प्रस्तावना
‘उपासना सूक्ते’ या पुस्तिकेत ज्ञान प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पांचे उपासनेविषयीचे विचार चोवीस सूक्तांच्या रूपात संकलित केले आहेत. यातील एका सूक्तामध्ये कौटुंबिक उपासनेचा उल्लेख येतो. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख आहे. तर इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधी आहेत. तर, या संकलनातील शेवटचे सूक्त म्हणजे कै. आप्पांनी सामूहिक उपासनेसंबंधी पाहिलेले स्वप्न..
या सूक्तांच्या संकलनासोबत दिलेल्या सुरुवातीच्या तीन व शेवटच्या तीन अशा २०२० च्या करोना संचारबंदीच्या काळात लिहिलेल्या एकूण सहा पत्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आ. गिरीशराव बापट यांनी त्यांचे सामूहिक उपासनेविषयीचे चिंतन मांडलेले आहे. उपासनेविषयीच्या चोवीस सूक्तांपैकी पंधरा सूक्ते करोना संचारबंदीच्या काळात अनेक प्रबोधकांना पाठवली होती. उरलेली नऊ निवडून ठेवली होती. सूक्ते व पत्रे ज्या क्रमाने पाठवली होती, त्यापेक्षा पुस्तिकेत छापताना क्रम थोडा बदललेला आहे.
प्रबोधिनी साहित्यात अन्यही अनेक ठिकाणी उपासनेसंबंधी विचार मांडलेले आहेत. या चोवीस सूक्तांचे, सहा पत्रांचे आणि आपल्या वाचनात येणाऱ्या अन्य साहित्याचे चिंतन करत, त्याचा अर्थ समजून घेत, आपल्या सर्वांची वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामूहिक उपासना अधिक अर्थपूर्ण होत जाईल, अशी अपेक्षा आहे.
——————————————————————————————————————————————————————————-
सौर चैत्र २२ शके १९४२
११/४/२०
स. न. वि. वि.
महाराष्ट्रामध्ये कोरोना साथीमुळे संचारबंदी सुरू होऊन दि. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूपासून काल २० दिवस पूर्ण झाले. आजच मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की ही संचारबंदी अजून २० दिवस चालणार आहे. पुणे व निगडीतील शाळा तर दि.१४ मार्च पासूनच बंद आहेत.
गेल्या वीस ते अठ्ठावीस दिवसांमध्ये प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागांतर्फे इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अध्यापन, कार्यपत्रके, वैज्ञानिक खेळ, स्पर्धा, कथाकथन, काव्यवाचन, गणितयज्ञ, अध्यापक बैठकी, परीक्षा असे अनेक कार्यक्रम घेतले गेले.
युवक-युवती विभागांतर्फे अनेक कार्यशाळा, रक्तदान, दल, बैठकी, मार्गदर्शक प्रशिक्षण, व्याख्याने, व्यायाम असे उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून केले गेले.
काही पुरोहित इंटरनेटच्या माध्यमातून संस्कार कार्यक्रम करत आहेत. संशोधिकांचे सदस्य घरूनच संशोधन कार्य करत आहेत. कार्यालयीन सदस्यांनी घरून किंवा एक-दोन दिवस पास मिळवून कार्यालयात येऊन वेतनवाटपाची कामे केली.
स्त्री-शक्ती ग्रामीण विभागातर्फे रोजच दूरभाषवरून बैठकी घेऊन कामाचा व परिस्थितीचा आढावा घेणे चालू असते. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती. जागेवर पोहोचलेले बांधकाम साहित्य संपेपर्यंत ग्रामीण भागातली विहिरींची कामेही चालू होती.
घरून करता येण्यासारखी कामे वेगवेगळ्या पद्धतीने समस्यापरिहार करून करण्याचा प्रयत्न अनेक विभागांतील सदस्यांनी केला. पुणे, निगडी, साळुंब्रे केंद्रांमध्ये संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्यांना मदत करण्याचे काम करण्याची संधी अजून यायची आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर १९ मध्ये सांगली-कोल्हापूर-पुणे शहरातील पूरग्रस्तांसाठी विविध केंद्रांनी आपणहून पुढाकार घेऊन मदतकार्य केले, त्याप्रमाणे हराळी व अंबाजोगाई केंद्रातून व कालपासून वेल्हे व सोलापूर केंद्रांमधूनही तयार जेवण किंवा शिधावाटपाचे काम तेथील केंद्रांनी पुढाकार घेऊन सुरू केले. वरील चार-पाच परिच्छेदांमधील कामाचे काही ना काही निवेदन १ चैत्रपासूनच्या तीन साप्ताहिक वृत्तांमधून दिलेले आहे.
पुढील २० दिवसांमध्ये आणखी काय करण्यासारखे आहे याबाबत काही विचार पुढे मांडत आहे. सर्व राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री आज पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या बैठकीत एकमुखी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे कोरोना साथीमध्ये राजकारणाला स्थान नाही व आपल्याला त्यात करण्यासारखे लगेच नाही.
प्रशासनापुढे खूपच आव्हाने आहेत. स्पर्धा परीक्षा केंद्रातले अनेक माजी विद्याथ-अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यासंबंधी मासिक वृत्तात आपल्याला अधिक वाचायला मिळेल. आर्थिक आणि प्रशासन क्षेत्रातील विविध प्रश्नांवरती उपाय सुचवणारे अनेक माजी विद्याथ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मानसशास्त्रज्ञ व काही अध्यापक कौटुंबिक व मानसिक समुपदेशन करत आहेत. आपत्तीकाळात ही सर्व कामे करणारे समाजपुरुषांची किंवा जनताजनार्दनाची उपासनाच करत आहेत. त्याशिवाय आपापली व्यक्तिगत उपासनाही चालू असेल.
सुखात किंवा विपदाकाली आपली व्यक्तिगत उपासना चालू असलीच पाहिजे. परंतु प्रबोधिनीपण व्यक्तिगत आणि सामूहिक उपासनेत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मदतकार्याला गेलेले गट जिथे कुठे मुक्कामाला असतील तिथे एकत्र उपासना करतात. अभ्यासदौरे, तंबूतील शिबिरे, सहलींमध्ये ही एकत्र उपासना होते. सध्या दैनंदिन काम बंद असले तरी पुणे, निगडी, हराळी केंद्रांमध्ये रोज सामूहिक उपासना, मग तीन-चार जणांची का असेना, होते. जिथे प्रबोधिनीचे केंद्र किंवा काम तिथे उपासना होते कारण तिथे प्रबोधक असतात.
सध्या प्रबोधक आपल्या घरात स्थानबद्ध आहेत. आपल्या घरच्यांसह सामूहिक उपासना करता येईल का? प्रबोधक सदस्यांना आपल्या घरातच एकत्र साप्ताहिक सामूहिक उपासना करणारे प्रबोधक कुटुंब करता येईल का? Work from home, Study from home, मदत वाटप, त्यासाठी निधी संकलन ही कामे तर आपल्याला हिकमतीपणा वापरून करायची आहेतच. अखंड कर्मशीलता हे जसे प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे, ‘राष्ट्रार्थ भव्य कृती’ हे जसे प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे, तसेच किमान सामूहिक साप्ताहिक उपासना हे देखील प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे. आपल्या घरच्यांशी आजपर्यंत उपासनेबद्दल बोलला नसलात तर सध्याची स्थानबद्धता ही असे बोलायची व त्याप्रमाणे करण्याची संधी आहे. ही संधी जरूर घ्यावी व घेतल्यावर मला अवश्य कळवावे. आधीपासूनच आपले प्रबोधक कुटुंब असेल तर तसेही कळवावे.
————————————————————————————————————————————————————————————————–
सौर चैत्र २५ शके १९४२
१४/०४/२०२०
स. न. वि. वि.
शनिवार, दि.२२ चैत्र (११/४/२०२०) या दिवशी प्रबोधिनीच्या सदस्यांनी आपापल्या घरी कुटुंबियांसमवेत दर आठवड्यात एकदा तरी सामूहिक उपासना करावी असे मी सुचवले होते. आजच्या पंतप्रधानांच्या घोषणेनुसार अशी उपासना करायला आणखी किमान तीन आठवडे तरी नक्की मिळतील. त्या आवाहनाला गेल्या तीन दिवसांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिसाद १२० जणांनी दिला.
आमच्या कुटुंबात आम्ही या आधीच रोजची सामूहिक उपासना सुरू केली आहे, असे काही जणांनी कळवले. आवाहन वाचल्यावर दिवसभरात घरच्यांशी बोलून त्यांच्यासह उपासना केली. आता व्यक्तिगत उपासना नक्की सुरू करतो, घरच्यांशी उपासनेसंबंधी बोलण्याचा प्रयत्न करून पाहतो. असे आणखी काही जणांचे वेगवेगळे प्रतिसाद होते, काहींनी नमस्काराचे हात जोडून आवाहन-पत्राची पोच दिली.
प्रतिसाद देणारे निम्मे सदस्य पुण्यातले होते. भाईंदर, डोंबिवली, चिपळूण, साळुंबे केंद्र, निगडी, सांगली, भालवणी, डोमरी, अंमळनेर, अंबाजोगाई, शिरूर, सोलापूर, बडोदा, आणि रांची येथूनही प्रतिसाद आले.
ज्या कुटुंबांमध्ये आधीपासूनच सामूहिक उपासना सुरू आहे, तिथे उपासना विविध प्रकारांनी होते. ध्यान, योगासने व ध्यान, पूजा व आरती, रामरक्षा म्हणणे, भीमरूपी म्हणणे, जप करणे, पसायदान म्हणणे, घरी दासबोध बैठक करणे, पोथीवाचन व श्रवण, काही लोक म्हणणे, गीतेचा अध्याय म्हणणे, विरजा मंत्रासह प्रबोधिनीची पूर्ण उपासना म्हणणे, असे उपासनेचे अनेक प्रकार प्रतिसादांमध्ये होते. माझ्या आवाहनात मला कोणती उपासना अपेक्षित होती?
साधनानाम् अनेकता’ हे हिंदू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या कुटुंबाला जी उपासना प्रिय, प्रेरक आणि आश्वासक वाटते, ती इतर कोणाला चालण्याचा किंवा न चालण्याचा प्रश्नच नाही. कुटुंबातल्या काही जणांनी किंवा सगळ्यांनी एकेकट्याने उपासना करण्याबरोबर सगळ्यांनी एकत्र बसूनही एकत्र उपासना करावी असे माझे आवाहन आहे.
घरात पती-पत्नी दोघेच असतील तर त्यांनी एकत्र उपासना करणे सामूहिक उपासनाच आहे, असे गेल्या दोन दिवसांत मी पाच जणांना तरी सांगितले. आई-वडील आणि काही वेळ तरी बडबड न करता शांत बसू शकणारी मुले, असे तीन किंवा चार जणांचेच कुटुंब असेल, तरी त्यांनी एकत्र बसून केलेली उपासना म्हणजे सामूहिक उपासनाच आहे. अशी कौटुंबिक उपासना रोज करता आली तर चांगलेच, सध्याच्या संचारबंदीच्या काळात अनेकांना तसे शक्यही होईल. व्यवहारतः नेहमीसाठी ती साप्ताहिक करणे सोयीचे जाते. सुरुवातीला रोज केली तर सवय लागायला सोयीचे जाते. फक्त आताच्या अडचणीच्या काळापुरते हे आवाहन नाही.
