मागच्या लेखाच्या शेवटी दिलेले जे सामूहिक व व्यक्तिगत कृतिसंकल्प आहेत ते सगळे समाजाशी व देशाशी एकरूप होण्याचे म्हणजेच समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचे संकल्प आहेत. सामूहिक संकल्प केले ते बाकी कोणी पाळते आहे की नाही हे न पाहता स्वतः पाळायचा प्रयत्न करणे म्हणजे समाजात स्वतःला विरघळवून टाकणे. प्रबोधिनीने रूढ केलेल्या मातृभूमी पूजनाच्या वेळी शेवटी जे व्यक्तिगत कृतिसंकल्प करतो ते स्वतःची समाजात विरघळून जाण्याची शक्ती वाढावी म्हणून. इतरांसाठी जिणे जे आपण कुटुंबात एकमेकांसाठी करतो ते कुटुंबाबाहेरच्या लोकांसाठी सहज करू लागणे म्हणजे समाजात स्वतःला विरघळवून टाकणे. तसे विरघळून जाण्यासाठी सर्वप्रथम ‘दुर्लभं भारते जन्म’ हे आपल्याला समजले पाहिजे. भारतात माझा जन्म झाला हे माझे मोठे भाग्य आहे असे मनापासून वाटले पाहिजे. यासाठी जमेल त्याप्रमाणे भारताचा भूगोल आणि लोकजीवन यांची ओळख प्रवासातून, अनुभवातून, पाहून आणि ऐकून करून घेतली पाहिजे. या सर्व मार्गांनी आपल्याला आपल्या समाजाची जी काही परिस्थिती कळेल, त्यातला एखादा प्रश्न निवडून, त्यावर स्वतःचे उत्तर ठरवून तो प्रश्न सोडविण्याचे काम आपण सुरू केले पाहिजे. आपल्या देशातील आजचे देशभक्त कार्यकर्ते आणि विचारवंत कोण यांचा शोध घेऊन त्यांच्याबरोबर राहावे, त्यांचे काम पाहावे, त्यांच्याशी बोलावे, त्यांनी कोणता प्रश्न निवडला आहे व ते तो कसा सोडवत आहेत हे त्यांच्याकडूनच समजून घ्यावे. काही वेळा आपण फार हिंडलेलो नसतो, परिस्थिती आपल्याला नीट समजलेली नसते, प्रश्नावर उत्तर आपल्याला सुचत नाही. अशावेळी आपल्या संघटनेचे ध्येय हेच आपले उद्दिष्ट मानून गटात ठरलेले काम करत राहिले पाहिजे. असे दीर्घकाळ गटाच्या कामात स्वतःला गुंतवून घेणे म्हणजे सुद्धा स्वतःला विरघळवून टाकणे.
आपल्या गटाचा अंतर्गत कार्यक्रम किंवा गटाचा समाजामध्ये चाललेला कार्यक्रम पार पाडत असताना मी एवढे काम केले, खस्ता खाल्ल्या, घाम गाळला, या कामातून मला काय मिळाले, असा प्रश्न मधून मधून अनुभवी व मोठ्या लोकांनाही पडतो. असा प्रश्न पडणे म्हणजे देशसेवा न करता आपण देशाशी सौदा करणे. स्वतःला विरघळवून टाकायचे म्हणजे आपण गटामध्ये आणि आपण व गटाने समाजामध्ये केलेल्या कामातून मला काय मिळाले? किंवा मला एवढेच कसे मिळाले? किंवा मला काहीच कसे मिळाले नाही? असला हिशोब न ठेवता काम करायचे. मला गटात व समाजात काही काम, काही सेवा करायची संधी मिळते आहे, यासाठी समाजाशी कृतज्ञ राहणे, हे काम करताना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष अनेक जणांची मदत होते, त्यांच्याशी नेहमी कृतज्ञ राहणे म्हणजे स्वतःला समाजात विरघळवून टाकणे. आपल्या देशाचा रामायण, महाभारत आणि पुराणांमधला थोडाफार इतिहास आपल्याला कथा, कहाण्या ऐकून माहिती असतो. ज्यांना समाजात विरघळून जायचे आहे त्यांनी आपल्या देशाचा इतिहास अधिकाधिक ऐकला, वाचला पाहिजे. जे काही ऐकले, वाचले त्यातले काय पुन्हा घडवले पाहिजे, काय पुन्हा होऊ द्यायचे नाही, काय आणखी वाढवले पाहिजे असा विचार करून आज आपण काय करायचे हे जे ठरवतात, ते देशाच्या इतिहासाशी जोडले गेले, म्हणजेच समाजात विरघळून गेले.
(एका कार्यकर्त्याला लिहिलेल्या पत्रातील काही भाग : सौर भाद्रपद २५ शके १९३०, दि. १६ सप्टेंबर ०८)
*****************************************************************************************************************