गणेश प्रतिष्ठापना

गणेशोत्सव हा सर्वांचा, अगदी सामान्यांचाही उत्सव आहे. पूर्वीच्या काळी केवळ घराघरामध्ये होणाऱ्या  उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप देऊन त्या माध्यमातून लोकजागरण आणि लोकसंघटन करण्याचा प्रयत्न केला.

श्रीगणेश-प्रतिष्ठापनेचा जो पारंपरिक विधी आहे, त्यात मूर्तिपूजेमागील अद्वैत तत्त्वज्ञानाची भूमिका स्पष्ट करणारा भाग जोडून ही नवीन पुस्तिका तयार केली आहे. प्रस्तुत पुस्तिकेमध्ये प्रारंभी स्वतःची आणि परिसराची शुद्धी, संकल्प, पूजा साहित्याचे पूजन इत्यादी प्राथमिक विधी केल्यानंतर वेद-उपनिषदांतील मंत्रांपासून ज्ञानेश्वरीतील विविध वचनांचा आधार घेत; सर्व सृष्टी कशी एका ब्रह्मतत्त्वाने भरलेली आहे, ते स्पष्ट केले आहे. प्रतिष्ठापनेसाठी चैतन्याला आवाहन आणि सर्वात शेवटी अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीची पूजा आणि आरती असा विधी आहे. पुस्तिकेच्या शेवटी उत्तरपूजेचा विधी दिला आहे.

गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे लोकमान्य टिळकांची जी भूमिका होती, ती थोड्याफार फरकाने आजच्या परिस्थितीतही सुसंगत आणि उपयुक्त आहे. त्या दृष्टीने पाहता सध्याच्या सार्वजनिक गणेश-मंडळांनी त्या उत्सवामागील जो सामाजिक आशय ध्यानात ठेवायला हवा, त्याचीही मांडणी या पुस्तिकेत गद्य प्रार्थनेच्या स्वरुपात केली आहे.

सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना विविध जातिधर्माच्या, व्यक्तींच्या हस्ते करण्याचा चांगला पायंडा आता पडला आहे. आता त्यापुढची पायरी म्हणजे प्रतिष्ठापनेचे पौरोहित्य करणे हे सुद्धा सर्व जातिधर्मांच्या स्त्रीपुरुषांना शक्य झाले पाहिजे.

कोणीही साक्षर, संस्कृतचा थोडा सराव करू इच्छिणारी व सश्रद्ध व्यक्ती असे पौरोहित्य करू शकेल. गेली अनेक वर्षे या पोथीचा वापर प्रबोधिनीत व बाहेरही चालू आहे.

गणेशोत्सवात त्या त्या मंडळातील संयोजकांनी आपल्याच भागातील पुरोहित तयार करून श्रींची प्रतिष्ठापना  करणे शक्य आहे. रूढीने व परंपरेने ज्यांना पौरोहित्याचा अधिकार नाही असे समजले जाते, अशा जातीधर्मातील स्त्री-पुरुषांना यात प्राधान्य द्यावे.

पूजेची तयारी

श्रीगणेशस्थापना -पूजेच्या आधी घराची स्वच्छता करावी. दारात सुंदर रांगोळी रेखावी. आकृतीत दाखविल्याप्रमाणे योग्य या ठिकाणी चौरंग अथवा पाट ठेवावा. त्यावर वस्त्र घालावे. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. आकृतीनुसार चौरंगावर उपलब्ध असलेली पूजेची उपकरणे म्हणजे कलश, शंख, घंटा, दीप इ. ठेवावे. चौरंगावर किंवा पाटावर मागे मध्यभागी थोडे तांदूळ ठेवून यावर श्रीगणेशाची उत्सवमूर्ती ठेवावी. मूर्तीवर घातलेले  वस्त्र किंवा रुमाल काढून ठेवावा. उत्सवमूर्तीच्या पुढे एका छोट्या वाटीत थोड्या अक्षता ठेवून त्यामध्ये गणेशाची धातूची छोटी मूर्ती किंवा सुपारीरुपी गणेश ठेवावा. तांदुळाच्या राशीवर कलश ठेवावा. कलशात पाणी, हळद- कुंकू, गंध, अक्षता, फूल, सुपारी, नाणे, कापूरवडी घालावी. कलशाच्या मुखावर विड्याची/आंब्याची पाने लावावीत. कलशावर नारळ ठेवावा.

खारका, बदाम, फळे या पूजेतील अत्यावश्यक गोष्टी नव्हेत. ज्यांना या ठेवाव्याशा वाटतील त्यांनी त्या ठेवाव्यात; नंतर प्रसाद म्हणून त्यांचे वाटप करावे.

पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी यादीनुसार सर्व साहित्याची तयारी करून ठेवावी. पूजास्थानी तेलाची समई प्रज्वलित करून ठेवावी.

२०२४ या वर्षासाठी पंचांग

इह पृथिव्याम् जंबुद्वीपे भरतवर्षे बौद्धावतारे पुण्यनगरे क्रोधी नाम संवत्सरे वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्लपक्षे चतुर्थी तिथौ शनि वासरे चित्रा नक्षत्रे श्री सिद्धिविनायक मूर्तेः प्राणप्रतिष्ठापूर्वकं श्री सिद्धिविनायक पूजनम् वयम् करिष्यामहे.

या पृथ्वीतलावरील जम्बुद्वीपामध्ये भारत देशात बौद्धावतारात पुणे नावाच्या नगरात क्रोधी नावाच्या वर्षी वर्षा ऋतूमध्ये भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला शनिवारी चित्रा नक्षत्रावर श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिचे आम्ही पूजन करत आहोत

अन्यत्र स्थित मंडळींसाठी पुढील संकेतस्थळ पाहून नक्षत्राचे आवश्यक ते बदल करता येतील.
https://www.drikpanchang.com/panchang/month-panchang.html?date=07/09/2024