आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग १
टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी
आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला २०२४ – भाग १ – आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ
आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाला आता आपण सुरुवात करत आहोत. आजच्या रविवारपासून आणखी पुढचे तीन रविवार ही व्याख्यानमाला चालू राहणार आहे. व्याख्यान चालू असताना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये ते प्रश्न टंकित करावेत. व्याख्यान संपल्यानंतर ते सगळे प्रश्न एकत्र पाहून पुढच्या व्याख्यानाच्या वेळी त्या प्रश्नांची उत्तर दिली जातील. व्याख्यान चालू असताना किंवा व्याख्यान संपल्यावर प्रश्नोत्तरांचे सत्र अपेक्षित नाही आहे. त्यामुळे ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी ते अवश्य चॅट बॉक्स मध्ये विचारून ठेवा. पुढच्या रविवारी त्याचे उत्तर मिळेल.
पार्श्वभूमी
‘राष्ट्रयोग’ या विषयावरती प्रबोधिनीच्या दुसऱ्या भवितव्य लेखामध्ये २०१२ साली पहिल्यांदा म्हटलेले आहे की, राष्ट्रविचाराला छेद देणारे जे आधुनिक विचारप्रवाह आहेत, त्याला उत्तर म्हणून आध्यात्मिक राष्ट्रयोगाची मांडणी आपण प्रबोधिनीमध्ये करायला पाहिजे. हे २०१२ साली म्हटलं; पण त्याच्यावर कोणी अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, असं काही ठरत नव्हतं आणि त्यामुळे त्याच्यावर पहिली व्याख्यानमाला व्हायला २०१९ साल उजाडलं. ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये तीन व्याख्याने झाली. पहिलं व्याख्यान अर्थात ‘राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचार प्रवाह’ या विषयावरती झालं. कारण राष्ट्राची गरजच नाही, राष्ट्र कालबाह्य झाले, असे हे आधुनिक विचारप्रवाह मांडतात, तर आपल्याला जर का प्रबोधिनी मध्ये ‘राष्ट्रासाठी काम करणे’, हे मुख्य उद्दिष्ट असेल तर या विचारप्रवाहांची दखल घ्यायला पाहिजे. तर हे विचार प्रवाह काय आहेत, त्यातले मुद्दे काय आहेत, असं समजून घेणारे पहिलं व्याख्यान झालं. मग दुसरं व्याख्यान ‘राष्ट्रकारणाची विविध अंगे’ या विषयावरती झालं की, राष्ट्रकारण करायचं म्हणजे काय करायचं, नेमकं कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये काम केलं पाहिजे, आज कोण काम करते, त्या कामाच्या मर्यादा काय आहेत, त्याची बलस्थान काय आहेत, असं दुसरं व्याख्यान झालेलं होतं. ही दोन व्याख्याने प्रस्तावनेची झाल्यानंतर मग ‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ या विषयावरती शेवटचं तिसरं व्याख्यान झालं. या विषयावरची पहिलीच मांडणी त्यावेळी झाली.
आता २०१९ मध्ये हे का करावसं वाटलं? एक तर भवितव्य लेखामध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे अनेक जणांचा आग्रह चालला होता, याच्यावरती काहीतरी आपण विचार सुरू करूया, अभ्यास सुरू करूया, बैठकी घेऊया. तर बैठकी घ्यायच्या तर आधी काहीतरी प्रस्ताव पाहिजे म्हणून हे व्याख्यान करूया अशी कल्पना निघाली. पण त्याला मुख्य गती मिळाली ती २०१८ साली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या वेळी जे भाषण झालं. ते जून २०१८ साली झालं. ते भाषण ऐकल्यानंतर आता आपण नक्की काहीतरी मांडणी करायला पाहिजे, असं वाटायला लागलं. ते भाषण मी पूर्ण ऐकलेलं होतं. अनेक जणांनी ऐकलं असेल कारण परस्परांशी फारसा संवाद नसणाऱ्या संघटना – संघ आणि काँग्रेस. तर काँग्रेस मध्ये पण ५० वर्ष काम केलेले शेवटी राष्ट्रपती म्हणून काम केलेले असे प्रणव मुखर्जी येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते काय बोलतील अशी थोडी उत्सुकता होती. फार छान भाषण झालं. अतिशय विद्वान गृहस्थ होते. त्यामुळे अतिशय चांगलं भाषण आहे.
त्याचं भाषण पूर्ण लेखबद्ध झालेलं आपल्याला ते बघायला उपलब्ध आहे. (https://www.indiatoday.in/india/story/read-here-the-full-text-of-pranab-mukherjee-s-speech-at-rss-event-1254156-2018-06-07 ) त्या भाषणाच्या शेवटी शेवटी त्यांनी “राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांची तुलना केली. Nationalism चं भाषांतर मराठीमध्ये राष्ट्रवाद करतो आणि patriotism चं भाषांतर आपण ‘देशभक्ती’ असं करतो. त्यांनी असं म्हटलं की, ‘राष्ट्रवाद’ हा थोडासा एकांगी आहे, अतिरेकी आहे. सर्व समावेशक असा तो नाहीये. लोकांना वगळणारा आहे आणि बऱ्याच देशांमध्ये किंवा बऱ्याच विद्वानांनी राष्ट्रवादामध्ये आपपरभाव हा अतिशय आवश्यक आहे. आपले कोण आणि परके कोण, हा फरक करता आला पाहिजे, असं त्याच्यामध्ये आग्रहाने सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद Nationalism पेक्षा ‘घटनानिष्ठ देशभक्ती’ (constitutional patriotism) हे मी मानतो आणि त्याची आज देशामध्ये जास्त गरज आहे” असं त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे आपल्या देशाची संस्कृती काय, इतिहास काय, याचा विचार न करता आता ‘India that is Bharat’ या राज्यामध्ये जी घटना आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली आहे, त्या घटनेशी एकनिष्ठ राहणं आणि या देशातल्या सगळ्या लोकांनी त्या घटनेप्रमाणे वागणं, ही घटनानिष्ठा म्हणजेच देशभक्ती, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली होती.
मला जरा उत्सुकता वाटली की, ‘Constitutional Patriotism’ ही कल्पना कोणी मांडली. असं लक्षात आलं की, ही युरोपात मांडली गेलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम जर्मनी काही काळ दोस्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली होतं आणि त्यांनी मिळून पश्चिम जर्मनीसाठी घटना तयार करून दिली. आधीचा सगळा नाझी भस्मासुराचा जो सगळा इतिहास आहे. ज्यूचं जे शिरकाण त्यांनी केलेलं होतं, तर तो इतिहास काही फार उज्जवल नाही. त्याचा अभिमान बाळगावा असं नाही, तर आता जर्मन राष्ट्र हे कशाच्या आधाराने उभं राहू शकेल, एकत्र येऊ शकेल तर जर्मनीतल्या तत्वज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ‘Constitutional Patriotism’ ही कल्पना मांडली.
आता आपण या देशामध्ये राहतोय, या देशाची घटना आपण प्रमाण मानूया, तिच्याशी एकनिष्ठ राहूया आणि या घटनेला मानणारे सगळे आपण सर्वजण एक आहोत. ही घटना या देशात चालते तर म्हणून या देशावरती आपण प्रेम करूया, अशी ती घटनानिष्ठ देशभक्तीची व्याख्या आहे. नंतर युरोपामध्ये सगळ्या युरोपची एक संसद तयार झाली आणि सगळ्या युरोपातल्या देशांनी आपापली राष्ट्रीय अस्मिता थोडीशी कमी करावी आणि युरोपची अस्मिता तयार व्हावी. त्या युरोपच्या संसदेसाठी सगळ्या युरोपची म्हणून सुद्धा घटना तयार झाली आणि त्यामुळे राष्ट्राच्या पलीकडे जाण्यासाठी ही घटनानिष्ठ देशभक्ती याचा उपयोग होईल आणि तो केला पाहिजे, असं पाश्चात्य देशांमधले घटनातज्ञ, समाजशास्त्रज्ञ आता बोलत आहेत आणि प्रणव मुखर्जी यांनी त्याचाच पुरस्कार केला. त्यामुळे याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळा विचार मांडण्याची गरज आहे, असं मला वाटतं. थोडंसं मागे जर का जायचं झालं, म्हणजे माझ्या या राष्ट्रासंबंधीच्या विचाराला कशी सुरुवात झाली? तर हा २०१८ मधला प्रसंग, त्यामुळे राष्ट्रयोगावरती बोलूया, असं मी ठरवलं; पण याच्यात घटनानिष्ठ देशभक्ती म्हटलंय.
