंतिम उद्दिष्टापर्यंत जाण्याची इच्छा असावी लागते. प्रयत्न लागतात. चिकाटी लागते. पण त्यातले काही जणच शेवट पर्यंत पोचतात. कोण पोचेल हे आधी सांगता येत नाही. पण अनेकांनी प्रयत्न सुरू केले की प्रत्येक जण काही पावले तरी पुढे जातो.
या संबंधी कै. आप्पांनी ‘श्री माताजी-श्री अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकात (पान १६४) गीतेतला एक श्लोक उद्धृत केला आहे. स्वकर्माने परमेश्वराची पूजा करणारे किती जण त्यात सफल होतात? या प्रश्नाचे उत्तर त्या श्लोकात दिले आहे. गीतेतला श्लोक असा आहे –
गीता ७.३ : मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये |
यतताम् अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः ॥
गीताई ७.३ : लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधीं
झटणाऱ्यांत एखादा तत्त्वतां जाणतो मज
हजारातला एखादा सिद्धीसाठी म्हणजे मोक्षासाठी झटतो आणि असे प्रयत्न करणाऱ्या अनेकांमधून एखाद्यालाच माझे, परमेश्वराचे, खरे ज्ञान होते. म्हणजेच मोक्ष मिळतो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. मोक्ष मिळण्याच्या बाबतीत हे जसे खरे आहे तसेच कोणत्याही भव्य उद्दिष्टाच्या बाबतीत ही खरे आहे. अनेकांना बसल्या जागी, प्रयत्न न करता, मिळेल त्यावर समाधान असते. त्यातल्या काही जणांना अधिक चांगले किंवा अधिक प्रमाणात मिळावे अशी आशा तरी असते. पण ते हात पाय हालवत नाहीत. त्यातल्या काही जणांमध्ये महत्त्वाकांक्षा (ॲम्बिशन) निर्माण होते. मोठे काहीतरी मिळवावे असे मनात धरून ते प्रयत्न सुरू करतात. असे लोकच हजारात किंवा लाखात एक अशा प्रमाणात असतात असे या श्लोकात म्हटले आहे.
महत्त्वाकांक्षी लोकांचे उद्दिष्ट बऱ्याच वेळा ज्याला समाजमान्यता आहे असे सत्ता, वैभव, प्रसिद्धी, पुरस्कार, इत्यादी प्रकारचे असते. महत्त्वाकांक्षेपेक्षा चांगली असते ती सिद्धी प्रेरणा. लोकांची मान्यता आहे किंवा नाही असा विचार न करता, स्वतः ठरवलेले उत्तमतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकडे सिद्धी प्रेरणा (अचीव्हमेंट मोटिव्हेशन) असते. सिद्धी प्रेरणेपेक्षा मोठी असते ती ध्येयप्रेरणा. स्वतःपुरता विचार न करता अनेकांचा किंवा सर्वांचा विचार करण्यासाठी ध्येयप्रेरणा लागते. देशात कर्तृत्ववंतांचा कधीही दुष्काळ पडू नये यासाठी गतिशील विकसनशील संघटना झाली पाहिजे. त्यासाठी हे ध्येय समोर ठेवून कोट्यवधी व्यक्तींना विद्यार्थिदशेपासूनच प्रयत्न करण्याची प्रेरणा झाली पाहिजे. हे प्रयत्न म्हणजेच उपासना. कामाने पूजा करण्याबरोबर मानसपूजा ही करणे. त्यातून देशाचे रूप पालटायला उद्याचे थोर स्त्री-पुरुष पुढे येतील. १४० कोटी लोकांनी उपासना केली तर १४० लोक येतीलच येतील. म्हणून कोटीकोटी लोकांनी उपासना केली पाहिजे असे कै. आप्पा या पुस्तकात म्हणतात.