कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज भासणारे मतभेद ५० वर्षांनी नाहीसे झालेले असतील असेही त्यांनी म्हणले आहे. हे त्यांचे उद्गार १९८२ सालचे आहेत. त्याला आज ३३ वर्षे झाली. भविष्यकाळात काय होऊ शकेल हे विचारांनी आणि अनुभवांनी आलेल्या दूरदृष्टीने कळणे यालाच द्रष्टेपण असे म्हणतात. कै. आप्पा असे द्रष्टे होते. प्रबोधिनीतून अनेक द्रष्टे-चिंतक-नवयुग निर्माते घडावेत असे त्यांचे स्वप्न होते. नवीन वर्षाच्या सुरुवातील आज चालू झालेले वर्ष आणि पुढील अनेक वर्षे कशी जावीत याची स्वप्ने बघायला आपण शिकूया.
कै. आप्पांनी हिंदुत्वाच्या ज्या दोन परंपरा सांगितल्या त्यांचे दोन प्रतिनिधी गांधीजी व डॉ. हेडगेवार यांची १९३६ साली वर्ध्याला भेट झाली होती. एका दिवशी सकाळी सहा वाजता गांधीजी त्यांच्या निवासस्थानाजवळच्या मैदानावर चाललेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट द्यायला गेले. जवळ जवळ दीड तास त्यांनी शिबिराचा कार्यक्रम व व्यवस्था समजून घेतल्या व तेथील जातीविरहित वातावरण पाहून गांधीजी अतिशय प्रभावित झाले. त्यावेळी डॉ. हेडगेवार शिबिरात नव्हते, ते संध्याकाळी पोहोचले. गांधीजी शिबिरात येऊन गेल्याचे कळल्यावर त्यांनी गांधीजींना भेटायची इच्छा व्यक्त केली. गांधीजींच्या सचिवाकडून दुसऱ्या दिवशी रात्री अर्धा तास वेळ मिळाला. दुसऱ्या दिवशीची भेट अर्ध्या तासाच्या ऐवजी दीड तास चालली.
या भेटीमध्ये डॉ. हेडगेवारांनी गांधीजींना सांगितले की ते काही काल काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते. नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी स्वयंसेवक दलाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. मग गांधीजीनी त्यांना विचारले की आता तुम्ही कॉंग्रेस पक्षाचे काही काम करता का? डॉ. हेडगेवार म्हणाले की ते काम समाधानकारक वाटले नाही म्हणूनच आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करायचे ठरवले. महात्मा गांधीनी विचारले की कॉंग्रेसच्या कामात काय चुका राहात आहेत. डॉक्टर म्हणाले की ते काम चुकीचे नाही पण मला ते अपुरे वाटते. तिथे फक्त आत्ता ब्रिटिशांची सत्ता घालवण्याचाच विचार होतो आहे. देश स्वतंत्र झाल्यावर राष्ट्रभक्त, शिस्तबद्ध, भेदभाव न मानणाऱ्या, परस्परांशी बंधुभावाने वागणाऱ्या लोकांचा समाज असेल तरच स्वातंत्र्य टिकेल असे मला वाटते. असे लोक घडवण्याचे काम आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुरू केले आहे. गांधीजींनी विचारले की ते काम करून तुम्हाला कॉंग्रेसचे काम करता येणार नाही का? डॉ. हेडगेवार म्हणाले की असं काम मी करू लागलो तर संघाच्या स्वयंसेवकांनी काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी स्वयंसेवक दल म्हणून सतरंज्या घालणे, पाहुण्यांची निवास-भोजन व्यवस्था करणे अशीच कामे करायची अपेक्षा राहील. संघाच्या स्वयंसेवकांनी एखाद्या पक्षाचे स्वयंसेवक म्हणून काम न करता देशाचे स्वयंसेवक म्हणून काम करायला शिकावे असे आम्हाला वाटते. यावर गांधीजींनी तुमचे म्हणणे योग्यच आहे आणि तुम्ही करत आहात ते काम आवश्यक आहे असे म्हणून त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
रामदासांच्या उपदेशानुसार कालानुरूप भर घालून डॉ. हेडगेवारांनी संघटनाचे काम सुरू केले. दयानंदांचा उपदेश, त्याच्यात कालानुरूप भर घालून गांधीजींनी स्वातंत्र्य प्राप्ती आणि समाज सुधारणेच्या कामासाठी अंमलात आणले. रामदास आणि दयानंद हे प्रबोधिनीचे आदर्श राष्ट्रपुरुष आहेतच. पण विवेकानंदांचे विचार आजच्या काळाशी जास्त सुसंगत आहेत.
व्रतपालन, विधायक कार्यक्रम आणि संघटनेतील शिस्तपालन हे राष्ट्रघडणीसाठी आवश्यक आहे असे गांधीजींनी म्हणले होते. डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रभक्ती, बंधुभाव आणि देशव्यापी संघटन यांचे महत्त्व सांगितले. विवेकानंदानी या सर्व गोष्टी सांगितल्याच पण त्याबरोबर अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची आवश्यकता सांगितली. ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ या त्यांच्या विचारांच्या संकलनामध्ये हे सगळे विषय आलेले आहेत. त्याबरोबर पराक्रम आणि जग जिंकण्याची आकांक्षाही त्यांनी मांडली आहे.
संघटनापेक्षा नेतृत्वविकसनही हे आणखी अवघड आहे. विवेकानंदांनी असे म्हणले आहे, “सर्व लोकांमध्ये आढळून येणाऱ्या आंतरिक एकतेच्या जोरावर विविध आणि परस्पर भिन्न स्वभावांच्या लोकांना एकत्र गोवता येणे यामध्ये नेत्याची खरी कसोटी आहे. असा नेता एकाच आयुष्यात तयार होत नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात.” असे विवेकानंदांचे म्हणणे आहे. प्रबोधिनीचे म्हणणे आहे की याच जन्मात संघटन आणि नेतृत्वविकसन हे दोन्ही जमले पाहिजे. विवेकानंदांनी प्रतिभाविकसनाबद्दल जाणीवपूर्वक काही म्हणल्याचे आढळत नाही. प्रबोधिनीमध्ये सर्वांना नवीन सुचले पाहिजे असे आपण म्हणतो.
‘परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हणजे एक प्रार्थना आहे. प्रार्थनेचा परिणाम आपण त्यानुसार कृती करू लागल्यावर दिसू लागतो. संघटना करणे, पराक्रमाची कृती करणे, स्वतःमधील आणि इतरांमधील चैतन्यशक्तीची सतत जाणीव ठेवणे आणि अध्यात्मतत्त्वज्ञानाने जग जिंकणे हे जमू लागले म्हणजे परब्रह्मशक्तीचे स्फुरण सुरू झाले, असे कै. आप्पांनी म्हटले आहे. प्रथम प्रतिज्ञा घेणे म्हणजे संघटना, पराक्रम, स्वतःमधील चैतन्याची जाणीव आणि विश्वविजय यासाठी जगायची प्रतिज्ञा घेणे. प्रथम प्रतिज्ञा घेणे म्हणजे विवेकानंदांचा वारसा सांगणे. गांधीजी आणि डॉ. हेडगेवार समजून घेऊन त्यांच्या खांद्यावर उभे राहून त्यांच्याहूनही पुढचे काम करण्याचा संकल्प करणे.
(सौर फाल्गुन ३० शके १९३६, दि. २१ मार्च २०१५ रोजीच्या युवक विभागाच्या प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रमातील भाषण)
******************************************************************************************************************