प्रथम प्रतिज्ञितांचे तिसरे काम आहे आपण संघटित होणे आणि इतरांना संघटित करणे.
आपण चांगलं म्हणजे समाजाला अनुकूल वागतो. पण एकट्याने समाजाला अनुकूल बनविण्याचे धाडस आपल्याला बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे समाजाला अनुकूल बनविण्याचे काम एकेकट्याने करण्यापेक्षा गटाने करणे सोयीचे जाते. गटाने काम करायला शिकायचे असते. मी गटासाठी व गट समाजासाठी हे लक्षात ठेवून काम करायला शिकायचे असते.
झुणका भाकर केंद्र चालविणे, बचत गट चालविणे, गटाने रुग्णसेवा करणे, अंत्यसंस्काराला मदत करणे, सार्वजनिक वाचनालय चालविणे, अभ्यासिका चालविणे, कौशल्य शिकवण्याचे वर्ग चालविणे, सामुदायिक खरेदी करणे, सामुदायिक विक्री केंद्र चालविणे, प्रदर्शने किंवा पथनाट्याच्या विचार लोकांपर्यंत पोहचविणे, व्यसनमुक्ती केंद्र चालविणे अशी अनेक सार्वजनिक कामे गटानेच करावी लागतात.
अशा कामांसाठी कोणी आवाहन केले तर त्यात भाग घेऊन सक्रिय प्रतिसाद देण्यापासून गटात काम करणे शिकायला सुरुवात होते. गटात काम करत असताना कोणाला तरी एखादे पद घ्यावे लागते. कोणाकडे तरी पैसे हाताळण्याचे काम येते. कोणाला तरी गटाचा प्रतिनिधी म्हणून जास्त वेळा इतरांसमोर यावे लागते. कोणालातरी गटाच्या वतीने पुरस्कार स्वीकारावे लागतात. गटातल्या काही जणांना जास्त प्रतिष्ठा व प्रसिद्धी मिळते.
अशा वेळी पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुरस्कार यासाठी काम करायचे नसून सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि सार्वजनिक संपत्ती वाढविण्यासाठी काम करायचे असते हे शिकावे लागते. या सर्व गोष्टी (पद, पैसा इत्यादी) नेहमी इतरांना देऊ करायच्या व स्वतःकडे आल्या तर आपल्या गटाच्या वतीने स्वीकारायच्या हे शिकावे लागते. याला म्हणायचे संघटित होणे आणि संघटित करणे.
१. आपण गटात सहभागी होणे. गटातील सगळ्यांशी आपली ओळख आणि संवाद वाढणे, कोणत्याही गटात सहज सहभागी होता येणे यातून आपल्या सार्वजनिक किंवा संघटनेतील आयुष्याला सुरुवात होते. दल किंवा उपासना केंद्र किंवा एखादी नियमित चालणारी बैठक ही अशा सुरवातीची जागा आहे.
२. अनेक गटांमध्ये मिसळण्याइतकी सहजता आली नाही तरी किमान एका गटात असल्यामुळे सुरक्षितता वाटणे, आनंद वाटणे आणि समाजाला अनुकूल बनविण्याचे काम करता येईल असा विश्वास वाढणे ही पुढची पायरी आहे.
३. संघटित होण्याची तिसरी पायरी म्हणजे गटाने काम करत असताना एकेका कामातील कौशल्य वाढते, काम संपविण्याचा उरक वाढतो आणि अधिक मोठी कामे किंवा एका वेळी वेगवेगळी कामे करण्याची शक्ती वाढू लागते.
४. त्यापुढची पायरी म्हणजे गटामध्ये असताना नवे काहीतरी करुन पाहण्याचे प्रसंग वाढल्याचा अनुभव येतो.
५. पाचवी पायरी म्हणजे काम करताना कशाकशाचे भान ठेवले पाहिजे याची आपली जाणीव वाढते. गटाने काम करताना सर्वांनी नियमांचे पालन करायचा प्रयत्न करावा लागतोच पण या प्रयत्नात ज्यांना पुरेसे यश त्या वेळी आलेले नसते त्यांच्याशी असलेले सहकारीपणाचे व स्नेहाचे नातेही आपण सांभाळायला लागतो.
६. हे जमू लागले की गटातले सर्वजण परस्परांना सहज-उत्स्फूर्त-सहकार्य करायला लागतात. त्यावेळी गट अधिक जाणीवपूर्वक गटाबाहेरच्या मोठ्या समाजातील व्यक्तींसाठी काम करायला लागतो.
या एवढ्या पायऱ्या काही जणांना सहा महिन्यात जमतील. काही जणांना यासाठी दहा वर्षेही लागतील. सहावी पायरी गाठली की आपण संघटित व्हायला शिकलो आणि इतरांना संघटित करायची शक्ती ही आपल्यामध्ये आली.
(कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रातील काही भाग : सौर श्रावण २५ शके १९३०, दि. १६ ऑगस्ट २००८)
*****************************************************************************************************************
सामूहिक संकल्प
- उद्याच्या भारताने भौतिक प्रगती साधून एक संपन्न व अग्रगण्य राष्ट्र बनावे, यासाठी आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास करू.
- समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी आणि वीज पोचावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- विविध जातींचे, संप्रदायांचे आणि भाषांचे सामाजिक गट प्रेमाने एकत्र येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- वैयक्तिक आग्रहामुळे कुटुंब, गट किंवा संस्था मोडली जाणार नाही याचे भान आम्ही ठेवू.
- भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भारताने जगाचे नेतृत्व करावे हे आपणा सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही वैयक्तिक व सामूहिकरित्या मन:पूर्वक साधना करू.
व्यक्तिगत संकल्प
- माझ्या रोजच्या दिनक्रमात मी काही मिनिटे घरच्या स्वच्छतेबरोबर परिसराच्या स्वच्छतेसाठी लक्ष घालीन.
- मी प्रत्येक आठवड्यात काही वेळ माझ्या कुटुंबापलीकडील व्यक्तींना आवश्यक ती मदत करण्यासाठी वापरेन.
- मला समजलेले चांगले विचार आणि मला पटलेली चांगली कामे मी इतरांना समजावून आणि पटवून द्यायचा प्रयत्न करीन.
- मी दर महिन्यातून एकदा समाजातील विकासाची कामे जाणून घेण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी काही वेळ देईन.
- माझ्या वार्षिक उत्पन्नाचा ठराविक हिस्सा मी गरजू व्यक्ती, कुटुंबे किंवा संस्थांसाठी देत जाईन.
************************************************************************************************************