उपासना म्हणजे स्वतःला किंवा आपल्या समूहाला रोजच्या मंत्र म्हणण्याने, एखाद्या विचाराने भरून व भारून टाकणे. सामूहिक उपासनेने भारून जाण्याचा अनुभव एकदा उपासना करण्यानेही येऊ शकतो. कै. आप्पांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुण्यात २६०० जणांनी भारून जाण्याचा हा अनुभव घेतला. जेवढी संख्या जास्त व उपासना म्हणणारे एका सुरात, एका तालात, एका लयीत मंत्र व लोक अर्थ समजून म्हणतात, तेवढा भारून जाण्याचा अनुभव लवकर येतो. पण अशा उपासनेतून मिळणारा उत्साह, प्रेरणा किंवा मनःशांती तात्पुरती असते. वर्षारंभ, वर्षान्त, विद्याव्रत, गणेश प्रतिष्ठापना, मातृभूमिपूजन अशा उपासनांच्या वेळी तात्पुरते भारून जाण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.
एखाद्या विचाराने किवा संकल्पाने मन भरून जाण्यासाठी मात्र नियमित उपासना लागते. व्यक्तिगत उपासनेने व्यक्तीचे मन संकल्पमय होऊन जाते. सामूहिक उपासनेने समूहाचे मन संकल्पमय होऊन जाते. आपल्या कुटुंबाचे सामूहिक मनही संकल्पाने भरून जाण्यासाठी कुटुंबातील सामूहिक उपासनेचा अनुभव सर्वांनी घेऊन पाहण्यासारखा आहे. एखाद्या संघटनेला काही हेतू व उद्दिष्ट असते. तसे प्रत्येक कुटुंबाला का असू नये? कुटुंबातील प्रत्येकाला व्यक्तिगत इच्छा, महत्त्वाकांक्षा असतात. पण कुटुंबाच्या एकत्रित जगण्याच्या हेतूचा व उद्दिष्टाचा विचार करायला बहुतेक कुटुंबांमध्ये कोणाला सुचलेलेच नसते. सुचले तरी तो विचार नेटाने पुढे चालवायला जमतेच असे नाही. कुटुंबाची सामूहिक उपासना असा विचार व्हायला निमित्त व साधन होऊ शकेल.
असा काही सामूहिक हेतू व उद्दिष्ट आपल्या घरच्या किंवा कामाच्या ठिकाणच्या समूहाला सुचावे, तो हेतू व उद्दिष्ट गाठायचे संकल्प आपल्या कुटुंबाचे किवा कार्यसंघाचे व्हावेत व ते संकल्प पूर्ण करायचेच या विचाराने आपले कुटुंब किवा कार्यसंघ भरून आणि भारून जावेत, यासाठी सामूहिक उपासना करायची आहे.
केवळ संकटनिवारण व्हावे, केवळ काहीतरी लौकिक लाभ व्हावा, केवळ आपल्या ऐक्यभावनेचे इतरांसमोर प्रदर्शन व्हावे, यासाठी सामूहिक उपासना सुचवलेली नाही. कोरोनाची साथ जावी, संचारबंदी लवकरात लवकर उठावी, आपले कुटुंबीय किंवा नातेवाईक यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सामूहिक उपासना सुचवलेली नाही. संचारबंदीच्या स्थानबद्धतेत सर्वांचे मनोधैर्य टिकून राहावे यासाठीही सामूहिक उपासना सुचवलेली नाही. मनोधैर्य टिकेलच आणि वाढेलही. कारण प्रबोधिनीमध्ये सामूहिक उपासना आपल्यातील तेज प्रकट होण्यासाठी, त्या तेजाची आराधना करण्यासाठी आहे. तेज जेवढ्या अंशांनी प्रकट होईल त्या प्रमाणात आपल्यातील विवेकशक्ती, प्रतिभाशक्ती, स्नेहशक्ती आणि त्याबरोबर मनोधैर्यही वाढल्याचा अनुभव येतो. कुटुंबातही येईल आणि संघटनेतही येतो. त्यासाठी शुभेच्छा.
—————————————————————————————————————————————————————————————————
सौर चैत्र २७ शके १९४२
१६/०४/२०२०
स. न. वि. वि
व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, सर्व मानवजात आणि अखिल विश्व अशी अखंड साखळी आहे. आज बुद्धीने विचार करून आपण सर्व मानवजातीचा आणि विश्वाचा एकेका व्यक्तीशी असलेला संबंध समजून घेऊ शकतो. कोरोना साथीच्या निमित्ताने प्रत्येक राष्ट्राने इतर देशांच्या नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे आपले राष्ट्र व इतर राष्ट्र यातला फरक स्पष्ट झाला. व्यक्तीचा राष्ट्राशी असलेला व्यावहारिक संबंध प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. कुटुंब आणि समाजाशी व्यावहारिक आणि भावनिक संबंध असतो. हे संबंध बळकट करण्यासाठी सामूहिक उपासनेचा उपयोग होतो.
सौर चैत्र २५ (१४ एप्रिल) च्या माझ्या टिपणामध्ये कुटुंबाच्या जगण्याला हेतू व उद्दिष्ट असले पाहिजे असे मी लिहिले होते. एक-दोन जणांनी त्यांच्या कुटुंबाचे हेतू व उद्दिष्ट कळवले. पण अनेकांनी हे कसे ठरवायचे असे विचारले. त्यासाठी मला प्रबोधिनीने तयार केलेली वास्तुशांतीची पोथी आठवली.
हिंदू संस्कृतीत घर/गृह या संकल्पनेला काही सामाजिक संदर्भ देखील आहे. घर हे केवळ कुटुंबाचे नाही तर समाजाचेही ते एक आधारकेंद्र व्हावे लागते. या दृष्टीने वास्तुशांतीच्या पोथीतला संकल्प आहे –
‘नीतीने मिळवलेली संपत्ती या घरात उदंड असावी.
येथे अतिथींचा सत्कार व्हावा,
विद्वानांविषयी आदर असावा,
राष्ट्रभक्तांचा गौरव व्हावा,
ईश्वरभक्तांविषयी प्रेम असावे.
सत्त्वसंपन्न अभिरुचीची आमच्या कुटुंबात जोपासना व्हावी.
सत्कर्माचे आचरण व्हावे, प्रीती आणि करुणा,
पुरुषार्थ आणि ईश्वरभाव यांच्या संगमात
आमच्या घराचे पुण्यतीर्थ व्हावे.’
असे संकल्प वास्तुशांतीच्या दिवशीच करायचे असे नाही. कुटुंबाच्या सामूहिक उपासनेत नेहमीच त्यांचा उच्चार व स्मरण करत राहायला पाहिजे. अशा शुभ संकल्पातूनच आपल्या कुटुंबाचे हेतू व उद्दिष्ट प्रत्येक कुटुंबाला स्पष्ट सुचत जाते व स्वतःच्या शब्दात मांडता येते.
मला कुटुंबाच्या सामूहिक उपासनेसंबंधी जे म्हणायचे होते, ते या तीन टिपणांमध्ये म्हणून झाले. उद्यापासून कै. आप्पांचे उपासना – व्यक्तिगत आणि सामूहिक – यासंबंधीचे काही विचार रोज एक या पद्धतीने काही दिवस पाठवण्याचा विचार आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————
“या परब्रह्मशक्तीचे आपल्या समाजात स्फुरण व्हावे अशी प्रार्थना करूया. भूतकाळात आपल्या देशाचा प्रकाश श्रीलंकेपासून ते थेट हिमालयाच्या शिखरापलीकडे पोचला होता. तो सर्व प्रदेश त्याच्या पूर्वपश्चिम विस्तारासह डोळ्यांसमोर आणायचा. या साऱ्या प्रदेशात विविध भाषा बोलणारा पण एकाच संस्कृतीच्या सूत्रात गुंफलेला विशाल हिंदुसमाज राहतो. कोणत्याही राष्ट्रामध्ये ‘परब्रह्मशक्ती स्फुरो’ असे म्हणताना त्या समाजातील ऐक्यभावना वाढवणारी संघटना आणि त्या समाजाचे नवनवीन क्षेत्रातले कर्तृत्व दाखवणारा पराक्रमही वाढायला हवा. शरीर अनित्य असून आत्मा नित्य आहे, हा अनुभव घेतल्यामुळे एकच सत्य अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात व एका पद्धतीने सांगितलेले सत्य अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी कृतीतून व्यक्त होते, ही वस्तुस्थिती मोकळेपणाने स्वीकारता येईल. ही स्वीकारशीलता जगातील सर्वांना आपल्या वागणुकीद्वारा शिकवणे म्हणजे अध्यात्म-तत्त्वज्ञानाद्वारे विश्वविजय करणे.”
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त 1. संकल्पसिद्धीसाठी उपासना
आपल्याला मिळालेल्या सर्व शिक्षणाचा उपयोग देशहितकारणासाठी झाला पाहिजे ; आणि आपले टिचभर जीवन देश समृद्ध होण्याकडे लागले पाहिजे असे विद्यार्थ्यांना वाटले तर खरा उपयोग ! त्यांचा भावनाकोश समृद्ध होणे याला खरे महत्त्व आहे.
अमुक एक गोष्ट मी करीनच करीन असे संकल्प करीत जाणे, केलेले संकल्प पार पाडण्याची मनाला सवय लागणे, पुन्हा नवे संकल्प करणे, लहान संकल्पातून मनात मोठ्या संकल्पांची बांधणूक करणे, त्या मोठ्या संकल्पांच्या सिद्धीसाठी जिवाचा आटापिटा करणे, अंती असे सर्वजीवनव्यापी संकल्प करणे आणि त्यांच्या सिद्धिसाठी जीवनाला सुयोग्य दिशा देणे, हे सर्व कुशाग्रबुद्धीच्या विद्यार्थ्यांना शिकविता येते आणि शिकविले पाहिजे.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ८)
————————————————————————————————————————————————————————————————–
सूक्त २. समाजघडणीसाठी उपासना…
भजन, नामस्मरण ही उपासना आहे का? आहे. रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीतापाठ ही उपासना आहे का? आहे. पण खरी ती उपासना की जी अंतर्यामीच्या शक्ती जागवू शकते, दैवी गुणसंपदेला आवाहन करू शकते, जी व्यक्तीचे समाजाशी, राष्ट्राशी, मानव्याशी आणि विराट विश्वाशी नाते जोडून देऊ शकते.
माणूस बदलणे, विकसणे, नवनवीन सामर्थ्यांनी समृद्ध होणे, त्या सामर्थ्याचा समाजघडणीसाठी विनियोग करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण होणे, हा शिक्षणाचा हेतू आहे आणि उपासनेचाही तो अपेक्षित परिणाम आहे.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५६)
- अंतर्यामी – आपल्या आतून नियंत्रण करणारा, म्हणजेच परमेश्वर
————————————————————————————————————————————————————————————————–
सूक्त ३. बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी..…
परब्रह्मशक्तीचे स्फुरण होणे म्हणजे काय? श्री रामकृष्ण सदैव कालीशी संवाद करण्यात मग्न असत. ‘God intoxicated man’ असं त्यांना म्हणत असत. त्यांच्यात परमेश्वरीशक्तीचे स्फुरण होते.
परब्रह्मशक्तीचे स्फुरण व्हावे असे आपण ज्ञान प्रबोधिनीत म्हणतो ते काही वेगळ्या अर्थाने. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या विकासातून मानवाचा महामानव – देवमानव – होणे असा आपल्या दृष्टीने परब्रह्मशक्ती स्फुरणाचा अर्थ आहे.
संवेदन, आकलन, स्मरण, इत्यादी दहा पैलूंनी विकसित झालेली बुद्धिमत्ता हा परमेश्वरी स्फुरणाचा प्रत्यय आहे. ह्यातच कार्याकार्यविवेक, गूढार्थसंशोधन, इत्यादी शक्ती अंतर्भूत आहेत. या विविध शक्तींनी संपन्न अशा व्यक्तींच्या कार्याचा कस आणि विस्तार हाही परब्रह्मशक्तीच्या स्फुरणाचा प्रत्यय आहे.
