राष्ट्र म्हणजे फक्त काही लक्ष चौरस किलोमीटरची जमीन नाही. तिथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचे आदर्श हे सगळे मिळून राष्ट्र बनते. हिमनगाचा थोडासा भाग समुद्राच्या वर असतो. त्यापेक्षा बराच मोठा भाग समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपलेला असतो. तसे राष्ट्रातील लोक किंवा समाज आपल्याला दिसणारे असतात. त्या समाजाच्या पोटात जितके आपण शिरू तितकी त्या समाजाची संस्कृती आणि आदर्श आपल्याला कळत जातात. इतर देशांतील समाज कळायला अनेक वर्षे जावी लागतात. पण आपण आपल्या समाजाचे भागच असतो. या समाजातील दारिद्र्य, विषमता आणि फुटीरता या प्रश्नांवर उपाय शोधता शोधता आणि या समाजाचे सामर्थ्य, समृद्धी आणि संघटना वाढवता वाढवता या समाजाची संस्कृती आणि आदर्श हे देखील आपल्याला समजायला लागतात. राष्ट्रसेवा म्हणजे सुरुवातीला समाजाची सेवा, मग संस्कृतीची आणि मग धर्माची सेवा.
(सौर फाल्गुन २७ शके १९३७, दि. १६ मार्च २०१६ रोजीच्या
प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रमातील भाषणाचा काही भाग)
*************************************************************************************************************