ज्ञान प्रबोधिनी: स्त्री शक्ती प्रबोधन
त्रिदशकपूर्तीचे वर्ष!
म्हणता म्हणता बचत गटाच्या कामाला 30 वर्ष पूर्ण झाली. हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष या निमित्ताने बचत गट उपक्रमाने नक्की काय केले हे समजण्यासाठी या खटाटोपाला सुरुवात करत आहे आणि म्हणून त्याला नाव देत आहे मागे वळून बघताना आज आपण बघूया: मागे वळून बघताना भाग १
‘ती’ला ‘मोकळीक’ दिली….मुभा दिली
जगभरातल्या महिला जरी एक असल्या तरी अभिव्यक्ती, समज, अनुभव, सामाजिक दडपणाखाली झालेली वाढ यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये पुणे शहरापासून ७०-८० किलोमीटर अंतर असले तरी जमिन आसमानाचा फरक असतो तो मी अनुभवला.
‘मला कोणीतरी समजून घेतंय’ असं वाटले तरी नात्यातला दुरावा विरघळून जातो. मग होणाऱ्या मोकळ्या संवादाने खूप काही घडते… घडवता येते. असा विश्वास मला गेल्या अनेक वर्षाच्या कामातून मिळाला.
एखाद्या परिस्थितीला ‘ती’ जबाबदार नाही, हे तिला माहिती असले, तरी जणू आपणच जबाबदार आहोत, असं आजूबाजूच्यांना वाटतंय, याचं ओझं आयुष्यभर बाळगणं सोपं नसतं.
एखादी महिला ‘एकल’ असते, म्हणजे नवऱ्याशिवाय एकटी रहात असते…… का बरं? …तर ती सांगते, ‘काळी आहे ना….. नवऱ्याला आवडले नाही!’ ….लग्नाआधी चार चौघात बघितले होते, त्याने रीतसर ‘हो’ म्हंटल्यावरंच थाटामाटात लग्न लावले होते. पण ती जेव्हा पहिल्या बाळंतपणाला माहेरी येते त्यानंतर सासरी गेलेलीच नसते अशी ‘ती’ जेव्हा नवऱ्याचं हे उत्तर ‘ती’च्या एकलेपणाचे कारण सांगते ….. आणि तरीही समाज तिच्या ‘एकल’ असण्याला केवळ तिलाच दोशी धरतो, तेव्हा तिचं बोलणं समजतंच नाही.
‘आवडली नाहीस’ या दोन शब्दाने तिचे आणि मुलाचे सगळे आयुष्य पणाला लागलेले असते… जर तिला मुलगी असेल तर तिच्या मुलीच्या लग्नाला सुध्दा वडील नसल्याने आईच्या ‘चारित्र्याची’ मनोकल्पित अडचण येते.
हे सगळं ‘समजल्यावर’ मला प्रश्न पडतो की तिची काहीच चूक नसताना एकल म्हणून जगलेल्या ‘ती’ला कशी शिकवायची लोकशाही? कसे सांगायचे संविधानाने समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे तो लिंगाधारित नाही? अजून समाज म्हणून आपल्याला खूप शिकायचंय हेच खरं…
स्त्री शक्ती प्रबोधन विभागाचे गावातले काम महिलांसाठी, महिलांनी केलेले असल्याने, कार्यक्रमाला महिलाच उपस्थित असायच्या. एकल महिला सुद्धा हक्काने यायच्या. एखादी महिला भाषण सुरु झाले की ५-१० मिनिटातच बसल्या बसल्या झोपून जायची. पण कार्यक्रम संपला की आवर्जून सांगायला यायची की कार्यक्रम चांगला झाला. मला अश्चर्य वाटायचं! मग मी तिच्या घरी सवडीने जायची. कधी कधी आधी सांगून… कारण माझं तिच्या घरी जाणं तिला जर साजरं करायचं असलं तर संधी मिळावी म्हणून…. मग एखाद्या घरी स्वागताला भजी मिळायची तर कधी तिने लावलेल्या परड्यातल्या आळूची वडी, कधी अचानक गेले तर खास आलं घालून केलेला किंवा लिंबाचं पान टाकून केलेला चहा मिळायचा!
….. कारण
‘ती’ ला तिच्याच स्वयंपाकघरात,
तिला हवे म्हणून केले
असं करण्याची मुभा
संस्कारामुळे तिनेच तिला दिलेली नाही.
म्हणून ‘ती’च्या साजरं करण्याला माझं निमित्त लागतं!!
मग गप्पागप्पात कळायचं भाषण कळलं नाही तरी त्या भाषणाला यायचा निर्णय ‘ती’ने केला. कदाचित असं काहीतरी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या कार्यक्रमा निमित्ताने तिच्या रोजच्या कामाला तिनेच सुट्टी घेतली. तिच्याच शब्दात सांगायचे तर ‘दिवसाचा विसावा घेतला बरं वाटलं!’ त्यानिमित्ताने तिने तिला आवडणारी ठेवणीतली साडी आवर्जून नेसली….. ‘ती’ने हौस केली… सुरक्षित वातावरणात, तिला वाटणाऱ्या सर्व मर्यादा सांभाळून….
बदल खूप बारीक असतात … पण जाणीवेतून केलेला प्रत्येक बारीकसा बदल सुद्धा, एखादीचं आयुष्य बदलायला दिशादर्शक ठरु शकतो.
बचत गटाने ‘बचत करणे’ ‘कर्ज देणे’ अशी रचनाच फक्त बसवली नाही तर ग्रामीण भागातील सर्वच महिलांना एक व्यक्ती म्हणून, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी घेण्याची मुभा दिली, मर्यादित, सुरक्षित स्वातंत्र्य अनुभवण्याचीही संधी दिली!