“स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जोपासना सतत स्पर्धा जिंकत जिंकत झालेली असेल, तर समूहामध्ये वावरताना एकांडे शिलेदार तयार होतात. इतरांशी जुळवून घेत-घेत त्यांच्या गुणांना व क्षमतांना पूरक होत सर्वांनी मिळून यश मिळवण्यासाठी मनाची तयारी करणे, म्हणजे कार्यकर्ता होणे...”
समाजासाठी संघभावना
कार्यकर्ता प्रतिसादी आणि उत्तरदायी असला पाहिजे हे आपण यापूवच्या लेखांमधून पाहिले. प्रतिसादी असणं आणि दायित्वाची जाणीव असणं या मुख्यतः भावनिक विकासाशी निगडित गोष्टी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती आपण भोवतालच्या व्यक्तींना उत्तरदायी आहोत असं समजू लागते त्या वेळी त्या इतर व्यक्तींनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, ती काही पटावरची प्यादी नाहीत हे तिला समजतं. ही व्यक्ती समाजजाणिवेच्या, भावनेच्या, इच्छाशक्तीच्या स्तरावर सुघटित असते. या टप्प्याला व्यक्ती इतरांशी बुद्धी, हृदय आणि कृती या स्तरांवर संवाद करू लागते आणि सहकृती करू लागते. जागतिक स्तरावर उत्तरदायी लोकांच्या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा युनोच्या विविध शाखासंस्था आणि त्यांना उपलब्ध असलेली साधने यांतून प्रचंड कार्यऊर्जा आणि प्रभावशक्ती सध्या उत्पन्न होत आहे. परंतु सामान्य लोकांच्या हितासाठी या ऊर्जा आणि शक्ती एकवटण्याकरिता जी सहकार्यशीलता आवश्यक आहे ती मात्र अगदी मोजक्या ठिकाणी दिसते. कारण उत्तरदायी व्यक्तींमध्ये संवादाचा अभाव आहे.
काही वर्षांपूव पुण्यातील गिर्यारोहकांची एक नागरी मोहीम एव्हरेस्ट शिखरावरती गेली होती. सहा जणांनी एव्हरेस्टवर जाण्यासाठी बारा जण दोन वर्षे शारीरिक व मानसिक तयारी करत होते. त्यातून शेवटच्या सहा जणांची निवड झाली. परंतु इतर सहा जणांना त्याचे वैषम्य वाटले नाही. या बारा जणांची तयारी चालू असताना इतर अनेक जण मोहिमेसाठी लागणारे काही कोटी रुपये जमवत होते. साहित्य खरेदी करणे, त्याची तपासणी करणे, त्याची चाचणी घेणे, ते साहित्य पायथ्यापर्यंत घेऊन जाणे, मोहीम चालू असतानाची संदेशवहन यंत्रणा सांभाळणे, अशी सगळी कामे करणारे 100 जण तरी असतील. या सगळ्या मोहिमेचा प्रमुख होता, तो ऐनवेळी स्वतःहून मागे थांबला व इतर साथीदारांना त्याने एव्हरेस्टचा शेवटचा टप्पा सर करायला पुढे पाठवले. पुढच्या दोन-तीन वर्षांत त्यातल्या कित्येकांनी एव्हरेस्ट व हिमालयातील इतर अनेक शिखरे सर केली. ही नागरी मोहीम प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांसाठी सहयोगी असण्याचा एक वस्तुपाठ आहे. कारण त्यातले सर्वच जण स्वयंसेवी वृत्तीने काम करणारे होते. राष्ट्रघडणीसाठी अत्यंत कर्तृत्ववान, अत्यंत कार्यसमर्पित व्यक्तींनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असते. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे तिसरेे लक्षण हेच आहे की, तो सहयोगी अर्थात् सहकार्यशील असला पाहिजे.
संघभावनेसाठी सहयोगी असणे
ज्ञान प्रबोधिनीत नेतृत्व शिक्षणावर मोठा भर असतो. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते, की एकच व्यक्ती सर्व क्षेत्रांत नेतृत्व करू शकत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत नेतृत्वाची धुरा वेगवेगळ्या व्यक्तींकडे असू शकते. चर्चिलचे युद्धकालीन नेतृत्व इंग्लंडला मान्य होते. पण शांतता कालात ते अन्य कोणी तरी घ्यावे असा कौल इंग्लंडने दिला आणि चर्चिलने तो शांतपणे मान्य केला. आपणहून पुढाकार घेणे जितके महत्त्वाचे असते तितकेच ज्या व्यक्तीकडे नेतृत्व आहे तिला सुजाण साथ करणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी स्वतःची विचारशक्ती गहाण ठेवावी लागत नाही. मतभेद सौम्यपणे पण स्पष्टपणे व्यक्त करता येतात. मोठमोठ्या कार्यांना कर्तृत्ववान, विचारशील, प्रतिभाशाली अशा अनेक व्यक्तींचे संच लागतात. त्यांच्या कामात संघभावना (टीम स्पिरिट) असावी लागते. व्ङ्मक्ती-व्ङ्मक्तीङ्कधील आंतरक्रियांमध्ये प्रतिसादी असणं, नैतिक निर्णय आणि कृती जबाबदारीनं करणं, व्यक्ती आणि संस्था यांच्या सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी परस्परांनी सहकार्यानं काम करणं, या उत्तमतेच्या तीन मिती आहेत. इतरांबरोबर सहकार्य करणं, मित्र, सहकारी, परिचित, अपरिचित, प्रतिस्पर्धी या सर्वांचं सहकार्य मिळवता येणं हे सहकार्यशीलतेचे म्हणजेच सहङ्मोगी असण्ङ्माचे काही पैलू आहेत.
