१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो.

 १०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो.

लोक अनेक तऱ्हांनी वागत असतात. ते जसे वागतात तसे का वागतात हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या स्वभावाची ठेवण जशी आहे, तसे ते वागतात हे लक्षात येते. कोणाचा स्वतः धडपड करण्यावर भर असतो. कोणी सरकार करील म्हणून वाट पाहतात. कोणी देव देईल ते घ्यायचे म्हणून स्वस्थ बसतात. कोणी एकटेच काम करतात. कोणी इतरांची मदत मागतात. कोणी मदत देऊ केली तरी घेत नाहीत. कोणी अनोळखी माणसांवर पटकन विश्वास ठेवतात. कोणी विश्वास असला तरी सर्व काही तपासून घेतात. कोणी इतरांच्या हेतूबाबत कायम संशय घेतात. कोणाला फाजील आत्मविश्वास असतो. कोणाला क्षमता असूनही स्वतःवर विश्वास नसतो. कोणी प्रतिकूल तेच घडेल असे गृहीत धरून, प्रत्येक बाबतीत पर्यायी व्यवस्था करून ठेवतात. कोणी आपण काहीही केले तरी प्रतिकूलच घडणार, असे म्हणून काहीच करत नाहीत. कोणाचा प्रयत्न केल्यावर प्रतिकूलही अनुकूल बनते, असा विश्वास असतो. ही स्वभावाची ठेवण जन्मतःच असते. कौटुंबिक परिस्थितीनेही बनलेली असते. अनुभवांमुळे ही बनलेली असते. या सर्वांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा जो गाभा किंवा सार बनलेले असते त्यासाठी सत्त्व असा शब्द आहे. या सर्व निरीक्षणांसंबंधी गीतेत एक श्लोक आहे –

गीता १७.३ :          सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत |

                           श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यच्छ्रद्धः स एव सः ॥

गीताई १७.३ :         जसा स्वभाव जो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे

                            श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो 

पृथ्वीच्या पाठीवर अनेक वनस्पती, अनेक प्राणी आहेत. त्यांची शरीरे वेगवेगळ्या आकार-प्रकाराची आहेत. त्यांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनक्रम वेगवेगळ्या प्रकारचा आणि कमी-जास्त कालावधीचा असतो. याला आपण जीविधा किंवा जैव विविधता म्हणतो. ती आपण सहज स्वीकारतो व ती टिकवली पाहिजे असे म्हणतो. प्रत्येक वनस्पती किंवा प्राण्याच्या गाभ्यामधले म्हणजे बीजामधले, सार किंवा सत्त्व काय आहे यावर, त्यांचा आकार-प्रकार-जीवनक्रम ठरतो. माणसांमध्ये या आकार-प्रकार-जीवनक्रमाशिवाय, वागण्याचे आणि विचार करण्याचे प्रकार आणि वेग, यांची पण विविधता असते. जीविधेच्या धतवर या विविधतेला मनोविधा म्हणता येईल. जीविधा जशी मोकळ्या मनाने स्वीकारतो तितक्याच मोकळ्या मनाने मनोविधा पण स्वीकारली पाहिजे. ही मनोविधा व्यक्ती-व्यक्तीच्या गाभ्यामधल्या म्हणजेच सत्त्वामधल्या श्रद्धेमुळे ठरते, असे या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगितले आहे.

जन्मतः मिळालेला गाभा फारसा बदलता येत नाही. असे काही जणांना वाटते. तो बदलता येतो, असे इतर काही जणांना वाटते. पण त्या त्या वेळी तो गाभा जसा असतो, त्यावरून आपण कोणत्या कामांना हात घालणार किंवा घालणार नाही ते ठरत असते. यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती कशी वागेल हे तिच्या श्रद्धेप्रमाणे सांगता येते. अमुक एखादी कृती आपण केलीच पाहिजे, आपणच केली पाहिजे, अमुक एका पद्धतीनेच केली पाहिजे, असा जो ठाम विश्वास असतो, तो विश्वास म्हणजेच आपली श्रद्धा. त्या श्रद्धेमधील ठामपणा आपल्या सत्त्वातून, व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून, आलेला असतो. 

पण ही श्रद्धा बदलता येते, असे स्वामी विवेकानंदांचे आणि कै. आप्पांचे म्हणणे होते. अमेरिकेतून परतल्यावर चेन्नई इथे केलेल्या ‌‘आम्हासमोरील कार्य‌’ या भाषणात विवेकानंदांनी म्हटले आहे, “जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो होतो. ‌‘मी स्वतः धीट आहे‌’ अशी श्रद्धा ठेवलीत की तुम्ही धीट व्हाल. ‌‘आम्ही ऋषी आहोत‌’ अशी श्रद्धा केलीत की तुम्ही ऋषी व्हाल”. एका वैचारिकाच्या पहिल्याच परिच्छेदात, कै. आप्पा विवेकानंदांच्या याच वाक्यांचा संदर्भ देऊन म्हणतात, “आपले जीवन निर्मल, निरामय, कर्तृत्वसंपन्न आणि सेवारत असावे असे संकल्प करायचे. श्रद्धापूर्वक केलेल्या संकल्पांचे बळ मोठे असते. जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो घडतो”. (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५५) आपण जसे संकल्प करतो तशी आपली श्रद्धा घडते. आणखी एका वैचारिकात हेच वाक्य उद्धृत करून कै. आप्पा म्हणतात “हृदयात श्रद्धा असेल तर कृतीला प्रारंभ होतो. आपल्या हातून कृती का होत नाही? कार्याचं वेड का लागत नाही? बारा, चौदा, सोळा, अठरा तास आपण काम करू असं का वाटत नाही? कारण आमची श्रद्धा नाही, चिंतन नाही, तपश्चर्या नाही”. (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान १११) म्हणजे सत्त्वाप्रमाणे श्रद्धा हे जेवढे खरे, तेवढेच संकल्पानुसार श्रद्धा व श्रद्धेनुसार सत्त्व घडते हे ही खरे.

प्रत्येकाची श्रद्धा कशीही असली तरी तिचे निमित्त करून माणसा-माणसामध्ये भेदभाव करणे चूक आहे. आपण देशसेवक व्हावे अशी स्वतःची श्रद्धा घडवता येते, तशीच इतरांनी देशसेवक व्हावे अशी त्यांची श्रद्धा ही घडू शकेल. ज्याची जशी श्रद्धा आहे तसा तो आज वागत असेल. पण प्रयत्नाने तो ही देशसेवक बनू शकेल, अशा विश्वासाने कृती करणे म्हणजे समावेशक भक्ती करणे. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत विवेकानंदांना आणि कै. आप्पांना असा कृतीपर अर्थ दिसतो.