तसेच देशभक्तीचा दुसरा एक प्रकार म्हणजे प्रादेशिक राष्ट्रवाद ‘Territorial Nationalism’ आणि आता यूपीएससीच्या परीक्षांची मी सगळी गाईड्स पाहतो, त्याच्यामध्ये भारताने आता ‘Territorial Nationalism’ स्वीकारलेला आहे, वगैरे अशी सुद्धा विधाने असतात. १९७२ साली प्रबोधिनी मध्ये अभ्यास शिबिर झालं. ते आपल्याकडच्या अभ्यास शिबिराच्या पद्धतीमध्ये प्रत्येकाने चार दिवसाच्या, पाच दिवसाच्या शिबिरात जे काही वाचलेले त्यातला एखादा विषय घेऊन बोलायचं असतं. त्यावेळी मी प्रादेशिक राष्ट्रवादावरती पहिल्यांदा बोललो होतो की, एका प्रदेशात राहणारे सगळे लोक त्यांचं राष्ट्र एक आहे, मग त्यांचा धर्म काही असू दे, भाषा काही असू दे, संस्कृती काही असू दे, वंश काही असू दे. ते एका देशात राहतात. त्या देशावरती एकच शासन चालते तर असे एका देशात राहणारे सगळेजण, त्यांचं एक राष्ट्र, अशी ती प्रादेशिक राष्ट्रवादाची कल्पना. १९७१ सालीच पाकिस्तान फुटलेला होता. पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान वेगळे झालेले होते. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातले सगळे लोक एका देशाचे म्हणजे त्यांनी एका राष्ट्राशी आपल्या एकनिष्ठ राहायला पाहिजे. पण आमची संस्कृती वेगळी, आमची भाषा वेगळी आहे, आम्ही काय पश्चिम पाकिस्तानची उर्दू भाषा मानणार नाही. ‘आमार सोमार बांगला’ हे आमचं राष्ट्रगीत आहे, अशी आपली वेगळी अस्मिता पूर्व पाकिस्तानातल्या लोकांनी व्यक्त केली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यावेळी ते उदाहरण ताजं होतं की, प्रादेशिक राष्ट्रवाद एका प्रदेशात राहणारे सगळेजण एका राष्ट्राचे असतात, असं मानलं पाहिजे आणि तसं त्यांनी जगलं पाहिजे, हा काही टिकणारा नाही. त्यामुळे प्रादेशिक राष्ट्रवाद – तिथे नुसते एका प्रदेशात राहणं, असं आहे.
प्रणव मुखर्जींनी ‘घटनात्मक देशभक्ती’ म्हटली. ते एका देशात राहणारे, एक घटना मानणारे, त्यांचे एक राष्ट्र, असं म्हटलं ते सुद्धा पुरेसं वाटत नाही. कारण घटना ही आपणच तयार केलेली आहे. त्या घटनेला मानणारे सगळेजण देशात असतातच असं नाही. म्हणजे मानावी लागते आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून आणि घटना कोणी तयार केली हे अनेकांना माहित नाही. या घटनेमध्ये इतक्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे घटना बदलू शकते हे माहिती आहे, तर या घटनेवर निष्ठा ठेवून आम्ही एका राष्ट्राचे आहोत कसं काय म्हणायचं, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या विषयावरती ‘राष्ट्र’ या संकल्पनेबद्दल बोलायला पाहिजे, असं वाटत होतं.
राष्ट्रवाद – राष्ट्रभक्ती – राष्ट्रधर्म – राष्ट्रविचार – राष्ट्रकारण – राष्ट्रयोग
आता माझ्या व्याख्यानांसाठी जी तीन व्याख्याने २०१९ साली दिली, त्याच्यात पहिल्या व्याख्यानात ‘राष्ट्रविचार’ असा शब्द मी वापरलेला होता. दुसऱ्या व्याख्यानात ‘राष्ट्रकारण’ असा शब्द वापरलेला होता आणि तिसऱ्या व्याख्यानात ‘राष्ट्रयोग’ असा शब्द वापरलेला होता. हे मुद्दाम जाणीवपूर्वक वापरलेले होते. कारण ‘Nationalism’ चे भाषांतर ‘राष्ट्रवाद’ असं आपण करतो. तो ‘राष्ट्रवाद’ हा शब्द जरा बाजूला ठेवायला पाहिजे, असं मला वाटत होतं. प्रबोधिनीमध्ये आपण ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’, ‘महात्मा गांधींचा राष्ट्रधर्म’ असा ‘राष्ट्रधर्म’ हा शब्द वापरतो. त्याच्या बाबतीत अजून सगळ्यांनी तो स्वीकारलेला आहे, असं नाही. ‘राष्ट्रभक्ती’ असा एक शब्द वापरला जातो. या तीन शब्दांमध्ये राष्ट्रासंबंधीचा जो काही विचार मांडायला पाहिजे, तो सगळा नीट व्यक्त होत नाही, असं वाटत होतं.
राष्ट्रवादामध्ये काय होतं, तर प्रणव मुखर्जींनी जे सांगितलं ते काही अंशी खरे आहे. आपपरभाव त्याच्यात आवश्यक आहे. त्यामुळे आम्हीच श्रेष्ठ, आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ, अशी नकळत भावना येऊ शकते. खरं ‘राष्ट्रवाद’ हा शब्द जर वापरायचा असेल तर आमच्यापासून आम्ही सुरुवात केली; पण आम्हाला सगळ्या मानवजातीपर्यंत पोहोचायचं, असा विचार त्या राष्ट्रवादात असला तर काही हरकत नाही. पण बऱ्याच वेळा राष्ट्रवाद म्हणजे “आम्ही श्रेष्ठ, आम्हीच बरोबर” अशी भावना ही राष्ट्रवादाचा विचार करताना जास्त येते.
राष्ट्रभक्ती अतिशय चांगली भावना आहे; पण राष्ट्रभक्ती करायची म्हणजे काय कृती करायची, हे त्याच्यातून स्पष्ट होतच असं नाही. राष्ट्रभक्ती आवश्यक तर आहे; पण आम्ही राष्ट्रभक्त आहोत किंवा आम्हाला राष्ट्रभक्त व्हायचं, असं म्हटल्यामुळे आम्ही कृती काय करायची, हे त्याच्यामध्ये स्पष्ट होत नाही. राष्ट्रधर्म त्याच्यामध्ये धर्माचा शास्त्रशुद्ध अर्थ जर का घेतला तर ज्याच्यामुळे राष्ट्राची धारणा होते, राष्ट्र एकत्र टिकून राहतं, राष्ट्र एकत्र विकसित होतं, राष्ट्र ज्याच्यामुळे घडतं, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे राष्ट्रधर्म. अतिशय चांगला शब्द आहे. राष्ट्रधर्माचा वापर विवेकानंदांनी केलाय आणि महात्मा गांधींनी केलेला आहे. महात्मा गांधींनी राष्ट्रधर्म म्हणजे काय, असं सांगताना, राष्ट्रधर्म म्हणजे ज्याच्यामुळे राष्ट्र निर्माण होईल, राष्ट्र घडेल, असा धर्म, असं सांगितलेलं आहे. मग स्वातंत्र्य आंदोलन काळामध्ये इंग्रज गेले आणि भारतीयांचे राज्य सुरू झालं. स्वराज्य आलं, तेवढ्याने राष्ट्र घडेल का? सत्ता कोणाची आहे, याच्यावरती राष्ट्र घडेल का? आणखीन काहीतरी करायला पाहिजे, आणि राष्ट्र घडण्यासाठी राष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी स्वतः काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. महात्मा गांधींनी एक रचनात्मक कार्यक्रम अशी कल्पना मांडली. ‘माझ्या स्वप्नातील भारत’, असं त्यांनी जे एक लेखन केलेलं आहे, त्याच्यामध्ये जिथे भारतातील सर्व लोक हा रचनात्मक कार्यक्रम राबवतील आणि त्याच्यातून राष्ट्र निर्माण करण्याच्या कामात सहभागी होतील, असं काम म्हणजे राष्ट्रधर्म! त्यांनी त्यावेळी १८ गोष्टी राष्ट्रधर्मामध्ये मांडलेल्या होत्या. त्याच्यात इतरांना सुचेल तशी भरही घालता येईल, असे त्यांनी म्हटलेलं होतं. त्या १८ गोष्टींच्या तपशीलात काय आहे, आज मी जाणार नाही; पण त्याचे गट केले तर तीन प्रकारची कामे त्याच्यात करायला पाहिजेत, असं त्यांनी म्हटलेलं होतं. एक तर देशातल्या लोकांमध्ये काही सामाजिक मानसिक बदल झाले पाहिजेत. हे सामाजिक मानसिक बदल घडवण्याचे काम करणं म्हणजे रचनात्मक काम किंवा देश घडवण्याचे काम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. जसे सामाजिक मानसिक बदल झाले पाहिजेत, तसे देशात काही भौतिक बदल आणि व्यवस्थांमधले बदल झाले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटलेले आहे. सामाजिक मानसिक बदलाच्या सहा गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. भौतिक व्यवस्थात्मक बदलांच्या त्यांनी सहा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि देशात एवढी मोठी लोकसंख्या आहे तर काहीतरी पुढे मागे त्याच्यामध्ये होणारच, त्यामुळे काही समाज गटांचा विकास होईल याच्याकडे मुद्दाम लक्ष दिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. ते भर घालत गेले म्हणजे सुरुवातीला फक्त स्त्रियांचा विचार केला पाहिजे असं म्हटले. मग शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे, मग मजुरांचा विचार केला पाहिजे. मग विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे, मग वनवासींचा विचार केला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी त्यांनी कुष्ठ रुग्णांची भर घातली आणि ते म्हणाले की, हे वाढू शकेल. हे आत्तापर्यंत माझ्या लक्षात आलेले सहा समाज गट. या सहा समाज गटांचं काहीतरी आयुष्य बदललं पाहिजे, असं रचनात्मक काम करणे म्हणजे राष्ट्रधर्म आणि मग या राष्ट्रधर्माचे पालन जर का सगळ्यांनी केलं तर मग नवीन भारत घडेल, माझ्या स्वप्नातील भारत घडेल, त्याला ‘धर्मसंस्थापना’ असा शब्द वापरता येईल. प्रबोधिनी मध्ये आपण समाज संस्थापना असा शब्द वापरतो तर स्वराज्य मिळाल्यावर समाज संस्थापना होईपर्यंत म्हणजे राष्ट्र निर्माण होईपर्यंत काय काय घडलं पाहिजे अशा गोष्टी महात्माजींनी तपशीलात सांगून ठेवलेल्या आहेत.