उपासनेत करण्याच्या चिंतनातून ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ ठरला पाहिजे. आपले शरीर, मन, बुद्धी यांच्या सहयोगाने निर्माण होणारे कर्तृत्व हे रोजच्या रोज अंशभराने – कणभराने का होईना वाढत राहिले पाहिजे. स्वतःत बदल घडवण्याचे सामर्थ्य उपासनेतून मिळवले पाहिजे….
…..परब्रह्मशक्तीच्या स्फुरणाचा प्रत्यय मानवाकडून विकसित मानवाकडे – देवमानवाकडे – चाललेल्या प्रवासाच्या खुणांमधून मिळाला पाहिजे असे आपण म्हटले. ज्यांच्याजवळ बुद्धिगुणांची, कर्तृत्वगुणांची आणि हृदयगुणांची दैवी संपत्ती – उत्तमगुणसंपत्ती – आहे, रोजच्या रोज जी माणसे विकसत आहेत, परमेश्वराच्या हातातील उत्कृष्ट साधन बनण्यासाठी झटत आहेत, अशा व्यक्तींतूनच ते स्फुरण प्रकटताना दिसणार आहे.
(युवतींच्या पहिल्या प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रमाती कै. आप्पांच्या अप्रकाशित भाषणातून, दि. ३०/०३/१९७५)
—————————————————————————————————————————————————————————————————
- दहा पैलूंनी विकसित झालेली बुद्धिमत्ता —
१. संवेदन, ६. कार्याकार्यविवेक,
२. आकलन, ७. प्रतिभा,
३. स्मरण, ८. दूरग्रहण,
४. गूढार्थसंशोधन, ९. दूरप्रक्षेपण,
५. प्रत्युत्पन्नमती, १०. शक्तिप्रदानता
असे बुद्धीचे दहा पैलू कै. आप्पांनी आपल्या चिंतनातून विद्यार्थ्यांसमोरील एका वैचारिकात मांडले होते. त्यापैकी पहिले सात पैलू मानसशास्त्रज्ञांना मान्य होतील असे आहेत. शेवटचे तीन पैलू आप्पांनीही पुढील प्रयोग किंवा संशोधनासाठी प्रस्ताव म्हणून मांडले आहेत.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ४. उपासना हा परमेश्वराशी संवाद…
भक्तियुक्त, श्रद्धापूर्ण मनाने परमेश्वराशी केलेला संवाद म्हणजे उपासना. हा संवाद आपल्या स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शब्दात करावयाचा. परमेश्वराला काय सांगावयाचे? त्याच्या साक्षीने कोणते संकल्प करावयाचे? स्वतःला आणि समाजाला, राष्ट्राला आणि अंती मानव्याला ईश्वरीय चैतन्य प्राप्त व्हावे, आपले जीवन निर्मल, निरामय, कर्तृत्वसंपन्न आणि सेवारत असावे असे मागणे मागावयाचे, असे संकल्प करावयाचे. श्रद्धापूर्वक केलेल्या संकल्पांचे बळ मोठे असते. जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो घडतो.
‘यो यत्-श्रद्ध: स एव स:’
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५५)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ५. ईश्वरीशक्तीला आवाहन..
शुभसंकल्प ही फार मोठी शक्ती आहे.
प्रार्थना म्हणजे तरी याहून अन्य काही आहे का? एकाग्र चित्ताने, उत्कट श्रद्धेने केलेले शुभसंकल्प म्हणजेच प्रार्थना किंवा उपासना. आपण ‘कुणाची तरी’ प्रार्थना करतो म्हणजे चराचराला व्यापून उरलेल्या वैश्विक शक्तीची किंवा ती इष्टदैवतामध्ये, मूतमध्ये किंवा अन्य कोणत्या प्रतीकामध्ये अवतीर्ण झाली आहे असे कल्पून त्या मूतची, इष्टदैवताची वा प्रतीकाची आपण प्रार्थना करतो. संघटना किंवा राष्ट्र किंवा समाज हा सुद्धा परमेश्वरी शक्तीचा अंश मानून आपण त्याची प्रार्थना करतो. ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षाची वा प्रगतीची जी स्वप्ने आपण पाहत असतो ती स्वप्ने आपण पुन:पुन: स्मरतो किंवा त्यांना शब्दांकित करतो. ती प्रत्यक्षात यावीत म्हणून साहाय्यीभूत होण्याचे ईश्वरीय शक्तीला आवाहन करतो.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५९)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ६. संघटित विचारशक्तीचे सामर्थ्य..
व्यक्तिगत उपासना आणि सामाजिक उपासना परस्परविरोधी नाहीत तर परस्परपूरकच आहेत. परमेश्वराच्या हातातले चांगले साधन आपण व्हावे, अशी मन:पूर्वक प्रार्थना व्यक्तिगत उपासनेतून झाली तर अशी व्यक्ती संपूर्ण समाजाच्या उत्थानासही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारणीभूत झाल्याखेरीज राहणार नाही.
पण मग सामुदायिक प्रार्थना कशाला? लक्ष व्यक्तींचे लक्ष संकल्प काही विलक्षण प्रभावी वातावरण निर्माण करू शकतात. संपूर्ण असंस्कारित व्यक्तीचे मनसुद्धा त्या प्रभावाने उंचावू शकते. विचार ही शक्ती आहे असे आपण म्हटले. अनेकांच्या विचारशक्ती जर एक केंद्र झाल्या, तर त्यातून निर्माण होणारे सामर्थ्य, हे एकाच्या विचारशक्तीतून निर्माण होणाऱ्या सामर्थ्यापेक्षा खासच जास्त असते. It doesn’t simply add but multiplies – (शक्तींच्या) फक्त बेरजा होत नाहीत – शक्तींचे गुणाकार होतात.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ६२- ६३)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ७. सर्वांची हृदये एक असोत..
संकल्प हे एकट्याने करता येतात किंवा समूहाने करता येतात. म्हणजेच व्यक्तिगत उपासना आणि सामूहिक उपासना असे त्यांच्या अभिव्यक्तीचे दोन प्रकार झाले. फार प्राचीनकाळी ऋषिसंघांची सूक्तगाने भरतभूमीत दुमदुमली होती. वैदिक काळात आणि त्यानंतरही संघभावना कशी प्रखर होती, प्रार्थनेतून राष्ट्रीय आकांक्षा कशा व्यक्त होत होत्या हे पुढील मंत्रावरून स्पष्ट होऊ शकेल….
ॐ संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्|
देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते॥
समानं मंत्र: समिति: समानी|
समानं मन: सहचित्तमेषाम्॥
समानी व आकूति: समाना हृदयानि व:|
समानमस्तु व: मन: यथा व: सुसहासति॥
या मंत्राचा आशय असा – आपण सर्व मिळून कार्य करा. कार्य यशस्वी व्हावे म्हणून आपणात सुसंवाद असू द्या. आपणा सर्वांचा आशय एक असू द्या. एका नियत ठिकाणी आपण एकत्रित व्हा. आपणा सर्वांची हृदये एक असोत. ध्येय एक असो.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ६०)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ८. उपासना धर्मसंस्थापनेसाठी..
दैनंदिन व्यक्तिगत उपासनेने जे नित्य चित्तशुद्धी मिळवतात, सामुदायिक उपासनेने समूहशक्तीला आवाहन करतात, सगुण साकारापासून निर्गुण-निराकारापर्यंतच्या उपासनेतून जे खरोखरीच या देशात ईश्वरीय शक्तीचे अवतरण घडवतात अशा मंत्रद्रष्ट्यांची आवश्यकता या देशात आहे. त्यांच्यामुळे या देशात धर्मसंस्थापना होईल म्हणजेच या देशातील विस्कळीत जीवनाला वळण लागेल.
(भगिनी निवेदिता, आवृत्ती दुसरी, पान २४५)
- चित्तशुद्धी – मनातील चांगल्या भावना व विचारांचे प्रमाण वाढत जाणे आणि वाईट भावना व विचारांचे प्रमाण कमी होत जाणे.
- समूहशक्तीला आवाहन – समूहातील व्यक्तींना आपण एक आहोत, आपल्याला समान उद्दिष्ट आहे याची जाणीव करून देणे.
- ईश्वरीय शक्तीचे अवतरण – स्वतःमधील व इतरांमधील ईश्वरी शक्तीची जाणीव होणे, जगातील सर्व मानवांना ही जाणीव करून देण्याची प्रेरणा होणे आणि त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक पराक्रम तसेच संघटना करता येणे.
- मंत्रद्रष्टे – विश्वाच्या अंतिम सत्याचे स्वरूप व विश्वातील मनःशक्तीचे नियम ज्यांना अंतर्ज्ञानाने कळतात अशा व्यक्ती. (म्हणजेच ज्यांना वेदांमधील मंत्र स्फुरले असे ऋषी)
- धर्मसंस्थापना – देशातील विस्कळीत जीवन म्हणजे व्यक्तींचे, त्यांच्या कुटुंबांचे व समाजाचे विविध दिशांनी जाणारे व परस्परांना अडथळा ही बनू शकणारे जीवन, याला परस्परपूरक दिशांनी जाण्याचे वळण देणे.
(हा धर्मसंस्थापनेचा सोपा व व्यावहारिक अर्थ कै. आप्पांनी दिला आहे.)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ९. उपासनेला दृढ चालवावे..
शीख गुरूंनी दाखवून दिले की लग्न करूनही साधुत्व असू शकतं. पांडुरंगशास्त्री आठवल्यांचं नाही का लग्न झालेलं? लग्न केलेले आणि न केलेले साधुपुरुष, वीरपुरुष इथे निर्माण व्हायला हवे आहेत. आठवले शास्त्रींनी लाखो कोळ्यांना संस्कृतची दीक्षा दिली. आम्ही त्याहून अधिक करू. उद्योगधंद्यातून माणसं घडवू. त्यांनी न केलेलं काम आम्ही करू……
….‘उपासनेला दृढ चालवावे’ हे प्रत्यक्षात येऊ दे. व्यक्तिगत, सामुदायिक उपासना मनःपूर्वक होऊ दे. बायको-मुलं, आई-वडील सर्वांना उपासना करायला शिकवा, तर तुम्ही प्रचारक, धर्मसंस्थापना करणारे. खरे साधुपुरुष होण्याची प्रतिज्ञा करा. त्या प्रतिज्ञेचं निश्चयात रूपांतर होऊ दे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५१ – ५२)
- साधुत्व – स्वतःच्या वागण्याने लोकांना निर्भय, निर्वैर होऊन जगण्याचे उदाहरण दाखवणे, वागण्याप्रमाणे उपदेश करणे.
- धर्मसंस्थापना – पान २५ पाहावे.
- खरे साधुपुरुष (आणि साध्वी स्त्री सुद्धा) – गृहस्थाश्रमी स्त्री-पुरुषांमध्येही साधुत्व येऊ शकते. आधीच्या सूक्तामध्ये मंत्रद्रष्टा शब्द आला आहे. तो विवेकानंदांनी वापरला आहे. मंत्रद्रष्ट्या ऋषींपैकी अनेक जण गृहस्थाश्रमी होते. इथे कै. आप्पांनी
त्याच्या अलीकडचा टप्पा म्हणून साधुपुरुष व्हायला सांगितले आहे. कुटुंबाच्या सामूहिक उपासनेचे उद्दिष्ट ‘साधुत्व मिळवणे’ या दिशेचे असावे.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १०. यांत्रिक पूजा नव्हे भावोत्कट उपासना...
