बचत गटाचं काम सुरू झालं तेव्हा बचतीची रक्कम ठरवताना चर्चा इथूनच सुरु व्हायची की बचत करणं हे जरी चांगलं असलं तरी बचतीसाठी वर्षभर रोख रक्कम आणायची कुठून? महिनाभर कष्ट केलेल्या बाईला तिच्या मिळकतीच्या एका दिवसाच्या मजूरीवर सुद्धा हक्क नसतो. त्यामुळे काहीतरी उत्पादन करून रोख पैसे मिळवणे यामधला महिलांचा सहभाग वाढवायला हवा या निमित्ताने स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात झाली. ‘जे मला जमेल त्या वैध मार्गाने मी पैसे मिळावीन!’ असे म्हणायला ग्रामीण महिलेला खूपच हिम्मत लागते असेही लक्षात आले, म्हणून या मानसिक बदलाच्या कामाला स्वयंरोजगाराच्या निमित्ताने सुरुवात केली.
रोखीत पैसे मिळवण्यातील भीड चेपणे यावर काम करावे लागणार होते आत्मविश्वास पुरेसा नसेल तर कुठलेही काम करताना अडचणी येतात याचा प्रत्यय वारंवार यायचा. अपरिहार्यपणे करावे लागणाऱ्या कष्टाच्या कामाच्या भारामुळे ‘उद्योगी’ असायला मनाची मोकळीक नव्हती. ‘मला काही येत नाही, तुम्ही सांगा ते करण्याची माझी तयारी आहे’ असा सूर स्वयंरोजगारात फारसा उपयोगी पडत नाही म्हणून ‘तुला नक्की येतं तेच तू स्वतःच्या जबाबदारीवर करुन कमवू शकतेस’ याचा अनुभव द्यायचा ठरवावं.
२० वर्षांपूर्वी माझी मैत्रीण सुप्रिया हिने कल्पना मांडले की ‘जे काम महिला करतंच आहेत, त्याच कामाचं व्यवसायात रूपांतर केलं तर?’ या कल्पनेला वेल्ह्याची सुरेखा तयार झाली आणि पहिला ‘भात लावणी’ करायचा अनुभव देणारा पुण्यातल्या कुटुंबाच्या सहलीचा घाट सुप्रियाने यशस्वी केला. सहलीत सहभागी झालेली मुले यथेच्छ चिखलात खेळली, पावसात भिजली, धमाल केली! २० वर्षांपूर्वी अशी कल्पनाही कोणाला सूचली नव्हती ती करून दाखवली! चिखलातून चालणे किती अवघड गोष्ट आहे हे पर्यटकांना कळत होते तेव्हाच भात लावणीच्या दिवसांमध्ये रोख रक्कम हाताशी नसल्याने येणारी अडचण या पर्यटनाच्या पैशातून पूर्ण होत होती. अनेक वर्ष भात लावणीच्या दिवसांमध्ये अशा सहली आपण काढल्या आणि लाखो रुपयाची उलाढाल केली. सर्व रक्कम महिलेच्या हातात पोचली! किती रकमेची उलाढाल हे माझ्यासाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं अशा पाहुणचारातून रोख रक्कम मिळवू शकतो हा विश्वास ग्रामीण महिलेला मिळाला तो महत्त्वाचा होता!
पुढच्या टप्प्यामध्ये विजयाताई रसाळ यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या सहली काढल्या! करवंद, फणस, जांभूळ, खायला चला अशा नावाने ‘ग्रामीण पर्यटन सहली’ यात विशेष आकर्षण होते बैलगाडीमधून चक्कर मारणे, विहिरीवर जाऊन पाणी भरणे, नैसर्गिक पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये पोहणे यापासून संध्याकाळी निघताना धारोष्ण दूध पिणे. सहलीच्या जेवणाचा मेनू झुणका-भाकरी, चुलीवरचा भात, खीर असा साधासा असायचा. कोणालाही करता येईल इतका सोपा पण ‘मी करीन’ म्हणण्याची तयारी करायला लावणारा. अशाच काही सहली खास मुलांसाठीही काढल्या. या सहलीमध्ये झाडावरून आंबे काढून फोडी न करता खाणे, गरज पडली तर शिडी वापरून पण झाडावर चढणे, पारंब्यांचा झोका खेळणे, मासे पकडायचा प्रयत्न करणे, ससे-शेळी अशा प्राण्यांना हाताळणे अशी वेगळीच आकर्षणे होती. अशा काही सहलींना तर शाळांनी सुद्धा प्रतिसाद दिला मग त्या सहलीत ग्राम पंचायत दाखवणे, शेती अवजाराचे प्रदर्शन मांडणे, पंचायत सदस्यांच्या मुलाखती असे काही शैक्षणिक विषयही जोडले. या सहलीला १००-१२५ मुले सुद्धा आली एवढ्या सगळ्यांची न्याहारी, जेवण, अन्य कार्यक्रमाची योजना करताना पैसे मिळवण्या बरोबरच नियोजन कौशल्य शिकल्या, गटाने काम करायला, सगळ्यांना सामावून घ्यायला शिकल्या. अशा सहली भरभरून नफा देणाऱ्या ठरल्या आणि नफ्यासोबतच कुटुंबांना आत्मविश्वास देणाऱ्या ठरल्या. बाईने कमावले तरी ‘ती’चे सगळे घर ‘ती’लाही मदत करते हे ‘ती’नेही अनुभवले.