गरिबातल्या गरीब माणसाला आमचा देश घडवताना आमच्या मताला किंमत दिली जाते असं वाटलं पाहिजे, असं वातावरण समाजात पाहिजे, अशी त्यांनी पहिली अट घातलेली किंवा पहिलं लक्षण सांगितलेले. आपलं राष्ट्र घडलं असं कधी म्हणता येईल तर अतिशय निर्धन माणूस आहे, त्याला सुद्धा वाटते की, माझ्या मताला इथे किंमत आहे. मी काय म्हणतोय देशात काय झालं पाहिजे हे ऐकलं जाते. मग अर्थातच असं जर का तिच्या मताला किंमत असेल तर उच्च नीच असे वर्ग काही राहणार नाहीत. उच्च नीचता भारतामध्ये जाती जमातींमध्ये आहे तर सर्व जाती जमाती गुण्या गोविंदाने नांदतील. मग जाती जमातींमध्ये आणखीन अस्पृश्यतेचा प्रश्न आहे तर अस्पृश्यताही नसेल आणि सगळ्या लोकांनी चांगलं जीवन जगायचं असेल तर वाईट व्यसनांनाही स्थान नसेल. समाजामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना सारखेच अधिकार असतील आणि गांधीजींचे वैशिष्ट्य असं की देशातले अतिशय गरीब ज्यांना अजून आवाज नाही मिळालेला, मांडता येत नाही असा जो मूक समाज आहे, त्याच्या हितसंबंधांशी विरोध जर का येत नसेल तर अशा सर्व देशी विदेशी संबंधांचे हितसंबंधांचे रक्षण केलं जाईल. म्हणजे वर्गविग्रहाची जी कल्पना आहे की, शोषक आणि शोषित, वंचक आणि वंचित असाच विचार करणाऱ्या काही विचारसरणी आहेत तर सगळेच आपल्या देशातले आहेत. गरीब माणसांच्या हितसंबंध वाद नसेल तर भांडवलधाऱ्यांचे भांडवलसुद्धा सुरक्षित राहिला पाहिजे, अशी व्यवस्था आपल्या समाजात असेल तर मग आपला देश चांगला घडला असं गांधीजींनी म्हटलेले आहे. हा सगळा विचार राष्ट्रधर्म म्हणून मांडलेला आहे. अतिशय चांगला आहे.
मग यांच्याशिवाय आता राष्ट्रयोग म्हणून काय पाहिजे? राष्ट्रवादात आम्ही श्रेष्ठ आणि तुमच्या आधी तुमच्यापेक्षा जास्ती आम्हाला मिळालं पाहिजे, असं राष्ट्रांनी म्हणणं हे नको. राष्ट्रभक्तीमध्ये कृतीची स्पष्टता यायला पाहिजे. राष्ट्रधर्मामध्ये खूपच सगळ्या चांगल्या गोष्टी, आदर्श गोष्टी मांडून ठेवल्या आहेत. हे करण्यासाठी काही पिढ्यांचे काम व्हायला लागेल. तर याच्याशिवाय राष्ट्रयोग म्हणजे आणखीन काय पाहिजे, त्याचा आशय स्पष्ट करायला पाहिजे. आणि या तीन पेक्षा काहीतरी वेगळ्या आशयाची भर घालायची गरज आहे म्हणून तो राष्ट्रयोग असा शब्द वापरला. एकदा आशय नक्की केला की, आम्हाला आमचं राष्ट्र असं घडवायचे तर मग त्याला राष्ट्रयोग म्हणा, राष्ट्रधर्म म्हणा, राष्ट्रवाद म्हणा, राष्ट्रभक्ती म्हणा. त्याने काही फार फरक पडणार नाही, पण आमच्या राष्ट्रांमध्ये काय झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे. हे इतर देशांमधले अभ्यासक विद्वान, तज्ञ जी भाषा वापरतात त्या भाषेतच आपण मांडलं पाहिजे, असं बंधन आपण घालून घ्यायचं कारण नाही. म्हणून हा राष्ट्रयोग हा शब्द मुद्दाम वापरून ही कल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे.
तीन शब्द एकमेकांमध्ये जोडलेले आहेत. खरं, अगदी काटेकोर चर्चा करायची नसेल तर पालटून ते वापरलेले चालतील; पण एक शब्द म्हणजे देश, भूमी, जमीन, देशाची इंग्रजीमध्ये कंट्री. दुसरा म्हणजे राष्ट्र, नेशन, आणि तिसरा म्हणजे राज्य किंवा शासन, स्टेट. आज जी काही राज्यशास्त्रामध्ये चर्चा चालते, ती प्रत्येक राष्ट्र हे एक राज्य आहे, नेशन स्टेट आहे, राष्ट्र राज्य आहे असं गृहीत धरून चर्चा होत असते. राष्ट्र हा शब्द आपल्या देशामध्ये आपण कधीपासून कसा वापरायला लागलो, नेशन आणि राष्ट्र हे समानार्थी आहेत की नाही, तर त्या शब्दाच्या आशयामध्ये जायला पाहिजे. राष्ट्र म्हणजे लोक, समाज हा त्याचा मुख्य अर्थ आहे. नामदेवांचा एक अभंग आहे. ‘राष्ट्राची पापं राजाला भोगावी लागतात’, अशा त्या अभंगाची सुरुवात आहे. तर राष्ट्राची पापं म्हणजे राष्ट्रात राहणाऱ्या लोकांची पापं, म्हणजे इथल्या समाजाची पापं. हा समाज जर का दुराचारी असेल तर त्याचे परिणाम राजाला भोगावे लागतात असं नामदेवांनी म्हणून ठेवलेले आहे. राष्ट्र म्हणजे आम्हाला आमच्या समाजाचा विचार करायचा आहे. पूर्वी इथे कधी जनपद होती, मग साम्राज्य होती, मग अनेक छोटी छोटी राज्यं होती, परकीयांचे राज्य होतं. आता लोकशाही राज्य झालेले आहे. Sovereign Democratic Republic असं घटनेमध्ये म्हटलेले आहे की, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक हे म्हणजे आमचं शासन काय प्रकारचं असावं, त्याचं वर्णन बदलत चाललेले आहे. पण या देशातले लोक तेच आहेत आणि या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगले बदल कसे घडवून आणावेत, याच्यासाठी त्यांना व्यक्तिश: जसे प्रयत्न करायला लागतात, तसे सगळ्यांना मिळूनही प्रयत्न करायला लागतात. वैयक्तिक आणि सामूहिक किंवा वैयक्तिक आणि सामाजिक असे प्रयत्न करायला लागतात. त्याच्यातून राष्ट्र घडतं. त्यामुळे constitutional patriotism का, नेशन स्टेट का, नेशन का, नॅशनलिटी हे बाकीचे राज्यशास्त्रज्ञ जे काही शब्द वापरतात, ज्या अर्थाने वापरतात, शास्त्रीय चर्चा करतात; त्या चर्चेच्या बंधनात मध्ये आपण अडकण्याची गरज नाही.