सहयोगी असण्याचे पैलू
संघटनेमध्ये एकत्र काम करत असताना अनेकांबरोबर सहविचार करायचा असतो. अनेकांची मदत घ्यायची असते. एकत्र संकल्प करायचे असतात. कधी एकत्र अपयश पचवावे लागते. काही वेळा आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याला द्यावे लागते, तर काही वेळा न केलेल्या कामातील अपयशाचे धनी व्हावे लागते. असे काम करणारे जे असतात त्यांना परस्पर सहकार्याने काम करणे जमू लागले असे म्हणता येईल. हे जमवण्यासाठी काही वेळा एकत्र पद्ये गाण्याचा उपयोग होतो. सगळ्यांनी मिळून सहलीला गेल्याचा उपयोग होतो. सगळ्यांनी एकत्र बसून जेवल्याचा उपयोग होतो. एकत्र प्रवास करताना सहयोगी असण्याची वृत्ती घडू शकते. एकमेकांच्या कामापलीकडच्या आयुष्यात रस घ्यावा लागतो. हे सगळे करताकरता अनेकांना एकमेकांच्या सहयोगाने काम करणे जमू लागते. काही जणांना या सगळ्याशिवायच सहयोगी बनता येते.
एखाद्या जोडीदाराबरोबर काम करताना किंवा गटात काम करताना सहयोगी असण्याची म्हणजे इतरांना सहकार्य करण्याची विशेष गरज असते. आपल्या अनेक प्रकारच्या वागण्यातून आपण इतरांना सहकार्य देऊ इच्छित असल्याचे व इतरांचे सहकार्य घेऊ इच्छित असल्याचे कळत असते. प्रत्येकाच्या छोट्याशा योगदानाची देखील दखल घेणे व त्याला दाद देणे यातून आपण सहयोगी असल्याचे कळते. स्वतःच्या मोठ्या योगदानाचाही कुणासमोर काहीच उच्चार न करण्यातही आपले सहयोगित्व दिसते. संकोचाने बाजूला थांबणाऱ्यांना चर्चेत किंवा कामात सहभागी करून घेणे हे सहयोगी असण्याचे लक्षण आहे. एखाद्या चालू कामात आपणहून ‘मी काय करू?’ किंवा ‘मी हे करतो/करते’, असे सांगणे व काही वेळा न बोलताच आपणहून चालू कामात सहभागी होणे, यातून आपण सहयोगी असल्याचे कळते. कामात नवखे सदस्य चुकल्यास त्यांना बरोबर कृती समजावून सांगणे, चालू काम अधिक चांगले करण्यासाठी सूचना करणे हे सहयोगी कार्यकर्ता सहजपणे करतो. दमलेल्या, थकलेल्या सहकाऱ्याला विश्रांती घ्यायला सांगून आपण त्याचे काम पूर्ण करणे हे सहयोगी कार्यकर्त्याला सहज सुचते. एकाच्या अनुपस्थितीत त्याचे दोष किंवा चुका इतरांना न सांगणे, इतरांची निंदा न ऐकणे, इतरांबद्दलची गैरचर्चा किंवा बाजारगप्पा (गॉसिप) आपण पुढे न वाढवणे व शक्यतो त्या थांबवणे, गटात कोणाचाही नामोल्लेख न करता काय चुकले आहे तेवढे सांगून सुधारणांबद्दल बोलणे, हे देखील सहयोगी असल्याचे लक्षण आहे. अनेक प्रकारचा अनौपचारिक संपर्क सहयोगित्व वाढवायला जसा उपयोगी पडतो, तसेच काम चालू असताना हे सर्व संकेत पाळणेही सहयोगी बनण्याला उपयोगी पडते.
स्वतःच्या प्रेयापेक्षा कार्याचे श्रेय मोठे
दैनंदिन कामातील सहकार्य आणि सहयोग आवश्यक आहे; परंतु एकत्र काम करताना इतरांच्या स्वभावाशी जुळवून घेणे जमावे लागते. तक्रार न करता स्वत: बदलणं किंवा शांतपणे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करीत राहणं हे जमवावे लागतेे. केवळ बोलण्या-चालण्याच्या पद्धतीतून कोणाच्या स्वभावाचे एकदम मूल्यमापन करायचे नाही हे शिकावं लागतं. तसेच दीर्घकाळ एकत्र काम करायचे असेल तर दर्शनी व्यक्तिमत्त्वाने प्रभावित न होता सहकाऱ्याचे अंतर्मन जाणून घेण्यासाठी चिकाटीने प्रयत्नही करावे लागतात. सहयोगी बनण्यासाठी हे सगळे करायला लागेलच.