चांगल्या कामाचे संकल्प डोक्यातून वाहून जातात. कुठलेतरी मोह पडतात आणि चांगलं असेल ते निरसून जातं. (ते टाळण्यासाठी) रोजच्या रोज उपासना करा. म्हणजे देवाशी मराठीत बोला. रामरक्षा म्हणणं, व्यंकटेश स्तोत्र म्हणणं, म्हणजे उपासना नव्हे. गायत्रीमंत्र म्हणणं, म्हणजे सुद्धा उपासना नव्हे. उपासना म्हणजे आपले संकल्प रोज देवाला सांगणं. त्याला म्हणा की, देवा मला श्रेष्ठकार्य करायचं आहे. त्यासाठी मला शक्ती दे. माझा निश्चय दृढ असू दे. हिंदुत्व तेजस्वी होऊ दे, प्रबोधिनी तेजस्वी होऊ दे; त्यात परब्रह्मशक्ती प्रकटू दे आणि माझ्यातून परब्रह्मशक्ती प्रकटू दे. माझं आयुष्य हिंदुत्वकार्यात सार्थकी लागू दे. असं म्हणणं म्हणजे उपासना.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ३१-३२)
कै. आप्पांनी दुसऱ्या सूक्तामध्ये भजन, नामस्मरण, रामरक्षा, मारुतीस्तोत्र, गीतापाठ ही उपासना आहे असे म्हटले आहे. या सूक्तामध्ये रामरक्षा, व्यंकटेशस्तोत्र, गायत्री मंत्र म्हणणे म्हणजे सुद्धा उपासना नव्हे असे म्हटले आहे. या परस्परविरोधी विधानांमागचे रहस्य काय आहे?
उपासनेसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. ज्याची उपासना करायची ते उपास्य म्हणजेच परमेश्वर आणि उपासना करणारा उपासक. फळ, फूल, पान, पाणी यापैकी काहीही वाहिलेले परमेश्वराला चालते. नुसता नमस्कार केलेलाही त्याला चालतो. मग भजन, नामस्मरण, रामरक्षा, मारुतीस्तोत्र, व्यंकटेशस्तोत्र, गीता, गायत्री मंत्र यापैकी कोणतेही एक किंवा अधिक म्हणलेले त्याला चालेल. भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने कोणतेही स्तोत्र, मंत्र, लोक, भजन, नाम म्हणले तर परमेश्वराच्या – उपास्याच्या दृष्टीने ती उपासनाच आहे.
मात्र हे सगळे म्हणणे किंवा करणे उपासकाच्या दृष्टीने केवळ तोंडाची, जिभेची कवायत होऊ शकते. यांत्रिकपणे होऊ शकते. तसे झाले तर नुसते म्हणणे, पुटपुटणे उपासकाच्या दृष्टीने उपासना होत नाही. आपल्या रोजच्या साध्या भाषेत देवाला आपले संकल्प सांगणे, ते पूर्ण व्हावेत यासाठी त्याला आळवणे म्हणजे उपासना. उपासकाच्या दृष्टीने उपासनेमध्ये भाषा आणि रचनेपेक्षा संकल्प पूर्ण होण्याबद्दलची तळमळ महत्त्वाची आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त ११. संकल्पशक्ती वाढायला हवी....
उपासनेबद्दल आपल्याला सांगतच असतो. आपल्याला काय सांगितलं आत्ता?… विवेकानंद वाचा ना तुम्ही! त्यांनी काय म्हटलं आहे? धर्मसंस्थापना कशी झाली पाहिजे? या कशाचा काही पत्ताच आम्हाला नसतो. ज्या हिंदुत्वासाठी सारा जीव-भाव अर्पण करायचा त्यासाठी पाच वेळा मनोभावे ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हटला तर कुठे बिघडलं? पण सबंध दिवसभरात आम्हाला यासाठी वेळ होत नाही!
रोजच्या रोज तुमची मनोभावे उपासना व्हायला हवी आहे. विरघळलेल्या मनाने, डोळ्यांत अश्रू आणून तुम्ही का म्हणत नाही की ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये, इतकंच नव्हे तर परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वव्यापी प्रबोधिनीमध्ये.’
प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी व्हायला हवी आहे. नंतर म्हणा की ‘परब्रह्मशक्ती स्फुरो माझिया अंतरात’ तुमच्यामध्ये परब्रह्मशक्तीचं अवतरण व्हायला नको? ज्याला अद्वैत तत्त्वज्ञान म्हणतात ते केवळ तत्त्वज्ञान नाही आहे, ते खरं आहे. जसं अन्न खाल्ल्यावर त्या अन्नाची शक्ती होते तसं परमेश्वराची उपासना केल्यानं त्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते हे अगदी खरं आहे. शंभर नाही, पाचशे टक्के खरं आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे. आपल्याला सुद्धा ते अनुभविता येईल. कोटीकोटी लोकांना उपासनेला बसवलं पाहिजे. तशी हालचालच आपल्याकडून नाही. आपणच बसत नाही तर आपण लोकांना कुठे बसायला सांगणार?
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ११२-११३)
- धर्मसंस्थापना – पान २५ पाहावे.
- हिंदुत्व – हिंदुत्व हा शब्द ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ या मंत्रामध्ये कै. आप्पांनी दोन अर्थांनी वापरला आहे –
- हिंदुस्थानात हजारो वर्षे चालू असलेली परंपरा व ती परंपरा ज्या समाजाच्या जीवनातून प्रकट होते तो समाज म्हणजे हिंदुत्व. परब्रह्मशक्ती या समाजात स्फुरावी व तिने ही परंपरा संपन्न करावी असा या मंत्राचा अर्थ. या अर्थानुसार हिंदुत्वामध्ये हिंदुस्थानातील सर्व जाती व धर्मपंथांचा समावेश होतो.
- या देशातील परंपरा ज्या तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे ते अद्वैत तत्त्वज्ञान हा कै. आप्पांना अभिप्रेत असलेला हिंदुत्वाचा दुसरा अर्थ. विज्ञान जसे एका देशाचे नसते, सर्व जगाचे असते, तसे अद्वैत तत्त्वज्ञान फक्त हिंदुस्थानचे नाही, तर सर्व मानवतेचे आहे. या अर्थाने हिंदुत्वामध्ये परब्रह्मशक्ती स्फुरावी म्हणजे सर्व समाजाच्या जीवनात अद्वैत तत्त्वज्ञानाच्या – मानवतेच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे – सर्व व्यवहार व्हावेत.
- परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये – या मंत्राचे स्पष्टीकरण पान१५ वर दिले आहे.
- परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये – या मंत्राचे स्पष्टीकरण पान ४७ वर दिले आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १२ समाजकार्य आणि साधनेचा समतोल..
शरीर आणि मन बलपूर्ण, सतेज असले पाहिजे ही स्वामी विवेकानंद यांची सुद्धा सांगी होती. ‘मन वज्र हवे, अन् मनगट ते पोलाद’ असे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. हिंदुस्थानच्या एकतृतीयांश दुःखाचे मूळ आमच्या शारीरिक दुर्बलतेमध्ये आहे, हे त्यांनी अचूक हेरले होते. दिवसातील सर्व वेळ साधनेत घालवावा, हे त्यांना मान्य नव्हते. ईश्वरी साधना एक तास आणि बाकीचे तेवीस तास दरिद्रीनारायणाच्या अथवा जनता-जनार्दनाच्या सेवेत व्यतीत करणे हे त्यांना अपेक्षित होते.
श्री अरविंद आश्रमात जे साधक आहेत, ते बारा महिने चोवीस तास केवळ उपासनाच करतात, असे दिसत नाही. लहान-मोठी, तथाकथित हलकी अथवा महत्त्वाची कामे त्यांच्याकडे सोपविलेली असतात आणि ती ते मनोभावे नेटकेपणाने करीत असतात. नियुक्त काम कार्यभक्तीने, आदरपूर्वक करणे, वापर वस्तू आदरपूर्वक हाताळणे, ही सुद्धा उपासना आहे, असे श्री अरविंदांनी सांगितले आहे. एवढे निश्चित दिसते की, दैनंदिन उपासना एक तासाची असो की दोन तासांची असो, शिल्लक राहिलेला वेळ हा समाजकार्यात शुद्धबुद्धीने घालविला पाहिजे, आणि त्यातून चित्तशुद्धी मिळविली पाहिजे.
(श्रीमाताजी-अरविंद काय म्हणाले, पान १६१)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १३ सावकाश व स्थिर बदलांसाठी उपासना..
ज्ञान प्रबोधिनीमध्ये (ही) उपासना गेली कित्येक वर्षे चालू आहे. या स्वरूपात केलेल्या उपासनेने चित्तात आनंद उत्पन्न होतो, प्रतिभा-स्फुरण होते, बुद्धीच्या दश-पैलूंना उजाळा मिळतो, दु:खाचा परिहार करण्याची शक्ती वाढते, आनंदाचे अनुभव येतात, चित्ताची एकाग्रता वाढते, निश्चयशक्ती वाढते, असे अनुभव अनेकांना आहेत.
या उपासनेने परमेश्वर साक्षात प्रकट झाले, त्यांनी आशीर्वाद दिले, वरदान दिले, निमिषमात्रात सर्व दु:खाचे हरण केले, सर्व आपत्ती नाहीशा झाल्या, असे अनुभव आलेले नाहीत.
शरीरांतर्गत शक्ती सावकाश काम करणाऱ्या असतात. परमेश्वरी शक्ती ही शरीरांतर्गत शक्तींना बल देत असते, त्यांचे सामर्थ्य वाढवीत असते आणि म्हणून जो लाभ व्हावयाचा, तो सावकाश होणार हे गृहीत धरणे उचित होय.
(ज्ञान प्रबोधिनी – दैनंदिन उपासना पोथी,आवृत्ती पहिली, पान १४ व १५)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १४. स्वतःतील शक्तीचे प्रकटीकरण..
जमिनीवर आसनमांडी घालून अथवा आरामखुचत ताणरहित अवस्थेत बसावे.
प्रथम मनातील भीती, क्रोध, चिंता, दुःख अशा सर्व अनिष्ट भावनांचे विसर्जन मी करीत आहे, माझे मन पूर्णतः निर्विचार, प्रसन्न होत आहे, असा संकल्प करावा.
यानंतर परमेश्वरशक्तीचे आपल्यात अवतरण व्हावे अशी प्रार्थना करावी. पृथ्वी, सूर्यमाला, अनंत आकाशगंगा – असा हा विश्वाचा पसारा (ज्याचे गायत्री मंत्रात वर्णन केले आहे) हा त्याच एकमेव परमेश्वरीशक्तीचा आविष्कार आहे. या विश्वात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. माझ्यातही याच परमेश्वरीशक्तीचा अंश आहे.
माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा ईश्वरीशक्तीचे अवतरण माझ्यामध्ये होऊ शकते. शरीरांतर्गत असलेले सर्व अनिष्ट तणाव विसर्जित केलेल्या या माझ्या देहामध्ये परमेश्वरीशक्तीचे आगमन होवो. ती शक्ती माझ्या सर्व ज्ञानशक्तीला व्यापून राहो आणि सदैव प्रचोदित करो. सर्व आरोग्य ज्ञानशक्तीमुळे मिळते. परमेश्वरीशक्तीने प्रचोदित झालेली माझी ज्ञानशक्ती मला निश्चित समर्थ करील.
माझे शरीर निरोगी, सतेज; मन सुदृढ, प्रसन्न; बुद्धी तीक्ष्ण, सखोल व्हावी. सर्व विश्वात भरून राहिलेल्या चैतन्याशी माझा आत्मा तादात्म्य पावावा. सर्वच विश्व विद्युतकण तरंगांचे बनलेले आहे. ती शक्ती सत् (म्हणजे अस्तित्व) – चित् (म्हणजे जाणीव) -आनंदयुक्त आहे. मीही त्याच शक्तीचा अंश आहे. माझ्यात ती शक्ती अधिक अंशाने प्रकटो – असा संकल्प करावा.
(अप्रकाशित टिपण)
- ज्ञानशक्ती – जाणीवशक्ती, म्हणजेच शरीरांतर्गत होणारे सूक्ष्म बदल टिपून, ते प्रतिकूल असल्यास त्यांना अनुकूल करून घेणारी शक्ती.
