चार प्रकारचे सदस्य
प्रबोधिनीमध्ये संगणक प्रणालीकार (कॉम्प्युटर प्रोग्रॅमर) एवढे एकच काम करणारे अजून तरी कोणी नाही. पण अनेक विभागांमध्ये गरजेनुसार संगणक प्रणाली तयार करून घ्यावी लागते. कल्पना करूया की अशांची नेहमीसाठी गरज निर्माण झाली व अनेक जण त्या प्रकारचे काम करू लागले. कोणतेही काम करणारे पुरेशा संख्येने आले की प्रबोधिनीत त्यांचे काम करण्याचे चार प्रकार जाणवायला लागतात. तसेच या संगणक प्रणालीकारांचेही चार प्रकार जाणवायला लागले.
पहिला प्रकार, हे काम जे हौसेने काम करता करता शिकले आहेत, व जिथे कुठे आव्हानात्मक काम मिळेल तिथे जातात, त्यांचा. ते एकदा आले आणि कामाला लागले, की काम एका टप्प्यापर्यंत नेऊन किंवा संपवूनच जातात. पण दुसऱ्या दिवशी आणखी कुठे बोलावणे आले की तिकडे जातात. पुन्हा त्यांना बोलावून आणायचे म्हणजे पाठपुराव्याची तपश्चर्याच करावी लागते.
दुसरा प्रकार, हे काम जे बाहेर कुठेतरी नियमितपणे करत असतात, व नंतर फुरसतीच्या वेळात प्रबोधिनीत येऊन काम करतात, त्यांचा. दिवसातले एक-दोन तास, किंवा आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस, ते नेमाने येतात आणि स्वीकारलेली जबाबदारी, सावकाश परंतु निश्चितपणे पूर्ण करतात.
तिसरा प्रकार, प्रबोधिनीतच पूर्ण वेळ येऊन प्रणालीकार म्हणून काम करणाऱ्यांचा. हे सदस्य नियमितपणेे येतात. नेमून दिलेले काम उत्तम करतात. काही नवीन शिकायला सांगितले तर शिकतात. थोडे आव्हानात्मक काम दिले तर स्वीकारतात. चार इतर कामेही उत्सुकता म्हणून करून पाहतात. त्यांची कामाची वेळ संपली की घरी जातात.
चौथा प्रकार कधीही, केव्हाही पाहिले, तर नवीन प्रणाली तयार करत, किंवा जुनी प्रणाली सुधारत बसलेल्यांचा. त्यांना वेळेची, कामाच्या जागेची, कामाच्या स्वरूपाची काळजी नसते. थोडे पहिल्या प्रकारासारखेच. परंतु पहिल्या प्रकारचे सर्वसंचारी असतात. त्यातला थोडा वेळ प्रबोधिनीच्या वाट्याला येतो. चौथ्या प्रकारचे प्रबोधिनीतच संचार करत असतात.
पहिले दोन प्रकार तर मी प्रबोधिनीत अनुभवले आहेतच. पुढचे दोन प्रकार तशा प्रकारचे काम वाढले की भेटतील याची खात्री आहे.
चारही प्रकारचे सदस्य कार्यकर्तेच
या चार प्रकारच्या संगणक प्रणालीकारांमध्ये प्रबोधिनीच्या कार्यशैलीप्रमाणे सवेतन-निर्वेतन, अंशकाल-पूर्णकाल-सर्वकाल, स्वयंसेवी-नियुक्त, प्रासंगिक-नियमित, हौशी-व्यावसायिक, व्रती-व्यवहारी, शिकाऊ-अनुभवी-निवृत्तीनंतर काम करणारे, अशा सर्व रंगछटांचे सदस्य सापडतील. अशा सर्वांनी परस्परांना प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणूनच संबोधावे असे मला वाटते.
