मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात आरोग्याचे काम करताना दूषित पाण्यामुळे होणारे आजार यावर अनेकदा चर्चा व्हायची त्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण महिलांना दिले जायचे. कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेकदा बचत गटातून कर्ज घेऊन दवाखाना करावा लागायचा. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण टाटांनी ज्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत असे सुजल फिल्टर दिले. हा फिल्टर म्हणजे स्टीलच्या पिंपाचे झाकट कापून तिथे प्लॅस्टिक भांडे बसवलेले असायचे ज्यांच्या तळाला फिल्टर बेड असायचा. ५-१० नाही तर भागात आपण ३०० पेक्षा जास्त फिल्टर वाटप केले. वेल्ह्यातील वरोती या दुर्गम गावातल्या प्रत्येक घराला सुजल फिल्टर दिला, एवढेच नाही तर फिल्टरचा वापर होत आहे ना हे तपासणारी यंत्रणा बसवली. दुर्दैवाने त्यावर्षीही पावसाळ्यात पूलावरून पाणी गेल्यामुळे अनेक दिवस गाव शासकीय संपर्कात नव्हते तरीही जेव्हा साथीच्या आजाराच्या उपचाराला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पूरानंतर पहिल्यांदा गावात पोचले तेव्हा त्यांना दूषित पाण्यामुळे आजारी पडलेला एकही रुग्ण आढळला नाही …. काही बदलाच्या गोष्टी महिलांना नीट समजून सांगितल्या की जमतात!     

सुजल फिल्टर उत्पादन: सुजल फिल्टरचा मुख्य भाग म्हणजे फिल्टर बेड! हा बेड भाताचे तूस जाळून तयार होणाराय कोळसा व विविध आकाराच्या वाळू या पासून बनवलेला होता. या गोष्टी स्थानिक पातळीवर उपलब्ध होत्या. वेगवेगळ्या गावातील २ महिला गटांना फिल्टर बेड बनवायला शिकवले त्यानिमित्ताने भांड्याला ड्रिल करण्यापासून सगळी कामे महिला शिकल्या व ३ वर्ष दोन्ही गटांनी मिळून ३००-३५० फिल्टरचे फिल्टर बेड बदलण्यासाठी नवीन फिल्टर बेडचे उत्पादन केले. एखाद्या योजनेतून फिल्टर दिल्यावर वापरल्यामुळे बेड साधारण ८-९ महिन्याने बदलावा लागायचा, तो फिल्टर बेड या प्रशिक्षित २ बचत गटातील महिलांनी बनवले. आणि गावकऱ्यांनी पैसे देऊन विकत घेतले. त्यानंतर साधारण त्याच किमतीत मिळणारा फिल्टर सारखा दिसणारा, व्यावसायिक तत्वावर उत्पादन केलेला ‘स्वछ’ फिल्टर टाटांनी बाजारात आणल्यावर आपण उत्पादन थांबवले …. तो पर्यन्त ‘शुद्ध’ पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून असणारे महत्व महिलांपर्यंत पोचले होते.    

 असाच दुसरा एक प्रयोग:

ज्येष्ठ नागरीकांसाठी केलेले काम: वेल्हे तालुका अविकसित! म्हणजे काय तर तर नवीन पिढी गावात राहायला तयार नाही. बरीच गावे अशी आहेत की ज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या राहात्या लोकसंखेच्या ७५%-८०% किंवा त्याही पेक्षा जास्त आहे. ‘रहात्या’ असा वेगळा उल्लेख केला कारण ही नोंद शासकीय आकडेवारीत कधीही येत नाही. गावची लोकसंख्या म्हणजे रेशन मिळणारी किंवा मतदानासाठीची लोकसंख्या असते. अशी ज्येष्ठांची संख्या गावात जास्त असल्यामुळे काही प्रश्नांना मिळणारी कलाटणीच वेगळी असते.

एका गावात ज्येष्ठ माहिलांचे प्रश्न काय आहेत ही समजून घेण्यासाठी बैठक घेतली तर पुरुष सुद्धा जमा झाले. आमचेही ऐकून घ्या असा आग्रह धरला. त्यात मुंबईहून नोकरी करून रिटायर्ड होऊन गावाकडे आलेला एक जण सांगत होता. स्वकमाईने हौसेनी गावाकडे बंगला बांधून राहायला आलो कारण गाव सोडले तेव्हाच ठरवले होते तसा तर माझ्या बरोबरीचे गावात कोणीच नाही! मी साठी उलटलेला. मग चर्चा सुरू झाली गावात त्याचे चुळते/ चुलत्या शेजारी सगळे आधीच्या पिढीचे फक्त रहात होते. हा राहायला आल्यामुळे त्यांच्या मुलांची सोय झाली कारण यांची शहरातली पोरे त्यांनाच फोन करायची, त्यांच्या आई वडिलांची चौकशी करायला.. कारण सत्तरी-पंच्याहत्तरी उलटलेल्या गावातल्या माणसाला मोबाईल कसा वापरायचा हे कसे शिकवणार? काहींना तर ऐकू सुद्धा येत नाही, काहींना नीट दिसत नाहीत…. तो संगत होता.. एखाद्याला काही झाले म्हणून उचलायची वेळ आली तर मला एकट्याला या वयात कसे जमणार?.. गाडीत घालून न्यायचे ठरवले तर गाडीवाल्याला फोन करताना तो आधीच सांगायचा २ पोरं मदतीला घेऊन ये.. इतकी गंभीर परिस्थिती. एखाद्याला शेवटचा खांदा द्यायची वेळ आली तर कधी कधी ४ जण जमायची वाट पहावी लागेल.. शासनाने महिन्याला १२०० रुपये दिले तरी पैसे खाता येत नाही त्यासाठी म्हातारीलाच राबावे लागते. बैठकीत चर्चा झालेल्या गावाच्या भाषेत बोलायचे झाले तर म्हातारी आधी देवाघरी गेली तर म्हाताऱ्याचे करणार कोण? मग म्हाताराही लगेचच जातो कारण एकट्याला त्याला राहाताच येत नाही. …. कधी कधी थकलेल्या म्हातारीला हळूहळू काम करताना बघवत नाही. गावामध्ये हॉटेल नाही.. गावात ‘बनवलेले ताजे अन्न’ पैसे असले तरी विकत मिळत नाही! असेच कोणी कधी जेऊ घालेल तर.. पण पैसे घेऊन नाही. असे कधीच विचारही न केलेले सगळे प्रश्न समजले.   