२०१२-१३ मध्ये रिझर्व बँकेची पंच्याहत्तरी झाली. त्यावर्षी आपण त्यांच्या सोबत गावोगावी कार्यक्रम केले आपल्या या कृषी पर्यटन करणाऱ्या महिलांनी या गटाच्या जेवणाची व्यवस्था केली. त्या चवदार जेवणामुळे या महिलांना संधी देण्यासाठी, रिझर्व बँकेच्या पुण्याच्या कार्यालयाने त्यांच्या ७००-८०० जणांच्या कौटुंबिक मेळाव्याचा मेनू त्यांच्या लॉनवर आपल्या मदतीने ठरवला. त्या वेळी सिंहगडावर दही विकणाऱ्या आपल्या गटाच्या महिलांना बोलावले होते तर गावरान चिकन बरोबरच गावरान मसालेदार आमटीसह पुरणपोळीचा स्टॉल सुद्धा बुफेमध्ये लावायची योजना केली. सगळे यशस्वी झाले. वेगळ्याच मेनूचा जरा ‘हटके’ असा आस्वाद घेऊन लोकं समाधानी झाली. या संधीमुळे असे वाटले की करायला लागले की मदतीचे हातही येतात. तोपर्यन्त कुठल्याही शासकीय योजनेत ‘कृषी पर्यटन’ अशी सोय नव्हती.
त्या नंतरच्या कोरोनाचा काळात तर बहुतेक घरातली आज पर्यन्त साठवलेली सगळीच बचत संपून गेली. व्यवहारिक निर्बंधांमुळे नवी कमाई कशी कधी होईल याचीही काही कल्पना येत नव्हती, तेव्हा ‘मामाच्या गावाला जाऊया’ अशासारख्या चार-पाच जणांच्या कौटुंबिक सहली, ‘चला शेती करूया’ अशा योजना आखून २.५-३ लाख रुपयांची उलाढाल केली. ५० कुटुंबांनी या सहल योजनेचे यजमानपद घेऊन नफा मिळवला.
नंतर थंडीच्या दिवसांत ‘चला पावटा भात खायला’ अशा सहली ठरवल्या. कोवळ्या उन्हात शेतात फिरायचे, स्वतः पावटा, वांगी, काकडी शेतांतून काढून आपलंच जेवण चुलीवर बनवायला मदत करायची. या पर्यटन उद्योगात ३०-४० कुटुंब नव्याने सहभागी झाली. पर्यटक येण्याच्या दिवशी गावातच शेतमालाचा स्टॉल लावायचा व थेट शेतकाऱ्यांकडून ताजा माल खरेदीचा आनंद गटाला द्यायचा हेही केले.
आता छोट्याशा कुटुंबाची वर्षभराची किमान आर्थिक गरज बंगायला ४/५ सहली पुरतात अशी रचना बसली. ‘आपल्या घरात पाहुणे जेवले तर जेवणाचे पैसे घ्यायचे कसे?’ या विचारा पासून ‘पर्यटक म्हणून पाहुणे आले तर पैसे घ्यायला हरकत नाही’ या टप्प्यापर्यंत पोचल्या. संकोच कमी झाला. पैशाचे व्यवहार करतानाच्या मानसिकतेत बदल झाला. ज्या महिला पैसे घ्यायला शिकल्या त्यांची गावातली उधारीही चुकती व्हायला लागली म्हणजे ‘पैसे द्यायलाही शिकल्या!’ मग तिच्याकडे पाहुणे आले तर मजूरी करायला ‘नक्की वेळेत पैसे मिळणार’ या विश्वासाने मदतीचे हात वाढले. मग पापड, मसाले, भाजणी असे उद्योग सुरू झाले. नुसत भांडवल मिळून गिरणी उद्योग यशस्वी होत नाही, ‘माझ्याकडे दळायला टाकतील’ असे वाटणारीचा गिरणी उद्योग यशस्वी होतो असे स्वतःच्या उदाहरणाने अनेकींनी सिद्ध केले.
अतिशय महत्त्वाचा असणारा मानसिक बदल भारतीताईंनी एकीत-दोघीत नाहीत तर अनेकींमध्ये घडवला. बचत गटाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा टिकणारा बदल करणं सोपं गेलं. एकीला दुसरीची मदत होऊन जिला स्वयंपाक येतो तीनच ते चांगल्या प्रकाराने करणं हे वर वर सोप्पं वाटलं तरी व्यवसाय म्हणून जमायला मानसिक बदल व्हावे लागतात. मग जाता जाता जमून जातं.
स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाचा भाग म्हणून जेव्हा आपण स्वयंरोजगार शिकवतो तेव्हा यशस्वी उद्योग झाला की तो तिचा हे आपल्याला स्पष्ट असते. तरीही एकेकीचा आत्मविश्वास वाढल्या शिवाय, समाजात सन्मानाने वावरता यायला लागल्या शिवाय, अभिव्यक्ती सुधारल्या शिवाय स्वयंरोजगारही यशस्वी होत नाही.
प्रबोधनाचे सगळ्यात प्रभावी आणि दृश्य माध्यम म्हणून आपण स्वयंरोजगाराचे काम केले आहे आणि करत आहोत ही नक्की!
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६