मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते!

ग्रामीण महिलांसोबत काम करायला लागल्यावर, पहिल्यांदा कुठली गोष्ट लक्षात आली तर तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट ‘ती’च्या मार्जिने झालेली नसते, लग्न तर सोडाच पण जन्म घेऊनही जणू ‘ती’ने काहीतरी चूकच केली आहे. त्यामुळे ‘ती’च्या मनासारखे होण्याची ‘ती’ची अपेक्षाही नसते. कारण संस्कार!

त्याकाळात बचत गटातील महिलांची नावे पाहिली तर दगडाबाई, धोंडाबाई, नकोशी अशी एखाद-दुसरी गटात असायचीच! आता काळ बदलला आहे. पण तेव्हा जी गटात आली ती, ‘मी निर्णय करू शकते!’ या  कल्पनेचा कधीही विचार केलेला नाही अशी होती, त्यामुळे नेतृत्वाचे काम एकदम सुरू करता आले नाही.. आधी व्यक्ती विकासाचे काम करावे लागले. अनेक जणी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाच्या कामासाठी जो मानसिक प्रवास करावा लागला त्याने सुद्धा दमून गेल्या. ‘ती’ला जबाबदारी घेण्याबद्दल स्वाभाविकच अडचण नसायची पण ‘अधिकार’ समजायला थोडा वेळ लागायचा. हा नेतृत्वाचा पहिला टप्पा होता!

प्रबोधिनी गावातच गावातल्याच महिलांच्या मदतीने काम करत असल्यामुळे उपक्रमाची कमी नव्हती. भरपूर उपक्रमाची योजना आखलेली असायची. उपक्रम कुठलाही असला तरी महिलांच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडत होते. अनेक उपक्रमांनी पहिल्यांदाच सहभागी होऊन घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे भावविश्व विस्तारण्याचे काम केले. भावविश्व समृद्ध झाल्याशिवाय विकासाची गरज निर्माण होत नाही. विकासाची गरज निर्माण होणे ही ‘महिलांनी विकास कामात स्वेच्छेने येण्यासाठीची प्राथमिक गरज’ आहे ही बाब आधी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपण गेल्या भागात जो ‘सहल’ उपक्रम पाहिला तो महिलांचे भावविश्व समृद्ध करायला कशी मदत करणारा ठरू शकतो हे समजून घेतले.   

बाह्य पेहेराव जरी बदलला, नऊवारी जाऊन पंचवारी आली.. क्वचित प्रसंगी पंजाबी ड्रेस आला तरी विचार करायची पद्धती कालानुरूप बदललेली असेलच असे नाही. आता ‘नकोशी’, दगडा.. धोंडा या सापडत नाहीत. आता मुलींची नावे कोमल, अपेक्षा, आकांक्षा असतात.. या बदललेल्या नावाचे सुद्धा त्यामुळे मला महत्व वाटते. हे जरी खरे असले तरी जिने ही नावे ठेवली त्या सविता/ कविता/ सुरेखा यांच्यांशी ‘कुटुंबामधले महिलेचे स्थान काय असावे?’ यावर चर्चा करताना संस्काराने घालून दिलेली ‘कुटुंबाची’ मर्यादा लक्षात आली. घरातल्या ‘बाई’च्या स्थानाचे त्यांचे वेगवेगळे विचार ऐकायला मिळाले.

