मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण!


समाजात वावरायला लागणारे ज्ञान किंवा माहिती ग्रामीण महिलेला सहज उपलब्ध नसते. त्यामुळे स्वतःकडे कायमच दुय्यमत्व घेतले जाते. ‘ती’नेच स्वतःला दुय्यम ठरवले की इतरांकडूनही तशीच वागणूक मिळणे वावगे ठरत नाही. किमान माहिती कशी मिळवायची हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे लहान मोठ्ठा निर्णय करायला जो आत्मविश्वास लागतो तो नसतो. निर्णय करायच्या विषयात ‘मी या विषयात माहितगार आहे!’ किंवा या विषयातले ‘मला कळते!’ असा जर स्वसंवाद झाला तर आत्मविश्वास येतो. ‘मला माहिती मिळवण्याचा मार्ग माहिती आहे!’ अशा जाणिवेतून सुद्धा ग्रामीण महिलांची स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. जिची स्वतःकडे बघायची दृष्टी बदलली आहे ‘ती’ची समाजात दाखल घेतली जाते. त्यामुळे जर महिलेचा आत्मविश्वास वाढायला हवा असेल तर विविध प्रकारची योग्य माहिती उपलब्ध करण्याच्या सुरक्षित रचना उभ्या केल्या पाहिजेत ज्या अनौपचारिक शिक्षण देत राहातील; असे या ३० वर्षांचे फलित आहे असे लक्षात आले.
‘मला ‘मुलीला’ शिकवायचे आहे, मुलीचे आयुष्य बदलायचे आहे, माझ्यासारखे तिने भरडले जायला नको!’ असे वाटणाऱ्या खूप आया असतात पण त्या स्वतः कधी शाळेत गेलेल्या नसतात किंवा उच्च शिक्षित नसतात त्यामुळे ‘मुलीचे शिक्षण!’ या वियशयावर त्या निर्णय करायला धजावत नाहीत .. पण मुलगी कुठे कुठे शिकू शकते, जवळ/ परवडणारी कॉलेज कुठली आहेत, कुठल्या अभ्यासक्रमाला साधारण किती शुल्क असते असे कळले की मग मुलीच्या शिक्षणाचे सर्व निर्णय गरज पडली तर कर्ज काढून शिकवायचा निर्णयाही ‘आई’ करू शकते!
आरोग्याचेही तसेच आहे. दवाखान्यात गेले तरी समोर बसलेल्या डॉक्टरला स्वतःच्या आजारपणाची सर्व लक्षणे सांगितली तरी औषध घेण्यापूर्वी ‘मला काय झाले आहे?’ असे विचारण्याची हिम्मत होत नाही, अशी हिम्मत येण्यासाठी कधीतरी दवाखान्यात आजारी नसताना कोणासोबत तरी गेले पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले पाहिजे, कुठल्या तपासण्या कशासाठी करतात ते माहिती करून घेतले पाहिजे ‘सगळेच आरोग्य महाग नसते!’ असे समजले की गावातली जाणकार म्हणून गावातल्या २-४ जणांना दवाखान्यात नेण्याची जबाबदारी तिच्यावर आपसूकच येते.. यालाच म्हणायचे तिची सामाजिक प्रतिष्ठा वाढली …. कारण कालपर्यन्त ‘तुला काय कळतंय’ असे तिने ऐकले, अनुभवले असते .. थोड्याशा माहिती घेण्याने तिची घेतली जाणारी दाखल बदलते.. पहिल्या टप्प्याला एवढेही पुरते!
बचत गट दर महिन्याला घेऊन, नियमित व्यवहार करणाऱ्या महिला, जमा झालेली रक्कम मोजताना नोटा चोख मोजत आहेतच पण भराभरा मोजत आहेत असे गावातल्या पुरुषांनी नोट बंदीच्या कामांमध्ये पाहिले. गावातल्या ताईचे बँकेत जाणे येणे असल्याने तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कामे गावातच झाली असेही चित्र गावागावात होते.. त्यानेही आर्थिक बाबतीत महिलांना ‘कळते’ अशी गावात सार्वत्रिक पावती मिळाली.. एका दादाने तर मला सांगितले, ‘गावच्या अण्णासाहेबापेक्षा आमची बायडी शहाणी झाली! आता तिलाच सरपंच केले पाहिजे!’ लगेच ती सरपंच होईल असे नाही पण तिच्याबद्दलचे बदललेले मत मांडण्याचा कौतुकाचा तो प्रकार आहे.
