९. प्रतिज्ञेचे स्वरूप

  • ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रतिज्ञा घेण्याची गरज का मांडली जाते?

आपण कोणतेही काम नैसर्गिक प्रेरणेने किंवा काहीतरी मिळवण्याच्या / टाळण्याच्या इच्छेने किंवा ते आपले कर्तव्य वाटते म्हणून करतो. पहिल्या दोन प्रकाराने काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार कमी होतो. कर्तव्य म्हणून काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार करावा लागतो. प्रतिज्ञा करण्याचे ठरवताना असा विचार सुरू होतो. आपल्या प्रत्येक कृतीच्या बाबतीत असा विचार आपण करू लागलो की आपले वागणे, बोलणे आणि विचार यात एकवाक्यता यायला लागते. या तिन्हीमध्ये असलेला फरक जितका कमी होईल तितके आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व-विकसन अखंड चालू राहण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याची गरज मांडली जाते.

  • मनातल्या मनात एकट्याने प्रतिज्ञा करणे आणि गटामध्ये अनेकांसमोर मोठ्याने उच्चारून प्रतिज्ञा करणे यामुळे काही फरक पडतो का?

ज्यांना मनातल्या मनात एकट्याने प्रतिज्ञा करणे आणि त्याप्रमाणे वागणे जमते अशा व्यक्ती कमी असतात. बर्‍याच जणांना प्रतिज्ञा केल्याप्रमाणे वागण्यासाठी, मोठ्याने उच्चार करण्याचा, अनेकांसमोर किंवा अनेकांबरोबर उच्चार करण्याचा आधार वाटतो. व्यक्तिमत्त्व विकसनासाठीची पद्धत म्हणून प्रबोधिनी प्रतिज्ञा ग्रहणाकडे बघते. म्हणून जास्तीत जास्त लोकांना उपयोगी अशी पद्धत बसवण्याचा प्रयोग चालू आहे. ज्यांना मनातल्या मनात प्रतिज्ञा करून पुरते त्यांनी प्रकटपणे प्रतिज्ञा करण्यात तोटा काहीच नाही.

  • प्रतिज्ञा स्वत: करायची असते की कोणीतरी द्यावी लागते?

स्वत:हून संकल्प करणे किंवा प्रतिज्ञा करणे सुचले तर उत्तमच आहे. पण अनेकांना मोठ्याने उच्चार करायची गरज असते. अनेकांसमोर, अनेकांबरोबर प्रतिज्ञा करताना अनेकांनी प्रतिज्ञेचा एकत्र उच्चार करणे सोयीचे असते. उच्चार एकावेळी व एका पद्धतीने व्हावेत म्हणून प्रतिज्ञेचे शब्द कोणीतरी थोडे थोडे सांगायचे व मागून सगळ्यांनी म्हणायचे याचा उपयोग होतो. प्रकट वाचनाचा सराव असेल किंवा पाठांतराबद्दल खात्री असेल तर कोणाच्या तरी पाठोपाठ म्हणण्याऐवजी स्वत:हून प्रतिज्ञेचा उच्चार केला तरी चालू शकेल.

ज्यांनी पूर्वीच प्रतिज्ञा केली आहे, त्याप्रमाणे जे वागत आहेत अशी ज्यांची स्वत:ची व इतरांची खात्री आहे, अशा कोणी प्रतिज्ञेचे शब्द सांगितले व नवीन प्रतिज्ञा करणार्‍यांनी त्यांच्यामागून उच्चारले तर आपण या प्रतिज्ञेप्रमाणे वागू शकू असा विश्वास वाढतो. म्हणून पद्धत बसवताना प्रतिज्ञा देणे, प्रतिज्ञा घेणे असे शब्द वापरतो. तो कार्यक्रमाच्या रचनेचा भाग आहे. प्रतिज्ञा स्वत: करणे हे योग्यच आहे.

*****************************************************************************************************************