प्रथम प्रतिज्ञेनंतरचे तुमचे मनोगत मिळाले. आजपर्यंत बहुतेक वेळा प्रतिज्ञा घेणाऱ्यांशी प्रतिज्ञाग्रहणापूर्वी काही ना काही चर्चा होत असे. प्रतिज्ञेसंबंधी जे सर्वसाधारण प्रश्न प्रतिज्ञा घेणाऱ्यांच्या मनात असतात, ते अनेकांशी बोलण्यातून लक्षात आलेले. त्याच्या आधारेच प्रतिज्ञेसंबंधी प्रश्नोत्तरे तयार केली होती.
तुमच्या पत्रामध्ये तुम्ही काय काम करायचे व कसे करायचे याबाबतचे तुमचे संकल्प कमी-अधिक प्रमाणात दिलेले आहेत. प्रतिज्ञा घेतल्यानंतर प्रतिज्ञेचे स्मरण सतत राहावे, यासाठी गेल्या वर्षी प्रतिज्ञा ग्रहणाची एक वेगळी उपासना प्रयोग म्हणून तयार केली होती. त्या उपासनेमध्ये काही श्लोक व प्रबोधन गीतांमधील काही पद्ये यांचा समावेश केला होता. त्यातले एक पद्य प्रथम प्रतिज्ञा घेणाऱ्यांसाठीच लिहिले होते. ते पद्य म्हणजे आपण काय करावे, याची छोटीशी यादीच आहे. या पद्यामध्ये सुरुवातीला दैनंदिन उपासनेचे व्रत दृढपणे चालवणे ही आपली साधना असली पाहिजे, असे म्हटले आहे. सर्वांच्या हिताच्या गोष्टींसाठी स्वतःच्या आवडीच्या गोष्टी सहजपणे बाजूला ठेवण्याची आपल्या देशातील तेजस्वी परंपरा पुढे चालवली पाहिजे, असे त्यापुढे म्हणले आहे. प्रासंगिक व्यक्तिगत पराक्रमापेक्षा सातत्याने प्रगतीशील सामूहिक कृती करणे व त्यासाठी आपली स्नेहशक्ती वाढविणे असे त्यापुढचे काम सांगितले आहे. आपली सर्व शक्ती आणि बुद्धी वापरून आपण आपल्याला केवळ हव्याहव्याश्या वाटतात म्हणून अनेक गोष्टी गोळा करतो. तसेच आपल्या व सर्वांच्या उपयोगाच्या आणि हिताच्या अनेक गोष्टी आपण जोडतो. सर्व आवडणाऱ्या किंवा हिताच्या गोष्टी आपण मातृभूमीकडूनच घेतलेल्या आहेत व त्या शेवटी तिलाच परत द्यायच्या आहेत, अशी भावना मनात पक्की करत जाणे हे चौथे व शेवटचे काम.
तुमच्या पत्रात तुम्ही कमी अधिक प्रमाणात वरील चार कामांमध्ये बसतील असेच संकल्प केले आहेत. ‘शुभ्र सुगंधित पुष्पे आणिक शुभ सुगंधित मने’ या पद्याचा संदर्भ मी वरती घेतला होता. तुमच्या प्रतिज्ञेचे स्मरण अखंड राहण्यासाठी तुम्ही या पद्यावर वारंवार विचार केलात तर आपोआपच अर्थ स्पष्ट होत जाईल. प्रबोधिनीमध्ये यापेक्षा अधिक नेमक्या सूचना आपण प्रतिज्ञाग्रहणानंतर देत नाही. प्रत्येकाला जसा समजेल तसा अर्थ लावत त्याने स्वतःच आपल्या प्रतिज्ञेशी जास्तीत जास्त सुसंगत कृती करत राहण्याचा प्रयत्न करायचा असतो. मी व्यक्तिशः मात्र याला अधिक नेमकेपणा आणायचा प्रयत्न करतो आहे. माझा स्वतःशीच चाललेला विचार तुमच्यासमोर मांडतो आहे.
राष्ट्रसेवेचे व्रत म्हणजे स्वदेशीचे व्रत. रुग्णसेवा करताना रुग्णाच्या गरजा सगळ्यात प्राधान्याच्या मानून आपण त्याप्रमाणे आपले वागणे बदलतो. देशसेवा करतानाही देशाची गरज प्राधान्याची मानली पाहिजे. देशाची परंपरा टिकवणे आणि त्या परंपरेत भर घालणे हा देशाचा प्राण असतो. देशातील गरीब, अडाणी, शोषित, वंचित यांचा आत्मसन्मान वाढेल असे काम करण्याने देशाचे शरीर सुदृढ होते. देशाचे शरीर सुदृढ करण्याचे काम आपल्या क्षमतेप्रमाणे करावे. परंतु देशाची परंपरा राखण्याचे काम प्रत्येक देशसेवकाने केलेच पाहिजे. स्वदेशीचे व्रत म्हणजे केवळ स्वदेशी वस्तू वापरण्याचे व्रत नाही. भारतीय वेष, भारतीय भाषा, भारतीय लिपी, भारतीय कालगणना, भारतीय गृहरचना, भारतीय पद्धतीचे उत्सव, भारतीय पद्धतीने सुख-दुःखाची अभिव्यक्ती (शुभेच्छा, शोकसमाचार इ.), भारतीय पद्धतीने अभिवादन, भारतीय पद्धतीने संबोधन, भारतीय कला, संगीत, साहित्य, भारतीय इतिहास, या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनात जास्तीत जास्त अंगीकार करणे, याला मी स्वदेशीचे व्रत म्हणतो. स्वदेशी वस्तू वापरणे हा त्याचा एक छोटासा भाग आहे. प्रथम प्रतिज्ञा घेणाऱ्याने असे हे स्वदेशीचे सर्वसमावेशक व्रत पाळले तर आधीच्या पद्यात सांगितलेल्या गोष्टी सहजपणे आचरणात आणता येतील.
(एका प्रतिज्ञित कार्यकर्त्याला लिहिलेले पत्र, सौर चैत्र २१ शके १९२२, दि. १० एप्रिल २०००)
********************************************************************************************************************