ग्रामीण महिलांच्या तालुक्याच्या शासकीय कार्यालयात काढलेल्या सहली असतील किंवा कार्यकर्त्यां सोबत त्यांनी व्यक्तीगत दिलेल्या भेटी असतील, त्यामुळे कुठले काम करणारे शासकीय कार्यालय कुठे आहे? अशी माहिती होते. बाजाराच्या दिवशी साधारणतः सगळे अधिकारी भेटलात, वेगवेगळी कार्यालयात वेगवेगळी कामे होतात. चालू योजनांचे बॅनर बहुतेक कार्यालयात लावलेले असतात. पुरुष पुढाऱ्यांनाही अशा मुळेच योजनांची माहिती होते. अशा किरकोळ माहितीने सुद्धा ग्रामीण महिला समृद्ध होते. त्यातून तीला व्यावहारीक शहाणपण येते. मग ‘पुढारी आपली कामे करायला असतात!’ असाही काहींना साक्षात्कार होतो.. मग मात्र राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ‘ती’ यायला लागते. केवळ महिला म्हणून मिळणारी संधी या टप्प्यानंतर ‘ती’ला गरजेची वाटत नाही एवढी ‘ती’ची भीड चेपते.
ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाने इतक्या विविध विषयावर काम केले त्याचे कारण एकच होते.. काम केलेला प्रत्येक विषय ग्रामीण महिलेच्या प्रबोधनाचे ‘माध्यम’ होता. प्रत्येक माध्यमातून ‘ती’चा स्वतःवरचा विश्वास दुणावला, त्या त्या विषयात ‘ती’ला गावात सन्मान मिळाला. यामुळे घरातले तिचे स्थान बदलले, तिची घरात दाखल घेतली जायला लागली, घरातल्या /गावातल्या निर्णयाचे कर्तेपण सुद्धा तिच्याकडे येण्याची रचना बसली असे या कामाचे स्वरूप होते. प्रत्येक गावातली, घरातली परिस्थिती वेगळी होती त्यामुळे याची छोटी मोठी दिशादर्शक / पथदर्शक उदाहरणे तयार करणे असे काम या काळात झाले.
एखादी नवीन गोष्ट म्हणजे ज्याची कल्पनाच कोणी केली नाही अशा कामाला सुरुवात करायची तर पहिल्या टप्प्याला कोणीतरी आधार देणारे लागते .. खरी माहिती देणारे लागते .. काम करताना पडेलच असे नाही पण पडले तर सावरायला कोणीतरी लागते. ‘मैं हू ना.. ‘ असा भरवसा देणारे लागते.
कामाच्या त्रिदशकपूर्तीच्या टप्प्यावर असे म्हणावेसे वाटते की या सगळ्या प्रयत्नातून १५०-२०० जणी तरी अशा जाग्या झाल्या, स्वतः पुरत्या नाही तर इतरांनाही आधार देणाऱ्या तयार झाल्या. यातल्या प्रत्येकीच्या आयुष्यात ‘ती’ने कल्पनाही केली नव्हती असे स्वतः करून दाखवले! कधी आरोग्यासाठी ठाम उभी राहीली तर कधी बँकेची कामे लीलया केली, कोणी मुलीचे आयुष्य बदलले तर कोणी गावचे नेतृत्व ‘स्वच्छ’ असू शकते असे दाखवून दिले. अशा कायमच घेतलेल्या कर्ते पणानेही दमायला होते.. पण अशा आयुष्याच्या टप्प्यावर, आत्मविश्वास वाढल्यावर जर ती एखाद्या संधीला ‘नको’ म्हणाली तर ‘ती’चा नकार जमत नाही म्हणून नसतो तर त्या संधी सोबत येणारी जबाबदारी समजून ती जबाबदारी निभावायची तीची आता तयारी नाही म्हणून तिला खरंच ‘नकोय’ .. आता प्रश्न क्षमतेचा नाही .. ही भूमिका आपणही समजून घेऊ शकतो.
अशी एखादी प्रबोधिका गावात असली, जरी रोजच्या कामात नसली तरी ‘गरज पडल्यावर’ ‘ती’चाच आधार पुढच्या पिढीला असतो हे पुन्हा पुन्हा दिसून येते. त्यामुळे वेल्हयात निवास काढला तर उरावर दगड ठेऊन पोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलीला निवासात राहायला पाठवणारी पहिली ‘ती’च असते आणि ‘आता माझं ऱ्हाऊ द्या सुनेला शिकवा!’ म्हणणारीही ‘ती’च असते.. आता पुढच्या पिढीसाठी काम या सगळ्या करत आहेत असे नक्की म्हणावेसे वाटते!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६