- तादात्म्य पावावा – सर्व विश्वात भरून राहिलेले चैतन्य आणि माझा आत्मा यांच्यात वेगळेपण नाही याचा कायम अनुभव यावा. ते एकमेकात पूर्ण मिसळून जावेत.
- विद्युतकण तरंग – अणूंमधील कणांना बांधून ठेवणारी शक्ती दृश्य प्रकाशाचेही रूप घेऊ शकते किंवा अंतरिक्षातून जाताना लाटांच्या किंवा तरंगांच्या स्वरूपात जाते. कधी कण, कधी तरंग असे विश्वातील ऊर्जेचे – शक्तीचे – रूप असल्याने विद्युतकण तरंग असे जोडनाव दिले आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १५ उपासनेतून आंतरिक बदल..
बक्षीस किंवा शिक्षा एवढे दोनच मार्ग माणूस बदलण्याचे आहेत, असे आपण समजतो, ते खरं नाही. नित्य आत्मपरीक्षणानं, स्वतःच्या दोषांची निवृत्ती होऊ दे, अशा अत्यंत तळमळीनं केलेल्या प्रार्थनेनं – उपासनेनं माणूस बदलतो. हा बदल स्थिर स्वरूपाचा असतो. कारण तो स्वयंस्फूर्त असतो. उत्तम गुणसंपदा मिळवण्याचा मार्ग म्हणून उपासनेकडे पाहा. ती परमविश्वासानं, श्रद्धेनं करा.
(ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. वि. वि. पेंडसे , आवृत्ती दुसरी, पान ८६)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १६ आत्मचिंतनातून प्रतिभाविकास....
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूव १९४५ सालापर्यंत स्वातंत्र्याची दारू पिऊन आम्ही धुंदीत काम केलं, पण ४६ साली मनात अस्वस्थता निर्माण झाली. आजूबाजूला काय घडतंय आणि आपण काय करत आहोत यातली संगती लागेनाशी झाली. त्या वेळी मी उपासनेला सुरुवात केली. त्या उपासनेने विचारांना टोक आले, दिशा मिळाली. ही उपासना आता सुटलेल्या धाग्यांना सुईप्रमाणे जोडण्याचं, विणण्याचं काम करीत आहे. असमाधानातून प्रेरणेची जोपासना झाली, उपासनेतून आत्मपरीक्षणाची सवय लागली.
या सवयीमुळे लिहिलेलं प्रत्येक पत्र पुनःपुनः तपासून पाहावं, दुरुस्त करावं हे वाटून तसं घडतं. एकच लेख पुनःपुनः लिहून तो अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रयत्न होतो. आपण काय बोललो, याचा काय परिणाम झाला, तो कामाला हितकारक झाला का याचा विचार होऊन बोलण्यात सुधारणा होते. आपण घेतलेले निर्णय, आपली धोरणं तपासून पाहूया आणि आवश्यक तर बदलूया ही लवचिकता येत जाते. आपल्याच कामाचं चिकित्सक पण विधायक आणि सर्जनशील परीक्षण करता यायला हवं. त्यासाठी वारंवार आत्मचिंतन हवं. या आत्मचिंतनाने प्रतिभेचं जागरण होत जातं.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान २३)
- स्वातंत्र्याची दारू पिऊन – स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायच्या वेडाने
- विचारांना टोक आले – हेतू (का करायचे?) आणि ध्येय (कोणत्या दिशेने जायचे?) स्पष्ट झाले.
- सुटलेल्या धाग्यांना सुईप्रमाणे जोडण्याचं, विणण्याचं काम – भोवती घडणाऱ्या अनेक घटनांसंबंधी मनात येऊन गेलेले पण लक्षात न राहिलेले विचार म्हणजे सुटलेले धागे. एका मध्यवत विचाराच्या (ध्येयाच्या) भोवती त्याच्याशी संगती व उपयुक्ततेनुसार, कोणताच विचार टाकाऊ न मानता, कमी-अधिक अंतरावर सर्व विचारांना स्थान देणे, म्हणजे सुटलेल्या धाग्यांना सुईप्रमाणे जोडण्याचं काम.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १७ उपासनेने मन ध्येयमंत्रित व्हावं...
उपासनेला कधीच विसंबू नये. उपासनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. उपासनेनं मन-बुद्धीच्या अंतरात्म्याच्या शक्ती जागृत होतात.
आणखी काय सांगू?… ज्ञान प्रबोधिनीच्या कार्याचा पाया तर घातलेला आहे. विस्ताराच्या दिशाही निश्चित झाल्या आहेत. हे मंदिर आता आपण सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण करायचं आहे. माझ्या खोलीच्या खिडकीतून नारळाचं झाड दिसतं. त्याला शेकडो नारळ लागतात. तसं आमच्या एकेका कार्यकर्त्यामध्ये शेकडो नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याचं बळ यायला हवं. प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांचे घडच्या घड लागले पाहिजेत तरच ही संघटना – हे कार्य – वर्धिष्णू, जयिष्णू राहील. उपासनेनं आपल्या सर्वांचं मनं ध्येयमंत्रित व्हावीत आणि असं कार्य घडावं एवढीच आज प्रार्थना करतो.
(ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. वि. वि. पेंडसे,आवृत्ती दुसरी, पान २३६)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १८. उपासना म्हणजे देवाला शरण जाणं...
बीजगुण बदलता येतात का? येतात. त्याचा एकमेव मार्ग म्हणजे उपासना, देवापाशी बसणं, रडणं. देवाला म्हणणं की देवा मला अंतर्बाह्य शुद्ध कर, निर्मळ कर. असं केलं तर ज्या वंशसूत्रांमुळे ते गुण संक्रांत झाले ती वंशसूत्रेसुद्धा बदलणं शक्य होईल. उपासना हा आमचा दृढ स्वभाव होऊ दे. उपासना म्हणजे गीतेचा बारावा अध्याय किंवा रामरक्षा म्हणणं नव्हे. उपासना म्हणजे देवाला शरण जाणं, आवाहन करणं. ‘मला शक्ती दे, शहाणपण दे’ असं म्हणणं म्हणजे उपासना.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ११५)
बीजगुण – वंशसूत्रांमधून आलेले गुण. म्हणजेच आई-वडिलांपासून आलेले शारीरिक, मानसिक व बौद्धिक गुणविशेष.
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त १९ सावकाश पण निश्चित होणारे परिवर्तन..
ज्ञान, भक्ती आणि कर्म ही मार्गत्रयी हिंदू तत्त्वज्ञानात सांगितली आहे. या तिन्हीलाही सामूहिक प्रार्थनेचे अधिष्ठान पाहिजे. ज्ञानाचे उपासक म्हणजे विद्याथ तर उपासना करतीलच. पण जे शेतीत वा यंत्रोद्योगात गुंतलेले आहेत-कर्ममाग आहेत, त्यांनाही सामूहिक उपासनेची आवश्यकता आहे.
प्रबोधिनीच्या शिवापूर यंत्रशाळेतील कर्मचारी नियमाने सामूहिक उपासना सार्थ रीतीने करतात. त्यामुळे जरूर काही परिवर्तन घडून आले आहे. दारू पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कौटुंबिक सुख वाढले आहे. स्वैराचार कमी झाला आहे. सावकाश पण निश्चित होणारे हे परिवर्तन महत्त्वाचे आहे.
(राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ६५)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त २० उपासनेत भक्तिशरणता आली पाहिजे...
एक मुख्य गोष्ट लक्षात आली की आपली सर्व उपासना केवळ बुद्धिप्रधान आहे –तीमध्ये भक्तिशरणता, भक्तिलीनता आली पाहिजे –
‘मी माझ्या सर्व परमात्म्यांसह (वंशसूत्रे-जीन्स्सह) ब्रह्मचैतन्याला (परब्रह्मशक्ती) भक्तिशरण आहे, भक्तिलीन आहे’ असा मंत्र करून तो सुमारे पाच मिनिटे तरी म्हणला पाहिजे. अतिमानसशक्तीच्या (मनापेक्षा श्रेष्ठ परंतु परब्रह्मशक्तीपेक्षा कनिष्ठ अशी शक्ती असल्याचे योगी अरविंदांनी स्वतःच्या योगसाधनेतून शोधून काढले आहे.) अवतरणाला प्रकृती विरोध करते असे अरविंदांनी म्हटलेलेच आहे, आणि ते खरे आहे. म्हणून प्रकृतीचा विरोध मी शून्य केला पाहिजे. ‘माझ्यात ब्रह्मचैतन्य, (आणि त्या आधी) अतिमानस चैतन्य अवतरित होवो’ असा मंत्र तयार करून त्याचा जप किमान पाच मिनिटे तरी केला पाहिजे.
(एका कार्यकर्त्याला लिहिलेले पत्र,सौर चैत्र १, संवत २०३९, दि. २२/०३/१९८३)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त २१. यत्नावाचोनि राहिले l
कर्तृत्ववंतांचा दुष्काळ – क्रायसिस ऑफ लीडरशिप …. आजचा चालक गेल्यानंतर उद्या काय होणार असा प्रश्न पडलेला असतो…. यावर उत्तर एकच. उपासना, उपासना, उपासना! कोटिकोटि लोकांनी उपासना करणे, अर्थपूर्ण उपासना करणे, संघटितरित्या उपासना करणे, आणि त्यातूनच उद्याचे द्रष्टे, चिंतक, नवयुगनिर्माते घडणार आहेत, यावर विश्वास ठेवून, तसे प्रयत्न करणे. भाग्यासी काय उणे? यत्नावाचोनि राहिले |
(श्रीमाताजी-अरविंद काय म्हणाले? पान १६५)
—————————————————————————————————————————————————————————————————
सूक्त २२. विवरलेचि विवरावे....
समर्थ रामदास यांनी म्हटले आहे,
“बोलिलेचि बोलावे | ध्यान धरिलेची धरावे |
विवरलेचि विवरावे | पुनः पुनः ॥”
एकदा मांडलेले तत्त्वज्ञान, विचार पुनः पुनः मांडत राहा म्हणजे ते विचार खोल जातील. रोज नवीन नवीन सांगण्याने काहीच खोल जात नाही, कशाचाच दृढ संस्कार होत नाही आणि विचारांना खोली असल्याशिवाय त्यातून निर्माण होणारी प्रेरणा दीर्घकाळ टिकत नाही. विचार उथळ स्वरूपाचे असतील तर त्या संबंधीची प्रेरणा अल्पकालीन असते. प्रतिकूल परिस्थितीत अशी अल्पकालीन प्रेरणा टिकू शकत नाही. विचार खोलवर रुजण्यासाठी ते पुनः पुनः सांगावे लागतात ….. म्हणजे ऐकलेल्या विचारांना भावनांची जोड मिळते. एखाद्या विचाराचं केवळ बौद्धिक पातळीवरील आकलन पुरेसे नाही. भावना आणि विचार, तर्क यांचं योग्य मिश्रण हवं, केवळ बौद्धिक आकलनातून कार्याची प्रेरणा निर्माण होत नाही.
(राष्ट्रदेवो भव आवृत्ती दुसरी, पान १२)
———————————————————————————————————————————————————————————————————-
सूक्त २३. भक्तियुक्त उपासना...
सर्व, अनंत विश्वे (आकाशगंगा) ही एकमेकांत गुंतून गेलेली (गुरुत्वाकर्षण शक्तीने जोडलेली) आहेत. आणि या अनंत विश्वांतून चैतन्यशक्ती स्वतःला मिळवता येते. हे मला निर्विवाद वाटते. एवढ्यासाठी सकाळी नित्याची उपासना झाल्यानंतर परब्रह्माच्या चित्शक्तीचे (जाणीवशक्तीचे) स्वतःमध्ये अवतरण होईल, असा केवळ व्यक्तिगत जप (सामूहिक उपासना संपल्यानंतर) करावा.
