२. इतरांचा विचार आणि रोजची उपासना

ज्येष्ठ महिन्याच्या चिंतनात विद्यार्थि-दशा संपल्यानंतर प्रौढ सदस्यांच्या व्यावहारिक आयुष्यात आठ व्रते घेण्यासारखी आहेत असे म्हटले होते. त्यापैकी पहिल्या सहा व्रतांमुळे आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, सततची प्रगती व प्रतिभा हे गुण वाढू शकतील असे ही म्हटले होते. सातवे व्रत – ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ असे होते. त्यामुळे आपल्या मनातील राष्ट्राची कल्पना स्पष्ट होत जाते.

            महाराष्ट्रात पसायदान सगळ्यांनी ऐकलेले-म्हटलेले असते. ती विश्वात्मक देवाला प्रार्थना आहे. विश्वात्मक म्हणजे सगळे विश्व हीच ज्याची मूर्ती आहे, सगळ्या विश्वातच जो प्रतिष्ठापित झालेला आहे असा देव. या देवाला प्रार्थना केली आहे की सर्व विश्व स्वधर्मसूर्य पाहू दे. सर्व विश्व म्हणजे विश्वातील सर्व माणसे. ‘स्वधर्मसूर्य पाहो’ म्हणजे आपल्यातही देवाची प्रतिष्ठापना झाली आहे हे कळण्यासाठी ‘कसे जगायला, वागायला हवे, काय करायला हवे हे कळो’. असे कळण्यासाठी इतरांमध्ये प्रतिष्ठापित असलेला देव पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी ‘इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ हे व्रत घ्यावे लागते. विश्वात्मक देव कळण्यासाठी आधी राष्ट्रात्मक देव कळावा लागतो. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हे कळावे लागते. आपला देश, त्यात राहणारे लोक, आणि त्या लोकांनी निर्माण केलेली जीवनपद्धती, संस्कृती आणि धर्म हे सर्व मिळून राष्ट्र होते.

            लोकांच्या हिताचा विचार करत सर्व कामे सुरू केली की राष्ट्र समजायला सुरुवात होते. प्रथम जीवनपद्धती समजू लागते. आपण स्वतः व इतर सर्व लोक मिळूनच ती जीवनपद्धती घडवत असतो. जीवनपद्धतीतील काही गोष्टी सहज बदलता येतात. काही कितीही प्रयत्न केले तरी चिवटपणे टिकून राहतात. जीवनपद्धतीतले  चिवटपणे टिकून राहणारे काय आहे हे लक्षात यायला लागले म्हणजे आपल्या समाजाची संस्कृती काय आहे हे समाजयला लागते. संस्कृतीमधल्या गोष्टी अशा चिवटपणे का टिकून राहतात याचा विचार सुरू झाला की धर्म काय आहे हे हळूहळू समजायला लागते. लोक, जीवनपद्धती, संस्कृती आणि धर्म या सगळ्याची जाणीव आपल्याला झाली की राष्ट्र सुद्धा देवाचे एक रूप आहे हे कळते.

            मातृभूमी हे दैवत, समाज हे दैवत, राष्ट्र हे दैवत, राष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती देखील देवाचे रूप हे ज्यांना कळले, त्यांनी घरी येणारा प्रत्येक अतिथी हा अतिथीदेव, शिक्षक हे आचार्यदेव, आई-वडील हे मातृदेव-पितृदेव असे मानण्याची संस्कृती निर्माण केली. ज्यांना हे कळले, त्यांना ते उपासनेतून कळले. आपण ही ते स्वतः अनुभव घेऊन जाणून घ्यावे, म्हणून ‘रोज उपासना झालीच पाहिजे’ हे आठवे व्रत घ्यायचे. आई, वडील, शिक्षक, अतिथी, सर्व व्यक्ती, मातृभूमी, राष्ट्र या सर्व देवाच्या मूर्ती असे पाहण्याची संस्कृती हिंदुस्थानातच निर्माण झाली. म्हणून इथे राहणार्‍या लोकांचे राष्ट्र हे हिंदुराष्ट्र. आपण हे केवळ श्रद्धेने न मानता श्रद्धा अधिक अनुभवाच्या आधारे मानावे या साठी ‘रोज उपासना करण्याचे’ व्रत घ्यायला हवे.

******************************************************************************************************************

1 : दि. 15 जुलै 1962 ला पुण्यातील शिक्षण-तज्ञांची सभा भरवून त्या सभेत कै. आप्पांनी ज्ञान प्रबोधिनी स्थापन करण्याचा ठराव संमत करून घेतला. कायदेशीर दृष्ट्या त्या दिवशी ज्ञान प्रबोधिनी या संस्थेचा प्रारंभ झाला. दि. 8 ऑगस्ट 1962 ला प्रबोधिनीतील अध्यापनाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष काम ज्या दिवशी सुरू झाले तो दिवस आपण आपल्या कामाचा वर्धापन-दिन मानतो.