आपण आपल्या देशाची मांडणी स्वतंत्रपणे करायला पाहिजे कारण काय त्याचं? विवेकानंदांनी म्हटलेले आणि महात्मा गांधींनी म्हटलेले. शेवटी राष्ट्राचा विचार आपल्याला का करावा लागतो? तर आम्हाला सगळ्यांना मिळून आमचं जीवन सुधारायचं आहे, बदलायचं आहे. मग आमच्या व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनामध्ये सुधारणा झाली असं आपण कधी म्हणणार? गांधीजींचे “हिंद स्वराज्य” जे पुस्तक आहे, साधारण 1907-8 साली ते लिहिलेले आहे, आणि 1946-47 साली सुद्धा त्यातला एकही मला अक्षर बदलायचं नाही, शब्द बदलायचं नाही असं यांनी म्हटलेलं आहे. बाकी गांधीजींचं विधान असं की, माझं आधीचं विधान आणि नंतरचं विधान याच्यात फरक असेल तर आधीचं सोडून द्या, नंतरचं स्वीकारा, कारण मी बदललेलो आहे. पण त्या हिंद स्वराज पुस्तकाच्या बाबतीत मात्र त्यांनी मला काहीही बदल करायचा नाही. तेव्हा जे म्हटलं तेच मला म्हणायचं आहे, असं म्हटलेलं. विवेकानंदांनी आणि गांधीजींनी दोघांनी जागतिक इतिहासाचा आढावा घेऊन असं म्हटलेलं आहे की, जगामध्ये अनेक साम्राज्य होऊन गेली, अनेक संस्कृती नांदल्या आणि नष्ट होऊन गेल्या. भारत अजून टिकून राहिलेला आहे. तर टिकून राहण्याची शक्ती भारतात आली. बाकीचे नष्ट झाले, भारताहून काही वेळा त्यांच्याकडे जास्ती लष्करी सामर्थ्य, जास्ती संपत्ती असेल; पण त्या नष्ट झाल्या आणि भारत टिकून राहिला. तर शेवटी सुधारणा कशाला म्हणायचं? तर जे वाढत राहतं आणि टिकून राहतं, नष्ट होत नाही, ती सुधारणा खरी. जे एकदा वाढलं आणि नंतर नष्ट झालं, मग सुधारणा काही खरी नाही. गांधीजींनी त्या हिंद स्वराज पुस्तकांमध्ये असं म्हटलेलं आहे की, पाश्चात्य देशांमध्ये त्यांचा धाडसीपणा आणि कष्टाळूपणा याच्यामुळे गेल्या तीन-चार शतकांमध्ये खूप वेगाने प्रगती झालेली आहे. औद्योगिक क्रांती झालेली आहे, शास्त्रीय शोध लागलेले आहेत, सुखसोयीची साधनं वाढलेली आहेत, पण त्याच्याबरोबर व्यसनंही वाढलेली आहेत, असंतोष वाढलेला आहे, समाजातल्या विसंगतीही वाढलेल्या आहेत. तर मग केवळ धाडसीपणा आणि कष्टाळूपणा यामधून वाढलेली भौतिक संपत्ती हिला खरं सुधारणा म्हणायचं का? त्याच्याबरोबर येणारे सगळे दोष पाहिल्यानंतर भारतात कशा कशाची सुधारणा झाली हे पाहायला पाहिजे. मग पुन्हा विवेकानंद आणि गांधीजी दोघांनी असं म्हटलेले. गांधीजींनी अगदी स्पष्टपणे प्रश्नोत्तर रूपातच एका प्रश्नाचे उत्तर म्हणून की, खरी सुधारणा भारतात झाली. त्याच्यात काय काय गोष्टी झाल्या? तर उपभोगावर नियंत्रण ठेवणे हे जास्ती महत्त्वाचे मूल्य आहे, असं समाजामध्ये आम्ही रुजवलं. त्या मूल्याप्रमाणे सगळे वागत असतील असं नाही; पण हे जास्ती बरोबर आहे, असं समाजात रुजवलं. तसं करण्यासाठी इंद्रिय संयमन आपण करणे आवश्यक आहे. इंद्रिय संयमनाचे महत्त्व आपण आपल्या देशामध्ये रुजवलं आणि खरं तर सगळ्यांनी संयम ठेवून वागायचं ठरवलं तर राजसत्तेची आवश्यकताच नाही, पण अजून सगळ्यांना जमलेलं नाही. त्यामुळे राजाची आवश्यकता होती, शासनाची आवश्यकता आहे; पण शासनावर धर्माचा अंकुश असला पाहिजे, असं आमच्या देशामध्ये आम्ही म्हटलं. तर ह्या तीन गोष्टी भारतात झाल्या. ही खरी सुधारणा आणि त्यामुळे भारत अजून टिकून आहे, असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे. हे सगळ्यांना पटेल असं नाही, पण इतिहासाचा अभ्यास करून समाजाचा अभ्यास करून आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे की काय नेमकं व्हायला पाहिजे.
आता या सगळ्या सुधारणा समाजात झाल्या आहेविचारांचंत आणि ती खरी सुधारणा आहे, असं क्षणभर गृहीत धरलं तर मग या सुधारणा, ही मूल्य, ही जीवन पद्धती म्हणजे आपल्या राष्ट्राचे वेगळेपण असं म्हणायचं का? हे ज्यांनी निर्माण केलं तो समाज हा जास्ती महत्त्वाचा, असं म्हणायचं. आप्पांनी विवेकानंद विचाराचं सार काढून ‘विवेकानंद काय म्हणाले?’ हे जे पुस्तक लिहिलं किंवा त्याचा आता ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ अशी आपण त्याची आवृत्ती काढलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विवेकानंद विचाराचं सगळं सार काढून राष्ट्राचे विवेचन केलेलं आहे. थोडी शास्त्रीय पद्धतीने चर्चा केलेली आहे. कार्यकारण किंवा कारण आणि परिणाम असा विचार त्यांनी मांडलेला आहे. या सगळ्या खऱ्या सुधारणा, ही जीवनदृष्टी, ही जीवन पद्धती हे कारण आहे का समाज कारण आहे. आणि मग अर्थातच समाजाने असं वागायचं ठरवलं, याला महत्त्व द्यायचं ठरवलं म्हणून ही आमची जीवन पद्धती झाली. त्यामुळे समाज हा कारण आहे, आणि ही जीवन पद्धती या सगळ्या सुधारणा हा परिणाम आहे. मग टिकलं काय पाहिजे तर आधी कारण टिकलं पाहिजे, तर तो परिणाम कमी जास्ती झाला असेल तर तो पुन्हा वाढवता येईल आपल्याला. त्यामुळे हा इथे राहणारा समाज हा मुख्य, त्याची जीवन पद्धती, त्याची जीवनदृष्टी हा त्याचा परिणाम. ते शुक्ल कृष्ण पक्षामुळे कमी जास्ती होऊ शकेल.
हिंद स्वराज मध्येच गांधीजींनी असं म्हटलं की, त्यांना लगेच हा प्रश्न त्यांच्या मित्रांनी विचारला किंवा भारतातली अस्पृश्यता, गरिबी, अडाणीपणा, विषमता याचं काय. तर गांधीजींनी उत्तर त्याच्यामध्ये असं दिले मित्राला की, युरोपामध्ये तूही हिंडलेला आहेस आणि मीही हिंडलेलो आहे. युरोपातल्या ज्या चांगल्या गोष्टींचं आपण कौतुक करतोय, त्या युरोपात अजून सगळ्यांना मिळालेल्या नाहीयेत. युरोपातही गुन्हेगारी आहे, बेकारी आहे, चोर, दरोडेखर आहेत, भांडणं होत असतात, अस्वच्छता आहे. तर याचा अर्थ अजून या सगळ्या सुधारणा समाजात सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. तसं भारतातही मी ज्याला खरी सुधारणा म्हणतोय, ते समाजातल्या काही लोकांना जमली; सगळ्यांपर्यंत अजून ती पोहोचलेली नाही. त्यामुळे भारतातले हे दोष तर गेले पाहिजेत, ते काय आपण पकडून ठेवायचे नाहीत किंवा त्याचं कौतुक करायचं नाही, पूजा करायची नाही. आपल्याला ते बदल करायला लागतील. मग हे जर का बदल करायचे झाले तर मग काय करायला लागेल आपल्याला. मग देशाच्या सर्व समाज जीवनाच्या सगळ्या पैलूंचा विचार आपल्याला करायला लागेल.
पाश्चात्य देशांचं त्यांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं होतं, ते ब्रिटिशांनी त्यांची सत्ता सुरू झाल्यावर भारतात आणायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मेकॉलेंनी आणलेली शिक्षण पद्धती हे आपण एक महत्त्वाचं कारण मानतो. मेकॉले त्यावेळी जे टिप्पण केलेलं होतं की, भारतात कुठल्या पद्धतीची शिक्षण असावी, पद्धती असावी तर त्याच्यामध्ये त्यांनी उपयुक्तता ही कसोटी असली पाहिजे. युटिलिटी टेस्ट, जे काही शिकवायचं त्याचा उपयोग होतोय का? आणि मग उपयोग होतोय म्हणजे काय, तर माणसाच्या सुखसोयी आणि बुद्धिमत्ता वाढ होते का हे बघायला पाहिजे. असं जे असेल ते वाढवायचं तर मग युटिलिटीच्या पुढची टेस्ट काय, तर मेकोलिनी त्याच्या टिपणामध्ये म्हटलेले की, मार्केट इज द टेस्ट. ज्याला मागणी आहे ते आपण दिलं पाहिजे. गरज कशाची आहे, आवश्यकता काय, काय चांगलं होईल, आपण हा विचार करायची गरज नाही. याप्रमाणे आपण शिक्षण देऊया. गांधीजी म्हणतात की, असं करणे बरोबर नाही. आपल्याला माणूस कसा घडवायला पाहिजे ,याचा विचार करायचा. त्याप्रमाणे माणूस कसा घडवायचा आणि राष्ट्र कसं घडवायचं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण अजून आर्थिक, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक स्वातंत्र्य आपल्याला अजून मिळवायचं आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळवताना जे काही सशस्त्र लढे झाले किंवा अहिंसात्मक लढे झाले, त्याच्यामध्ये काहीतरी आपण नेत्रदीपक करतोय, पराक्रम करतोय अशी भावना सहज निर्माण होत होती. कारण त्यातले बदल हे लगेच जाणवणारे होते. पण बाकीचे सगळे जे बदल आहेत आर्थिक, सामाजिक, नैतिक बदल ते खूप सावकाश होणारे, त्यामुळे ते काही जाणवणार नाहीत. त्यामुळे ते अतिशय चिकाटीचे काम आपल्याला करायला लागणार आहे.