सहकार्यशील व्यक्तीला स्वतःच्या गुण-दोषांची उत्तम जाण असायला हवी. आपण काय करू शकू आणि काय नाही याची उमज असायला हवी. आपण ज्या व्यक्तींबरोबर काम करतो त्यांच्याही गुणावगुणांची चांगली जाणीव असायला हवी. त्याचबरोबर हातात घेतलेल्या कार्याच्या आवश्यकता काय हेही दृष्टीपुढे सतत असायला हवे. त्या प्रकाशात, संचातील कार्यकर्त्यांच्या गुणांची व कर्तृत्वाची बेरीज कशी होईल ते ती पाहाते. व्यक्तिगत मोठेपणा, मानापमान, श्रेय या गोष्टींना ती काहीही किंमत देत नाही. पंडित नेहरू एका चर्चासत्रात डॉ. आंबेडकरांवर रागावले आणि त्यांना अपमानास्पद शब्द बोलले. डॉ. आंबेडकर हेही मानी होते, तरी त्यावेळी त्यांनी स्वतःचा क्षोभ होऊ दिला नाही. नंतर नेहरूंनी दिलगिरी व्यक्त केली तेव्हा ते म्हणाले, ‘राग तर मलाही येऊ शकतो. पण माझ्यामागे जो दलित समाज उभा आहे, त्यांच्यासाठी मी अशा प्रसंगी रागावता कामा नये. त्यांच्या हिताचे काम आपण सर्व मिळून करतो आहोत. त्यात अडथळा येता कामा नये म्हणून मी मौन राहिलो.’ व्यक्तिगत मानापमानांपेक्षा कार्याच्या हिताकडे लक्ष देणारा कार्यकर्ता चांगले सहकार्य करू शकतो. कामाच्या विभागणीत आपण अन्य कुणाच्या क्षेत्रात अकारण पाऊल घालत नाही ना, याविषयीही तो दक्ष असतो. परंतु कुठे न्यून दिसले तर गाजावाजा न करता हलकेच ते पुरे कसे करून घ्यायचे याची युक्ती त्याला माहिती असते. श्रेय घेण्यापेक्षा देण्यातला आनंद त्याला कळतो. आपली भूमिका आणि योगदान याबद्दलची स्पष्टता त्याला असते.
सहयोगातून ध्येयसिद्धी
भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायात दोन श्लोक आहेत. त्यांचे गीताईमधील भाषांतर वाचताना त्यांत परमेश्वराच्या भक्तांच्या वागणुकीचे जे वर्णन केले आहे ते ध्येयसिद्धी करू इच्छिणाऱ्या लोकांनाही लागू पडते हे कळते.
चित्तें प्राणें जसे मी चि एकमेकांस बोधिती |
ज्यांच्या चित्तामध्ये ध्येयाशिवाय अन्य कोणताही विषय नाही, ज्यांचा संपूर्ण दिनक्रम ध्येयसिद्धीसाठीच आखलेला आहे, जे परस्परांशी ध्येय अधिक स्पष्ट करून घेण्यासाठीच बोलत असतात,
भरूनि कीर्तनें माझ्या ते आनंदात खेळती ॥10.9॥
ज्यांना ध्येयाविषयी बोलताना नेहमीच आनंद व समाधान वाटते,
असे जे रंगले नित्य भजती प्रीतिपूर्वक |
असे नेहमी ध्येयाशी जोडले गेलेले आणि ज्यांच्या मनात केवळ ध्येयसाधनेचीच आवड आहे,
त्यास मी भेटवीं मातें देऊनी बुद्धियोग तो ॥10.10॥
त्यांना ध्येयसिद्धीसाठी एकमेकांशी जोडली जाण्याची बुुद्धी होते व अशा बुद्धीने एकत्र काम करून, ते आपले ध्येय त्यानंतर निश्चितच गाठतात.
सहयोगी बनण्यासाठी इतके मुळापासून प्रयत्न केले, तर आधी उल्लेख केलेली पथ्ये व कार्यपद्धती पाळणे खूपच सोपे जाईल. अशा पद्धतींनी सहयोगी बनलेले कार्यकर्ते कामाच्या आवश्यकतेप्रमाणे कधी गटातील सहयोगी सदस्य असतील किंवा आवश्यकतेप्रमाणे गटातील सर्वांचे सहकार्य मिळवून गटाचे नेतृत्वही करतील. सहकारी आणि नेता या दोन्ही भूमिका सहयोगी कार्यकर्त्याला प्रसंगानुरूप बजावता आल्या पाहिजेत.