१७. सश्रद्ध समर्पण

प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव घेऊन, गीता, रामायण इत्यादी पवित्र ग्रंथ हातात धरून, सद्गुरुचे अथवा अन्य पूजनीय महापुरुषाचे किंवा महासतीचे चित्र समोर ठेवून किंवा आपल्याच छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली जाते. तात्पर्य असे की, आपणास जे काही पवित्र, आदरणीय, वंदनीय, परमप्रिय किंवा सर्वश्रेष्ठ वाटते त्याला स्मरून आपला निश्चय उद्घोषित करणे म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रतिज्ञा नेहमी स्पष्ट असावी. ती गुळमुळीत नसावी. तीत लपंडाव नसावा. मी होईल तितके करीन, जमेल तसे पाहीन, माझ्या शक्तीप्रमाणे अथवा बुद्धीप्रमाणे जसे साधेल तसे करीन – अशा पळवाटा प्रतिज्ञेत नसाव्यात. माझी प्रकृती ठीक राहिली तर, दैवाने साथ दिली तर, समाजाने विरोध न केला तर, अशी जरतारी भाषा प्रतिज्ञेत अभिप्रेत नाही.

प्रतिज्ञा म्हणजे एखादे श्रेष्ठ कार्य, आपल्या सर्वशक्तींनिशी प्राणपणाने आणि जिद्दीने करण्याचा निश्यय. प्रतिज्ञा म्हणजे स्वतःला झोकून देणे होय. प्रतिज्ञा म्हणजे मोठ्या आणि स्पष्ट अक्षरात लिहिलेला ध्येयाचा घोषफलकच होय. प्रतिज्ञा म्हणजे अन्य उद्दिष्टांकडे नेणार्‍या आडवाटा आणि चोरवाटा बंद करून एकाच मोठ्या उद्दिष्टाकडे नेणारा राजमार्ग चोखाळणे होय. होडीची सगळी छिद्रे बंद करून आणि भेगा बुजवून तिच्या प्रवासाला तीव्र गती देणारे शुभ्र आणि उंच शीड उभारणे म्हणजे प्रतिज्ञा.

            मनातल्या मनात केलेला निश्चय म्हणजे काही प्रतिज्ञा नव्हे. अनेक चांगले विचार मनुष्याच्या मनात येतात आणि जातात. अनेक प्रकारच्या महत्त्वाकांक्षा माणूस नित्य बोलूनही दाखवितो, पण जोपर्यंत त्याच्या या कल्पनांना निश्चयात्मकता येत नाही, तोपर्यंत ते सर्व व्यर्थ ठरते. ‘उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथाः’ असे वचन प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ बहुधा आर्थिक दारिद्य्राच्या संदर्भातच घेतला जातो. ज्याला निश्चय करता येत नाही त्याला आयुष्यात दाखवण्यासारखे काम करता येत नाही आणि ज्या मनुष्याजवळ कर्तृत्व नसते त्यालाच अर्थदारिद्य्र येते. ‘निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ ॥’ हा नियम जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उपयोगी पडणारा आहे. निश्चयात्मक बुद्धी जागृत करणे हेच समर्थ रामदासांचे ही जीवितकार्य होते.

छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेल्या लहान-सहान निश्चयाला कोणी प्रतिज्ञा म्हणत नाहीत. स्थिरचित्ताने विचारपूर्वक केलेला दृढनिश्चय जेव्हा शब्दरूप घेतो किंबहुना मंत्ररूप घेतो तेव्हा त्याला प्रतिज्ञा असे म्हणतात. प्रतिज्ञेचा आशय व्यापक, विशाल, शुद्ध, पवित्र, समाजोपकारक आणि आत्मोन्नतिसाधक असावा लागतो.  प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमंदिरावरील पताकाच समजावी. ती दुरून नित्य दिसते आणि नवनवीन प्रेरणा देते. ती वारंवार बजावते –‘चल पुढे, चल पुढे. तुला तेथे पोहोचावयाचे आहे. वाटेल तिकडे भटकू नकोस.’

(जीवनमूल्ये : भाग ३ – लेखक : प्र. ग. सहस्रबुद्धे या पुस्तकातून संपादित)

****************************************************************************************************************