निरूपण –
अनेक जणांमध्ये काही उपजत गुण असतात. त्या गुणांच्या जोरावर ते अनेक कामे यशस्वी करतात. अनेक कामगिऱ्या पार पाडतात. पण कधीतरी एखादे काम असे येते की उपजत गुण पुरेसे पडत नाहीत. काही प्रशिक्षण घेतल्याशिवाय, काही सराव केल्याशिवाय, नवे आव्हान पूर्ण करता येत नाही. शिक्षणक्षेत्रात बऱ्याच वेळा अनुभव येतो की उपजत स्मरणशक्तीच्या जोरावर सुरुवातीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होता येते. पण नंतरच्या अवघड परीक्षांसाठी अभ्यासकौशल्ये स्वतंत्रपणे शिकावी लागतात. मी गणित शिकवताना अनुभव घेतला आहे, की काही विद्यार्थी अवघड गणितेही वेगाने विचार करत तोंडी सोडवू शकतात. पण त्यांना विचाराच्या पायऱ्यांनुसार उत्तर लिहिणे जमत नाही. मग त्यांना लेखनाच्या कौशल्यांचा वेगळा सराव करावा लागतो. ज्याला वक्तृत्व चांगले जमते, त्याला वादविवादाची कौशल्ये शिकावी लागतात. ज्याला स्वतःला कोणतेही काम उत्तम करता येते, त्याला इतरांकडून काम करून घेणे शिकावे लागते. उपजत गुणांच्या जोरावर जे काम करता येत नाही, ते करणारच नाही असे प्रत्येक वेळी म्हणून चालत नाही. वेगळ्या प्रकारचे काम, आतापर्यंत केलेल्या कामांपेक्षा अवघड काम करायला, नेटाने शिकावे लागते. या संबंधी आजच्या पद्यामध्ये सांगितले आहे.
अब तक सुमनों पर चलते थे, अब काँटों पर चलना सीखें ॥धृ.॥
कोणत्याही अडचणी न येता एखादे काम सहज, सुरळीत करता येणे म्हणजे जणू फुलांच्या पायघड्यांवरून चालत जाणे. त्याची सवय झाली की कामातली कोणतीही अडचण, कोणताही प्रश्न नकोसा वाटतो, काट्यांसारखा वाटतो. अशा अडचणी आल्यावर आतापर्यंत फुलांवरून चालायचा अनुभव घेतला, आता काट्यांवरून कसे चालायचे ते शिकूया, असे म्हणता आले पाहिजे. प्रत्येक समस्येकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.
खडा हुआ है अटल हिमालय, दृढता का नित पाठ पढाता;
बहो निरंतर ध्येय-सिंधु तक, सरिता का जल-कण बतलाता;
अपने दृढ निश्चय से पथ की, बाधाओं को ढहना सीखें ॥१॥
काट्यांवरून चालत जायला शिकायचे म्हणजे आपल्यामधले धीर धरता येणे आणि चिकाटीने काम करणे, हे दोन गुण वाढवावे लागतात. धीर धरणे म्हणजे कामाचे परिणाम दिसायची वाट पाहता येणे. मानवी आयुष्याच्या कालावधीत हिमालयात काही बदल झालेले दिसत नाहीत. शतकानुशतके तो आहे तसाच अटल म्हणजे अढळ – न ढळणारा, न हलणारा – दिसतो आहे. तो जणू ठामपणे, अधीर न होता, वाट पाहायला शिकवतो आहे. डोंगरमाथ्यावरून झरा वाहायला लागला की त्यातला प्रत्येक थेंब समुद्राकडे जायला लागतो. वाटेत कितीही अडथळे आले तरी नदीला आणि तिच्यातल्या प्रत्येक थेंबाला समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग काढत जावे लागते आणि तसे करूनच नदीतले सर्व थेंब शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. ही चिकाटी आपण ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मिळवली पाहिजे असे जणू ते थेंब आपल्याला सांगत आहेत. दृढता म्हणजे न ढळता थांबण्याचा धीर धरणे आणि निश्चय म्हणजे ध्येयापर्यंत पोचणारच, त्यासाठी लागेल ते सर्व करणारच, अशी चिकाटी. या दोन गुणांच्या आधारे ‘बाधाओं को ढहना’ म्हणजे वाटेतल्या अडचणींना उद्ध्वस्त करायला शिकूया.
अपनी रक्षा आप करे जो, देता उसका साथ विधाता;
अन्यों पर अवलंबित है जो, पग-पग पर वह ठोकर खाता;
जीवन का सिद्धान्त अमर है, उस पर नित हम चलना सीखें ॥२॥
इतरांवर विसंबून राहिले की पावलोपावली परिस्थितीच्या थपडा खाव्या लागतात, ठरवल्याप्रमाणे काम होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपण हातपाय हलवल्याशिवाय परमेश्वरही आपल्याला टेकू देत नाही हे पण लक्षात ठेवले पाहिजे. या लक्षात ठेवायच्या दोन्ही गोष्टी जीवनाचे शाश्वत सिद्धान्त आहेत. त्याला अनुसरूनच नेहमी काम करायला शिकूया.