माझे एक मित्र ग्रामीण कामातला अनुभव म्हणून सांगतात की ‘गंप्या’ला ‘गणपतराव’ म्हटले की तो शेफारून बसतो व करायचा ते कामही करेनासा होतो. मला वाटते की हा ‘गणपतराव’ म्हणण्याचा परिणाम नसून त्याने जे कोणी ‘गणपतराव’ पाहिलेले असतात त्यांचे तो वरवरचे अनुकरण करायला लागतो म्हणून तसे होते. दुसरे म्हणजे ‘गंप्या’ने कोणती कामे करायची आणि ‘गणपतराव’ कोणती कामे करायची याची प्रतवारी नकळत अनेकांच्या मनात तयार झालेली असते. त्याचाही परिणाम होतो. सर्वजण ‘गणपतराव’च आहेत. सर्व गणपतरावांनी कोणतेही काम करायला तयार असले पाहिजे. ही अपेक्षा ग्रामीण भागातील व्यक्तींचा आत्मसन्मान वाढवणारी व त्याचवेळी त्यांना श्रमप्रतिष्ठा शिकवणारी आहे. प्रबोधिनीतील सर्व सदस्य हे देखील या भूमिकेतून कार्यकर्ते आहेत.
कार्यकर्ता म्हणताना जो आदर, बहुमान परस्परांना द्यायचा, तो सर्वांनी सकारात्मक भूमिकेतून द्यावा. कुठे वागण्यात काही कमी पडत असले तर ते भरून निघेल या अपेक्षेने द्यावा. कोण, काय, किती, व कसे काम करतो याची काटेकोर चिकित्सा करत बसू नये. कार्यकर्ता या संबोधनाला आपण स्वत: पुरे पडतो आहोत की नाही याची काळजी त्या त्या सदस्यांनी करायची आहे.
विनाश्रमाचे घेणार नाही
प्रबोधिनीतील सर्व संगणक प्रणालीकार गरज पडली तर संगणक आणि तो ठेवलेले टेबल स्वच्छ करतील आणि संगणक वापरून तयार केलेल्या प्रणालीही सिद्ध करतील. ‘विना मोबदला श्रम नाही’ अशी एक शिकवण कळत न कळत समाजात सर्वांना मिळत असते. कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात वेतन, मानधन किंवा सेवा-शुल्क अशा पद्धतीने देणे ही आज सर्वांना समजणारी व रूढ पद्धत आहे. दोन शतकांपूव जहागिरी आणि वतने देण्याची पद्धत होती. पुढच्या शतकात वेगळी पद्धत असेल. त्यामुळे श्रमाचे मूल्य मिळाले पाहिजे ही अपेक्षा चूक नाही. श्रमाचा मोबदला घेणारे व न घेणारे संगणक प्रणालीकार आजही पाहायला मिळतात. ते सर्व कार्यकर्तेच आहेत. केवळ श्रमाचा मोबदला न घेण्यामध्ये कार्यकर्तेपण नाही. उलट श्रम केल्याशिवाय मोबदला घेणार नाही असे म्हणण्यात कार्यकर्तेपणाची पहिली पायरी चढणे आहे. शारीरिक कष्ट, मानसिक गुंतवणूक, बौद्धिक प्रयत्न हे सर्व श्रमच आहेत.
जिथे श्रम मोजायचे असतील तिथे त्याच्या मापात, जिथे श्रमाचे परिणाम मोजायचे असतील तिथे त्याच्या मापात, जिथे श्रमाचा परिणाम सातत्य आणि गुणवत्तेत बघायचा असेल तिथे त्या अपेक्षेनुसार, आधी श्रम करतो तो कार्यकर्ता. स्वीकारलेले काम वेळेवर, चोख, मन:पूर्वक, देखरेखीशिवाय, आठवणीशिवाय, आणि त्या कामाचा अपेक्षित परिणाम समजून घेऊन करणारा कधीही ‘विना श्रमाचे घेणार नाही’, तोच कार्यकर्ता.
विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळण्यासाठी ‘विनाश्रमाचे घेणार नाही’ हे सूत्र आवश्यक आहे. प्रौढ सदस्यांकरिता आपला आत्मसन्मान राखण्यासाठी आपण श्रम न करता फुकटचे काही घ्यायचे नाही, हे लक्षात ठेवण्यासाठी या सूत्राचा उपयोग होतो.
सौर फाल्गुन 1, शके 1928