गावातली ज्येष्ठ नागरिक महिला घरी स्वयंपाक करणार म्हणजे पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करणार.. त्यासाठी लाकडे आणणार.. अनेक गावात नळपाणी पुरवठा नाही मग लांबून उचलता येईल असे थोडे थोडे पाणी आणणार .. कितीही वय झाले तरी यातून ‘ती’ची सुटका नाही! एवढाच प्रश्न वाटत होता पान चर्चे नंतर प्रश्नाचे वेगळेच गांभीर्य लक्षात आले.  

बैठकीनंतर एक उपाय म्हणून एका गावात प्रयोग करायचा ठरवला. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा बैठक घेतली व त्यांना सांगितले की एकांना ‘अन्नदान’ करायचे होते म्हणून त्यांनी संस्थेला काही देणगी दिली आहे तर त्यातून संस्थेने ज्येष्ठ नागरिकांची २ महीने एकत्र जेवायची व्यवस्था करायची ठरवली आहे. उपयोगी वाटले तर चालू ठेऊ!

मनात होते वेगळा वृद्धाश्रम काढण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे हाताळून बघू. त्या निमित्ताने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे एकत्र येणे होईल, सगळ्यांची आपोआप हजेरी घेतली जाईल, कोणी आजारी नाही ना ते रोजचे रोज तपासले जाईल, औषध घेणारे औषध घेतात ना? असे तपासले जाईल .. असेही काही मनात होतेच!

या प्रयोगामुळे गावातलीच गरजू महिला सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र करेल. त्यासाठीच्या लाकडाची व्यवस्थाही करेल आणि जेवणानंतर भांडीही धुवेल त्याच्यासाठी प्यायचे पाणीही भरेल. तिलाही गावातच रोजगार मिळेल! ज्या गावात प्रयोग केला त्या छोट्याशा गावात २२ ज्येष्ठ नागरिक होते. पहिल्या दिवशी १० आले. त्यांचा अनुभव म्हणजे स्वयंपाकाची चव काय होती, कुठला तांदूळ वापरला असे बघून हळूहळू संख्या वाढली सर्वच्या सर्व २२ जण यायला लागले .. आणि एक दिवस एकदम संख्या कमी झाली कारण काय तर या आनंदी ज्येष्ठांनी या योजनेची माहिती शहरातल्या मुलाला दिली. आणि तो म्हणाला ‘मी काय जेवण देऊ शकत नाही का?’ बास याचे येणे बंद! गावात साधे २ माणसांचे जेवण करायचे तरी त्यासाठी लाकूड आणण्यापासून भांडी घासे पर्यन्तची सर्व कामे ‘थकलेल्या बाईने’ करायची.. कारण ती कामे तिने आयुष्यभर केली आहेत! मुलगा महिन्यातून एकदाही गावाकडे येईल असे नाही पण ‘नाही’ म्हणायचं अधिकार पालकांनी त्याला दिला आहे! अशी प्रतिक्रिया एकाच गावात आली असे नाही तर आपण ३-४ गावात हा प्रयोग केला .. सर्व ठिकाणी ज्येष्ठांना असणारी मुलांची दहशत लक्षात आली! आपण प्रयोग थांबवला कारण गावात न राहाणाऱ्या मुलांचे प्रबोधन आधी करायची गरज आहे अशा निष्कर्षावर पोचलो!

थांबवायला लागलेल्या या प्रयोगाबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की वय वाढल्यामुळे ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांचे निर्माण होणारे प्रश्न मग आरोग्याचे म्हणजे वेळेवर औषध घेण्याचे असोत किंवा जवळच्या गावाला जाऊन औषध आणायचे असोत, आर्थिकअसोत किंवा एकटेपणाचे असोत, ताकदीने करायच्या कामाचे असोत कुठलेही असोत हे प्रश्न आता कौटुंबिक राहिलेले नाहीत हे आता सामाजिक प्रश्न आहेत असे अजून समाज म्हणून आपण शिकलेलो नाही यांची खंत आहे!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६