८. राष्ट्रासाठी कृती

११वी-१२वीतील युवकांसाठी व युवतींसाठी वीरव्रत संस्काराची योजना करायचे ठरवले आहे. प्रबोधिनीत येणारे सर्वचजण ‘राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची’ आपल्या हातून घडावी अशी इच्छा करत असतात. अगदी ‘राष्ट्रार्थ’ ही झाली पाहिजे व ‘पराक्रमाची’ ही झाली पाहिजे. वीरव्रत घेणे म्हणजे ‘पराक्रमाची कृती’ करायची ठरवणे, आणि प्रथम प्रतिज्ञा घेणे म्हणजे ‘राष्ट्रार्थ कृती’ करायाची ठरवणे. वीरव्रत काही वर्षांसाठी घेऊन मग पुढे त्याला विकासव्रताची जोड द्यायची आहे.प्रथम प्रतिज्ञा मात्र आयुष्यभरासाठी घ्यायची असते. ‘ही हिंदूभू परम् श्रेष्ठ पदास न्याया, आम्ही कृती नित करू, झिजवोनि काया’ असे आपण प्रतिज्ञेत म्हणत असतो. इतके दिवस गटाचा भाग म्हणून ‘आम्ही कृती करू’ असे म्हटले. प्रथम प्रतिज्ञा घेतल्यावर या गटात असेन किंवा त्या गटात असेन किंवा कोणत्याच गटात नसेन पण मी व्यक्तिश: राष्ट्रार्थ कृती करीन, असे व्रत घेतले आहे. ही कृती पराक्रमाची असेल, विकासाची असेल किंवा सेवेची असेल. परंतु नेहमीच ती राष्ट्रासाठी असेल.

(सौर फाल्गुन २५ शके १९३७, दि. १४ मार्च २०१६ रोजीच्या युवती विभागाच्या प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रमातील भाषणाचा काही भाग)

*************************************************************************************************************