३. देशसेवेची सोपी रूपे

प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे देशसेवा करायची तर त्याचे चार भाग आहेत. पहिला भाग आहे समाजाला अनुकूल बनण्याचा, दुसरा भाग आहे समाजाला अनुकूल बनविण्याचा, तिसरा भाग आहे संघटित होण्याचा व संघटित करण्याचा आणि चौथा भाग आहे समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचा.

समाजात राहत असताना सगळ्यांनाच काही स्वयं-अनुशासन पाळावे लागते. सर्वांचे हित करण्यामध्ये आपण परतंत्र आहोत, म्हणजेच आपले वागणे इतरांची सोय वाढेल असे असले पाहिजे. ते सुद्धा कोर्टाच्या किंवा पोलिसांच्या भीतीने नाही तर तसे वागणे योग्य आहे हे मनोमन पटले आहे म्हणून. अशा वागण्याला स्वयं-अनुशासन म्हणतात. पापाला किंवा शिक्षेला भिणारा माणूस म्हणून नाही तर सुजाण नागरिक म्हणून तसे वागायचे असते. सर्वांना समजायला सोपा असा हा भाग, पण त्याप्रमाणे नेहमी वागायला निश्चयाचे, संकल्पांचे, प्रतिज्ञेचे बळ लागते.

विद्याव्रत संस्काराच्या वेळी अनेक विद्यार्थी व प्रथम प्रतिज्ञा घेणारे अनेकजण अर्चनेचे संकल्प म्हणून पुढे दिल्याप्रमाणे संकल्प करतात.

            १. वाहतुकीचे नियम पाळीन

            २. रांग असेल तिथे रांगेत उभे राहून क्रम आल्यावर काम करीन

            ३. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सूचना पाळीन

            ४. मतदान करीन

            ५. कर वेळच्या वेळी भरीन

            ६. सार्वजनिक सुविधा व मालमत्ता व्यवस्थित वापरीन

            ७. ऊर्जा, पाणी यांची बचत करीन

            ८. पर्यावरणाची काळजी घेईन

            ९. प्रामाणिकपणे आणि सचोटीने वागेन

            १०. टंचाई असलेल्या गोष्टींचे वाटप चालू असताना माझ्या वाट्याला येईल तेवढेच घेईन.

असे वागणे सर्वांना सहज झाले तर यात काही राष्ट्र-सेवा आहे असे वाटणार नाही. पण आज अनेकांना हेच सुचते कारण हे ही दुर्मिळ दृश्य आहे. प्रबोधिनीचे काम करणाऱ्यांना याच्या कितीतरी पुढे जायचे आहे. पण प्रबोधिनीद्वारे ज्यांना राष्ट्रसेवेच्या कर्तव्याची जाणीव झाली आहे, ते बहुतेक अशा संकल्पांनी सुरुवात करतात.

(कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रातील काही भाग : सौर वैशाख २५ शके १९३०, दि. १५ मे २००८)

**************************************************************************************************************