… गीतारहस्याचे सुद्धा वाचन चालू ठेवावे. त्या वाचनातून आपली उपासना कशी झाली पाहिजे हे आपोआप कळेल. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो माझिया अंतरात’, ‘अनंतकोटी ब्रह्मचैतन्य (अनंत आकाशगंगा सामावून घेणाऱ्या परब्रह्माचे चैतन्य – चित्शक्ती) माझ्या परमात्म्यांतून (वंशसूत्रे – जीन्स्मधून) प्रकट होवो’ हा मंत्र सुद्धा महत्त्वाचा आहे…. हा जप भक्तिपूर्ण मनाने करावयाचा. बुद्धीने केलेला जप फार लाभदायक होत नाही. बुद्धी ही तोडणारी आहे. भक्ती ही जोडणारी आहे. बुद्धीने समजून घ्यायचे आहे. भक्तीने आचरण करायचे आहे.
(एका कार्यकर्त्याला लिहिलेले पत्र,सौर फाल्गुन ६, संवत २०३९, दि. २८/०२/१९८३)
———————————————————————————————————————————————————————————————————-
सूक्त २४. सहस्रावधी कंठातून परब्रह्मशक्तीचे स्मरण..
ही उपासना सर्वदूर प्रिय होऊन मोकळ्या क्रीडांगणावर सहस्रावधी लोक आसनमांडी घालून बसलेले आहेत आणि संकेत होता क्षणीच एकत्र व एका स्वरात प्रारंभ करीत आहेत, तन्मयतापूर्वक गात आहेत, योग्य वेळी उपासना पूर्ण करीत आहेत, सर्व हिंदुस्थानभर तळमळ आणि निष्ठापूर्वक ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र कोटीकोटी कंठांतून निघत आहे आणि खरोखर सामुदायिक निष्ठा, नीती, धैर्य, उद्योगशीलता, मित्रभाव, सर्वांभूती प्रेम आदि समाजधारणेला आवश्यक गुणांचा समाजात विकास होत आहे, असे दृश्य लवकरात लवकर पाहायला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
(ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला, दैनंदिन उपासना पोथी आवृत्ती पहिली, पान १५)
———————————————————————————————————————————————————————————————————- “हिंदुत्वाच्या परंपरेतील एक बिंदू म्हणजे आपली प्रबोधिनी ही संघटना. आज या हिंदुत्वाचा एक अंश असलेली प्रबोधिनी हिंदुस्थानव्यापी व्हावी, असा संकल्प सर्वांनी मिळून करायचा. प्रबोधिनीच्या विविध केंद्रांमधून व कामांमधून परमेश्वराची शक्ती प्रकट करणाऱ्या प्रतिभेचे आणि जाणिवेचे स्फुरण वाढावे, वेदान्त तत्त्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यामध्ये आणि विज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्यामध्ये नेहमी आघाडीवर राहणारे नेतृत्वगुणसंपन्न युवक-युवती आणि स्त्री-पुरुष येथे निर्माण व्हावेत, हिंदुभूमीला वैभव आणि गुरुता प्राप्त व्हावी म्हणून येथे पराक्रमांची, प्रयत्नांची आणि दीर्घकाळ विकसणाऱ्या संघटनांची पराकाष्ठा व्हावी, असा संकल्प करायचा. त्यासाठी ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ अशी प्रार्थना करून परमेश्वराजवळ सामर्थ्य मागावयाचे.”
———————————————————————————————————————————————————————————————————-
सौर वैशाख ४, शके १९४०
२४/०४/२०२०
स. न. वि. वि.
गेले काही दिवस कै. आप्पांचा उपासनेसंबंधी एक एक विचार आपण रोज वाचला असेल. त्यापूव कुटुंबातील सामूहिक उपासनेसंबंधी मी तीन टिपणे लिहिली होती. तीही आपण वाचली असतील. पहिल्या टिपणामध्ये कोरोना साथीच्या काळात प्रबोधिनीची विविध केंद्रे व विभाग कसे काम करत आहेत, याचा थोडक्यात आढावा मी घेतला होता. त्यापैकी मदतकार्याचे संकलित निवेदन मी चार दिवसांपूव पाठवले होते.
भुकेलेल्या लोकांची भोजनाची व्यवस्था करणे, हे सर्वप्रथम केले पाहिजे असे काम आहे. तयार भोजन देण्यापेक्षा शिधा दिल्यावर, जे स्वतः आपले जेवण तयार करू शकतील, त्यांना शिधा वाटणे हे देखील चांगलेच. जेवण व शिधा वाटपाला जुन्या भाषेत ‘अन्नदान’ म्हणायचे.
कोरोना व्याधिग्रस्त रुग्णांवर औषधोपचार करणे हे काम दीनानाथ रुग्णालयात तेथील डॉक्टर व अन्य आरोग्य सेवक करत आहेत. अनेक डॉक्टर आपापल्या खाजगी दवाखान्यांमधून किंवा सरकारी रुग्णालयांतून रोगनिदानाचे काम करत आहेत. याशिवाय रक्तदान करणे, स्वस्तातले व्हेण्टिलेटर बनवणे, रोगनिदानाचे संच बनवणे, मास्क बनवणे, ही सुद्धा आरोग्य रक्षणाचीच कामे आहेत. प्रबोधिनीचे अनेक सदस्य अशी कामे करत आहेत. या सर्व कामांना जुन्या भाषेत ‘प्राणदान’ म्हणायचे. आपण त्याला ‘आरोग्यदान’ ही म्हणू शकू.
‘अन्नदान’ आणि ‘आरोग्यदान’ ही आपत्तीकाळात करायची कामे. ती चालू असताना नित्याचे ‘विद्यादानाचे’ कामही आपले अनेक विभाग नवीन-नवीन तंत्रे वापरून व विविध प्रकारे अडचणींवर मात करत, करत होते. त्यामध्ये शाळेचा नियमित अभ्यासक्रम शिकवणे, परीक्षा घेणे, कार्यपत्रके देणे, बौद्धिक खेळ देणे, प्रश्नमंजूषा देणे, अभिरुची व अभिव्यक्ती विकासाचे कार्यक्रम घेणे, अशी अनेक प्रकारची कामे अनेकांनी केली.
‘अन्नदान’, ‘आरोग्यदान’ व ‘विद्यादान’ ही तीनच कामे पारतंत्र्याच्या काळात भारतीय व्यक्तींना करता यायची. त्यांचा उल्लेख भारतातील व्याख्यानांमध्ये विवेकानंदांनी तीन वेळा केला होता. देशातील व्यापार, उद्योग, अर्थकारण, प्रशासन, संशोधन, संरक्षण या सर्वांवर इंग्रजांच्या राजवटीचे नियंत्रण होते. पण स्वातंत्र्याच्या काळात ही सर्व कामेही भारतीयांना स्वयंसेवी वृत्तीने व्यक्तिशः किंवा संघटितरित्या किंवा शासनाला सहकार्य करत करावी लागतात. या सगळ्या कामांना आपण ‘देशकारण’ करणे, हा कै. आप्पांचा शब्द वापरू शकतो.
‘अन्नदान’, ‘आरोग्यदान’, ‘विद्यादान’ आणि ‘देशकारण’ या प्रत्येकाच्या बरोबर आणि स्वतंत्रपणेही ‘अध्यात्मज्ञानाच्या दानाचे’ काम केले पाहिजे, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. बंगालमधल्या एका खेडेगावात दुष्काळाच्या काळात अन्नछत्र चालवणाऱ्या एका शिष्याला विवेकानंदांनी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे, की फक्त ‘अन्नदान’ करत राहिले, तर साऱ्या जगातली संपत्ती वापरली तरी, एका गावाचे समाधान होणार नाही. ‘अन्नदानाच्या’ बरोबर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘विद्यादान’ केले पाहिजे व आपल्या आयुष्याचा हेतू त्यांना कळण्यासाठी ‘अध्यात्मज्ञानाचे’ दान केले पाहिजे. असे करणे म्हणजे लोकांची खरी सेवा करणे किंवा त्यांच्यातील परमेश्वराची पूजा करणे.
प्रबोधिनीतील सर्व सदस्य व कार्यकर्ते आरोग्यदान, विद्यादान आणि देशकारण यापैकी एखादे काम, आपल्या सर्व क्षमता वापरून, कौशल्याने आणि ज्ञान व तंत्रज्ञानामध्ये अद्ययावत राहून, करायचा प्रयत्न करत असतात. आपत्तीच्या काळी अन्नदानाचे काम करण्यासाठी कष्ट करण्याची ही त्यांची तयारी असते. परंतु अध्यात्मज्ञानाच्या दानाचे काम करण्याची मात्र आपली तयारी झाली आहे किंवा नाही याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका असते.
प्रबोधिनीच्या कामाचे समग्रता हे एक वैशिष्ट्य आपण सांगतो. त्यामुळे अन्नदान असो, आरोग्यदान असो, विद्यादान असो, किंवा देशकारण असो, या प्रत्येक कामाबरोबर आपल्याला व्यक्तिशः किंवा गट म्हणून अध्यात्मज्ञानाचे दान सुद्धा करता आले पाहिजे. विवेकानंदांनी निवेदितांना लिहिलेल्या एका पत्रात त्याचा उल्लेख पुढील प्रमाणे केला आहे – ‘माझे ध्येय काही थोड्याशा शब्दात मांडले जाऊ शकते. आणि ते याप्रमाणे : मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वरत्वाचा उपदेश देणे (म्हणजेच अध्यात्मज्ञानाचे दान) आणि जीवनातील प्रत्येक कार्यात (म्हणजे अन्नदान, आरोग्यदान, विद्यादान आणि देशकारण) हे ईश्वरत्व कसे प्रगट करावे या संबंधीचा मार्ग दाखवून देणे (म्हणजेच प्रत्येक कामाबरोबर त्यात कार्यकर्ते व लाभाथ या नात्याने सहभागी असणाऱ्यांना अध्यात्मज्ञानाचे दान) हे माझे ध्येय आहे.’ असे करणे म्हणजेच समग्रता.
नित्याच्या कामाच्या धबडग्यात या महत्त्वाच्या विषयासाठी आपण पुरेसा वेळ व लक्ष देऊ शकत नाही. आपल्या विभागाची सामूहिक उपासना हा, या महत्त्वाच्या कामाकडे आपले लक्ष असले पाहिजे, याची आठवण ठेवण्याचा एक मार्ग आहे. कोरोना साथीच्या काळात प्रत्येकाचा निदान कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा वेळ वाचलेला आहे. त्या वेळातला काही भाग आपण सगळ्यांनी व्यक्तिगत आणि सामूहिक उपासनेसाठी द्यावा, हे सुचवण्यासाठी मी सुरुवातीची तीन टिपणे लिहिली होती. उपासनेवरचा आपला विश्वास बळकट होण्यासाठी रोजच्या व्यक्तिगत उपासनेचा उपयोग होतो. तसाच कुटुंबातील सदस्यांबरोबर केलेल्या सामूहिक उपासनेचा उपयोग होतो. याचा स्वतः अनुभव घेण्याची संधी आपल्याला या काळात मिळाली आहे. अनुभवाच्या जोडीला उपासनेमागचा विचार आपण समजून घ्यावा यासाठी गेले सात दिवस कै. आप्पांचा एक एक विचार आपण क्रमशः पाहिला. उद्यापासून पुन्हा आणखी एक एक विचार रोज पाहणार आहोत.
‘रूप पालटू देशाचे’ या प्रबोधिनीच्या कामामागील विचारात असलेली समग्रता आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावी त्याकरिता कुटुंबातील, मित्रमंडळाबरोबरील आणि कामातील नित्याच्या सहकाऱ्यांबरोबरील सामूहिक उपासना अधिक अर्थपूर्ण व्हावी. आणि यासाठी त्यासंबंधीचा विचार समजून घेणे व प्रत्यक्ष कृती करणे हे दोन्ही जमवण्याचा आपण प्रयत्न करूया.