हममें चपला सी चंचलता, हममें मेघों का गर्जन है;
हममें पूर्ण चन्द्रमाचुंबी, सिंधु तरंगों का नर्तन है;
सागर से गंभीर बनें हम, पवन समान मचलना सीखें ॥३॥
चपला म्हणजे आकाशात चमकणारी वीज. चंचलता म्हणजे चपळपणा. वीज जशी क्षणात आकाशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकताना दिसते, तसा चपळपणा आपल्यामध्येही आहेच, (तो प्रकट करायला शिकले पाहिजे.) ढगांच्या गडगडाटासारखे आपल्या शक्तीचे प्रकटन करण्याइतका आत्मविश्वास आपल्यामध्येही आहेच, (तो जाहीर करायला शिकले पाहिजे). पौर्णिमेच्या दिवशी भरतीच्या लाटा जणू पूर्ण चंद्राला स्पर्श करायला उसळत असतात. तसे ध्येयाला स्पर्श करण्यासाठी पुन्हा पुन्हा उसळी मारण्याचा उत्साह आपल्यामध्येही आहेच. (त्याचे प्रात्यक्षिक दाखवायला शिकले पाहिजे). इतरांचे भले-बुरे सर्व काही पोटात घेऊन त्याचा स्वतःवर काही परिणाम समुद्र होऊ देत नाही. त्याला समुद्राची गंभीरता म्हणतात. तसे कामात येणारे सर्व कटू-गोड अनुभव गिळून टाकण्याची गंभीरता आपण मिळवली पाहिजे. डोंगरातल्या काही कड्यांना नेढं असते. म्हणजे वाऱ्याच्या दीर्घकाळ सततच्या माऱ्याने पडलेले भोक असते. कड्याच्या पलीकडे जाण्यासाठी भोक पडेपर्यंत वारा त्या कड्याला धडका देत असतो. वाटेतले अडथळे दूर होईपर्यंत त्यांना हट्टाने धडका द्यायलाही आपण शिकले पाहिजे.
उठें उठें अब अंध:कारमय, जीवन-पथ आलोकित कर दें;
निबिड निशा के गहन तिमिर को, मिटा, आज जग ज्योतित कर दें;
तिल-तिल कर अस्तित्व मिटा कर, दीपशिखा सम जलना सीखें ॥४॥
अडचणी आणि आव्हानांपुढे हताश आणि अगतिक होऊन निष्क्रिय बसणे, पुढची वाट न दिसणे, म्हणजे जीवन अंध:कारमय होणे. आपण कामासाठी उठल्याशिवाय पुढची वाट दिसणार नाही. अंधार संपवून पुढची वाट प्रकाशित करण्यासाठी आधीच्या तीन कडव्यांमध्ये सांगितलेले गुण मिळवले पाहिजेत. त्या साठी आता उठा, जागे व्हा. निबिड म्हणजे घनदाट. निबिड निशा म्हणजे काळोखी रात्र. अशा रात्रीचा तिमिर, म्हणजे अंधार, गहन म्हणजे तीव्र असतो. मनाला भिववणारा असतो. मनातली भीती काढून टाकली की रात्रीचा घनदाट काळोख दूर होतो. अडचणींच्या भीतीमुळे आलेली निराशा, उत्साह गळून जाणे, हे भीती गेली की जाते. निर्भयतेमुळेच प्रकाश दिसायला लागतो. मृत्यूच्या घटकेपर्यंत तिल-तिल, म्हणजे कणाकणाने, अस्तित्व मिटाकर, म्हणजे शरीर झिजवत, ध्येयसिद्धीसाठी काम करत राहा. तसे केल्यानेच जीवनज्योत अखंड तेवती राहील आणि पुढचा मार्ग प्रकाशित करत राहील.
पद्य –
अब तक सुमनों पर चलते थे, अब काँटों पर चलना सीखें ॥धृ.॥
खडा हुआ है अटल हिमालय, दृढता का नित पाठ पढाता;
बहो निरंतर ध्येय-सिंधु तक, सरिता का जल-कण बतलाता;
अपने दृढ निश्चय से पथ की, बाधाओं को ढहना सीखें ॥१॥
अपनी रक्षा आप करे जो, देता उसका साथ विधाता;
अन्यों पर अवलंबित है जो, पग-पग पर वह ठोकर खाता;
जीवन का सिद्धान्त अमर है, उस पर नित हम चलना सीखें ॥२॥
हममें चपला सी चंचलता, हममें मेघों का गर्जन है;
हममें पूर्ण चन्द्रमाचुंबी, सिंधु तरंगों का नर्तन है;
सागर से गंभीर बनें हम, पवन समान मचलना सीखें ॥३॥
उठें उठें अब अंध:कारमय, जीवन-पथ आलोकित कर दें;
निबिड निशा के गहन तिमिर को, मिटा, आज जग ज्योतित कर दें;
तिल-तिल कर अस्तित्व मिटा कर, दीपशिखा सम जलना सीखें ॥४॥
या प्रकारच्या पद्यांमध्ये एक ठराविक साचा दिसतो. हिमालय नद्या समुद्र यांच्या सहाय्याने देशाचे देहीकरण.. (personification)
मग पुढे – “education is manifestation of perfection already in man and religion is manifestation of divinity already in man” – या धर्तीवर तुझ्या मध्ये सर्व आहे हे सांगणे.
शेवटच्या कडव्यात समाज अभिमुखता यायला हवी. तिथेही भावनिक आवाहनच येते…
खूपच सुंदर. सरांनी जीवन जगण्याची ध्येया पर्यंत पोचण्याची कलाच सांगितली आहे.
खूप छान….
उपजत गुण नक्कीच आयुष्यभर पुरत नाहीत नवीन आव्हानात्मक काहीतरी वेगळे करण्यासाठी नवीन गोष्टी शिकाव्याच लागतात
पद्य निरूपण खूप छान वाटले.
संकल्पाची पूर्तता करण्यासाठी प्रसंगानुसार संबंधित विषयाचे शिक्षण घेणे गरजेचे आहे