७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजे आपले राष्ट्र असे शब्द पहिल्या प्रतिज्ञेत आहेत. या राष्ट्राची सेवा म्हणजे बहुतेकांना येथील समाजाची सेवा हेच प्रथम डोळ्यासमोर येते. तेथून सुरुवात करायची आहे. समाजाची सेवा करता करता त्या समाजाची संस्कृती आणि तिच्या मुळाशी असलेले अध्यात्म याचा हळूहळू परिचय होत जातो. हिंदू धर्म म्हणजे भारतीय अध्यात्म असे म्हटले. हिंदू समाज म्हणजे सर्व भारतीय नागरिकांचा समाज असे ही म्हटले. मग हिंदू राष्ट्र म्हणायच्या ऐवजी भारतीय राष्ट्र म्हणायला काय हरकत आहे? फक्त वर्तमान काळाचा विचार केला तर दोन्ही शब्द समानच आहेत. पण भवितव्याचा विचार केला तर मात्र त्यात थोडा फरक आहे. भारताची फाळणी होऊन काही भाग पाकिस्तान मध्ये गेला. उरलेल्या खंडित भारताची घटना तयार करताना त्या भागाचे नाव India that is भारत असे घटनेत ठरविण्यात आले. आजचे आपले कार्यक्षेत्र हा खंडित भारतच आहे. पण प्रबोधिनीच्या प्रार्थनेमध्ये ‘होई अखंड प्रियभूमि अजिंक्य तेव्हा’ ही आमची आस पुरव अशी प्रार्थना आपण देवाकडे करतो. आमच्या डोळ्यासमोर कधीतरी फाळणी पुसली जाऊन भारत अखंड व्हावा असे ध्येय आहे. आपले राष्ट्रीयत्व हिंदू आहे. आजच्या खंडित भारताच्या पलीकडे बृहत्तर भारतात असलेल्या हिंदूंचेही स्मरण व्हावे म्हणून हिंदुस्थान व हिंदुराष्ट्र हे शब्द वापरतो. सारा देशच असे अखंड भारताचे स्वप्न पाहायला लागला, तर भविष्यातील हिंदुस्थान आणि भारत किंवा हिंदूराष्ट्र आणि भारतराष्ट्र एकच आहे असे आनंदाने म्हणता येईल.

**************************************************************************************************************