मग हे सगळे जर का करायचे झाले तर समाज हा कारण आहे; तो सगळा बदल घडवत असेल तर त्या समाज जीवनाचे सगळे पैलू आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. आज लोकशाही आल्यानंतर राजकारण म्हणजे राजकीय पक्षांची धोरणं, त्यांचे आपापसातले वाद, त्यांच्यातले सत्तेतले चढउतार असं आपण बोलतो; पण हे लोकशाही यायच्या आधी. मग राजकीय बघायचं म्हणजे काय बघायचं? या देशातले राजकीय स्वातंत्र्य टिकवण्यासाठीचे प्रयत्न ते कोणी केले? त्यांना कशामुळे यश मिळालं, कशामुळे अपयश आलं याचा अभ्यास केला पाहिजे. मग आज हिंदू समाजाचा, भारतीय समाजाचा विचार करत असताना, त्याची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे फक्त आजचे गेले 70-75 वर्षातले पक्ष बघायचे का राजकीय किंवा त्याच्या आधीचा इतिहास बघायचा का? आणखीन बघायला पाहिजे. एक मोठा टप्पा हा भारतावरती अरबांची, अफगानांची, मुगलांची, तुर्कांची आक्रमण झाली आणि पारतंत्र्य आले. त्याच्या आधीचा भाग आहे. त्याच्यानंतर सगळं समाज जीवन बदलून गेलेले आहे. पण हे आक्रमण आपण जशाच्या तसं स्वीकारलं का? ते थोपवण्याचा प्रयत्न केला, उलटवण्याचा प्रयत्न केला. हा भारताचा राजकीय इतिहास आहे. ते प्रयत्न राजपूतांनी केले, शिखांनी केले, मराठ्यांनी केले. मराठ्यांच्या आधी विजयनगर साम्राज्याचा इतिहास तो पाहिला तर त्यांनी केलेले राज्य. बाळशास्त्री हरदास म्हणून एक अभ्यासक होते, त्यांनी शिवाजी महाराजांवरती मोठी व्याख्यानमाला, तीन व्याख्यानमाला दिल्या होती. एकूण चार दिल्या ‘पुण्यश्लोक शिवाजी’ नावाने. त्यातली पहिली पूर्ण व्याख्यानमाला ही विजयनगर साम्राज्यावरती होती. ते झालं, त्याचे अवशेष शिवाजी महाराजांना, शहाजी महाराजांना बघायला मिळाले आणि त्यामुळे मराठी स्वराज्य हे नंतर होऊ शकलं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हा इतिहास हा हिंदू समाजाचा इतिहास आहे. या समाजाचा राष्ट्र घडवताना हा इतिहास लक्षात घ्यायला पाहिजे. मग आधीच्या काळात जायचं झालं तर मग सावरकरांनी लिहिलेली सहा सोनेरी पाने वाचली पाहिजे. अलीकडचा इतिहास जर का बघायचा झाला तर फक्त काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेलं स्वातंत्र्य आंदोलन बघून चालणार नाही. बाळाशास्त्री हरदासांनी ‘५७ ते सुभाष’ नावावर आणखी एक व्याख्यानमाला दिलेली आहे. त्याच्यात विविध क्रांतिकारकांनी केलेले प्रयत्न, त्यांनी दिलेले आहेत. आता कोणाला किती यश मिळालं. हा वेगळा प्रश्न.
आजच आमची चर्चा झालेली होती की, क्रांतिकारकांच्या प्रयत्नाला यश मिळाला असतं तर भारत कसा झाला असता. तेव्हा असं म्हटलं की, ते यश मिळालं असतं तर गांधीजींनी जेवढा विचार केलेला होता की, स्वराज्य मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, तेवढा काही क्रांतिकारकांपैकी फार कोणी केलेला नव्हता. एक मानवेंद्रनाथ रॉय, त्यांनी तत्वज्ञान मांडलेलं होतं, दुसरं भगतसिंग, समाजवादाचे तत्वज्ञान हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी असे शब्द आल्यामुळे त्यांनी काहीतरी विचार केलेला होता. आता त्यांच्या लेखन अलीकडे जास्ती प्रसिद्धी मिळते आहे. तिसरा सावरकरांनी थोडाफार मांडलेला होता की, फक्त क्रांतिकार्य पुरेसं नाही; वेगळ्या विषयांचा अभ्यास करायला पाहिजे. पण त्यांना तितकं नाही यश आलं. गांधीजींच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यातले अनेक त्यांचे दृष्टिकोन हे एकूण समाजाच्या हिताचा विचार करणारे होते. काही चुकीचे होते.
‘राष्ट्रयोग’ आपण जेव्हा विचार करतो तर योग शब्द म्हणजे काय? योग शब्द म्हणजे जोडलं जाणं. जोडलं जाण्यासाठी ज्याच्याशी जोडलं जायचे त्याच्यावरती एकाग्र व्हावं लागतं. त्यामुळे योगचा प्राथमिक अर्थ आहे की ज्याच्याशी जोडलं जायचे त्याच्यावर एकाग्र होणे. योगचा दुसरा अर्थ आपल्याला आपल्या उद्दिष्टाशी जोडलं जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींशी जोडलं जाणे. ज्ञानयोग असा शब्द वापरतात म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाण्यासाठी ज्ञान हे साधन वापरायचे तर आधी भक्ति योग म्हटलं तर परमेश्वराशी जोडण्यासाठी भक्ती हे साधन वापरायचे तर भक्तीशी जोडलं गेलं पाहिजे ज्ञानाशी जोडलं गेलं पाहिजे आणि मग परमेश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. भक्ति योग म्हटलं तर परमेश्वराशी जोडण्यासाठी भक्ती हे साधन वापरायचे तर भक्तीशी जोडलं गेलं पाहिजे. मग परमेश्वराशी जोडलं पाहिजे. कर्मयोग हे साधन वापरायचे तर परमेश्वराशी जोडलं जाण्यासाठी आधी कर्माशी जोडलं गेलं पाहिजे आणि मग परमेश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. तसा राष्ट्रयोग म्हणजे परमेश्वराशी जोडलं जाण्यासाठी आधी राष्ट्राशी जोडलं गेलं पाहिजे आणि मग त्याच्याद्वारे परमेश्वराशी जोडलं गेलं पाहिजे. परमेश्वराशी जोडलं जाणं हा अध्यात्माचा भाग हा पुढच्या व्याख्यानामध्ये येईल. पण राष्ट्राशी जोडलं जाणं तर व्यक्तीचा जसा आयुष्याचा विचार करताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक, सामाजिक, आत्मिक अशा सगळ्या पैलूंचा विचार करावा लागतो. तसं राष्ट्राशी जोडलं जाण्यासाठी समाज जीवनाची सगळे अंगे आहेत, त्या सगळ्यांचा विचार करायला लागतो. आजच्या भारतीय समाजाचा, हिंदू समाजाचा राजकीय इतिहास आपण लक्षात नाही घेतला, तर त्या समाजाशी आपल्याला नीट जोडलं जाता येणार नाही. पण राजकीय इतिहास हा एवढाच एक भाग नाही. मग आर्थिक भाग येतो. आर्थिक विचार आपल्या इथे फार पूर्वी कोणी स्वतंत्रपणे केलेला आहे, असं नाही. गांधी आणि विनोबांनी ट्रस्टीशिप, ग्रामदान अशा काही कल्पना मांडल्या. शरीर श्रमाला महत्त्व दिलं, पण ते सगळं ‘कृषिप्रधान भारतातला अर्थकारण’ याच्यासंबंधी त्यांनी जास्ती विचार केलेला आहे. आज भारतात यंत्र युग आलेलं आहे. माहिती युग आलेलं आहे. जैवतंत्रज्ञान युग आलेलं आहे. या काळातला अर्थकारण कसा असेल, याचा विचार वेगळा करायला लागेल. हा विचार साम्यवादाने कसा केला, समाजवादाने कसा केला, हा थोडासा आता ऐतिहासिक अभ्यास झाला. सगळ्या गोष्टी आता फार लागू आहेत असं नाही. पण भांडवलशाही आणि खाऊजा, ज्याला म्हणतात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, तर हा सगळा अर्थ आर्थिक विचार करूनच भारताला काय उपयुक्त आहे, काय लागणार, हा विचार करायला लागेल. राजकीय आणि आर्थिक हे एकमेकांशी जोडलेला असतं. सामाजिक जोडलेलं आहे.
