१. व्रत म्हणजे काय?

आपले खाणे-पिणे, हिंडणे-फिरणे, व्यायाम, अभ्यास, दिनक्रम म्हणजेच आपले दिवसभराचे वेळापत्रक. त्यात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत या संबंधी आपणच काही नियम केले, ते नियम आग्रहाने पाळले म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात पाहिजे तसा चांगला बदल होतो. असा फार पूर्वीपासून अनेकांचा अनुभव आहे.

मी काही नियम स्वतः केले व पाळले, तर मला हवे तसे माझे व्यक्तिमत्त्व घडेल असा विश्वास आधी असावा लागतो. त्याही आधी मी प्रयत्न केले तर माझे व्यक्तिमत्त्व चांगले घडेल असा सकारात्मक विचार करावा लागतो. ज्यांनी ठरवून काही नियम पाळले व आपले व्यक्तिमत्त्व चांगले घडवले अशी उदाहरणे समोर असली तर सकारात्मक विचार करणे व आपल्यालाही जमेल असा विश्वास निर्माण होणे सोपे जाते.

खाणे-पिणे किंवा व्यायामासंबंधी नियम असतील तर काही दिवस नियम पाळल्यावर शारीरिक स्थितीतील बदल जाणवू लागतात. अभ्यासासंबंधी नियम असतील तर ते नियम पाळायला लागल्यावर स्मरणशक्ती, नवीन सुचणे, नवीन गोष्टी पटकन समजणे, असे बुद्धीत पडणारे फरक जाणवू लागतात. इतर नियमांच्या बाबतीतही आपले कौशल्य, ज्ञान, चपळता, तत्परता, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुण वाढत असल्याचे अनुभवला येते. पण हे सर्व नियम पाळत गेल्यावर एक महत्त्वाचा बदल जाणवतो, तो म्हणजे आपली इच्छाशक्ती, म्हणजे ठरलेले पार पडण्याची शक्ती, वाढते आहे. कोणताही सकारात्मक बदल आपोआप घडत नाही. बऱ्याचदा एका पाठोपाठ एक तीच कृती करत राहण्याने हळू हळू बदल होत जातो. ज्ञान काही मिनिटांमध्ये अथवा काही तासांमध्ये मिळवता येते. कौशल्येही प्रशिक्षण घेऊन शिकता येतात. त्यासाठी काही तास, काही दिवस खर्ची घालावे लागतात. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ज्यांना स्वतःची सर्व कौशल्ये आलटून पालटून व सहजपणे वापरता येतात, ते अधिक चांगल्या कार्यक्षमतेने कामे पार पाडू शकतात. कौशल्ये अथवा ज्ञान सतत वापरण्याच्या वृत्तीमुळे ही सहजता निर्माण होते. शिक्षण अथवा प्रशिक्षणाने ज्ञान व कौशल्यांमध्ये वाढ होत असते. मात्र वृत्तीतील बदल सतत सरावाने व इच्छापूर्वक कृती करत राहिल्यानेच होऊ शकतो. यासाठी स्वतःसाठी काही नियम स्वतः ठरवून घेतल्याचा उपयोग होतो.

असे स्वतःच्या बाबतीतले नियम स्वतः ठरवण्याला व्रत घेणे असे म्हणतात. आणि ठरवलेल्या नियमांप्रमाणे न कंटाळता वागण्याला व्रत पाळणे असे म्हणतात. भारतात अशी व्रत घेऊन ते पाळण्याची पद्धत हजारो वर्षांची आहे. ही व्रते मुख्यतः व्यक्तिगत स्वरूपाची असायची. महात्मा गांधीनी समाजासाठी काम करण्याची व्रते घेण्याची पद्धत सर्वप्रथम सुरू केली. समाजात टिकाऊ स्वरूपात चांगले बदल व्हायचे असतील तर त्यासाठी समाजात संघटना झाली पाहिजे. संघटना व्हायची असेल तर समाजात रचनात्मक काम करणाऱ्या संस्था पाहिजेत व त्या संस्थांचे नियम मनापासून पाळणारे कार्यकर्ते हवेत. आपल्या संस्थेचे नियम मनापासून पाळण्याची शक्ती कार्यकर्त्यांमध्ये येण्यासाठी त्यांनी काही व्रते घेतली पाहिजेत व ती नियमितपणे पाळली पाहिजेत. व्यक्तिशः व्रतपालन – त्यातून कार्यकर्ते घडणे – त्यांनी संस्थेचे नियम पाळणे – संस्थेद्वारे रचनात्मक काम करणे – त्यातून संघटना होणे – संघटनेमुळे समाजात बदल होणे, अशी व्यक्तीतील बदलापासून समाजातील बदलापर्यंतची साखळी गांधीजींनी मांडली. स्वातंत्र्यपूर्व काळात व्रतपालन ते रचनात्मक काम या पहिल्या चार टप्प्यांतून निर्माण होणारी शक्ती स्वातंत्र्य चळवळींसाठी वापरली गेल्याने, संघटना आणि समाजात टिकाऊ चांगले बदल होण्यासाठी ती वापरता आली नाही असे गांधीजींनीच म्हणून ठेवले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी रचनात्मक कामे केली. पण व्रतापालनाकडे त्यांनी पुरेसे लक्ष न दिल्याने संघटना होऊ शकली नाही. व्यक्ती आणि त्यांच्या पिढ्या बदलल्या तरी काम चालू राहण्यासाठी संघटना लागते. भौतिक किंवा व्यवस्थेतील बदल होण्यासाठी संस्थेचे नियम पाळणे पुरेसे असते. परंतु लोकांच्या विचारातच बदल होण्यासाठी लोकांसमोर तेच काम पुन्हा पुन्हा समोर येत राहायला पाहिजे. एकाच व्यक्तीने काम करत राहण्याला त्या व्यक्तीच्या कार्यक्षम आयुष्याची मर्यादा असते. मात्र ते काम व्रत म्हणून करणारे अनेक जण असलेली संघटना लागते. एकाने असो किंवा अनेकांनी काम करण्याच्या मुद्दा असो, एकेकाचे व्रतपालन आणि अनेकांची संघटना आवश्यक असते.

