- प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा केवळ सत्कार्याची किंवा नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची अशी न करता राष्ट्रसेवेचे व्रत घेण्याची का केली आहे ?
आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य निश्चित करावे लागते. कौटुंबिक, स्थानिक किंवा प्रांतिक विचार करून पुरत नाही. तेवढाच विचार केला तर राष्ट्र दुबळे राहते, असा अनुभव आहे. आपली वैभवशाली संस्कृती केवळ आपल्यात राष्ट्रभावना न उरल्याने बाह्य आक्रमणांमुळे लयाला गेली. प्रबळ राष्ट्रभावना असलेले लोक अधिक जागरूक नागरिक बनतात असे दिसते. आजच्या परिभाषेतील civil society, संकटकाळात उफाळून येणारी धर्मनिरपेक्ष देशभावना व एरवीची सांस्कृतिक राष्ट्रभावना यात मूलभूत फरक नाही. व्यक्ती व समाजाचे नाते दर्शवणाऱ्या त्या विविध अवस्था आहेत. राष्ट्रहिताचा विचार बाजूला ठेवून सगळ्या जगाचा विचार करणे हे आज परिणामकारक व व्यवहार्य नाही. केवळ सत्कार्य किंवा नागरिक म्हणून पार पाडण्याची कर्तव्ये असे म्हटले तर त्यात कौटुंबिकपासून जागतिकपर्यंत सर्वच पातळ्यांवर विचार करता येतो. आपल्या विचाराला नेमकेपणा यावा म्हणून व आज राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याची गरज आहे म्हणून प्रबोधिनीच्या प्रथम प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवेला प्राधान्य दिले आहे.
- राष्ट्रसेवा काय करायची याचा उल्लेख प्रतिज्ञेमध्ये का नाही ?
आपले स्वत:चे शिक्षण, उपजीविकेसाठी करावे लागणारे काम आणि कौटुंबिक जबाबदार्या यातून आपण किती वेळ राष्ट्रसेवेच्या कामासाठी म्हणून वेगळा काढू शकू हे प्रत्येकाला स्वत:ला ठरवावे लागते. त्या वेळात कोणते काम करता येईल हे स्वत:लाच शोधावे लागते. काय काम करायचे हे स्वत:च ठरवायचे असल्यामुळे अनेकांबरोबर घेण्याच्या प्रतिज्ञेत त्याचा उल्लेख नाही. प्रत्येकाने निवडलेले काम वेगळे असू शकते. ते काम काळानुसार बदलू शकते. या लवचिकतेमुळे प्रत्यक्ष कामाच्या तपशिलाचा प्रतिज्ञेत उल्लेख नाही. प्रतिज्ञा करताना आपण स्वत: काय काम करणार हे प्रत्येक जण लिहून ठेवू शकतो किंवा सांगू शकतो.
***************************************************************************************************************
प्रथम प्रतिज्ञेपूर्वी किंवा प्रतिज्ञा झाल्यावर आवर्जून वाचावीत अशी पुस्तके
१) राष्ट्रद्रष्टे विवेकानंद, २) स्मृतीतुनी स्फुरो कृती,
३) विवेकानंदांची पत्रे, ४) सहा सोनेरी पाने, ५) राजा शिवछत्रपती
****************************************************************************************************************