काल परवाच आपण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं की एक ऑगस्ट टिळक पुण्यतिथी हे हळूहळू लक्षात राहत नाही आणि एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती, हे आता जास्ती पुढे आलेलं आहे. हा सामाजिक बदल आहे आणि समाजामध्ये आधी त्यांना आवाज नव्हता असं महात्मा गांधी म्हणत होते, त्यांना आवाज आता फुटलेला आहे. अजून काय बोलायचं माहित नाही. त्यामुळे जे बोलावसं वाटते ते बोलतात. तर हा सामाजिक बदल लक्षात घेतला पाहिजे. हा आजच्या काळातला सामाजिक बदल; पण संथपणे सामाजिक बदल जो होत होता, तो सगळ्या भक्ती संप्रदायांनी, संतांनी केलेला आहे. त्या संतांनी समाजामध्ये काय काय बदल घडवले हे आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे. मग नैतिकता, नैतिक बदल समाजामध्ये काय झाले पाहिजेत? जसा गांधीजींनी विचार केला रचनात्मक कार्याचा, तसा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळालं. पण ते कुठल्या मार्गाने मिळवायचं, कसं मिळवायचं, पुढे काय करायचं याच्यासाठी मार्गदर्शक असा “गीता रहस्य” ग्रंथ लिहिला. त्याला ‘भारतीय नीतीशास्त्र’ असंच त्यांनी नाव दिलेले. दुसरं नाव जे आहे की, नीतीशास्त्र काय असलं पाहिजे हे त्या गीतेतून आपल्याला कळेल. त्याचं सार शेवटी जे प्रबोधिनीच्या प्रार्थनेत आलेलं आहे: ज्ञान, कर्मयुक्त, भक्तिव्रत, असा तिन्हीचा एकत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. अशीच ती सगळी नीतीशास्त्राची मांडणी त्यांनी केलेली आहे; पण गीता रहस्याचे शेवटचं प्रकरण अध्यात्म असा आहे. नैतिकतेपासून सुरुवात करायची. नैतिकता ही पूर्वअट आहे; पण शेवट अध्यात्मिकता हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, असं गीता रहस्यामध्ये नीतीशास्त्राची मांडणी करताना म्हटलेलं आहे. गीता, उपनिषद याच्यामधून अध्यात्म काय आहे, याचा विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये बदल घडवत असताना राजकारण, अर्थकारण, समाजकारण, नीतीशास्त्र, अध्यात्म, विज्ञान; कारण विज्ञानावरती आधारित सगळं आधुनिक तंत्रज्ञान आणि सगळं माहिती, जैवतंत्रज्ञान, आलेलं आहे. या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि ह्या सगळ्याचा विचार करणं म्हणजे समग्रता. एकमेकांवर परिणाम घडवणारे, एकमेकांकडून शक्ती घेणारे हे सगळे समाज जीवनाचे पैलू आहेत. त्या सगळ्यांचा एकत्र विचार केला पाहिजे, म्हणजे समग्रता.
आता ज्यांना समग्रता मांडायची त्यांना काय करायला लागतं. भारतातल्या ब्रिटिश आल्यानंतरच्या सुधारणा पाहिल्या तर समाज सुधारणा करायच्या म्हणून ब्राह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, देव समाज असे वेगवेगळे समाज स्थापन झाले, म्हणजे ते आपल्या देशातले आधुनिक संप्रदाय आहेत. पण विवेकानंद आणि गांधीजींनी मात्र वेगळा संप्रदाय सुरू केला नाही, वेगळा पंथ न काढता एकूण समाजातच काय बदल झाले पाहिजेत, या सगळ्याचा विचार ते मांडत राहिले. असा विचार मांडत राहणं आणि काम करत राहणे म्हणजे राष्ट्रयोग.
समाज मुख्य. समाजप्रामाण्य बुद्धी असा आप्पांनी शब्द वापरलेला आहे. पण ती खरी समाज प्रामाण्य वृत्ती आहे. समाजाला प्रमाण मानून मी कसं वागायचं ते ठरवून, समाजाचा अपमान झाला असेल तर तो मला माझा अपमान वाटला पाहिजे. समाजाला अपयश आलं असेल तर ते मला माझं अपयश वाटलं पाहिजे. समाजाचा गौरव झाला असेल तर तो मला माझा गौरव वाटला पाहिजे. समाजाची प्रगती झाली असेल तर मला त्याच्यात माझी प्रगती होते असं वाटलं पाहिजे. ही समाज प्रामाण्य वृत्ती किंवा समाजप्रामाण्य बुद्धी. ही सगळ्यांमध्ये वाढवणे हे राष्ट्रयोगाचे काम आहे.
व्यक्तींनी समाज बनतो. त्यामुळे व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, पण व्यक्ती ज्या समाजात राहते त्या समाजाचा कसा किती विकास झालाय, याची मर्यादाही व्यक्तीच्या विकासाला पडत असते. हे त्यामुळे परस्परांवरती अवलंबून आहेत. तर मग हा समग्रतेला महत्त्व देणारा राष्ट्रयोग. याच्यातून जर का समाजात बदल घडवायचे असतील, राष्ट्र घडवायचं असेल तर दुसरं काय करायला लागतं. तर सूत्रांमध्ये मांडलं की, काही गोष्टी सुटतात, पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहतात. सूत्र आपण उपनिषदांच्या भाषेत स्वीकारलेला आहे, ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते’ खरं त्याचं पहिली ओळी लक्षात घेतली पाहिजे – विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह। उभय विद्या आणि अविद्या या दोन्हीसह जो ते जाणतो, ते म्हणजे काय तर ते परब्रह्म. तो अविद्येच्या सहाय्याने म्हणजे भौतिक विद्यांच्या सहाय्याने आपलं भौतिक आयुष्य सुधारतो. आणि विद्येच्या साह्याने म्हणजे अध्यात्म ज्ञानाच्या साह्याने आपलं चित्त समाधान मिळवतो. सर्व परिस्थितीत त्यालाच अमृतत्व असा शब्द वापरलेला आहे, सनातन असा शब्द ही वापरतात; पण त्याचे अर्थ बदलत गेलेले आहेत. त्यामुळे शाश्वत हा सध्या जरा रूढ असलेला शब्द – शाश्वत विकासाचा. त्याच्यामुळे तो मी वापरतो की, अध्यात्म आणि ईशचिंतन यात शाश्वताला धरून ठेवणे आणि उद्योग तंत्रज्ञान यात आधुनिकातला आधुनिक राहणं असं आपल्याला करायला लागेल.
पुरातन शाश्वत आणि अद्यतन किंवा आधुनिक तर आपण पुरातनालाच पकडून ठेवलं तर सामाजिक कचरा खूप आपल्यामध्ये गोळा झालेला आहे. सगळ्या ज्या रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, कालबाह्य झालेल्या अनेक गोष्टी आपण ज्या करत राहतो, त्या आपण पुरातनाला पकडून ठेवलं, त्याच्यामुळे झालं. पुरातन म्हणजे शाश्वत नाही, ते दुरुस्त करायला पाहिजे. आधुनिक जे घ्यायचे ते आधुनिक आपण अनुकरणातून घेणार का, नवनिर्मिती स्वतः करणार, म्हणजे इतर देशांनी निर्माण केलेलं तेच आधुनिक आम्ही स्वीकारणार का? आम्ही आमच्या गरजांप्रमाणे नवीन निर्माण करणार ते आमचा आधुनिक हा विचारही करायला लागेल.
त्यामुळे राष्ट्रयोग जेव्हा करतो, त्याच्यामध्ये स्वावलंबन, स्वदेशी याचाही विचार करायला लागतो. लोक म्हणतात की, आम्ही तर सगळं विश्व एक कुटुंब आहे असं मानतो. सगळ्या विश्वातला घ्यायला काय हरकत आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रबोधिनी मध्ये कल्पना मांडली की, आपली स्वीकारशील स्वदेशी असली पाहिजे. जे आम्हाला आमच्या बुद्धीने, आमच्या परंपरेतून करता येते, ते आम्ही आग्रहाने तसं करणार. आणि जे अजून आम्हाला सुचलेलं नाहीये, ते तात्पुरत बाकीच्यांचं वापरू; पण तेही पचवून टाकू. प्रत्येक वेळी तसंच्या तसंच अनुकरण करू, असं नाही तर तेही आम्हाला पचवून टाकायला पाहिजे. तर असा हा विचार करायचा झाला तर पुरातन कचरा आहे, तो आम्हाला काढून टाकायचा आहे. शाश्वत विचार आहे, तो सांभाळायचा आहे. आधुनिक जगातला आम्ही स्वीकारू, पण आम्ही स्वतःच आधुनिक निर्माण करणारे होऊ, असाही विचार करायला लागेल. हाही समग्रते मधला विचार आहे. समाज जीवनाचे वेगळे पैलू जसे आहेत, तसे समाज जीवन बदलण्याचा कसा विचार करायचा तर त्याच्यातही समग्रता आली पाहिजे. याच्यातून होणार आहे ते जीवन परिवर्तन होणार आहे तर जीवन परिवर्तनासाठी जीवन योग असाही शब्द वापरलेला आहे.