अशी संघटना करून देशाचे भौतिक व सांस्कृतिक रूप पालटण्यासाठी प्रबोधिनीने काम करायचे ठरवले असल्याने प्रबोधिनीमध्ये कार्यकर्ते होऊ इच्छिणाऱ्यांनी काही व्रते पाळावीत अशी प्रबोधिनीची अपेक्षा असते. प्रबोधिनीचे काम शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असल्याने विद्याव्रत संस्काराच्या वेळी विद्यार्थ्यांनी युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन, दैनंदिन उपासना, शिकणे-शिकवणे, गुरूंविषयी आदर व प्रेम आणि राष्ट्रअर्चना ही सहा व्रते घेऊन आपले व्यक्तिमत्त्व विकसन सुरू करावे अशी योजना आपण प्रबोधिनीत केली आहे.

विद्यार्थी दशा संपल्यावरही या व्रतांचे पालन करायचे असते. पण त्यानंतर लौकिक, व्यावहारिक जगात देशाचे रूप पालटण्याच्या हेतूने काम करताना आणखी काही व्रते घेतल्याचा उपयोग होतो. कार्यकर्त्याचा आत्मसन्मान टिकून राहिला तर तो समाजात काम करू शकतो. त्यासाठी १) ‘विनाश्रमाचे घेणार नाही’, हे व्रत त्याने घ्यावे लागते. आत्मसन्मानासाठी स्वावलंबनही आवश्यक असते. त्यासाठी २) ‘आपले काम दुसऱ्यावर नाही’ हे व्रत घ्यावे लागते. कार्यकर्ता कामात तत्पर असेल तर तो नवीन सहकाऱ्यांना आकर्षित करू शकतो आणि समाजातील धुरीणांचा विश्वास मिळवू शकतो. त्यासाठी ३) ‘आजचे काम उद्यावर नाही’ हे व्रत त्याने घ्यावे लागते. आजच्या युगात उत्तमता हे एक महत्त्वाचे मूल्य बनले आहे. उत्तमतेसाठी केवळ तत्परता पुरत नाही. उत्तम गुणवत्तेचे निकष स्वतः ठरवून आणि समाजमान्य कालसंगत निकष स्वीकारून त्या निकषांवर टिकेल असे काम करण्यासाठी ४) ‘गुणवत्तेत तडजोड नाही’ हे व्रत घ्यावे लागते.

गुणवत्ता आणि त्यातील उत्तमता याचे निकष सतत अधिकाची अपेक्षा करणारे असतात. उत्तमतेची निश्चित पातळी अनेकांनी गाठली की गुणवत्तेच्या पुढच्या टप्प्याची अपेक्षा होऊ लागते. आपली उत्तमता टिकवण्यासाठी ५) ‘कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे’, हे व्रत घेण्याची आवश्यकता असते. पुढे पुढे जात राहण्यासाठी फक्त संख्यात्मक वाढ करून पुरत नाही. गुणात्मक बदलही करावे लागतात. ‘इतरांपेक्षा जास्त’ पुरत नाही. ‘इतरांपेक्षा वेगळे’ ही लागते. त्यासाठी ६) ‘रोज नवीन सुचलेच पाहिजे’, असा स्वतःकडेच आग्रह धरण्याचे व्रत घ्यावे लागते. आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, त्यासाठी सततची प्रगती व प्रतिभा हे सर्व गुण त्यासाठीची व्रते घेऊन वाढतील. पण त्यांचा समाजाला म्हणजेच लोकांना उपयोग होण्यासाठी ७) ‘प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे’ हे बंधन स्वतःवर घालून घ्यावे लागते. म्हणजेच व्रत घ्यावे लागते. इतरांच्या हिताचा विचार, आपले हित त्यांच्याशी बांधले आहे म्हणून किंवा दयाबुद्धीनेही होऊ शकतो. तसा तो होऊ नये, सर्व लोकांचे हित होण्यासाठीच माझी शक्ती, युक्ती, बुद्धी मला मिळालेली आहे अशी स्वतःची वृत्ती बनावी यासाठी, ८) ‘रोज उपासना झालीच पाहिजे’ असे ही व्रत घ्यावे लागते.

अशी ही आठ व्रते घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रबोधिनीपण विकसित होऊ लागते. ही व्रते घेण्याचा संकल्प अनेकांसमोर करणे म्हणजे प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा घेणे. ही व्रते घेणे म्हणजेच राष्ट्रसेवेचे व्रत घेणे. सर्वसाधारण प्रबोधिनीपण विकसित होण्यासाठी घ्यायच्या आठ व्रतांपैकी पहिली सहा व्रते कोणत्याही देशातील कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्याला घ्यावी लागतील अशीच आहेत. शेवटची दोन व्रते चांगल्या रीतीने पाळण्यासाठी राष्ट्र म्हणजे काय व हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेतल्याचा उपयोग होतो.

(निवडक कार्यकर्त्यांसाठीचे चिंतन : सौर ज्येष्ठ १ शके १९४२, दि .२२ मे २०२०)

**************************************************************************************************************

प्रथम प्रतिज्ञा

चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणा-या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करते की, आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजेच आपले राष्ट्र यांची सेवा करण्याचे व्रत मी आज घेत आहे. हे व्रत मी आजन्म पाळीन.

*********************************************************************************************************************