बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते.
आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला विषय असायचा. ‘काम करुन अंग मोडून आलं’ अशा वाक्याने सुरवात होऊन वेगवेगळे उपाय सांगितले जातात…त्यातच एक गोळी खाऊन झोप असाही उपाय असतो… पण ‘गोळी आणायला सुध्दा जाववंत नाही!’ इथे थांबलेला संवाद…. ‘बाईपणाचे भोग अन् दुसरं काय!’ इथं संपतोच!!
ग्रामीण महिलांच्या सोबत काम करताना लक्षात आले की आरोग्याचा प्रश्न वैद्यकीय नसून त्याला आर्थिक पैलू आहे, आजाराच्या परिणामाची भीती वाटणे असा मानसिक पैलू आणि पुरुष डॉक्टर असणे असा लिंगाधारीत भेद अशी ३ कारणे सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत.
जेव्हा ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामीण कामाचा भाग म्हणून आरोग्याचे काम करणारी आरोग्य सखी गावातच उभी राहिली तेव्हा अनेक बारीक बारीक प्रश्न तिला स्वाभाविकपणे विचारले गेले. त्त्यात सणावार जवळ आला की ‘पाळी पुढे ढकलायची गोळी कुठली?’ हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा ‘अधुनीक’ सुनांचा प्रश्न!
खरंतर शासनाने ‘आशा वर्कर’ ही याच पद्धतीने दर हजार माणसांमागे १ अशी रचना केलेली आहे पण शासनाच्या कुठल्याही कामात ‘प्रेरणा वाढवणे’, ‘काम कशासाठी करतो आहोत?’ ते पुन्हा पुन्हा सांगणे यावर भर दिला गेला नसल्यामुळे काही गोष्टी घडत नाहीत किंवा घडण्याची शक्यता खूपच कमी असते त्या गोष्टी गावातील आरोग्य सखींमुळे लक्षात यायला लागल्या. आरोग्य सखींच्या मदतीने लग्न होऊन साधारण ३-४ वर्ष झालेल्या महिलांचे काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केले. प्रश्न होता ‘सॅनिटरी नॅपकिन वापरता का?’ ‘हो’ उत्तर देणाऱ्यांना विचारले, ‘त्यासाठी महिन्याला लागणारे 35-40 रुपये तुम्हाला घरून मिळतात का?’ यासाठी/यावर ‘तुम्ही नवऱ्याशी बोलता का?’ इथे नोंदवायला खेद होतो की एकाही ‘अधुनिक’ सुनेने हा विषय आम्ही नवऱ्याशी बोलू शकतो आणि त्याच्याकडून घेऊन महिन्याला 35 40 रुपये खर्च करू शकतो असे उत्तर दिले नाही. या सुना ‘अधुनिक’ म्हणजे सासऱ्याच्या उपस्थितीत ज्या गाऊन घालू शकतात अशा होत्या पण अशा वरवर अधुनिक पेहराव करणाऱ्या सुनांनाही ‘याच्याशी नवऱ्याचा काय संबंध?’ हे ‘कळत’ नव्हते…. अनेकींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच दिसत होते. लग्न झाल्यानंतर माहेरून मिळणाऱ्या पैशातून अनेकजणी सँनिटरी नँपकीनसाठी लागणारा खर्च करत होत्या. काहीजणी रोजच्या किराण्याला मिळणाऱ्या पैशातून ‘पैसे वाचवून’ त्यातून हा खर्च करत होत्या.
त्यामुळे मासिक पाळी संबंधातील प्रश्न किती महिला धार्जिणा आहे असे आमच्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आले!
गावातल्या दुकानात आरोग्याला हानी कारक असली तरी पुरुष माणसाची गरज भागावी म्हणून तंबाकूची पुडी मिळते पण गरजेचे सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही आणि त्यामुळे सँनिटरी नँपकीनच्या खर्चात बाजाराच्या गावापर्यंतचा प्रवासखर्च ही धरायला हवा असे अनेकींनी सुचवले…. कारण या विषयाशी संबंध नसणारा नवरा बाजाराला गेला तरी ‘हे’ आणू शकत नाही!
मग जरा चौकशीच केली की मेडिकल मधे मिळणारे अजून काय काय गावात मिळायला हवे? तर ताप, डोकंदुखी, अंगदुखी यावर उपाय करणारी रुपया-दोन रुपयाची गोळी असे उत्तर आले!
शासनाने सर्वदूर राबवलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या कामामुळे म्हणा किंवा आरोग्य खात्याच्या कामामुळे म्हणा समाजात जागृती झाली आहे. आता ताप आला म्हणून कोंबडीचा नैवेद्य दाखवण्याऱ्या मागच्या पिढीपेक्षा आ़धी गोळी खाऊया असे वाटणारी नवी पिढी तयार झाली आहे. पण गावात गोळी मिळण्याची सोय नाही. गावातच शासनाची आशा वर्कर रहात असली, स्टॉकमध्ये असली तर फुकट गोळी मिळेल. पण विकत मिळणार नाही. लोकसंख्या कमी असेल तर साधारण ३०-४० गावात औषधाचे एक दुकान असते…. बाईमाणसाला २₹ गोळी आणायला ३०-४०₹ खर्च किंवा २-३ तास चालत जावे लागते. कोपऱ्यावरच्या दुकानात वाईन मिळावी असे वाटणाऱ्या एकाही पुढाऱ्याला स्वाभिमानाने विकत घेऊ शकेल अशी ताप उतरवणारी गोळी गावात मिळावी असे काही करावेसे का वाटू नये? मला कळतच नाही.
जगभरातील विकासाच्या स्पर्धेत टिकायचं असेल आणि सरासरी आयुर्मर्यादा वाढवायची असेल तर या विषयावर पंचतारांकीत हॉटेलमधल्या सेमिनारमध्ये तावातावाने मतप्रदर्शन करण्यापेक्षा तापाची-अंगदुखीची -डोकंदुखीवर उपाय करणारी गोळी गावात सहज मिळेल, महिलेला ‘सर्वार्थाने’ स्विकारले म्हणून सँनिटरी नँपकीनही गावात मिळतील असे करायला हवे. मला तर वाटते नवीन ‘विकासाच्या व्याखेत’ अशा गोष्टी गावातच मिळायला लागल्या की गावाचा विकास झाला असे आपण म्हणायला लागू या!!