कौटुंबिक हिंसाचार हा खूपच मोठा विषय आहे, पोलिस स्टेशन सोबत महिला दक्षता समितीची स्थापना करून आपण हे काम करायला बचत गटाच्या महिलांसाठी सुरुवात केली. जी कौटुंबिक हिंसाचाराची बळी असते ती या विषयावर बोलायला सुद्धा पहिल्यांदा तयार नसते. याचे नक्की कारण काय असावे अशी खात्री करायला आपण करोना नंतर एक छोटेसे सर्वेक्षण केले. त्यात अनेक प्रश्न होते. त्यापैकी एक प्रश्न होता की नवऱ्याने बायकोला मारले तर.. अ) शिस्त लागण्यासाठी मारले तर ठीक ब) चूक झाली म्हणून मारले तर हरकत नाही आणि शेवटचा क) पर्याय होता मारता कामा नये. अजूनही लग्न झालेल्या तिशी ओलांडलेल्या ८०% महिलांना अ/ब पर्याय योग्य वाटतात. मुलांसामोर मारू नये असा अनेकींचा सूर होता. पूर्वी नवऱ्याची ओळख ‘मालक’ म्हणून करून दिली जायची, आता जरा शिकलेली ‘मालक’ म्हणत नाही मिस्टर म्हणते पण आजही ‘ती’ने स्वीकारलेली त्यांची ‘मालकी’ मनातून पूर्ण गेलेली नाही. जरा खोलात जाऊन चर्चा केली तर त्या ‘वाटण्यात’ सुरक्षितता दडलेली आहे असे लक्षात येते. सर्व सिध्द्धीस नेण्यात ‘तो’ समर्थ आहे.. ही भावना आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रश्नाचे उत्तर बादलायचे असेल तर मनातला ‘स्वीकार’ बदलण्याची गरज आहे, ‘ती’ची मानसिकता बदलायला हवी. मानसिकता क्रांती केल्यासारखी कमी काळात बदलत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, या पिढीसाठी काम केले तर पुढच्या पिढीमध्ये दिसून येते.

      बचत गट हे निमित्त आहे हे त्यासाठीच! त्यामुळे असा वेगळा विचार करायची संधी मिळते. कधी गटात कर्ज मागणी जास्त झाली तर गटाशी बोलावे लागते, कोणाला कर्ज हवंय त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून कर्ज वाटप करावे लागते तर कधी एखादीची सहलीला येण्याची परवानगी काढण्यासाठी तिच्या घरी जाऊन सासू-सासरा किंवा नवऱ्याशी बोलावे लागते, कधी कधीच न गेलेल्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करावे लागते तर कधी स्वतःच्या घरी पाहुणे असले तरी बँक कर्जाचा हप्ता वेळेत गेला पाहिजे म्हणून बँकेत जावे लागते. बचत गटाच्या बैठकीनंतर उगाचच रेंगळणारे गटात कोण-कोण आहे, त्या काय बोलतात त्यावर खरेतर गटाचा परिणाम अवलंबून असतो. एरवी अशा क्षुल्लक वाटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ‘ती’चे अस्तित्व, ‘ती’ची स्वकल्पना तयार करायला उपयोगी पडतात. ‘मी माझ्या वेळाचा निर्णय घेऊ शकते’ असे वाटल्या शिवाय ‘मी माझे निर्णय करू शकते’ असे वाटत नाही .. मग गावासंबंधी निर्णय करण्याचा टप्पा येतो. गटाचे आर्थिक काम झाले तरी मैत्रिणींसोबत रेंगाळण्यासाठी जिच्याकडे वेळ आहे ती स्वतः पलीकडे पाहू शकते. पण स्वतःच्या किरकोळ वेळेचा सुद्धा निर्णय सुद्धा जी करू शकत नाही ‘ती’ गावाचे निर्णयही करू शकत नाही असे सार्वत्रिक चित्र आपण बघतो.  

त्यामुळे ‘ती’ची स्वतः पलीकडच्या कामात गुंतवणूक जसजशी वाढत जाते तसतसा ‘ती’चा आत्मविश्वास वाढला आहे असे इतरांच्याही लक्षात यायला लागते. आणि ‘ती’चा नेतृत्वाकडे प्रवास सुरू होतो. नेतृत्व करण्यासाठी फक्त राखीव जागा दिल्या पण असे प्रयत्न झाले नाहीत तर त्या पदावर जाऊनही हक्क बाजावता येत नाही मानसिकता आड येते. असा आत्मविश्वासाचा प्रवास झाला असला की पद मिळाले नाही तरी ‘गावच्या महिला राखीव पदासाठी कोणाला उभे करूया?’ यावर चर्चा करण्याच्या बैठकीचे सन्मानाचे निमंत्रण नक्की येते. लोकांना दिसेल अशी समाजाभिमुख वेळेची गुंतवणूक वाढत गेली की नेतृत्वाला व्यापाकता येते. बचत गट अशी स्वतः ठरवून स्वतःच्या वाढीची संधी देतो त्यामुळे समाधानकारक असते!   

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६