प्रबोधिनी मध्ये काही काळ परिस्थिती ज्ञानाचे तास व्हायचे, त्याच्यासाठी पाठ्यपुस्तक म्हणून गांधीजींचा आध्यात्मिक जीवनयोग असे एक पुस्तक काही वर्ष वापरलं जायचं. त्याच्या २५-३० प्रती आपल्या ग्रंथालयामध्ये अजूनही सापडतात. त्या काळातल्या आणि त्या गांधीजींच्या अध्यात्मिक जीवन योगामध्ये व्यक्ती जीवन आणि समाज जीवन, ऐहिक आणि पारमार्थिक असा सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे जे आपलं आहे, ते आधी वापरायचं आणि मग इतरांचं आहे, ते स्वीकारायचं. आपल्याला नवीन सुचेपर्यंत इतरांचे ते तात्पुरत स्वीकारायचं, अशा भूमिका त्याच्यामध्ये मांडल्यात. हे सगळं त्या समग्रतेमध्ये, म्हणजे राष्ट्र योगामध्ये येत असं मला वाटतं. जीवन परिवर्तन म्हणून गांधीजींनी काही कल्पना मांडलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला कदाचित आजच्या काळामध्ये, शंभर वर्षानंतर काही बदल करायला लागतील. पण त्यांनी म्हटलं की, व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन त्याच्यामध्ये काय गोष्टी आल्या पाहिजेत तर संयम आला पाहिजे, श्रमनिष्ठा आली पाहिजे, आध्यात्मिक दृष्टी आली पाहिजे, सत्याचा शोध सतत आला पाहिजे. आणि लोकांना तेजस्वी बनवणारी विद्या ही दिली पाहिजे. अध्ययन अध्यापन हे तेजस्वी बनण्यासाठी झालं पाहिजे. तर हे काय करायचं याच्याकडे गेलो म्हणजे राष्ट्रयोगाचं आचरण याच्याकडे आपण गेलो. पण राष्ट्रयोगाचं आचरण करण्यासाठी राष्ट्रयोगाची संकल्पना ही समजून घेतली पाहिजे. राष्ट्रयोग म्हणजे राष्ट्रनिर्माण योग असं आपल्याला म्हणायचे आहे. योग म्हणजे राष्ट्र निर्माणात आपण सगळ्यांनी एकाग्र होणे, हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. राष्ट्रनिर्माण कामातच आपण एकाग्र झालो, तद्रूप झालो तर ज्यांना नंतर परमेश्वर दर्शन व्हायची इच्छा आहे, त्यांना ते त्याच्यातूनच होणार आहे. हाही भाग त्याच्यामध्ये आला. वैयक्तिक मोक्षाची कल्पना आता जुन्या युगातली झाली. मोक्ष हा शब्द आता थोडासा बाजूला सारायचा. इथेच याच आयुष्यामध्ये पूर्णत्व अशी संकल्पना, ही विवेकानंदांच्या पुढे अरविंदांनी पूर्णयोगाची कल्पना मांडलेली आहे. तर व्यक्तीच्या जीवनात पूर्णत्व आणि समाजाच्या जीवनामध्ये पूर्णत्व अशा दोन्ही कल्पना याही या राष्ट्रयोगामध्ये येतात.
असे काही शब्द या राष्ट्रयोगाचा संकल्पना किंवा राष्ट्रयोग म्हणजे काय याचा विचार करताना मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. ह्या सगळ्या संकल्पना वापरून राष्ट्राचं रूप बदलण्यासाठी आचरण कसं करायचं, त्याला राष्ट्रयोगाचा आचरण म्हणून आपण त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघायचं, असं हे पुढच्या रविवारच्या व्याख्यानामध्ये बघू.
आजच्या व्याख्यानाबाबत जे काही प्रश्न असतील, आपल्याला ते सगळे चॅट बॉक्स मध्ये लिहा. त्या सगळ्याचा एकत्र विचार करून पुढच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला त्यातल्या त्या व्याख्यानाच्या विषयाशी संबंधित अशा प्रश्नांची उत्तर मी देईन. काही प्रश्न हे राखून ठेवीन. पुढच्या तीन व्याख्यानांमध्ये जिथे जिथे देणे शक्य आहे, त्याच्याबद्दल देईन. ही चार व्याख्याने प्रश्नोत्तरांच्या शिवाय होणार आहेत, मांडणीची होणार आहेत. त्यातले प्रश्न काही शिल्लक राहिले तर मग एक सप्टेंबरला फक्त प्रश्नोत्तरांचे सत्र वेगळं ऑनलाईन आपण घेऊया. पण नाहीतर मग आधीच्या चॅट बॉक्स मध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तर देत देत पुढच्या व्याख्यानाची मांडणी मी करत जाणार आहे.
आज जे जे या व्याख्यानाला उपस्थित होते, त्यांना धन्यवाद देतो. त्या निमित्ताने या विषयावरचे चिंतन हे थोडसं प्रबोधनीमधून आणखीन पुढे सरकेल. आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून या चिंतनाला पूर्णता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
संक्षिप्त टिपण
‘आध्यात्मिक राष्ट्रयोग’ या विषयावर पहिल्यांदा मांडणी २०१९ मध्ये केली. त्यासाठी कारण
- मा. राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांनी जून २०१८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात केलेले भाषण-मांडणी
- राष्ट्रवाद आणि देशभक्तीची तुलना – राष्ट्रवाद एकांगी त्यामध्ये आप-पर भाव, त्यापेक्षा घटनानिष्ठ देशभक्ती (Constitutional Patriotism)
https://youtu.be/8SZ0AVHnTGw?si=D26MuU23BspWAN6g – Speech; https://www.indiatoday.in/india/story/read-here-the-full-text-of-pranab-mukherjee-s-speech-at-rss-event-1254156-2018-06-07 – Text
- Constitutional Patriotism हा शब्द कुठून आला? दुसऱ्या महायुद्धाचा पश्चिम जर्मनीचा इतिहास फारसा उज्ज्वल नाही. जर्मन तत्त्वज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ‘Constitutional Patriotism’ ही संकल्पना आणली. घटनेतून अस्मिता जागृत केली.
- Territorial Nationalism प्रादेशिक राष्ट्रवाद – अभ्यासशिबिर (१९७१)
- प्रादेशिक राष्ट्रवाद पुरेसा वाटत नाही. पाकिस्तान-बांगलादेशाचे उदाहरण ताजे आहे.
- राष्ट्रवाद – राष्ट्रभक्ती – राष्ट्रधर्म – राष्ट्रविचार – राष्ट्रकारण – राष्ट्रयोग
- राष्ट्रवाद – आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच बरोबर
- राष्ट्रभक्ती – कृती काय ते स्पष्ट होत नाही
- राष्ट्रधर्म – ज्याच्यामुळे राष्ट्राची धारणा होते, राष्ट्र टिकून राहते, घडते. ज्याच्यामुळे राष्ट्र घडेल असा धर्म [विवेकानंद, गांधीजी]
- ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकात म. गांधी यांनी रचनात्मक कार्यक्रम दिलेला आहे. १८ प्रकारची कामे सांगितली आहेत. त्यांचे ३ प्रकारांमध्ये वर्गीकारण केलेले आहे
- देशातल्या लोकांमध्ये सामाजिक, मानसिक बदल [६]
- भौतिक आणि व्यवस्थांमधले बदल [६]
- काही समाजगटांचा विकासाकडे लक्ष – स्त्रिया, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, वनवासी, कुष्ठरोगी [६]
- राष्ट्रधर्माचे पालन केले तर स्वप्नातील भारत घडेल – धर्मसंस्थापना, समाजसंस्थापना
- गरीबातील गरीब माणसाला आपल्या मताला किंमत दिली जाते आहे, असं वाटेल असं वातावरण निर्माण करणे
- उच्च-नीच वर्ग राहणार नाहीत
- जाती-जमाती गुण्यागोविंदाने राहतील
- अस्पृश्यता नसेल
- व्यसनादी गोष्टींना स्थान नसेल
- स्त्री-पुरुष समान अधिकार
- गरीबांच्या हितसंबंधांना बाधा न आणता देशी-विदेशी हितसंबंधांचे रक्षण केलं जाईल.
- गरीबातील गरीब माणसाला आपल्या मताला किंमत दिली जाते आहे, असं वाटेल असं वातावरण निर्माण करणे
- राष्ट्रयोग का पाहिजे? याचा आशय स्पष्ट करायला हवा…आमच्या राष्ट्रामध्ये काय झालं पाहिजे? कसं झालं पाहिजे?
- देश (भूमी) – country
- राष्ट्र – nation
- राज्य (शासन) – state
- राष्ट्र-राज्य संकल्पना (Nation-state)
- राष्ट्र हा शब्द कधीपासून कसा वापरायला लागलो?
- राष्ट्र म्हणजे लोक, समाज
- नामदेवांचा अभंग – राज्याची पापे राजाला भोगावी लागतात
- जनपदे, सार्वभौम लोकशाही, प्रजासत्ताक
- गांधीजी, विवेकानंद – सगळ्यांनी मिळून आपलं जीवन बदलायचे आहे म्हणजे सुधारणा होईल. ‘हिंदस्वराज्य’ पुस्तक
- जी टिकून राहते ती खरी सुधारणा
- पाश्चात्य राष्ट्रांनी धाडसीपणा आणि कष्टाळूपणा यामुळे प्रगती केली. यातून वाढलेली भौतिक संपत्ती यालाच सुधारणा म्हणायचे आहे का? नंतर व्यसने व असंतोष देखील वाढीला लागला.
