बचत गटात महिला आल्यामुळे नवीन उत्साहाने खूप काही शिकायला लागल्या, पण एका टप्प्यावर आल्यावर त्यांना वाटायला लागतं की आता यापुढे ‘शिकणं’ अवघड आहे… मग पुढच्या पिढीचा विचार स्वाभाविक सुरु झाला. बचत गटात मनापासून सहभागी होणाऱ्या महिलांचे सामाजिक भान बदलले, आयुष्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. ‘मुलीला कशाला शिकवायचं… ती तर परक्या घरचं धन!’ असं वाटणं बदललं. एवढंच काय पण सूनेकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलली. ‘माझ्या सासूने माझी पोरं सांभाळली असती तर.. मी घरात अडकून पडले नसते…’ असं म्हणणारी प्रत्येक सासू सुनेच्या पाठीशी उभी राहिली. नातवंडे तर आपलीच आहेत असं म्हणून त्यांना सांभाळायची जबाबदारी घेऊन सुनेला बाहेर पडायला प्रोत्साहन देती झाली.
बचत गटाच्या कामाचे हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष असले, तरी पुढच्या पिढीसाठी बचत गटाशिवाय रचना उभी करण्याचा टप्पा यायला १९ वर्ष उलटावी लागली. या नवीन सुनांची जोपर्यंत प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीची ओळख होत नाही तोवर घरुन पाठिंबा असला तरी कामाची गोडी लागणार कशी? म्हणून ’हिरकणी’ या उपक्रमाची सुरुवात केली. हिरकणी उपक्रमाचे हे ११वे वर्ष!
आपल्यासाठी हिरकणी म्हणजे ०-६ वयोगटातील मूल (आपत्य) असणारी माता! आपण या मातांसाठी मुलाच्या वाढीमध्ये त्यांनी काय व कसे योगदान द्यायचे हे शिकवला सुरवात केली. गावातच एका दिवशी ३ तास असे पंधरवड्यातून एकदा प्रशिक्षण घ्यायचे अशी ३ महिन्यात ६ वेळा प्रशिक्षण देण्याची योजना केली, प्रशिक्षणा आधी एक दिवस मेळावा घेऊन ‘हिरकणी’ ही काय कल्पना आहे ही सांगायचे, प्रशिक्षणा नंतर शेवटी समारोपाचा दिवस हिरकणींच्या मनोगतांसाठी मोकळा ठेवायचा! असा छोटासा, वेळेत बांधलेला उपक्रम. हा उपक्रम पहिल्या पासून तृप्तीताईंनी फुलवला.
हिरकणी उपक्रमाने जरा शिकलेली, ‘काही तरी करावंसं’ वाटणारी, नवी कुमक या निमित्ताने कामात दाखल झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या मर्यादा तर होत्याच पण तरीही जिने स्वतः मुलाच्या घडणीला जाणीवपूर्वक वेळ दिला, तिने मुलाला मारणे थांबवले. मुलाची शब्द-संपत्ती वाढावी म्हणून स्वतः गोष्टी सांगितल्या, मुलाच्या सूक्ष्म स्नायू विकासासाठी प्रशिक्षणात सांगितलेले खेळ घेतले, शाळेत न शिकवला जाणारा पंचेद्रिय विकास होण्यासाठी विचार करून काही कृती केल्या, तिला वाटायला लागले की हे मुल माझं आहे! या मातृत्वाच्या जबाबदारी पुढे मुलगा का मुलगी हा भेद सहज विरघळून गेला, समानतेचा संस्कार झाला. अशा हिरकणीला आनंद देणारा, तरीही समृध्द करणारा मातृत्वाचा अनुभव स्वस्थ बसू देईना. मग काही म्हणू लागल्या, ‘ही अशी मातृत्वाची जबाबदारी कुठे शिकवंत नाहीत. आम्हाला वाटायचं मूल शाळेत गेल्यानंतरच शिकतं पण तसं नाही. मीच माझ्या बाळाची पहिली शिक्षिका आहे!’ काहीना हे इतरांनाही सांगावंस वाटायला लागलं. अनेक जणी ‘मी माझ्या बाळासाठी काय काय केलं?’ हे सांगायच्या निमित्ताने हिरकणी प्रशिक्षण गटात आल्या नि प्रशिक्षिकाच झाल्या.
आता अशा ३५-४० जणी घरचं सगळं सांभाळून, घरच्यांच पाठींब्याने कामाला नियमित येत आहेत, या शिवाय ५०-६० जणींनी प्रासंगिक संधी घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधीच्या पिढीपेक्षा थोडं जास्त शिकूनही गावातलंच सासर मिळाल्याने, काही जणी मनातून खट्टू होत्या… त्यामुळे कुटुंब संबंधात काही कुरकुर चालू असायची. हिरकणी उपक्रमाने त्यावर फुंकर घातली गेली, जी परिस्थिती बदलता येणार नाही ती स्विकारण्याचं बळ त्यांना मिळालं.
हिरकणी दशकपूर्ती पर्यंत बचत गटाचे काम चालू असणाऱ्या ५५ गावात हा उपक्रम झाला, त्यात ९८६ मातांचे प्रशिक्षण झाले. अशा मोठ्या अनुभवाने अभ्यासक्रमात अनुभवाने बदल होत गेले. अशा समृद्ध अनुभवातून या उपक्रमाची आता प्रशिक्षण पुस्तिका तयार झाली. ६ दिवसांच्या प्रशिक्षणात १८ सत्रात काय शिकवायचे? कसे शिकवायचे? गृहपाठ काय द्यायचा हे सुद्धा ठरले. आईचे मूलाप्रति कर्तव्य म्हणजे फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी खायला देणे एवढेच नाही तर त्यापलीकडे बरेच आहे हे मातांना या सहभागामुळे समजले, त्यातून मुलांचे बालपण आनंदी होत गेले. न रडणारी, न चिडचिड करणारी मुले घरातले वातावरणही आनंदी ठेवतात ही लक्षात आले. अशा अनुभवामुळे या उपक्रमाच्या दशक पूर्ती वर्षांनंतर आता आपल्या भागापलीकडे जायची विस्तारायची तयारी झाली असे वाटायला लागले! मग गट ठरवून संधी मिळवून बाहेर पडला.
या वर्षी पुण्यात व पुण्याबाहेरच्या ७ केंद्रावर मिळून २३ ठिकाणी एकाच वेळी हिरकणी उपक्रम चालू आहे. यामध्ये ४८८ हिरकणी सहभागी आहेत. १२ गावातील ३३ प्रशिक्षिका घरचं सगळं सांभाळून हा उपक्रम घेत आहेत.
बचत गट कामाच्या पाठबळावर सुरु झालेला हिरकणी हा उपक्रम आता सुटवंग होऊन नवमातांचा आत्मसन्मान वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ करणारा ठरत आहे!
सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६