———————————————————————————————————————————————————————————————————-
सौर वैशाख १३ शके १९४२
०३/०५/२०२०
स. न. वि. वि.
गेले पंधरा दिवस कै. आप्पांचे उपासनेसंबंधी पंधरा विचार आपण वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. मी कौटुंबिक आणि सामूहिक उपासनेसंबंधी लिहायला सुरुवात केली होती. आपल्याला पाठवलेल्या पंधरा सूक्तांपैकी एका सूक्तातच कौटुंबिक उपासनेचा उल्लेख होता. चार सूक्तांमध्ये सामूहिक उपासनेचा उल्लेख होता. इतर सर्व सूक्ते व्यक्तिगत उपासना का व कशी करावी यासंबंधीच होती. समूहशक्ती जागी व्हावी यासाठीच सामूहिक उपासना करायची आहे. पण उपासना करणाऱ्या समूहात व्यक्तिगत उपासना व्रत म्हणून करणाऱ्या काहीतरी व्यक्ती असाव्या लागतात. तर त्या समूहात समूहशक्ती जागी होईल.
कौटुंबिक उपासनेच्या बाबतीतही तसेच आहे. कुटुंबातील जेवढ्या व्यक्ती दैनंदिन उपासनेचे व्रत घेतलेल्या असतील तेवढ्या प्रमाणात त्या कुटुंबाची सामूहिक उपासना चांगली होईल. अनेक कुटुंबांमध्ये स्तोत्र म्हणणे किंवा आरती करणे या स्वरूपातील सामूहिक उपासना परंपरेने होते. अशा कुटुंबातील प्रबोधक सदस्यांना तुमची आहे ती उपासना चालू ठेवा. त्यामध्ये ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ या मंत्राची भर घाला. असे कै. आप्पांनी सांगितलेले मी ऐकले आहे. असे का बरं सांगत असतील?
‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ किंवा ‘विश्व स्वधर्मसूर्ये पाहो’ अशा प्रार्थना अनेक कुटुंबांमधून होतात. भारतीय मन ‘सर्व जगाचे मंगल होवो’ या पातळीला सहज जाते. परंतु अशा विचारामध्ये राष्ट्र समर्थपणे जगले पाहिजे, याचे भान इतिहासात अनेक वेळा सुटून गेलेले दिसते. हे भान सुटून जाऊ नये, राष्ट्राचा विचार व्यक्ती-व्यक्तीमध्ये व घरा-घरामध्ये पक्का व्हावा यासाठी ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हणण्याचा आग्रह आहे.
कुटुंबाच्या सामूहिक उपासनेत किंवा व्यक्तिगत उपासनेत ‘परब्रह्मशक्ती स्फुरो आमच्या घरामध्ये/कुटुंबामध्ये’ असा मंत्र कोणाला म्हणावासा वाटला तर म्हणावा का? अवश्य म्हणावा. काही जणांनी आम्ही असा मंत्र म्हणतो असे मला कळवले ही आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात आणि नेहमीसाठीच ‘परब्रह्मशक्ती स्फुरो मानवतेमध्ये/जगामध्ये/सर्व देशांमध्ये’ असा मंत्र ही आम्ही म्हणतो असे पण काही जणांनी कळवले आहे. त्यांचेही स्वागत आहे.
व्यक्तिगत किंवा कुटुंबाच्या उपासनेमध्ये ज्यांना सोयीचे वाटेल त्यांनी ‘परब्रह्मशक्ती स्फुरो भारतामध्ये/हिंदुस्थानामध्ये/आमच्या राष्ट्रामध्ये/आपल्या राष्ट्रामध्ये’ असाही मंत्र म्हटलेला चालेल. हनुमंताने जशी एकदम सूर्यबिंबाकडे झेप घेतली तशी आपल्या चिंतनाने एकदम मानवतेकडे उडी मारू नये. मध्ये राष्ट्राचा थांबा अवश्य असावा. एवढेच प्रबोधिनीतल्या या बाबतीतल्या चिंतनाचे सूत्र आहे.
‘भारत महासत्ता व्हावा’ ही प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली घोषणा आहे. ‘भारताने विश्वगुरू व्हावे’ ही झोपी गेलेल्यांना जागे करण्यासाठी मारलेली हाक आहे. ‘विश्वसंस्कृती निर्माण करण्यामध्ये भारताने आपला वाटा पुरेपूर उचलावा’ हेच समृद्ध, सशक्त, संघटित भारताचे काम आहे. हे ध्येय जागे झालेल्या प्रत्येक व्यक्ती व कुटुंबाचे व्हावे यासाठी व्यक्तिगत व कौटुंबिक उपासनेत सुद्धा ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र असावा.
कै. आप्पांचे पंधरा विचार व माझी पाच टिपणे यांच्या द्वारे सामूहिक उपासनेबद्दलचे चिंतन आज संपले. उपासनेसंबंधी व उपासनेला पूरक असे कै. आप्पांचे विचार आणखी बरेच आहेत. उरलेले विचार कै. आप्पांच्या साहित्यात शोधणाऱ्याला सापडू लागतील.
कोरोना साथीमुळे जाहीर झालेली संचारबंदी आणखी दोन आठवडे लांबली आहे. या काळात आपली व्यक्तिगत व कुटुंबातील सामूहिक उपासना नियमित व दृढ करण्याचा प्रयत्न करावा.
———————————————————————————————————————————————————————————————————-
सौर वैशाख २७, शके १९४२
१७/०५/२०
दि. ३ मे रोजी कै. आप्पांची उपासना सूक्ते व माझी उपासनेवरील टिपणे पाठवायचे मी थांबवले. कोरोना साथीमुळे आलेल्या संचारबंदीच्या काळात सार्वजनिक सामूहिक उपासना इंटरनेटच्या माध्यमातून करणे शक्य आहे. परंतु कौटुंबिक सामूहिक उपासना एकत्र बसून करणे शक्य आहे. सामूहिक उपासनेत सहभागी व्यक्तींमध्ये जितक्या जणांची व्यक्तिगत उपासना नियमित व मनःपूर्वक चालू असते, तितक्या प्रमाणात सामूहिक उपासना अधिक चांगली होते, असे मी म्हटले होते. गेल्या दोन आठवड्यात बहुतेकांची दैनंदिन व्यक्तिगत उपासना आणि अनेकांची किमान साप्ताहिक कौटुंबिक उपासना त्यांच्या त्यांच्या संकल्पाप्रमाणे झाली असेल. व्यक्तिगत उपासना चांगली होण्यासाठी उपासनेतील ध्यान किंवा स्वगत चिंतन एकाग्रतेने आणि अर्थपूर्ण व्हायला पाहिजे. त्यासंबंधी आज लिहायचा विचार आहे.
कै. आप्पांची उपासनेसंबंधी सूक्ते मागच्या महिन्यात अनेकांना वाचायला पाठवली होती. त्यामध्ये चिंतन, संकल्प असे शब्द अनेक वेळा आले आहेत. स्वतःच्या भाषेत, मराठीत, स्वतःच्या शब्दांत देवाशी संवाद करावा, असा ही उल्लेख काही वेळा आला आहे. गद्यामध्ये (म्हणजे सरळ वाक्यांमध्ये, मंत्र, लोकांच्या स्वरूपात नाही) बोलावे असेही सुचवलेले आहे. उपासनेतील मंत्र म्हणताना त्यांचा उच्चार, त्यांची चाल, त्यांचे शब्द, त्यांचा क्रम बरोबर राहावा, त्यात चूक होऊ नये, याकडेच बऱ्याच वेळा लक्ष जाते. मंत्रांच्या अर्थाकडे लक्ष देणेसुद्धा प्रयत्नपूर्वक करावे लागते. मग स्वतःच्या शब्दांमध्ये, गद्यामध्ये देवाशी संवाद कधी करायचा? आपले संकल्प देवाला कधी सांगायचे? संकल्प पूर्ण करायला बळ मिळावे अशी प्रार्थना कधी करायची? असे अनेक जणांचे प्रश्न आहेत.
ध्यान म्हणजे स्वगत चिंतन
प्रबोधिनीमध्ये प्रचलित असलेल्या उपासनेमध्ये शक्तिमंत्र व विरजा मंत्र म्हणजेच शुद्धिमंत्र म्हणून झाल्यावर व गायत्री मंत्र म्हणायच्या आधी ध्यान करावे असे सुचवले आहे. ध्यान शब्दाने बरेच गैरसमज होतात. दैनंदिन उपासना पोथीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ध्यान म्हणजे काय अभिप्रेत आहे, ते कै. आप्पांनीच लिहिले आहे –‘ध्यान म्हणजे देवाशी स्वभाषेत, गद्यामध्ये प्रत्यक्ष बोलायचे. लागल्यास (म्हणजे मनातल्या मनात बोलणे जमत नसल्यास) आपलेच आपल्याला ऐकू येईल इतक्या मोठ्याने बोलायचे. देवसुद्धा आपल्याशी बोलतो आहे असा दृढ विश्वास ठेवायचा’.
दैनंदिन उपासना पोथीच्या दुसऱ्या आवृत्तीतही ‘ध्यान म्हणजे परमेश्वराशी संवाद साधावा’, ‘हे चिंतन प्रत्येकाचे व प्रति दिवशी वेगळे असू शकेल’ असे लिहिले आहे. ध्यान म्हणजे देवाशी संवाद व तो शक्यतो मनातल्या मनात, पण आवश्यक वाटल्यास ओठ हालवत स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या मोठ्याने करावा, असे दोन्ही आवृत्त्यांमधले वर्णन पाहून, दैनंदिन उपासना पोथीच्या तिसऱ्या आवृत्तीपासून, विरजा मंत्र व गायत्री मंत्र यांच्यामध्ये दीड ते दोन मिनिटे ‘स्वगत चिंतन’ करावे असे छापायला सुरुवात केली आहे. ‘ध्यान’ म्हणा, किंवा ‘स्वगत चिंतन’ म्हणा, पण नेमके काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या मनात शिल्लक राहतोच. प्रत्येकाचे चिंतन आणि एकाचेच रोजचे चिंतन वेगवेगळे असू शकेल असे म्हणूनही, खुलासा झाला असे बऱ्याच जणांना वाटत नाही. काय संकल्प करायचे हेच सुचत नाही. काय सांगायचे? काय मागायचे? काय विचारावे? हे आमच्या शब्दांत मांडता येत नाही, अशीही काही जणांची अडचण दिसते. त्यासाठी निगडीच्या गुरुकुलात सुचवलेली प्रश्नावली मला उपयुक्त वाटते.
चिंतनासाठी निगडी गुरुकुलातील प्रश्नावली
निगडीच्या गुरुकुलात विद्याथ पाचवीमध्ये येतात. सुरुवातीला ते उपासनेमध्ये फक्त शक्तिमंत्र व ‘चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्’ हा शिवमंत्र म्हणतात. दोन्ही मंत्रांच्या मध्ये ते ‘स्वगत चिंतन’ करतात. त्यासाठी त्यांना पाच प्रश्न सांगितले जातात. – १) मी कोण? २) माझे कर्तव्य काय? ३) मी काल कोणती चांगली गोष्ट केली? ४) मी काल कोणती वाईट गोष्ट केली? आणि ५) मला मोठेपणी कोण व्हायचे आहे? म्हणजेच माझे ध्येय काय?
विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा अर्थ पाचवीमध्ये वर्षभरात गोष्टी व उदाहरणांच्या मदतीने समजावून सांगितला जातो. स्वगत चिंतनाच्या वेळी रोज स्वतःला मनातल्या मनात या प्रश्नांची उत्तरे द्यायची. म्हणजे स्वगत चिंतन झाले. दीर्घ काळ (दहावीनंतरही दहा ते पंधरा वर्षे) उपासना करणाऱ्या गुरुकुलाच्या स्नातकांनी (माजी विद्यार्थ्यांनी) मला सांगितले, की प्रश्न तेच असले तरी, पुढच्या पुढच्या इयत्तांमध्ये म्हणजे वयानुसार, स्वतः स्वतःला दिलेली उत्तरे बदलत जातात.
सुरुवातीला, अध्यापकांनी सांगितले म्हणून, विद्याथ असे चिंतन करत असले, तरी आठवीमध्ये विद्याव्रत संस्कारानंतर, अनेक जण अधिक मनःपूर्वक, उपासनेच्या वेळी चिंतन करायला लागतात. विद्याव्रत संस्कारानंतर या प्रश्नांचे स्वरूप थोडे बदलते. दर वषचे वर्गशिक्षक कदाचित आपल्या शब्दांमध्ये ते प्रश्न सांगत असतील. आठवीमध्ये सांगितलेले प्रश्न एका स्नातकाला पुढीलप्रमाणे आठवतात – १) मी कोण आहे? २) माझा धर्म (कर्तव्य) काय? ३) काल माझ्या धर्माला अनुसरून मी कोणती गोष्ट केली? ४) काल माझ्या धर्माच्या विरुद्ध मी कोणती वाईट गोष्ट केली? ५)परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा माझा मार्ग कोणता?’ तिसरा व चौथा प्रश्न अनुक्रमे ‘मी देशासाठी कोणती अनुकूल गोष्ट केली?’ व ‘मी देशाला प्रतिकूल कोणती गोष्ट केली?’ असे होते, असेही एका स्नातकाने मला सांगितले.
मला या दोन्ही प्रश्नावल्यांवरून एवढे लक्षात आले की हे प्रश्न रस्त्यावरच्या मार्गदर्शक खुणा आहेत. त्यामुळे स्वगत चिंतन कसे करायचे हे शिकायला व त्याप्रमाणे करता यायला मदत होते. सुमारे दहा वर्षांपूव एका स्नातकानेच पोथीत लिहिलेल्यापेक्षा, गुरुकुलात शिकवलेल्या पद्धतीने स्वगत चिंतन अधिक चांगले होते असे मला सांगितले.
मी आठवडाभर उपासनेच्या वेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांना सांगितले जाणारे वरील प्रश्न वापरून चिंतन करून पाहिले. कोणत्याही वयात उपासना सुरू करणाऱ्यांना ते प्रश्न चिंतन सुरू करून द्यायला उपयोगी ठरतील असे मला वाटते. ज्यांना प्रयोग करून पाहायचा असेल त्यांनी अवश्य करून पाहावा. स्वगत चिंतनातली सुरुवातीची पावले टाकण्यासाठी हे उत्तम साधन आहे. ज्यांना आधीपासूनच स्वतःची स्वगत चिंतनाची पद्धत सापडली आहे, त्यांनी अर्थातच या प्रश्नांची मदत घेण्याचे काही कारण नाही. माझे स्वगत चिंतनाचे प्रयोग अनेक वर्षे चालू होते. त्यातून मला माझी पद्धत सापडली.
माझे स्वगत चिंतनाचे प्रयोग
मी स्वगत चिंतनाचे काय प्रयोग केले? सध्या स्वगत चिंतन कसे करतो? शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असताना उपासना साप्ताहिकच व्हायची. तेव्हा उपासनेतला दोन मिनिटे चिंतनाचा काळ अस्वस्थतेतच जायचा. कारण काय करायचे कोणी सांगितले नव्हते. एम्. एस्. सी. ला असताना कै. आप्पांनी सांगितले की ‘सगळ्या गोष्टी तुम्हाला आयत्या कशा मिळतील? स्वतःची उत्तरे स्वतःच शोधून काढायची’. त्या काळात मधून- मधून सलग काही दिवस रोज उपासना व्हायची. त्यात महिना-दोन महिने खंडही पडायचा. तेव्हा चिंतनाच्या वेळात मनातल्या मनात ओंकाराचा उच्चार करायचो. असे दोन-तीन वर्षे चालले पुढे कॅनडात गेल्यावर हिंदुस्थानची चित्रमूत डोळ्यांसमोर आणायची व ओंकाराचा उच्चार करायचा असा प्रयोग केला. पण एक चित्र पाहायचे आणि दुसऱ्या अक्षराचा उच्चार करायचा हे जमेना. मग मनातल्या मनात चित्रमूत पाहणे एवढाच कार्यक्रम ठेवला व ओंकाराचा उच्चार बंद केला. पण दैनंदिन उपासना अनियमितच होती.
१९८३ साली पुण्यात परत आल्यावर प्रबोधिनीच्या उपासना मंदिरातच दैनंदिन उपासना सुरू झाली. त्यामुळे चिंतनाच्या वेळात चक्क डोळे उघडून उपासना मंदिरातल्या चित्रमूतकडे बघत बसायला सुरुवात केली. त्यावेळी प्रथमच दैनंदिन उपासनेची पोथी बारकाईने अभ्यासायला सुरुवात केली. आपण काही चिंतन करतच नाही अशी जाणीव तेव्हा प्रथम झाली. पण सर्व अडचणींवर उत्तरे स्वतःच शोधून काढायची हे डोक्यात इतके पक्के बसले होते, की चिंतनाच्या वेळात काही मागावे असे वाटत नव्हते. स्वतःचे काय चुकले, काय बरोबर झाले, काय करायला हवे, हा विचार इतर वेळी चालूच असायचा. त्यासाठी उपासनेतला वेळ कशाला वापरायचा असे वाटायचे.
कल्पक सहानुभूती आणि इतर पठणाचे प्रयोग
या काळात स्वामी रंगनाथानंदांचे एक पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकामध्ये imaginative sympathy (कल्पक सहानुभूती) हे एक तंत्र सुचवले होते. ते वापरण्यासाठी डोळे मिटणे सोयीचे वाटले. त्यामुळे चिंतनाच्या वेळात चित्रमूतकडे उघड्या डोळ्यांनी बघत बसणे बंद झाले. बसल्या जागेवरून आपल्या मनात असलेल्या देशाच्या नकाशात कुठे-कुठे, कोण कोण लोक, कुठल्या प्रकारच्या अडचणीत असतील, त्यांची दुःखे कोणती असतील, ती कशी दूर करता येतील, याची मनानेच कल्पना करायची. काही आठवडे उपासनेच्या वेळी चिंतनाच्या वेळात हे तंत्र वापरले, ते उपयुक्त वाटले. पण उपासनेची दोन मिनिटे पुरेनात. इतर वेळीही स्वस्थ बसून असा कल्पनेने अडचणींचा विचार करता येतो, आणि कल्पनेनेच या अडचणी दूर करण्यासाठी काय उपाययोजना करायची हा विचार कोणत्याही वेळी करता येईल.
काही महिने कल्पक सहानुभूतीचे तंत्र वापरून चिंतन झाले. त्याच काळात प्रबोधिनीमध्ये गांधी विचार अभ्यास शिबिर झाले. त्यामुळे त्यात म्हटलेले गीतेतील स्थितप्रज्ञ दर्शन, विनोबांची नाममाला, एकादश व्रतांचा लोक, गांधीजींच्या आश्रम प्रार्थनेतील प्रात: स्मरणाचे लोक, ‘वैष्णव जन तो’ हे भजन, असे आळीपाळीने दोन मिनिटात काय म्हणता येईल ते म्हणत होतो. दोन-तीन वर्ष हे चालले. पाठांतर त्यानिमित्ताने बरेच झाले. पण चिंतन होते आहे असे वाटेना. मग जे पाठ आहे तेच म्हणूया व त्याच्या अर्थाचे चिंतन करूया कसे वाटले.
काही महिने अथर्वशीर्ष म्हटले, काही महिने गीतेच्या अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शनानंतरचे अर्जुनाने म्हटलेले कृष्ण स्तुतीचे लोक म्हटले. काही आठवडे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र, तर काही आठवडे ‘काया ही पंढरी’ हा अभंग म्हटला. सलग सहा महिने वर्षारंभ-वर्षान्ताच्या उपासनेतील गद्य प्रार्थनेचे शेवटचे वाक्य ‘आमचा कणन् कण आणि क्षणन् क्षण तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू देत’ हे जपासारखे म्हणून पाहिले. पसायदानही म्हणून पाहिले. एवढे सगळे करूनही त्यातले काहीच माझ्या स्वभावाला जुळणारे आहे असे वाटेना.
प्रार्थना, चल उपासना आणि प्रार्थनेचा जप
साधारणपणे १९९४ मध्ये एकदा सोलापूर ते लातूर प्रवास करताना, सर्व वेळ प्रबोधिनीच्या प्रार्थनेच्या अर्थावर विचार करत होतो. त्याच काळात कै. आप्पांच्या चल उपासना पद्धतीचा विचार चालू होता. मग रोजच्या उपासनेनंतर चालत-चालत प्रबोधिनीची प्रार्थना मनातल्या मनात म्हणणे, अशी चल उपासना चालू केली. त्यावेळी लक्षात आले की मला छोट्या मंत्रांचा जप करणे कंटाळवाणे वाटते. अथर्वशीर्ष थोडे मोठे असल्याने त्याचा जप करता येतो. पण अर्थ माहीत असला तरी संस्कृत मंत्र म्हणत मराठीत अर्थाचा विचार करणे अवघड जाते. परंतु प्रबोधिनीची प्रार्थना पुरेशी मोठी आणि मराठीत आहे. अर्थाचा विचार करता-करता प्रार्थनेचा जप करता येतो. असे लक्षात आले की सर्व कडवी एकाच चालीत मनातल्या मनात म्हटली, तर बरोबर एका मिनिटात प्रार्थना म्हणता येते. मग चिंतनाच्या दोन मिनिटात संपूर्ण प्रार्थना दोनदा म्हणायची असे चालू केले. काही दिवस प्रार्थना म्हणायची तर काही दिवस अथर्वशीर्ष किंवा स्थितप्रज्ञ दर्शनाचे लोक म्हणायचे असे २००४ ते २००९ या काळात चालू होते. या काळात प्रार्थना म्हणत चल उपासना पण चालू होती. काही दिवशी दिवसभरात दहा-पंधरा वेळा संपूर्ण प्रार्थना म्हणून व्हायची. प्रबोधिनीच्या प्रार्थनेत अकरा संकल्प आहेत, आणि त्यांचा उच्चार केल्यावर ‘हे देव आस पुरवी तव पूजकांची’ अशी प्रत्यक्ष मागण्याची एकच ओळ आहे असे तेव्हा मनात स्पष्ट झाले.
स्वतः कृती करण्याचे अकरा संकल्प व देवाकडे मागण्याची एकच ओळ हे माझ्या स्वभावाशी जुळणारे होते. माझ्या स्वगत चिंतनाचा आशय मला सापडला. १९८३ मध्ये सुरू झालेला शोध २००९ मध्ये संपला. तेव्हापासून स्वगत चिंतनाच्या वेळेत मी दोन वेळा प्रबोधिनीची पूर्ण प्रार्थना म्हणतो. माझे संकल्प दृढ होताना अनुभवतो आहे. तुम्ही सर्वांनी आपले चिंतन कसे असावे याचे प्रयोग असेच करून पाहावेत. कदाचित माझ्यापेक्षा कमी वेळात तुम्हाला तुमच्या स्वगत चिंतनाची पद्धत सापडेल. लॉकडाऊन-४ च्या काळात स्वगत चिंतनाची एकाग्रता व अर्थपूर्णता वाढवण्याचा प्रयत्न आपण सर्व जण करूया.
———————————————————————————————————————————————————————————————————-