- खरी सुधारणा – ‘उपभोगावर नियंत्रण’ हे जास्त महत्त्वाचे मूल्य. इंद्रियसंयमनाचे महत्त्व समाजात रुजवणे
- सर्वांनी संयमन ठेवलं तर राज्यसत्तेची आवश्यकता नाही
- राज्यसत्तेवर धर्माचा अंकुश
- विवेकानंदांचा राष्ट्रधर्म – समाजकारण – जीवनपद्धती – परिणाम
- सुधारणा सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही
- समाजजीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करावा लागेल
- ब्रिटिशांना जे चांगलं वाटत
- मेकाले
- उपयुक्ततावादी दृष्टिकोन – सुखसोयी
- बाजारपेठ – मागणीला पुरवठा
- माणूस कसा घडवायचा आणि राष्ट्र कसं घडवायचं? राजकीय स्वातंत्र्य मिळालं; आर्थिक, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळायचं आहे. समाजजीवनाचे सर्वच पैलू महत्त्वाचे.
- राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर
- अरबांच्या आक्रमणाच्या वेळेची संस्कृती समजून घ्यावी लागेल – रजपूत, शीख, मराठे, विजयनगरचे साम्राज्य
- बाळशास्त्री हरदास यांची पुस्तके ‘पुण्यश्लोक शिवाजी’, ‘५७ ते सुभाष’
- सावरकरांचे ‘सहा सोनेरी पाने’
- क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश येऊन स्वातंत्र्य मिळाले असते तर काय झाले असते?
- स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय याचा विचार क्रांतिकारकांपैकी थोड्या जणांनी केला होता – मानवेंद्रनाथ रॉय, भगतसिंग, सावरकर
- योग म्हणजे जोडलं जाणं. त्यासाठी एकाग्र व्हावं लागतं. उद्दिष्टाशी जोडण्यासाठी उद्दिष्टांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींशी जोडलं गेलं पाहिजे. राष्ट्रयोग म्हणजे आधी राष्ट्राशी जोडलं जाणं आणि मग परमेश्वराशी जोडलं जाणं.
- समाजजीवनाची सर्व अंगे
- राजकीय – राजकारण
- आर्थिक – अर्थकारण
- सामाजिक – समाजकारण
- नैतिक विचार – नीतिशास्त्र
- विज्ञान
- आध्यात्मिकता – आध्यात्म
- या सगळ्यांचा एकत्र विचार म्हणजे समग्रता. ज्ञान-कर्मयुक्त-भक्तियोग
- ज्यांना समग्रता पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे?
- आधुनिक पंथ – सामाजप्रामाण्य वृत्ती-बुद्धी ही सगळ्यांमध्ये वाढवणं, हे राष्ट्रयोगाचे काम
- व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजविकास
- विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥
- भौतिक प्रगती व चित्त समाधानी
- सनातन – शाश्वत – पुरातन कचरा काढून – आध्यात्म ईशचिंतन आणि उद्योग व तंत्रज्ञानात आधुनिकातील आधुनिक
- आधुनिकता – यामध्ये स्वीकार का नवनिर्मिती
- स्वीकारशील स्वदेशी – आधुनिक निर्माते होणं
- जीवन परिवर्तन – जीवनयोग
- गांधीजींचा आध्यात्मिक राष्ट्रयोग
- व्यक्ती – समाजजीवन
- संयम
- श्रमनिष्ठा
- आध्यात्मिक दृष्टी
- सत्याचा शोध
- लोकांना तेजस्वी बनविणारी विद्या
- जीवन परिवर्तन
- राष्ट्रयोग
- राष्ट्रनिर्माणयोग – राष्ट्रनिर्मितीमध्ये एकाग्र होणे
- याच आयुष्यामध्ये पूर्णत्व
- व्यक्ती आणि समाजजीवनामध्ये पूर्णत्व
- व्यक्ती – समाजजीवन
- मेकाले
- ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकात म. गांधी यांनी रचनात्मक कार्यक्रम दिलेला आहे. १८ प्रकारची कामे सांगितली आहेत. त्यांचे ३ प्रकारांमध्ये वर्गीकारण केलेले आहे
प्रश्न
- एखादा कृतिकार्यक्रम राबवताना त्यामध्ये समाजजीवनाच्या विविध अंगांनी समग्रता कशी आणायची?
- समाजाची रचना लावत असताना (समाज संस्थापना करत असताना) प्रत्येक व्यक्तीला हे वाटणं की , ‘माझ्या मताला किंमत आहे’, ही संकल्पना पचायला अवघड वाटली. सर्व साधारण अर्थ म्हणून समजायला ठीक आहे, पण समाजाने कोणाच्या मताला किंमत द्यायची याचा विवेक सतत करायलाच लागतो. वर्ग विग्रह याप्रकारे याकडे न पाहता सुध्दा समाज म्हणून व्यक्त होताना त्यातलं कौशल्य, क्षमता, प्रेरणा यातलं स्तरीकरण आणि तरीसुद्धा समानतेची भावना दृढ करणं हे एकूण आध्यत्मिक राष्ट्रयोगात कसं पाहणार हे अजून समजून घ्यायला हवं असं वाटलं.
- समाज हे कारण आणि त्यातून तयार झालेली शाश्वत मूल्य हा परिणाम, हा प्राधान्यक्रम समजून घ्यायला अवघड वाटला. स्वतःच्या प्रेरणेने दीर्घकाळासाठी काम करत असताना ती प्रेरणा शाश्वत मूल्यांमुळे टिकते असं वाटतं आणि ती मूल्य जोपासली जावीत यासाठी ते काम आहे. त्यानंतरचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणून ती मूल्य याच समाजात जोपासली जावीत यासाठीचा आग्रह येतो असं वाटलं. आधी लोकं/ समाज असं केलं तर समाजाची मागणी आणि समाजाची आदर्श मूल्य यातला संघर्ष कसा सांभाळणार असा प्रश्न पण पडला.
- “राष्ट्राने निर्माण केलेली शाश्वत मूल्ये” याला नंतर महत्त्व देऊन “राष्ट्र म्हणजे समाज याला प्रथम प्राधान्य” असे का म्हटले असेल? समाजाचे भौतिक रक्षण आणि किमान निर्वाह याला प्रथम महत्त्व इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे समाजाने आजपर्यंत निर्माण केलेल्या उदात्त मूल्यांकडे आवर्जुन लक्ष द्यावेच लागेल. नाहीतर राष्ट्राचा आत्माच हरवून बसेल. किंवा दुसऱ्या शब्दात, “राष्ट्रधर्मात/राष्ट्रयोगात काय करायचे?” याचे उत्तर “भारतीय राष्ट्राचा आत्मा – म्हणजेच आध्यात्मिकता – याचे शिक्षण व्हावे याची व्यवस्था प्राधान्याने करणे”, असे का नाही?
- राष्ट्रविचार, राष्ट्रकारण राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रधर्म असे पाच शब्द चर्चेत आले. या प्रत्येक शब्दामध्ये आशयाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. पण आपल्याला रूप पालटू देशाचे यासाठी जे तत्त्वज्ञान मांडायचे आहे, तो सर्व आशय या सर्व छटांच्या बेरजेतून येत नाही. त्यामुळे योग हा शब्द आणून कमी पडणारा आशय, या सर्व छटांच्या बेरजेशी जोडला तर एक पूर्ण विचारसरणी किंवा तत्वज्ञान किंवा जीवनयोग आकाराला येईल, असा हा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य परिभाषा आणि प्रभाव टाळण्यासाठी या संभाव्य परिपूर्ण आशयाला योग्य अशी परिभाषा सुद्धा भारतीय वारसा असलेली तयार करण्याचाही प्रयत्न दिसतो. राष्ट्र म्हणजे प्रामुख्याने समाज आणि समाजाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि नैतिक अशा सर्व पैलूंना जोडणारे समग्र समाजप्रामाण्य या राष्ट्र योगातून वाढवायचे आहे. त्यासाठी त्याला अध्यात्माचा पाया दिला पाहिजे. या दिशेने सर्व मांडणीचा रोख दिसतो. मला भावलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण मानवतेकडे आणि चराचर सृष्टीकडे जाणारा असा हा राष्ट्रयोग असला पाहिजे….या दृष्टीने सद्यस्थितीमध्ये एकविसाव्या शतकात भारतात आणि जागतिक परिस्थितीत जे महत्त्वाचे बदल विविध विचारसरणी, जागतिक नेतृत्व आणि तंत्रज्ञानाचे विस्फोट यामुळे होत आहेत त्याचा या सर्व मांडणीत निश्चितच व्यावहारिक( प्रॅक्टिकल) राष्ट्रयोग या दृष्टीने विचार करावा लागेल. [विवेकसर]