महिलांना तोंड बंद ठेवता येत नाही हे ग्रामीण महिलांचे खूप मोठे भांडवल आहे, हे त्यांच्या अनौपचारिक गप्पांमधून मला नेहमी कळायचे. त्यांच्या गप्पांमधून बोलणारीच्या पारदर्शक मनाचा ठाव घेता यायचा. त्यातून खरेतर बचत गट+ अशा कामांना सुरूवात झाली. विकास होऊ नये असे कोणालाच वाटत नाही पण नेमके काय केल्याने विकास लवकर करता येईल याचा खात्रीशीर मार्ग, सोपा करून, समजेल अशा प्रकारे, कोणी सांगत नाही ही खरी अडचण आहे.. असे मला ग्रामीण महिलांनी शिकवले.
विकासासाठी मुलींनी शिकायला पाहिजे कारण बाई शिकली की कुटुंब शिकते! हे वाक्य आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकले असेल, निबंधात वाचलेले असेल पण म्हणजे नक्की काय त्याची प्रक्रिया काय? या वर आम्ही आमच्या गटात विचार केला. मुलीला शिकवायला हवे असे शासन कानी-कपाळी ओरडते म्हणून मुलीला शिकवायचे का? असा प्रश्न शाळेत न गेलेल्या आईला कायमच पडतो. जर मुलीने शिकायला हवे असले तर ‘ती’ला शिक्षणाचे महत्व पटू दे .. आपण काम करतो तो भाग पुण्यापासून जवळचा त्यामुळे चर्चेत महिला म्हणायच्या, ‘मोप शिकवावसं वाटतं पण पैसा लागतो.. कुठे काय शिकायचे ते कळावे लागते. आम्ही कधी शाळेत सुद्धा गेलो नाही आम्हाला काय कळणार त्यातले!’ या धाग्याला धरून आपण कामाला सुरुवात केली.
गेली १५-१८ वर्ष ग्रामीण भागात युवती विकास उपक्रम राबवत आहोत. दुर्गम भागातल्या मुलींसाठी वेल्हयाला निवास सुरू केल्याचे आपण या आधी पाहिले पण जी मुलगी वयाने मोठी आहे, आता शाळेत जाणार नाही तिचे काय? म्हणून दुर्गम भागातल्या शाळा सोडलेल्या, घरीच असणाऱ्या युवतींच्या अनौपचारिक शिक्षणापासून सुरूवात केली. ‘जास्वंद’ वर्ग सुरू केला. जास्वंद वर्गाचा हेतू शालेय शिक्षण झाले नाही तरी जीवन कौशल्य आली पाहिजेत असा होता. म्हणून अभ्यासक्रम ठरवताना मजुरीचे पैसे मिळवू शकतील अशी शिवणापासून-कॉम्पुटरची डेटा एंट्री करण्याची तोंड ओळख करून देणारी १० कौशल्य होती, बँक व्यवहार कळावेत म्हणून बँकेत जाणे होते, कुठल्या कार्यालयात कुठली शासकीय कामे होतात हे समजण्यासाठी तहसील कार्यालयात आणि bdo ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाणे होते. एवढेच काय पण पोलिसांना आपण घाबरायचे नसते अगदी लहान मुलाला सुद्धा ‘पोलिसांकडे देते’ असे म्हणायचे नसते, पोलिस आपल्या मदतीसाठी असतात ही कळण्यासाठी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन येणे असे नियोजन होते. अभ्यासकामाचा भाग म्हणून पाळी कशी येते, याचे आरोग्यचक्र समजाऊन सांगण्याबरोबरच ताप, सर्दी, उलट्या, जुलाब, अंग-डोकेदुखी यावरचे घरगुती उपाय आणि औषधे यांचा परिचय असणारे १० तासांचे आरोग्य शिक्षण होते. असा ठरवलेला अभ्यासक्रम असणारा ४ महिने कालावधीचा जास्वंद वर्ग होता. वर्षाला २-३ तुकड्यांची योजना असायची. ६५० पेक्षा जास्त युवतींसाठी आपण अशा जवळजवळ ३० तुकड्या चालवल्या. एका तुकडीत ६-७ गावातल्या युवती एकत्र यायच्या. वर्गाची फी केवळ १०० रु असायची, त्यात त्यांच्या त्यांच्या गावातून वर्गाला जा-ये करायला वाहन व्यवस्था सुद्धा केली. त्यामुळे नियमित उपस्थितीसाठी काही वेगळे करावे लागले नाही. या प्रवास सोयीमुळे घरी जायला थोडा उशीर झाला तरी पालकही निर्धास्त असायचे. वैयक्तिक देणगीदारांनी या वर्गांसाठी लागणारा साहित्याचा, प्रशिक्षकांच्या मानधानाचा आणि प्रवासाचा सर्व खर्च उचलला त्यामुळे अनेकींची आयुष्य बदलली.
जास्वंद वर्गाचा हेतू शालेय शिक्षण नसल्यामुळे येणारा न्यूनगंड घालवणे.. त्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यावर काम करणे असाच होता. अभ्यासक्रमात संवाद कौशल्य प्रशिक्षणाचाही भाग होता. त्यासाठी प्रशिक्षणानंतर गावातल्याच पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणे आणि गावातच ३-४ जणींच्या गटाने लहान मुलांचा ३ तासांचा मेळावा घेणे असेही काम होते. वर्गात प्रवेश घेताना आईने बळजबरीने पाठवलेल्या युवती वर्ग संपेपर्यंत गावात उठून दिसायला लागायच्या. परिणामतः यातल्या काही विद्यार्थिनींना गावात त्यांच्या अभ्यासक्रमाचे ग्रामसभेत निवेदन करायला मिळाले तर कोणाकोणाला छोटीशी नोकरी मिळाली, कोणी ‘ताई’ झाल्यामुळे गावातल्या मुलांचे नियमित खेळ घायायला लागली तर कोणी पुन्हा पुढे शिकायला कॉलेजमध्ये जायला तयार झाली.
याचा खरा फिडबॅक मिळाला तो महिलांच्या बैठकीत.. ‘ताई पोरगी वर्गाला आली की बदलूनच जाते, घरी आल्यावर आज काय केले हे तिला इतके भरभरून सांगायचे असते की तिच्या गप्पा ऐकताना माझीच का ही? असा मलाच प्रश्न पडतो.’ एक तर म्हणाली, ‘पोरीला या वर्गाला पाठवून तुम्ही बापाचे कामच सोपे केले तुम्ही!’ न समजून मी ‘काय?’ असे विचारले तर .. अगदी मोकळेपणाने तिने सांगितले, ‘या वर्गात आलेल्या पोरींना सासरकडून मागणी येते आहे …. आता या पोरींनी ठरवायचे याला ‘हो’ म्हणायचे का त्याला!’
मुलग्यांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे असे स्टॅटिस्टिक्स मी सांगायला लागले की महिला म्हणायच्या, ‘तरी बापाला पोरगी उजावायला उंबरे झिजवावे लागतातच ना.. जो पर्यन्त ‘मुलीचा बाप’ असे म्हणत नाही तोवर या आकडेवारीला काही अर्थ नाही!’ जास्वंद वर्गाने हे काम केले! मुलीला प्रतिष्ठा मिळाली.. जिच्या पाठीशी आई आहे अशा मुलीला आधी प्रतिष्ठा मिळाली. जेव्हा शाळेत कधीही न गेलेली आई बचत गटात येऊन मुलीला कुठे संधी द्यायची असे ‘शिकते’ तेव्हा आपणही म्हणू शकतो की ‘आई शिकली की कुटुंब शिकते!
’***** सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६